Friday, January 18, 2013

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -५

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -५

विशेष सूचनाः

१. पाचवा भाग मायबाप रसिक वाचकांच्या चरणी अर्पण करत आहे तरी पायातले जोडे, सॅंडल, चपला, पायमोजे व धुळ बाजूला करून निवांत एका ठिकाणी बसून आदरपुर्वक वाचावे.आधीचे चार भाग वाचले नसतील तर ते आधी वाचावेत अन्यथा झालेल्या अपचनास लेखक जबाबदार राहणार नाही.

२. प्रत्येक भागाची खूप वाट पहावी लागत आहे असे सांगत आनंदरावांनी कंपनीच्या कामात लागलंतर हातभार लावू असे आवाहन करून आम्हाला सदगदीत केले आहे. पण हाता पेक्षा भारच जास्त लागण्याची शक्यता लक्षात घेउन आदरपुर्वक आमचा नकार स्विकारावा.त्याचबरोबर लेखनशैली व हास्यरस टिकवतांना आम्हाला आमच्यात असलेल्या (किंबहुना नसलेल्या) प्रतिभेचा तोकडेपणा (ममता कुलकर्णीच्या कपड्यांइतका)कमालीचा नडत असल्याने वेळ लागत आहे व प्रत्येक वेळेस पुढचे क्रमशः टाकतांना साशंकतेने हात थरथरत आहेत.

३. आपण कंसात लिहीलेल्या वाक्यांमुळे व आपल्या प्रत्येक गोष्टीला कशाचीतरी उपमा देण्यामुळे वाचतांना एकसंधपणा येत नसल्याचे काही आदरणीय वाचकांनी कळविले आहेत ते आम्ही अंशतः मान्य करतो.पण `कंस’ वजा केल्यास जिथे कृष्णकथाही पुर्ण होत नाही तिथे या पामराच्या कथेचे काय? हे पाहता ही एक लेखनशैली समजून आनंद घ्यावा.

विनायकने पायात जी बर्मुडा घातली होती त्याला थ्री फोर्थ न म्हणता वन फोर्थ म्हट्लं असतं तर तेही थोराड वाटलं असतं.उरलेली चड्डी घरीच राहीली असं वाटून तुलाही बायकोचा `काही राहीलं’ म्हणून फोन आला होता काय? असं विचारायचा माझा मनसुबा त्यांच्या धुम्रपानाच्या तल्लीनतेपुढे नतमस्तक होत उधळला.

आता पुढे….

आता पुढचा स्टॉप शरदवाडीला ही घोषणा झाली.हे नाव कुठेतरी बारामती जिल्ह्यातून पुनर्वसीत झाल्यासारखे वाटले.नंतर ती शरदवाडी नसून सरदवाडी आहे असे कोणीतरी `श नही बाबा स..स..स..अ..’ असे सुनील दत्तने नुतन ला सांगावे तसे सांगीतले.मकरंदच्या हातात ब-याच वेळेची एक कागदाची नळकांडी होती.त्या कागदातला मजकूर मधून मधून बघत तो स्वतःशीच लाजत हसत होता.वाचता वाचता त्याने टेबलावर साचलेल्या धुळीवर पडलेल्या पावसामुळे झालेल्या चिखलात गोल गोल वर्तुळं काढली.त्यामुळे आतील मजकूर त्याने (लग्नाआधी) केलेल्या हजारो पहिल्या प्रेमांपैकी एका प्रेमाचा पत्ररूपी पुरावा असावा असे वाटले.मध्येच `अरे हा पण होता का?’ असे पुट्पूट्ल्याने तो जे काही वाचत होता त्यात फक्त `ही’ नसून `हा’ पण आहे ही खात्री झाल्यावर मी जरा जपूनच त्याला विचारले,`मकरंद काय वाचतोयस?’त्याने `आता तुझ्यापासून काय लपवायचे यार’ असे भाव चेहे-यावर आणत तो कागद माझ्याकडे दिला.

जवळपास ११-१२ कागदांच्या त्या संचात जणू त्र्यंबकेश्वरच्या बडव्यांकडे असणारी गोत्रावळाची यादीच होती.विवीध जातीधर्माच्या नावांच्या त्या यादीमध्ये सुनिल खिरड,इंद्रजीत थोरात,संभाजी अतकरे ही नावे वाचून ती यादी भूखंड माफियांची …माफ करा… बांधकाम उद्योजकांची आहे असे प्रथमदर्शनी वाटले.नंतर त्यात अविष्कार शेळके,आनंद चावरे मंडळी पाहून ही यादी डोळ्याला पट्टी बांधल्यामुळे काहीही न दिसणा-या न्यायदेवतेपुढे फडाफडा इंग्रजीत कसलेसे पुरावे सादर करून कशीबशी केस( पाच पंचवीस वर्ष खेचल्यानंतर समोरचा कंटाळल्यामुळे) जिंकणा-या व युअर ऑनर, युअर ऑनर करत स्वतःचे आर्थिक ऑनर वाढवणा-या वकीलांची आहे असे वाटले.काही नावे म्हणजे मंगेश म्हारोळकर (आपला म्हा-या हो..मन्या म्हारोळकर…नाही लक्षात येत? अहो जो जन्मतःच मिशी लावून आला होता असा गंभीर आरोप लावून तुम्ही सगळे फिदी फिदी हसलात ना तो…मन्या..डोंट वरी.. मी साक्षीदार आहे ,नव्हती तुला मिशी त्यावेळेस..कमीत कमी पाचवीपर्यंत तरी नव्हती...),ओम बारलिंगे,वैभ्या बक्षी,मंगेश कुलकर्णी.समीर डोरले वाचून ही देश सोडून परागांदा झालेल्यांची यादी असावी असेही वाटले. त्यानंतर त्यात अनेक डॉक्टर मंडळी दिसल्याने एकंदरच यादी बंदूकीचा धाक न दाखवता,एका डोळ्याला काळा गॉगल न लावता,घोड्यावर न येता, फक्त होळीच्याच दिवशी धाड टाकण्याचे गब्बरसिंगसारखे कुठलेही नैतीक बंधन नसलेल्या, समाजाला लुटणा-या,बेरोजगार नसूनही सुशिक्षीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळ्यांची आहे असा विचार मी पक्का केला.त्यानंतर मात्र त्यात अमित कुलकर्णी,मनिष पाडळकर ,शैलेश पत्की,अजय काळे,सचिन टाकळकर,यशवंत दुधे,सचिन राजे,सुहास वळे,हेमंत रायबागकर,मकरंद सातारकर झालचतर प्रशांत नानकर अश्या सदगुणी, विवेकी, मायाळू, समाजोपयोगी अभियंत्यांचीही नावे दिसली आणी ही यादी १९८९ मध्ये कसेबसे का होईना १० वी पास होणा-या सर्वच मुलांची आहे हे निदर्शनास आले.

त्या यादीत विद्यार्थ्याचे नाव,त्याला मिळालेली गुणवत्ता श्रेणी व त्याची सही अशी माहीती होती.मकरंदच्या नावाला अगदी लागून म्हणजे साधारणतः १०-१२ नावांनंतर एका मुलीचे नाव आल्याने तो यादी वाचतांना इतका का लाजत होता हे माझ्या लक्षात आले.यादी वाचता वाचता तो अचानक रागाने त्या कागदाकडे बघू लागला. झेरॉक्स करतांना मजकूर वर खाली झाल्याने त्याच्या नावासमोर मेहेनतीने कमावलेल्या `सेकंड क्लास’ च्या ऐवजी मानहानीकारक `फर्स्ट क्लास विथ डिस्टींक्शन’ आल्याचे निदर्शनास येउन अपमानाने त्याचा पारा चढला होता.`ही मानहानी पचवण्यासाठीच का स.भु.ऑफीस मधून ही यादी आणली मी?’ हा भाव कितीतरी वेळ त्याच्या चेहे-यावर होता.या सगळ्या धांदलीत जवळपास प्रत्येकाने आपआपले यादीतील नावा समोर केलेली त्या वेळेची आपली स्वाक्षरी डोळे भरून पाहून घेतली.काहींनी तर ती तेवीस वर्षांपूर्वीची आपली सही वाचतांना असे काही अविश्वासाचा ठराव मांडल्यासारखे चेहेरे केले की जणू आपण दहावीत इतके निरक्षर होतो की सही सारखी अद्ययावत तांत्रीक बाब आपण त्यावेळेस आत्मसात करणे म्हणजे अप्लाइड मेकॅनीक्सचा पेपर पहिल्या प्रयत्नात पास केल्यासारखे होते.(अप्लाईड मेकॅनिक्स काय रोग आहे हे ज्याला माहीती नाही त्याने त्वरीत मकरंदशी संपर्क करावा.तो अजूनही त्या आजारातून बरा झालेला नाही.) `कुठल्या श्रेणीत पास’ चा स्तंभ वर खाली झाल्याने अनेक हुशार विद्यार्थ्यांना (म्हणू नये पण माझ्यासारख्या) कसेबसे पास होण्याचा तर ३५% च्या वर जे मिळेल ते बोनस असे समजत शालेय आयुष्य काढणा-यांना पहिल्या नंबरात पास होण्याचा आनंद मिळाला.मकरंद नी तर ही यादी घरी वहीनींना दाखवून १० वी त केलेल्या अतुलनीय ` फर्स्ट क्लास विथ डिस्टींक्शन’ कामगीरीबद्दल पुरणपोळीच्या जेवणावर ताव मारल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे.

पांढरीपुल ते सरदवाडी या प्रवासात मी ,माझा १५ वर्षांपूर्वी झालेला अपघात व त्या अपघातात मी सोडून इतर ५ अनोळखी व्यक्तींचा जागेवरच झालेला मृत्यू व मला साधी जखम ही न होणं ही थोडीशी दुःखद घटना (हो मी गेलो नाही याही अर्थाने दुःखद) मोठ्या विस्ताराने कथन केली.माझ्या या कर्तुत्वाने भयभीत होवून निलेशने स्टेअरींग वरचा आपला हात आळीपाळीने शर्टला पुसला व मला उगाचच सोबत घेतले ह्या विचाराने भर ए.सी.मध्ये आलेले घर्मबिंदू त्याच्या कपाळावरून घसरत स्टिअरींगवर पडल्यामूळे ट्टॉक….. असा आवाज आला (हा आवाज जीभेने टाळूला(स्वतःच्या) चुटकी मारल्यावर येतो.) असा आवाज सतत येऊ लागल्याने निलेशला घामाच्या धाराच सुरू झाल्याकी काय असे वाटून मी आवाजाचा वेध घेतला असता माझी ऐतिहासीक लाल बॅग बाजूच्या `मॅनली’ थैल्यासोबत झिम्मा खेळण्याचा प्रयत्न करतांना मी रंगेहाथ पकडली व गाडीच्या हाद-यांमध्ये बॅगची कडी थैल्याच्या बेल्टच्या पितळी बक्क्लवर टॅपडान्स करत असल्याने तो आवाज येत होता. बॅगच्या या बाहेरख्यालीपणाचा राग येउन मी तिला थैल्यापासून फरफटत बाजूला करत दुस-या कोप-यात स्वगृही नांदायला पाठवली व एका नुकत्याच उमलत चाललेल्या प्रेमकथेचा करूण अंत झाला.या सर्व अंतर्गत कलहात मी व्यस्त असतानाच मग संधी मिळाल्यामुळे अजयनेही त्याला टेकडीवरून पडून झालेल्या अपघाताची कथा ऐकवली. त्या कथेत त्याच्या झालेल्या हालाअपेष्टा ऐकून घामेघूम होत `पाणी पाणी’ झालेल्या मकरंदने त्वरीत महत्वाच्या कामासाठी गाडी थांबवण्यास सांगीतले.

या सर्व कथाकथनामुळे वातावरण खुपच भितीदायक व शांत वाटायला लागल्यामुळे (म्हणजे साधारणतः तुम्हाला सासुरवाडीला वाटत असणार तसे) मिळालेल्या संधीचा फायदा घेत मी स्वतःच्या शौर्यकथा ऐकवायला सुरूवात केली.आता मी गेल्या ९ वर्षांपासून (एकाच बायकोसोबत) सुखाचा(??) संसार करतो आहे ही एक शौर्यकथाच नाही का? पण या शौर्याचा सगळ्यात प्रदिर्घ अनुभव निलेशकडे असल्याने (२१ व्या वर्षीच बालविवाह झाल्याने त्याचे हे रणकंदन १६-१७ वर्षांपासूनचे आहे) मी त्याच्यासमोर या शौर्यकथा सांगणे म्हणजे विदर्भातल्या शेतक-याने सावकारालाच कर्ज देऊ केल्या सारखे होते (व ते न फेडता आल्याने सावकारानेच आत्महत्या केल्यासारखेही होते.)पण मला गप्प करण्याचा प्रयत्न करणे निरर्थक असल्याचे त्याला पुर्वानुभवावरून माहिती असल्याने तो बिचारा माझ्या शौर्यकथा ऐकत होता.

सरदवाडीला थांबा असे निरोप वरचेवर मोबाईल वरून एकमेकांना दिले जात होते.त्यातल्या त्यात आनंदरावांचा खाण्यापिण्याच्या बाबतीतला असलेला दांडगा अनुभव व उत्साह आपोआपच हॉटेल निवडण्यासाठी कामाला येत होता.त्यामुळे त्याची गाडी जिथे असेल तिथे सरदवाडीचा स्टॉप अशी खुणगाठ बांधुन आम्ही सरदवाडी आल्यावर `ती’ ला शोधायला लागलो.मग पुन्हा एकदा अंगापिंडाने भरलेली,खात्यापित्या घरातली,रंगानी थोडीशी कमी पण देखणी,मादक चालीची,चंचल नजरेची,आकर्षक, थोडक्यात पाहताक्षणी कोणीही प्रेमात पडावी अशी आनंदरावांची सुमोसदृश्य गाडी आम्हाला दिसली.आनंदरावांनी तिला थोडीशी `वाम’ मार्गालाच लावलेली होती…अहो…तसे नाही…म्हणजे नगर पुणे रोडवर न लावता का कोण जाणे पण त्यांनी पुणे नगर रोडवर उलट्या दिशेने असलेल्या हॉटेलवर लावली होती या अर्थाने वाममार्गाने.`ती’च्या कडे बघून एक इंडिकेटर रुपी डोळा गचागच मिचकावत निलेशच्या आकाराने अर्ध्या असलेल्या त्या `स्वर्ग’ रथाने अर्धगोलाकार वळण घेतले व `ती’ ला एकदम खेटून स्वतःला लावून घेतले.आम्ही `स्वर्गा’ तून जमीनीवर पाऊल ठेवले आणी दूरवर `हा हा हा ‘ असे महा हास्य ऐकू आले.त्यानंतर त्याला `ही...ही...ही’ मग `हू.. हू.. हू’ असे हाराखडीचे (बाराखडीचे) विवीध पैलू ऐकू आले.ही सर्व हास्यकारंजे एका टेबलाच्या सगळ्या कोप-यातून उडत होती.

आनंदरावांनी पहीली मिसळपाव संपवत नुकतीच दुस-याची ऑर्डर दिली होती व `तिखा बनाव’ हे ही तिखट भाषेत सांगीतले होते.इतर तीन डॉक्टर्स व वैष्णव हे ही मिसळपाव समोर ठेवून ती खायला चालू करावी का नाही याचा गहन विचार करत पहात होते पण आनंदरावांचा एकंदर खवैय्या अवतार बघून बहुदा आता खाल्लं नाही तर पुन्हा उरणार नाही हे लक्षात येउन त्यांनी त्वरीत `वदनी कवळ’ घेतला. आमच्या नुकतेच आधी हर्षल,अरगडे,मिहीर व औंढेकर हे तेथे पोहोचले होते व बसायची जागा शोधत होते.आता आम्हीही चौघे आल्याने एकंदर ८-१० लोकांची बसण्याची सोय नसल्याने आम्ही उभेच राहीलो.आमचा शेजारच्याच टेबलावर एक दोन ग्रामीण कुटूंबे नाश्ता करत बसले होते.आमच्या हास्यकारंज्यांच्या फवारे असह्य झाल्याने व बहुधा आता लवकर आवरलं नाही तर आम्ही मांडीवर बसायला कमी करणार नाही असे वाटून हर्षल, मिहीर, नानकर यांना मांडीवर घेण्यापेक्षा जीव दिलेला परवडेल असेही वाटल्याने त्यांनी लवकरच काढता पाय घेतला.महेश अरगडे हा एका जोडप्याच्या इतका जवळ जाऊन शीट सांभाळायला(शीट = सीट म्हणजे जागा या शब्दाचा ग्रामीण अपभ्रंश,उगीच गैरसमज नको) उभा राहीला होता की त्या काकांनी स्वतःच्या तोंडात घातलेला घासाचा ढेकर महेशने दिला असता तरी आश्चर्य नव्हते.

शेवटी सगळे एका पंगतीला आले तोवर आनंदरावांचा दुस-या `तिखा मारलेल्या’ मिसळपावेचा एक्स्ट्रा पाव चुकून थंड आल्याने गरम करण्यासाठी परत रवाना झाला होता.`या मिसळपावेत मजा नाही’ हे वाक्य पाच बोटातले (हाताच्या) शेवटचे बोट मोठ्या चवीने चाखत आनंदराव बोलले.आता हे बोलणे त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने कुजबूज देखील दहा पाच लोकांनी ऐकावी असे असल्याने त्या थंड पावाने जाता जाता रागाने आनंदकडे पाहिले.पण त्यामुळे आम्हाला जी मिसळपाव आली ती हॉटेलवाल्याने आधीच तिखी मारून व पाव एक्स्ट्रा गरम करूनच आणलेला होता.या सर्व `गरमा गरमीत’ आनंदरावांचे मिसळपावचे फोटो काढून फेसबुकात अपलोड करण्याचे राहून गेल्याचे लक्षात आले आणि मग आजून एक मिसळपाव त्यांना घ्यावा लागला.(काय करतील बिचारे त्यांचाही नाईलाज होता).वेगवेगळ्या पद्धतीने पोझेस टिपल्यानंतर पावाला थोडे मिसळीकडे सरकावत आनंदरावांनी पावाला काही आक्षेपार्ह्य पोझेस देण्यास भाग पाडले. मिसळीसोबत दिलेल्या चुंबनदृश्यातमात्र पाव अजूनच फुलल्यासारखा वाटला आणि पुढे मिसळीसोबत रस्श्यात डुंबलेल्या बाथसीन मध्ये पावानी दाखवलेले सिक्स पॅक्स टीपतांना आनंदरावांच्या(व पावाच्या देखील) चेहे-यावर एक अमाप सुख दिसले व या गडबडीत मोह न आवरल्याने त्यांनी `पाव’ तोंडात घालून `अर्धा’ शिल्लक ठेवला व सिक्सपैकी बरेचशे पॅक्स रिचवले.

क्रमशः लवकरच...

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home