Friday, January 18, 2013

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -४

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -४


विशेष सूचनाः
१. या लेखाचे याआधीही तीन भाग झाले असल्याने ते आधी न वाचता सरळ चौथ्या भागाला हात घालून काहीही समजलं नाही असा गलका करून लेखकाची मानहानी करू नये.

२. भाग-३ मध्ये काही चतुर वाचकांना `एका झटक्यात होईल तिळं’ ही काव्यपंक्ती लिहीतांना तांत्रीक चूक झाल्याचा आभास झाला आहे कारण मुळ कवीतेमध्ये ती ओळ`एका वर्षात होईल तिळं’ अशी आहे.पण मतितार्थ न बदलता विनोदनिर्मीती साठी लेखक असे स्वातंत्र्य घेत असतो हे यापुढे असले आभास होतांना लक्षात घ्यावे.

३. काही परममित्र वाचकांनी भावनेच्या भरात आमची तुलना पु.ल.देशपांडे ह्यांच्याशी केली आहे ते निव्वळ आमच्या प्रेमापोटी हे आम्ही जाणतो.अन्यथः पु.लं च्याच स्टाईलने सांगायचे तर, ` या पी.पी.ची तुलना पी.एल.शी करणं म्हणजे गांडु ळा ला शेष(नाग) म्हणण्यासारखे आहे.’(यातील प्रत्येक शब्द पुर्ण न वाचता अश्लील लेखनाचा आरोप लावू नये.)

नंतर त्या पेनड्राईव्ह मधून अगम्य म्हणजे ज्याला आपण मराठीत कर्नाटकी संगीत म्हणतो तसले काहीसे बाहेर पडायला सुरुवात झाली. मकरंदची मराठीनंतर कानडी वृत्तपत्रात काम करण्यासाठीची चाललेली ती पुर्वतयारी असावी असा कयास बांधून आम्ही ती सहन केली.कानडीची ही मराठी मातीत चाललेली घुसखोरी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नापेक्षाही जास्त तीव्र झाल्याने शेवटी नाईलाजाने आम्हाला त्यावर प्रतिबंधांत्मक कारवाई करून प्लेयर बंद करावा लागला.

आता पुढे…

इतक्यात माझा फोन खणाणला.इतक्या सकाळी कोणाला माझ्याशी `तोंड’ लावायची इच्छा झाली ह्या विचारातच मी नंबर वाचला आणी लाजेने चूर होत व आवाजात मधाच्या पोळ्यातल्या शुध्द मधात असतं तसं माधुर्य आणत `हॅलो’ म्ह्टले.`अहो काय हे?,पॅंट घरीच विसरलात ना? कहर आहे बाई तुमच्या वेंधळेपणाची.’ पलीकडून सौभाग्यवती त्याच मधाच्या पोळ्यातली माशी चावल्यागत कडाडल्या.ती काय बोलली हे ऐकताना माझ्या ह्रदयात धडधड सुरु झाली.तिचे वाक्य पुर्ण होइपर्यंत ह्रदयाचा भाता झाला.मी धापा टाकायला लागलो.म्हणजे मी पॅंट घालायला विसरलोय???????? ओह..नो….हे कसं शक्य आहे? मग इतक्या वेळ!!! कोणीच कसं बोललं नाही?? म्हणजे लेकाच्या सगळ्यांनी `मजा’ पाहीली?? आणी कर्णपु-याच्या मैदानात तर मी खालीही उतरलो होतो!!! हे धरणीमाते सीतामाईच्या आधीच मला आत का नाही घेतलस..? मी लगबगीने खाली पायांकडे पाहीलं तर सगळं नॉर्मल होतं.मी काय कोणीच आक्षेपार्ह्य अवस्थेत नव्ह्तं.

` अगं काय बोलतेस? मी घातली आहे.’ मी ओरडलो.त्यावर `अहो तुम्ही पांढरी घालणार होतात ना? ती घरी राहीलीय.’ सौ पोळं च्या पोळं अंगावर पडल्यासारखं किंचाळत ओरडल्या. ह्या सगळ्या धावपळीत मी इस्त्री केलेली पांढरी पॅंट तशीच बाजूला ठेवून कालचीच चुरगळलेली निळी पॅंट केव्हा चढवली हे माझे मलाच समजले नव्हते.खिशात राहीलेल्या पेन ड्राईव्ह चे गुपीतही मला आता उलगडले.` मग हे केव्हा सांगशील? माझा हार्ट फेल झाल्यावर?’ मी शक्य तेवढ्या करड्या आवाजात विचारलं.त्यावर ` तुमचा कसला होतोय हार्टफेल ..ठेवा..’असं म्हणत सौं नी फोन आदळला.पण ठेवता ठेवता `माझं मेलीचं कुठलं एवढं नशीब’ असं पुटपुटल्याचा मला भास झाला. (तो भास असावा असे मानन्यातच जास्त आनंद आहे)

निलेश सकाळी सकाळी घेणा-यातला नाही तरी त्याची ड्रायव्हींग करायची पद्धत ही किमान त्याला सकाळची टुथपेस्ट तरी चढली असावी हे मानन्याइतपत भयावह होती. अजय समोर,निलेशसोबत (क्लीनर सीटवर) बसला होता व मी आणि मकरंद मागच्या सीटवर विराजमान होतो .हे तरी बरे नाहीतर मी खरोखरच ह्रुदयविकाराने जाऊन सौं चे नशिब उजळवले असते.सुरुवातीला आम्ही (मी, मकरंद ,अजय) `ओम जय जगदीश हरे’ या भजनावर डोलल्यासारखे गाडीच्या हेलकाव्यांवर डोलत होतो. नंतर हेलकावे इतके वाढले की त्या डोलण्याला एक वर्तुळाकार आकार आला व देवी अंगात आली की काय (आणी ती ही होलसेल मध्ये एकदम तिघांच्या अंगात) असा भास पाहणा-याला झाला असणार.नंतर डोलणा-या हालचालींसोबत हात पण गदा गदा हलल्यामुळे या `तीन देवीया’ लेझीम खेळायला लागल्या.हळू हळू जोडीला पायांनाही हादरे बसले व हिप हॉप,ब्रेक डान्स,लॉकींग पॉपींग,जलसा…माफ करा..सालसा सारखे वैविध्यपुर्ण नृत्यप्रकार पहायला मिळाले.पुर्ण शरीराच्या या लालित्यपुर्ण थरथरण्यामुळे `कॅबेरे’ हा एक अती लोकप्रिय सर्वांगीण व्यायामप्रकार पहाण्याची सुवर्णसंधी मात्र काही अपु-या साधनसामुग्रीच्या अभावी गमवावी लागली.

निलेश स्वतःच्या या कर्तुत्वावर खुष होऊन स्टीयरींगला घट्ट धरून गाडी चालवत होता त्यामुळे ह्या सगळ्या समूहनृत्यात त्याला सहभागी होता आले नसल्याची अपार खंत त्याच्या गप्पगार चेहे-यावर होती. असंख्य हाद-यांमध्ये धडाधड शेजारच्या दरवाजाला धडकल्याने माझं बाळसं धरलेलं गुबगुबीत शरीर आदळून तो दरवाजा निखळतो की काय अशी शक्यता मला वाटायला लागली.(तो निखळो अथवा चेपून त्याची मच्छरदाणी होवो वा खूप झालेतर निलेश त्या दरवाज्याच्या लोखंडी पत्र्याची पानं करून आवश्यक त्या भागांना झाकत अफ्रिकेच्या जंगलात वडुंबा झाडावर कंपनीच्या खर्चाने `सी फेसींग’ फ्लॅट बुक करो मला काही घेणे देणे नव्हते.)नंतर नंतर ते धक्के मकरंद सोबत रशियन बॅले खेळल्याचा आनंद देउ लागले. (रशियन बॅले मध्ये जोडीदाराला अंगाखांद्यावर घेउन वाटेल तसे फिरवून जणू काही झालेच नाही असे करत वापस जमिनीवर आदळायचे असते.व आदळल्यावर दोघांनी देवाकडे एका हाताने वर मागितल्यासारखे हात वर करून दात काढायचे असतात. )

शेवटी शेवटी साईडवाईज होणा-या हेलकाव्यांसोबत कचा कच ब्रेक दाबल्यामुळे समोरच्या दिशेने मिळालेल्या धक्क्यांची विवीधता व त्यासोबत, रस्त्यातल्या सरकारमान्य एकही खड्ड्याला सवतीची वागणूक द्यायची नाही या निलेशने केलेल्या अभूतपुर्व निर्धारामुळे ,मला ४-डी सिनीमागृहात (१२०० रू किमतीची) बॉक्स सीट मिळाल्याचा अलौकीक अनुभव मिळाला.अहो तो निलेश साधे ओव्हरटेक करतांना असं वाटायचं की गाडी डिव्हायडरच्या पोराबाळांना अंगाखांद्यावर खेळवून,त्यांचा गालगुच्चा घेउन, मग मायबाप रस्त्यावर वापस येत आहे.एखाद्या महाकाय ट्रकच्या मागून जाताना आजूबाजूनी ओव्हरटेकला जागा मिळाली नाही म्हणून त्याच्या दोन टायरच्या मधुनही गाडी काढेल व त्याच्याच पुढे जाउन म्हणेल `आता बच्चू तु माझ्या टायरखालून जाउन दाखव’ असा प्रचंड आत्मविश्वास मला त्याच्याविषयी वाटायला लागला.

माझ्या छोट्या छोट्या दोन लेकरांचे बापाच्या वळणावर गेलेले गोंडस चेहेरे, निरागसता, गोड हसणे,प्रेमळ स्वभाव, हुशारी आणि आईच्या वळणावर गेलेल्या त्यांच्या खोड्या, लबाड्या, आरडाओरडा, आदळआपट, आक्रस्ताळीपणा,मुर्खपणा व त्यांचे यथेच्छ धासमुसळ्य , कैंचाळ्य ह्या सगळ्या गोष्टी आठवून मला हुंदके आवरेनात. अत्यंत भयभीत होऊन मी मनातल्या मनात पुराणातल्या जगदंबा,भवानी,सरस्वती,लक्ष्मी,दुर्गा,पार्वती,सप्तश्रुंगी इथपासून ते कलियुगातील फुलन,कुंजारानी, भॅंवरी,राबरी,चाबरी आणि श्री देवींपर्यंत सर्व देवींचे बळ एकवटून निलेशला `हळू चालव’ अशी विनंती केली.त्यावर त्याने कचकन ब्रेक दाबत कार साईडला लावली.देव्या इतक्या अर्जंट पावतात हे माहीती असतं तर स्वतःला लग्नमुक्त करण्यासाठी गणपती,राम,कृष्ण,हनुमान,दत्त वगैरे पुरूष मंडळींवर वेळोवेळी झालेला आर्थिक व नारळीक केव्ह्ढा खर्च वाचला असता असा आपला एक स्वार्थी विचार मनात आल्याशिवाय राहीला नाही.(त्या गडबडीत दोन मुलं पदरात आली ते निराळेच.)

आमचा दुसरा अघोषीत स्टॉप आल्यामुळे कार थांबली आहे हे बाहेर हॉटेलवर जमलेल्या इतर मित्रांकडे पाहून साक्षात्कार झाला.बाहेर हलका हलका पाउस चालू होता.इतका हलका की त्या पावसात छत्रीच्या डोक्यावरही पाणी साठून राहिले असते. पण काही बालमित्रांनी `पाणी जिरवा’ मोहीमेअंतर्गत घराच्या गच्चीसोबत सोबत डोक्यावरही रुजवलेल्या रेन हार्वेस्टींग प्रकल्पांमुळे (ज्याला काही निरक्षर लोक टक्कल असेही म्हणतात) एकही पावसाचा थेंब डोक्यात जमा न राह्ता पूर्णपणे जमीनीवर पडत होता व पांढरीपुलाच्या (हे नगर रोडवरील एका गावाचे नाव आहे.निलेशच्या ड्रायव्हींगमुळे घाबरून पांढ-या पडलेल्या पुलाशी त्याचा काडीचाही संबंध नाही) त्या जमिनीची जलपातळी वाढवत होता.

इतक्यात एक अंगापिंडाने भरलेली,खात्यापित्या घरातली,रंगानी थोडीशी कमी पण देखणी,मादक चालीची,चंचल नजरेची,आकर्षक, थोडक्यात पाहताक्षणी कोणीही प्रेमात पडावी अशी सुमोसदृश्य गाडी येउन थांबली.त्यातून अत्यंत घाबरलेल्या,भेदरलेल्या चेहे-याने मकरंद वैष्णव बाहेर आले. खाटकाच्या तावडीतून सहीसलामत सुटलेल्या बोकडाच्या चेहे-यावर दिसावा तसा बावरलेला आनंद त्याच्या चेहे-यावर होता. त्यांच्यापाठोपाठ शोधक नजरेने चार नामांकीत,प्रतिथयश,सदगुणी डॉक्टर्स आनंद देशमुख,संदीप मुळे,उमेश कुलकर्णी व विनय चपळगावकर गाडीतून बाहेर आले. चार डॉक्टरांसोबत त्यांच्याच खर्चाने, त्यांच्याच गाडीत,त्यांच्याच सी ड्या ऐकत,वरून त्यांच्याच विनोदांवर फुकट हसत,टाळ्या घेत,आनंदरावांच्या कवीता पचवत, व हे सगळे सुख(?) उपभोगल्याचे पैसेही न देता सहीसलामत बाहेर पडून सुभेदार मकरंद वैष्णव यांनी दाखविलेल्या या असामान्य बहादुरीला आम्हा असंख्य देशवासी पेशंट्स कडून २१ तोफांची सलामीसुद्धा अपूरी पडेल.

हॉटेलवाल्याजवळ असलेल्या मोडक्या तोडक्या खुर्च्यांवर चहाचे झुरके मारत काही, तर सिगरेटींच्या झुरक्यांनी वातावरणात धुकं निर्माण करुन पांढरीपुलाचाच लोणावळा मानत काही बसले होते.विनायक कुलकर्णी ह्यांनी ह्या धुक्याच्या धुराडविभागाचे प्रमुखस्थान कोणीही न सांगता स्वीकारले.(विनायकला हल्ली दुरुन दुरुन सिनेमाच्या शुटींगच्या वेळेस खोटं धुकं तयार करण्यासाठी बोलवतात म्हणे.आणी त्यानेही शुटींगच्या गरजेनुसार कमी अधिक धुर काढणा-या सिगरेटी फुंकण्याचे विशेष प्रशिक्षण घेतल्याचे समजते.तशी प्रात्यक्षीकं पुर्ण लोणावळा प्रवासात विनामूल्य पहायचा योग आम्हा ताकसुद्धा फुंकून पिणा-या निरागसांना आला.)विनायकने पायात जी बर्मुडा घातली होती त्याला थ्री फोर्थ न म्हणता वन फोर्थ म्हट्लं असतं तर तेही थोराड वाटलं असतं.उरलेली चड्डी घरीच राहीली असं वाटून तुलाही बायकोचा `काही राहीलं’ म्हणून फोन आला होता काय? असं विचारायचा माझा मनसुबा त्यांच्या धुम्रपानाच्या तल्लीनतेपुढे नतमस्तक होत उधळला.

क्रमशः लवकरच..

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home