Friday, January 18, 2013

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -२


 हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -२
विशेष सूचनाः
१.ज्या वाचकांनी याआधील भाग-१ वाचला नाही त्यांनी तो ऑप्शन ला न टाकता आधी पूर्ण वाचावा, त्याला लाईक करावे व मग ह्या भागाला हात घालावा(लाइक करण्यासाठी).तसे न केल्यास आजूनही या लेखाचे काही भाग शिल्लक असल्याचे विसरू नये.वर्णन करण्यासारखे अजून खुप शिल्लक आहे.
२.प्रस्तुत लेखकाला आता भाग-१ लिहीण्याचा अनुभव आला आहे.आणी समान विनोद निर्मीती प्रत्येक भागात करणं तोंडचा खेळ नाही हे समजत आहे.तरी फार जास्त अपेक्षा न ठेवता प्रत्येक ओळ रसग्रहण करत आरामात वाचावी.घाईघाईत भाग-१ वाचून विनोद न समजल्यामूळे परंतु काही प्रेमळ,सदगुणी,विचारी,रसिक  आणी ऋषीतुल्य वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून विनोद झाला असल्याची शंका आल्याने मला काहींचे `विनोद अधोरेखित करुन दिल्यास आम्हालाही हसता येईल’ असे निरोप आले आहेत.हा प्रस्ताव विचाराधीन आहे.अशा वाचकांची संख्या पाहून निर्णय घेण्यात येइल तोवर सबूरीने घ्यावे.

एक दिवसाचा मुक्काम असल्याने छोटे कपडे (ज्याला सामान्य लोक चड्डी/बनियानही म्हणतात) ,नुसतेच छोटे कपडे घालून चार चौघात बरं दिसणार नाही म्हणून मोठे कपडे, ओल्या अंगावर तसेच कपडे घालायची रीत नसल्याने मग अंग पुसायचा टॉवेल,वरचेवर वाढत्या कमरेचा घेर मॅच करण्यासाठी घेतलेल्या एक नंबर मोठया पॅंटी सैल असेस्तोवर लागणारा कंबर आवळण्यासाठीचा पट्टा, आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे ह्या सर्व जिनसा हातात मावेनात म्हणून मग एक बॅग घ्यायचा एक महत्वपूर्ण निर्णय मी सौभाग्यवतींच्या कुशल मार्गदर्शनाखाली घेतला. आता ही बॅग  गडद भगव्या कलरची माझ्या हातात देण्यात आली.माझा शर्ट गडद निळ्या रंगाचा,माझी पॅंट पांढ-या रंगाची होती.आता कमी फक्त गडद हिरव्या रंगाची होती.तो तेवढा असला म्हणजे मी देशभक्तीपर गीताच्या मागे लावायचा ड्रॉप म्हणून शोभलो असतो असं मला वाटायला लागलं.मग ब-याच वाटाघाटींनंतर त्या बॅग चा कलर भगव्यावरून  गडद लाल वर सेटल करण्यात मला यश मिळालं.
नंतर इतकी घाई झाली तयार होण्याची की विचारू नका.ब्रश करणे, आंघोळ करणे ह्यात पुष्कळ वेळ गेला.आदल्या दिवशी फोनवर बोलतांना विन्या कुलकर्णी म्ह्टला होता `यार इतक्या सकाळी निघायच तर परसाकडे जाण्याची सोय रस्त्यातच बघावी लागेल’.वेळ वाचावण्यासाठी माझ्याही मनात ह्या घोर लालची विचारांचे थैमान माजले.पण शेवटी निसर्गा(च्या दबावापुढे)पुढे माझे चालले नाही.(आणी ह्याबद्दल माझ्या गाडीतल्या इतरांनी निसर्गाचे आभार मानावे.)
मी पुर्ण तयार झालो तेव्हा सकाळचे ०५.३५ झालेले होते.जग जिंकल्याच्या अविर्भावात मी गेट मधे येऊन उभा राहीलो.माझी अशी अपेक्षा होती की इतर मंडळी फक्त मी बाहेर येण्याची वाट बघत असतील.पण तसला काही चमत्कार पहायला मिळाला नाही.मी तावातावाने मकरंद ला फोन लावला असता तो मी अमरप्रितपाशी निलेश ची वाट पहात उभा आहे असे म्हणाला.पण त्याच्या फटफटीच्या स्टार्ट होण्याच्या आवाजावरून स्वारी घरून नुकतीच निघत  असल्याची कल्पना माझ्या चाणाक्ष मनाला आली.निलेश हा अजयच्या घराबाहेर १० मिनीटांपासून वाट पहात असल्याचे म्हणाला पण का कोण जाणे फोन ठेवतांना बायकोला उद्देशून `म्हारो पाकीट कठो गयो?’ असं काहीसं बोलल्यासारखा वाटला.आता उरलेल्या अजय काळे ला फोन करण्याची हिम्मत झाली नाही.अर्ध्या रस्त्यात आहे म्हणतांना बॅकग्राउंड ला फ्लश चा आवाज ऎकण्याची माझी इच्छा नव्हती.या सगळ्यात निलेश त्याचे पाकीट सोबत आणत आहे ही एक(गोड) धक्कादायक गोष्ट अनावधानाने समोर आली.
ह्या सगळ्या गडबडीत टॉमी माझ्या या सगळ्या येरझा-या शांत चित्ताने मनोभावे बघत होता.आता टॉमी,वाघ्या,मोती ही नावे पुरूष जातीच्या श्वानांनी जवळ जवळ पेटंट केल्यासारखी असल्यामुळे टॉमी हा माझा पामेरियन कुत्रा आहे हे एव्हाना तुम्हाला लक्षात आले असेल.अर्थात एखाद्याच्या फक्त नावावरुन तो कुत्रा आहे वा नाही हे मात्र खात्रीलायक सांगता येत नाही हे मी तुम्हाला अनुभवावरुन सांगू शकतो.कारण आमच्या एका घरमालकाच्या चिरंजीवांनी उत्साहाच्या भरात आपल्या १.५ फुट् बाय १ फुटी, खाली शेपटी घातलेल्या,मरतुकड्या,काना खालच्या पिसवा घसा घसा खाजवणा-या,कायम चारही पाय गमबुट लावल्याप्रमाणे चिखलात भिजलेले असणा-या, फक्त एका डोळ्याला गावगुंडासारखे निसर्गतः काळं वर्तुळ असणा-या आपल्या प्राणप्रिय गावठी कुतरड्याचे नाव थेट अमिताभ बच्चन ठेवल्याचे मी याची देही याची डोळा पाहीले आहे.एवढे करुन ते चिरंजीव थांबले नाहीत तर त्याला शक्य तितकी घाणेरडी चार ठिकाणी जोड असणारी सुतळी लावून पुर्ण कॉलनीत ` अमिताभ बच्चन यू यू यू’ अशा आरोळ्या ठोकत फिरवले होते.त्यावेळेसही अमिताभचा प्रचंड मोठा फॅन असलेल्या व त्या कुत्र्यापेक्षा फार तर एखादा फुटाने उंची जास्त असलेल्या माझ्या कोवळ्या जिवाला हा घोर अपमान सहन न होऊन मी थेट घरमालकाविरुद्ध बंड पुकारत घर सोडण्यासाठी घराच्या गेट मध्ये येउन उभा राहिलो होतो. पण आमच्या बाबांनी कुत्र्यासाठी घर सोडणार असशील तर घरासाठी तुला सोडू हे सांगितल्याने मी वार्डाची निवडणूक हरून आपल्याच वार्डातील घरात वापस येतांना पराभूत उमेदवाराचे होत असतील ते कष्ट सहन करत घरात आलो. पण पुढे याच अमिताभ ने त्या मुलाच्या पुस्तकाची पुर्ण पाने चविने वाचली,त्याच्या पॅंटी (म्हणजे त्या मुलाच्या) वारंवार रफू च्या दुकानावर जाउ लागल्या,एका अखंड पायपुसण्याचे अनेक छोटे छोटे हातरुमाल तयार झाले,एका चांभाराचे दुकान आरामात चालेल एवढे चपलांचे जोड रिपेअर ला जाऊ लागले.इथे खुप चांगला धंदा मिळतो असे वाटून त्या स्पॉट साठी इतर `चांभार’चौकश्या सुरू झाल्या.अमिताभ ने अंगणात केलेल्या मलविसःर्जनाचा जिन्नस रोज झाडायला येणा-या बाई च्या सहनशक्तिच्याबाहेर गेल्याने तिने या कामासाठी वेगळा भंगी लावण्याचा मोलाचा सल्ला दिला.आणी सगळ्यात कहर म्हणजे घरमालकीणीने बाहेर मिठ,लिंबू लावून वाळत ठेवलेल्या एक किलो बडीशेपीची चव अमिताभला खुप आवडल्याने त्यानी ती एका दमात फस्त केली व आजून घरात काही बडीशोप असल्यास द्या या थाटात मालकीणीसमोर येउन शेपटी हलवत उभा राहीला.ह्या सगळ्या अभ्यासक्रमाबाहेरच्या उपक्रमांना कंटाळून शेवटी मालकानी अमिताभ ला रात्रीतून लांब कुठेतरी मुलाच्या नकळत सोडून येण्याचा गनिमी कावा साधला.
तर हो मुळ मुद्दा हा की  टॉमी माझ्या या सगळ्या येरझा-या शांत चित्ताने मनोभावे बघत होता.प्रातःविधी तिथल्या तिथे न करण्याची शालीनता त्याचात असल्याने तो मधुन मधुन हलकी कुइ कुइ करत माझे लक्ष वेधुन घेत होता.ह्ळू ह्ळू त्याचे गुरगुरणे सुरु झाल्याने मी अधिक वेळ न दडवण्याचं ठरवलं आणी त्याला फिरवून आणण्यासाठी बाहेर घेउन गेलो.परत घरापाशी पोहोचतांना परममित्रांचे त्रिकूट एकदाचे पोहोचले आणी मला कुत्र्यासोबत पाहून निलेशनी `तु त्याला नेलं होतंस की त्यानी तुला?’ असा खोचक टोला मारून विनोदनिर्मीती करायचा केविलवाणा प्रयत्न केला.गधड्या उद्या एखाद्या चोराला हातकडी लावून घेउन जाणा-या पोलीसाला पाहून चोराला विचारशील `कुठे सापडला तुम्हाला हा पोलीस?लबाडाच्या मागच्या महिन्यापासून मागावर होतो.पासपोर्ट पोलीस व्हेरिफीकेशन ला मीच ह्याच्या (दोन्ही) घरी चार दा जाऊन आलो.’  असो.मी निलेश च्याच गाडीत बसणार असल्याने मी तो टोला पचवला आणी आमचा एकदाचा प्रवास सुरू झाला.
क्रमशः

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home