लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने)-१
हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.
लोणावळा
प्रवास (थोड्या विनोदी अंगाने)
विशेष सूचनाः
१.या लेखातील एकही पात्र काल्पनिक
नाही.त्यामुळे कुठ्ल्याही प्रसंग अथवा व्यक्तीचे वास्तवाशी साध्यर्म आढळल्यास हा निव्वळ
योगायोग न समजता ती प्रस्तुत लेखकाला आपल्यासोबत लोणावळ्याला येउ दिल्याचे प्रायश्चित्त
समजावे.
२.प्रस्तुत लेखकाला यापूर्वी लेखनाचा
कुठलाच अनुभव नसल्याने जे पदरात पडेल त्याला गोड माणून लाईक करा.
जुलै
महिन्याच्या अगदी सुरुवातीला मनीषचा मला फोन आला. काय? कोण मनीष? आता हे वाक्य २८ जुलै
च्या आधीच्या आठवड्यात म्हणायची हिम्मत होती का तुमची? झालं, म्हणजे विसरलात
ना ? मनीष म्हणजे आपला मनीष पाडळकर हो. हा हा तोच ज्याला रियुनियन चावली होती न तोच
! हो ज्याच्या मेहनतीच्या छाताडावर आपण सगळे धपाधपा नाचलो,खदाखदा हसलो,ढसा
ढसा प्यायलो, शेवटच्या पाचशे रुपयासाठी ज्याला आपण फक्त रडवायचे बाकी ठेवलं ना ,तोच
मनिष पाडळकर. तर ह्या मनीष चा मला फोन आला.`नानक्या अबे १० वी च्या ब्यॅच च्या
रियुनियनच काही समजले का ?मग येतोयस ना?'.नाही म्हणायचा तसा प्रश्नच नव्हता.तरी
कुठेही मी पटकन हो म्हंटलं तर ती गोष्ट माझ्याकडून पूर्ण झालेली नाही हा एक पूर्वानुभव
लक्षात घेऊन मी सावध पावलं उचलत ` नक्की ट्राय करीन' असा पवित्रा घेतला.(आणी तसेही
युनियन वगैरे शब्दांना आमच्यासारख्या छोटी मोठी कंपनी चालवणा-यांना खूप विचारपूर्वकच
होकार द्यावा लागतो.)
नंतर
रियुनियनची जागा ठरली.लोणावळ्याचे नाव ऐकून पोटात गप्पकन गोळा आला .नुकतेच एका मित्राकडून
लोणावळ्याचे या सिझन मध्ये हॉटेल बुकिंगस आणि त्याचे दर याविषयी कथा ऐकल्या
होत्या.पोटातला गोळा बहुदा ते दर आठवून गोळा झाला असावा. आणि मग नंतर चार्जेस ठरले.
चार्जेस ऐकून मला आपल्या मारुती ८०० ने दुसऱ्याच्या मर्सिडीझ चे समोरचे
डम्पर चेपावे व त्याने आपल्याकडून टायर च्या हवेचे पैसे वसूल करावे असे वाटले.या
सिझन मध्ये लोणावळ्याला ३००० रुपये खरच चांगली किंमत होती.
तोवर
फेसबुक च्या मेसेजेस ला उत आला होता. रियुनियनच्या बातम्यांनी फेसबुक अक्षरशः
फेस येइस्तोवर ढवळून निघाले होते.वातावरण सॉलिड तयार झाले होते.पैसे भरण्यासाठी अकौंट
नंबरही आला आणि नंतर दोन दिवसांनी २०-२२ चक्क पैसे भरलेल्या मुलांची लिस्ट मनीष नि
अपलोड केली.
मकरंद कुलकर्णी,टाकळकर व इतर अनेक मित्रांचे फोन,मेसेजेस आले.तोवरही मी कन्फर्म केलं
नव्हतं.मग नंतर `तू येणार नसशील तर मी पण जात नाही' अशा प्रेमी युगुलालाही
लाजवणारा-या संवादांची देवाण घेवाण झाली.मग शेवटच्या २-३ दिवसात मी मनीष ला फोन
करून मी पैसे अकौंट ला टाकत असल्याचा निरोप दिला.अर्थात तो शांतपणे ऐकल्यावारही
त्याने पैसे टाकलेस कि पुन्हा फोन कर असा निरोप देवून इतकी वर्ष प्रामाणीकपणे
जपलेल्या स.भू.बाण्याची आठवण करून दिली.
२६
तारखेला संभाजीच्या ऑफिसवर संध्याकाळी मीटिंग झाली.त्याचा मूळ मुद्दा नाव नोंदवूनही
पैसे न भरलेल्या मुलांचा फौलो उप हा होता. का कोण जाणे पण हा एकंदरीत विषयच खूप ओळखीचा
वाटला. संभाजीने १० वी फ च्या राहिलेल्या मुलांचे पैसे भरताना दाखीवलेले औदार्य पाहून
मी मनीष कडे `बघ लेका! नाही तर तू.'असे शक्य तेवढे तुच्छतेचे भाव आणत काही बोलणार इतक्यात
मिहीर राउत चे आगमन झाले.मिहीरची तुडुंब भरलेली शरीरयष्टी पाहून मला काही उद्गार काढायचा
झालेला मोह मी आपण स्वतः हि आता तब्बल ७० किलो वजन राखून आहोत या विचारांनी माझ्या
लोंबलेल्या उदरात ढकलून टाकला.
तेथे
जमलेल्या सगळ्यांमध्ये एकट्या संभाजीची फिगर मेनटेन होती. म्हणजे मकरंद कुलकर्णी,मनोज
निंबाळ्कर,मिहिर राऊत,योगेश जहागिरदार आणी अस्मादिक यांचे देह वयाच्या सम प्रमाणात
तर संभाजीचा देह वयाच्या व्यस्त प्रमाणात वाढला आहे असले काहीशे भौमितिक(का बिजगणीतीय?)
विचार माझ्या मनाला चाटुन गेले.पण ही भुमिति
इथे संभाजीच्याच ऑफिसमधे बोलून दाखविणे म्हणजे आपलाच भुगोल बिघडून घेण्यासारखे होते.
दुस-या
दिवशी म्हणजे २७ तारखेला कोण कोणाच्या खांद्यावर लादले जाणार म्हणजेच कोणी कोणाला
वाहुन न्यायचे ते ठरले.तोच मुद्दा प्रत्येकाच्या अजेन्डा वर होता.त्यात पुन्हा
आपआपले ग्रुप्स होते,सवयी होत्या (??)आवडीनिवडी होत्या,पुर्वानुभवावरून आलेले `अरे
तो नको गाडीत बोर करेल' असे मौलिक विचार होते. मग शेवटी कमीतमी गाडी चालवणारा लोणावळ्या
पर्यन्त सर्वांना सुखरुप पोहोचवण्याच्या परिस्थितीत असावा असा किमान कौशल्याचा निकष
लावुन अस्मादीकांची वर्णी निलेश दहाड,अजय काळे, मकरंद कुलकर्णी
यांच्या सोबत लागली.
सकाळी
०५.३० ला सर्वांनी औरंगाबाद सोडले पाहिजे अशी आज्ञा मनिष ने केलेली होती.आणी घरात लग्न
कार्य काढल्यावर जसे घरातल्या चिल्ल्या पिल्ल्या पासून ते पेन्शनर्स पर्यंत व झाडू
केरसुण्यांपासुन ते श्वान श्वापदांपर्यंत सर्वांना घरातल्या कर्त्या पुरुषाचे ऎकावे
लागते त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी मनीष चे आज्ञापालन करायचे ठरवले.वास्तविक सकाळ्चे
०५.३० कशे वाजतात हे मला अजिबात माहिती नाही. कोंबडे,सूर्य वगैरे मंडळींना आपली सकाळ्ची
कामे करतांना डिस्टर्ब करणा-यातला मी नाही.अहो सकाळच्या गजर लावलेल्या मोबाईल अलार्म
लाही २-३ वेळेस स्नूझ वर वाजू देऊन पुर्ण संधी देणार्यांपैकी मी आहे.निलेशच्या `यार
०५.३० फार लवकर होतं,आपण ०७.३० ला निघू यात’ या उद्गारांनी सूर्यवंशी नसणा-यातला मी
एकटाच नाही हे सिद्ध झालं.
गजर
लावलेला मोबाईल रात्रीतून डिसचार्ज होण्याचा आमचा इतिहास सौ.ना ठाऊक असल्याने तिने बौद्धीक चपळता दाखवत दुस-या मोबाईलवर अलार्म
लावला.पण नेहेमीप्रमाणे मला जाग अलार्मच्या आवाजाने न येता
`अहो
उठा!जायचय ना लोणावळ्याला?स्वतःच्या जिवाचा लोणावळा आणी आम्ही आपले धुणी धुवा आणी उष्टी
काढा’ या काव्यपंक्तींनी आली.आता हा निश्चयी कणखर आवाज माझ्या बायकोचा होता हे सुद्धा
मलाच तुम्हाला सांगावे लागणार असेल तर मग तुम्ही परिक्षेत नुसतेच उत्तरं च नाही तर
रोल नंबर आणी स्वतःचे नाव सुद्धा समोरच्याच्याच उत्तरपत्रिकेतले कॉपी करत होता असं
मला म्हणावं लागेल.
क्रमशः
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home