Friday, January 18, 2013

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -३


हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -३
विशेष सूचनाः
१.      भाग-१ व २ वाचवल्यावर हा भाग-३ वाचल्यास प्रस्तुत लेखकाला वाचकवर्ग वरचेवर वाढत चालल्याचा आनंद मिळेलच त्याचबरोबर आपल्यासोबत इतर मित्रमंडळींचीही हळूहळू खेचली जात असल्याचे पाहून आपणास एकटेपणा वाटणार नाही.
२.       अनेक वाचकांच्या व मित्रांच्या `खुप छान लिहीता,तुमच्याकडे बघुन वाटत नाही हं’,`ठीक आहे’,`बरं आहे’,`मस्त आहे पण विनोद अजिबात समजला नाही’,`तोच तोच पणा वाटतो’,`आता पुरे करा,लवकर लवकर पुढे सरका नाहीतर पुढच्या रियुनियन पर्यंत भाग चालतील’,`च्यायला ह्या नानक्याच्या तोंडावरची माशी उडत नव्हती कधी काळी’,`आजकाल काम कमी दिसते कंपनीत’ अशा खूप विवीध व बोलक्या प्रतिक्रीया कळाल्या आहेत.त्या सर्व आपल्या (माझ्या) साहित्यावरच्या प्रेमाचा कळकळा समजून(आणी तसेही `कविता’ काय आणी `विनोद’ काय प्रसवतांना `कळा’ ह्या येणारच हे समजून) पॉसीटीव्हली घेतल्या आहेत.काहींनी `आपल्या सौभाग्यावतींना प्रत्येक भागात स्थान देण्याचा उद्देश त्यांच्या भितीपोटी की आदरापोटी?’ असे खोचक प्रश्न सार्वजनीक ठिकाणी विचारून आम्हाला अडचणीत आणले आहे.पण सौभाग्यवतीं(नी कटकट केल्या) शिवाय आमचे पानही हलत नसल्याने ( व प्रत्येक लिहीलेला भाग त्यांना विनोद्बुद्धी नसली तरी स्वतः च्या झालेल्या उल्लेखामुळे चवीने वाचता यावा हा उदात्त विचार ठेवून) प्रत्येक पानावर त्यांना आदरापोटी स्थान देण्याची सोय केली आहे.
(वरील सर्व कंसातले वाक्य सौं चे या लेखाचे वाचन झाल्यानंतर टाकून मी पुरूषसुलभ हौशार्य दाखविले आहे.)

आता पुढे…
निलेश ने गाडीचा पहीला गियर टाकला आणी ती जसा एखादा घोडा `ई ही ही’ करत चारही खुरांवर उधळतो त्याप्रमाणे कार चारही टायर्सवर उधळली.आता पुढचे पाच – सहा तास अशाच पद्धतीने हिमालीयन कार रॅली चा थरार अनुभवायला मिळणार हे नमनालाच लक्षात आले. समर्थनगर पासून बाबा पेट्रोल पंपापर्यंतचा प्रदीर्घ प्रवास आम्ही करत नाही तोवर पहिला स्टॉप कर्णपुरा मैदानात घ्यायचे फर्मान वरिष्ठांकडून(मनिष्ठांकडून) आले.आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा तिथे आधीच एक तब्येतीने भरगच्च अशी तवेरा सारखी गाडी लागलेली होती.त्यातून चार इसम बाहेर आले.त्यातला एक हर्षल देशपांडे हा हुबेहूब हर्षल देशपांडेसारखाच दिसत होता.म्हणजे त्याने लहानपणापासून कमावलेली अतिरीक्त चरबी त्याने या वयातही टिकवल्याची एक विजयी मुद्रा त्याच्या चेहे-यावर होती.आनंद औढेकर मला लहानपणीचा आठवत नाही पण त्याच्या चेहे-यावरचा आजच्या उपक्रमाविषयीचा उत्साह तो आमच्यासोबत दहावीला असल्याचे स्पष्ट दाखवत होता.महेश अरगडे हा पहाटे पहाटे काळा गॉगल लावून `डॉन को पकडना मुश्कीलही नही नामुम्कीन है’ असे डायलॉग म्हणणा-या टोळीतील आजीव सदस्य वाटत होता.आणी मिहीर राऊतचे अस्तित्व चार जणांसाठी हर्षल ने घेतलेल्या इतक्या मोठ्या गाडीला न्याय देत होतं.
१०-१५ मिनटे हास्य कल्लोळ झाल्यानंतर आपण इथे का थांबलो आहोत हा मूलभूत प्रश्न उपस्थीत राहिला व कुणालाही त्याचे उत्तर सापडेना.  आनंद व इतर डॉक्टर मित्रांची व मनिष ची गाडी येत असल्याने सर्व सोबत निघावे म्हणून हा थांबा होता असा एक सर्वमान्य तोडगा निघाला.तेवढ्यात सचिन टाकळकर ला अचानक `कळा’ सुरू झाल्याची (गोड)धक्कादायक बातमी आली.आता माझ्याशी आदल्या दिवशी संध्याकाळी बोलताना त्याची `ती वेळ’ इतक्या जवळ आली आहे ह्याचा त्याने मला अजिबात थांगपत्ता लागू दिला नाही. अशा `अवघडलेल्या’ अवस्थेथही तो लोणावळ्याला येण्याचा विचार तरी कसा करू शकतो याचे मला (म्हणजे आमच्या सौ.ला) प्रणव झाला त्यावेळी झालेला त्रास आठवून आश्चर्य वाटले.सचिन ने तिसरा चान्स घेतला वगैरे विचार माझ्या मनात घर करत असतानाच ह्या कळा `त्या’ नसून किडनी स्टोनच्या आहेत असा तांत्रिक खुलासा मकरंद ने केला.आमचे आनंदराव व इतर डॉक्टर मित्र त्याच्यासोबत असून त्याच्या परिस्थीतीत वर लक्ष ठेउन आहेत हे ही समजले. मित्रांच्या या सहकाराने गहिवरून येउन `फ्रेंड इन निड इस अ फ्रेंड इनडीड’ वगैरे इंग्रजी वाक्य माझ्या हळव्या मनरूपी आळूच्या पानावर तरंगले.माझा भावनांचा बांध मैत्रीच्या पूरात मोकळा होणार एवढयात आनंद व इतर डॉक्टर मंडळी आमच्या बरीच पुढे असून लवकरच नाश्ता करण्यासाठी योग्य चवदार स्थळ शोधत असल्याचे समजले.मी फुटणा-या बांधाला रागाच्या फावड्याने ताबडतोब आवर घातला व सचिनसोबत डॉक्टर सचिन काळे ,मनिष व विनायक कुलकर्णी हे असून सचिन ला पद्मावती मध्ये सुई टोचून पुढे कुच करत असल्याचे वृत्त आले .जीव भांड्यात पडून आम्ही एकदाचे औरंगाबाद सोडले. (आता कुठल्या भांड्यात हे विचारु नका कारण मी,हर्षल,मिहीर,औंढेकर,मकरंद व अजय ही टरबूजं आणि झालचतर निलेश व अरगडे हे लिंबू,टिंबू या सगळ्या फळफळावळांचा जीव मावेल अशा भांड्याचे नाव माझ्या कल्पनेच्या पलिकडचे आहे.)
गाडी जेमतेम ए.एस.क्लब पर्यंत आली असेल.तेथे एका पेट्रोल पंपावर निलेशने गर्रकन वळवून लावली व `अरे लबाडांनो, संपवलेत ना बसल्या बसल्या माझे डिझेल?’ अशा भावनेने बघत डिझेल संपले ही घोषणा केली.`१२०० का भरो’ असे पंपवाल्या काकांना सांगत त्याने अशा काही `पैसे निकाल’  नजरेने माझ्याकडे पाहिले की मी गुपचूप पाकीटात हात घालत(स्वतःच्या) पैसे काढले.इतका वेळ सुतकी चेह-यात असलेला निलेश अचानकच खुलला व त्याने पुढे गाडी पिटाळली.मी पैसे दिल्यावरही बील स्वतःकडे ठेवायला मात्र तो विसरला नाही यावरुन ही गाडी त्याला ऑफिसने डिझेल खर्चासकट आंदण दिली असावी हे मी हेरले.
सकाळच्या त्या धुंद वातावरणात सुंदर उदबत्तीचा मंद सुवास आणी सी.डी. प्लेयर वर पहाटेची भक्तीगीतं लागली की प्रवासात मन कसं प्रसन्न होतं.ड्रायव्हर ने गाडी चालवावी व आपण शांतपणे डोळे मिटून `म्हणे होनाजी देह हा वाहीला,   सांगा मुकूंद कुणी हा पाहीला’ ठेक्यावर गुणगुणत प्रवास करावा यासारखं दुसरं सुख नाही.पण निलेशनी हे काय आणि इतर कुठचेही सुख आम्हाला उपभोगणे सोडा शिवूही द्यायचे नाही हे जणू ठरवलेलेच होते.त्याच्या गाडीत सी.डी.प्लेयर होता पण त्यात सी डी नसल्याचा साक्षात्कार घडला व पुन्हा एकदा त्याने माझ्याकडे पुन्हा `निकाल सीडी’ या नजरेने पाहिले.आम्ही आमच्या पॅंटीच्या खिशात साध्या सीडीजही कोंबुन आणल्या नाहीत हे समजल्यावर ज्या काही हीन भावनेने त्याने आम्हाला पाहिले , अगदी तसेच ,इंजीनीयर असून साधे रेल्वेचे इंजीन बापाला चालवता येत नाही हे समजल्यावर आमच्या चिरंजीवांनी आमच्याकडे पहिले होते. आता गाडीत डिझेल काय तर सी डीजही आपल्याच खर्चानी टाकायच्या आहेत याचा आम्हा पामरांना अजिबात अंदाज नव्हता.गाडी आंदण देताना कंपनीने निलेशला फक्त गाडीची चासीस दिली असावी व इतर गोष्टी म्हणजे बॉडी, दरवाजे,खिडक्या,काचा,सीटं, सीट बेल्ट , सीट कव्हर,सी डी ज, वायपर, दिवे, , नटं,बोल्टं,पान्हे,स्क्रू ड्रायव्हर,पकडी , फुट रेस्ट मॅटींग,साइड मिरर,मड फ्लॅप,फॉग लॅंप,लॉन्ग ऑन ,लॉन्ग ऑफ,मिडॉन,मिडॉफ,स्क्वेअर लेग झालचतर टायर,स्टेपन्या व त्यातली हवादेखील जाता येता पॅशींजर भरून, त्यांच्याकडून स्वकर्तुत्वावर भरावयास सांगितली असावी अशी पुसटशी शंका मला आली.व वर्षभरात कोण किती पार्ट्स गाडीला ऍड करतो यावर त्यांचे प्रमोशन ठरते ही एक आतल्या गोटातली पक्की खबर आहे.(पुढील तपास पत्रकार मकरंद कुलकर्णी करत आहेत.)
थरथरत्या हातांनी मी माझ्याकडे असलेला एक पेन ड्राईव्ह ,जो मी का बरोबर घेतला असावा हे सांगता येणार नाही, काढून दिला.अजय समोर बसला होता त्याने तो माझ्या हातातून जवळ जवळ ओढून स्लॉट मध्ये ढकलला.ब-याच वेळ वाट पाहिल्यावर त्या प्लेअर ने `रीड एरर’ असा मेसेज छापला.`माझ्या गाडीत हलके पेन ड्राईव्ह चालत नाहीत’ असे उदगार निलेश ने काढले. त्यावर `साधं mp3 वाचता येत नाही,निरक्षर माठ कुठचा’  अशी शिवीगाळ माझ्या पेनड्राईव्हने  प्लेयर ला पाहून  केली असावी कारण बाहेर काढल्यावर तो गरम झालेला होता.
इतका वेळ म्हणजे पेट्रोल पंपावर गाडी लागल्याचा सुगावा लागल्याबरोबर झोप लागलेला मकरंद अचानक जागा झाला व त्याने त्याच्याकडील पेनड्राईव्ह `भक्तीगीतं आहेत’ म्हणून काढून दिला.प्लेयरशी युगा युगांची नाती असल्यासारखा तो लावल्या लावल्या चालू झाला.` `वर ढगाला लागली कळ ,पाणी थेंब थेंब गळं’ ही कविता भक्ती गीत श्रेणीत येत नसून ते एक निसर्ग वर्णन असलेले पण वीर रसाने भरलेले स्फुर्तीगीत आहे हे पूर्ण कवीता चवीने ऐकल्यानंतर सर्वानुमते ठरलं.त्यातील ` एका झटक्यात होईल तिळं’ ह्या काव्यपंक्तींमध्ये जी अचाट इच्छाशक्ती,क्रयशीलता व उद्योजगता कवीने दाखवली आहे त्याचा विशेष उल्लेख झाला. नंतर त्या पेनड्राईव्ह मधून अगम्य म्हणजे ज्याला आपण मराठीत कर्नाटकी संगीत म्हणतो तसले काहीसे बाहेर पडायला सुरुवात झाली. मकरंदची मराठीनंतर कानडी वृत्तपत्रात काम करण्यासाठीची चाललेली ती पुर्वतयारी असावी असा कयास बांधून आम्ही ती सहन केली.कानडीची ही मराठी मातीत चाललेली घुसखोरी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नापेक्षाही जास्त तीव्र झाल्याने शेवटी नाईलाजाने आम्हाला त्यावर प्रतिबंधांत्मक कारवाई करून प्लेयर बंद करावा लागला.



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home