Friday, January 18, 2013

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -६

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -६


विशेष सूचनाः

१. सहावा भाग पाच भाग झाल्यानंतर येतो हा अंकगणितीय सिद्धांत लक्षात घेउन त्या क्रमाने वाचन करावे.

२. आनंदरावांनी त्यांच्या झालेल्या अतिउल्लेखामुळे बळावू शकणा-या जनप्रक्षोभाविषयी चिंता व्यक्त केली आहे.पण आनंद हा शब्दच असा आहे की कुठेही कोणीही उल्लेख केला तरी तेथून दुःख,पीडा,संकट,नैराश्य अशी अवगुणं नाहीशी होतात.ह्या आपल्या विनोदी लेखन उपक्रमाचा मुळ हेतूच रोजच्या धकाधकीतून काहीतरी वेगळं तणावमुक्त देणं (तुम्हाला आणि मलाही) हा असल्याने कुठलीही विनोदनिर्मीती `आनंदा’शिवाय अपुर्ण आहे.त्यामुळे आनंदरावांना ह्या भागातही भरभक्क्म स्थान दिले आहे व ते पुर्णतः जनहितार्थ आहे.

३. या भागातील विनोद निर्मीती तुलनेने कमी वाटण्याची शक्यता आहे.तरी सौभाग्यवतींनी केलेला अळणी चहा जसा गुप चिळी करून गिळता तसाच गिळावा उगच गलका करू नये.

मकरंद अगदी निघाल्यापासून त्याचा आज उपवास आहे हे प्रत्येकाला सांगत होता.त्याचे चि.वी.जोशींच्या स्वयंपाकीण काकू मधील तुंदीलतनू बोक्यासारखे असणारे शरीर पाहून मात्र तो फारसा उपवास वगैरे दुष्काळी गोष्टींचा पुरस्कर्ता वाटत नव्हता. सरदवाडी जशी जशी जवळ आली होती तशी त्याची उपवास असल्याची खंत वाढलेली दिसली.पण आता प्रत्यक्ष ती वेळ समोर येऊन ठेपल्यावर मात्र त्याच्या या खंते चे रुपांतर प्रचंड मोठ्या पश्चातापात झाल्याचे जाणवले व तपाला बसलेल्या विश्वामित्रांसारखी मिसळरुपी मेनका त्याचे तप भंग करेल असे वाटले.आम्ही सगळ्यांनी त्याला आजच्या दिवस उपवास मोडण्याचा दिलेला सल्ला त्याने वेफर्सच्या पाकीटाला फाडून रागारागात जेवढे एका हातात बसतील तेवढे वेफर्स तोंडात टाकत झिडकारला.या मेनके चे लुक्स जरा आमच्या विश्वामित्राला घायाळ करायला कमी पडल्यासारखे वाटले.फोडण्याआधी मुन्शी राठींसारखे दिसणारे वेफर्सचे पाकीट आतील हवा गेल्यानंतर शितल चुडीवालसारखे दिसायला लागले. त्याच्या या उपवास न मोडण्याच्या धार्मिक प्रवृत्तीबद्द्ल निर्माण झालेला कमालीच्या आदरभावनेला `मक्याला(मकरंदला प्रेमाने हाक मारण्यासाठी वापरण्यात येणारा बोलीभाषेतील शब्द ज्याचा कणसाच्या प्रकाराशी संबंध नाही.) लोणावळ्यात कोंबडी चावूनच उपवास मोडायचा असेल’ या कोणाच्यातरी उत्त्स्फुर्त डायलॉगने स्थगीती दिली.तेवढ्यात मनिष आणि मंडळी समोरच्या बाजूस कोणत्यातरी हॉटेलमध्ये असल्याचे समजले.मग गुंड जसे पोलिस आले हे समजल्यावर नवीन कामं मिळवण्यासाठी त्यांना शोधत येतात तसे आम्हा सर्व मंडळींचा मोर्चा समोरच्या हॉटेलकडे वळला (इकडचे बिल राहिलेले काही मित्रगण देतीलच ही कमालीची श्रद्धा ठेवून).

तेथे सचिन काळे,टाकळकर,विन्या कुलकर्णी, मनिष व असंख्य माश्या मिसळपावेवर ताव मारत बसलेले होते.त्यावर आनंदला अचानक आपण खूप दिवसात मिसळ खाल्ली नसल्याचा साक्षात्कार झाला.आनंदचा एकंदर नूर पाहून सचिन काळेंनी स्वतःची प्लेट अंमळ जवळ स्वतःजवळ ओढल्याची जाणवली. त्यांच्या देहबोलीत आनंदला पाहून कमालीची सतर्कता आली(पुर्वानुभवातून माणूस खुप शिकतो हेच खरं). जवळपासच्या माशाही आपापल्या खाद्याला लपवून सावरुन बसल्या.त्याकडे दुर्लक्ष करत `अरे चव फक्त बघू द्या’ असं म्हणून आनंदने जणूकाही हॉटेलवाल्याने प्रत्येकाच्या ताटलीत स्वतंत्र्य स्वयंपाक्याकडून मिसळपाव बनवून चवीत वेगळेपण टाकलं आहे असे भासवून इतर प्रत्येक प्लेटमधील एक एक मजबूत घास चवीसाठी घेतला.त्याच्या चेहे-यावर दिसलेल्या प्रसन्न मुद्रेवरुन ती चव त्याला रुचलेली दिसली.आता इथेही मिसळपावेची तिखा मारके ऑर्डर होते का हे पहाणे फार मनोरंजक होते.पण त्याचवेळी शेजारीच चाललेल्या भजे तळण्याच्या समारंभाकडे मोठ्या आदरपुर्वक पहात आनंदरावांनी मिसळीशी फारकत घेत `सब के लिये भजे लाव एक प्लेट’ अशी ऑर्डर दिली.आता `सबके लिए एक एक प्लेट’ की `सब मिलाके एक प्लेट’ हे हॉटेलवाल्या पो-याला झालेले कन्फुजन फक्त २-३ भजे उरले असताना मोठ्या औदार्याने ` अरे घ्या घ्या सगळे घ्या’ असे इतरांना आनंदरावांनी केलेल्या आग्रहाने अपार वाढले.आता मी ही चपळता दाखवत त्या उरलेल्या ३ पैकी एक तरी भजा गटवता आला पाहीजे या दृढनिश्चयाने घाईघाईत मध्ये हात टाकला.आम्ही तिघे त्या प्लेटपाशी उभे असताना एकंदरीत चार हातांनी दावा केल्यामुळे हा चौथा हात कोणाचा म्हणून मी पाहीले असता आनंदरावांनी आपले दोन्ही हात आत टाकल्याची धक्कादायक सत्यता समोर आली.आणी विशेष म्हणजे आनंदराव वगळता इतर कोणालाही भजा हस्तगत करण्यात यश आले नाही.वर्षानुवर्ष मेहनत करुन तयार झालेल्या त्यांच्या या अभूतपुर्व साधनेला आमचा मानाचा मुजरा.

यश मिळवण्यासाठी दुरदृष्टी किती आवश्यक असते हे आनंदच्या ` चला चला आता लोणावळ्याला गेल्यावर लंचसाठी आपल्या पोटात जागा शिल्लक हवी ना?’ हे दुस-या भजाच्या प्लेटमधील शेवटच्या भजासोबतची मिरची तिखट लागल्यानंतर मागवलेली थंड बिसलेरी संपवताना म्हटलेल्या वाक्याने समजले.तोवर गेल्या २० मिनीटात ३ मिसळपाव + ४ जणांच्या प्लेटमधील एक एक निस्सीम भक्तीभावाने घेतलेला घास+जवळपास २ प्लेट भजे + १ बिसलेरी+आणि बहुदा प्रत्येक प्लेटीसोबत एक एक या दराने ५-६ सरदवाडीकर माश्या असा अल्पोपहार याने चेपलेला आहे याची पुसटशी शंकाही कोणाला आली नसती अशी त्याची देहबोली होती.तो भजे खातांना तर मला शेवटी शेवटी दोन्ही हातांनी खात आहे , रिकाम्या प्लेटला उपडे पाडून त्यावर धपाधप उड्या मारून तिच्यातून एखादा भजा टपकतो का हे पाह्तो आहे आणि समजा टपकलाच तर इतर सगळ्यांना दोन्ही हात हुतूतू खेळल्यासारखे बाजूला ठेवून एकटेच भजाला गपकन पकडून तोंडात टाकत ` ही.ही.हा हा हा हा हा…. असे बकासूरी हसत असल्याचे भास व्ह्यायला लागले.जाता जाता आनंद `बिल साबके बिल मे लगाव’ ही अतिशय मौलीक सूचना हॉटेलवाल्याला द्यायला विसरला नाही.

आनंद त्याची `ती’ मादक गाडी पुढे घेउन गेल्यावर मग विनायकरावांनी टपरीवरच धुराची नळकांडी फोडली. मनिष,टाकळकर,मी त्यातून निघालेला अश्रुधुर चुकवत त्याचा धुम्रोत्सव पाहात उभे होतो.`नानक्या, तु पुढे आमच्या सोबत ये’,मग नानक्या तु आला तर मजा येईल’, `नानक्या तु हवाच’ मग पुन्हा `नानक्या तु नाही तर मी नाही’ अशी चार चौघात न शोभणारी व (बायकोशी) प्रतारणावादी वाक्य विन्या व टाकळकर यांनी आलटून पालटून म्हटली.मित्रांच्या या प्रेमाग्रहाने गहिवरुन येऊन मी जड अंतःकरणाने साश्रुनयनांनी आयुष्याला कलाटणी(गोल गोल फिरून खाली पडणे) देण्याचे सामर्थ्य असलेल्या निलेशच्या त्या स्वर्गरथाचा निरोप घेतला व मनीष,टाकळकर,काळे व विन्या यांनी आधीच ठासून भरलेल्या त्या स्विफ्ट नामक कारेत ठोसून ठोसून बसलो.आत बसतांनाच मागचा अनुभव लक्षात घेऊन मी आधीच १२०० रुपयाचे लोणावळा फाट्यापर्यंतचे टिकीट काढले असल्याचा खुलासा मी सारथी मनिष यांना करून दिला.त्याचबरोबर मला माझ्यापेक्षा वयानी खूप लहान असलेली दोन बालकं असल्याने व माझे इन्शुरंसचे हप्ते थकलेले असल्याने सावकाश व सुखरुप लोणावळ्यास पोहोचवण्याची मनोमन विनंती केली.त्याचबरोबर इन्शुर्ड गाडीचा अपघात झाल्यास गाडीसोबत आतील व्यक्ती मोफत मध्ये इंन्शुअर करण्याची सोय आहे का? असा एक भाबडा प्रश्नही माझ्या मनाला चाटून गेला.पण का कोण जाणे त्यावर मनिष मला `माझ्या गाडीचाही हप्ता थकलेला आहे’ असा सभुईक (स्वाभावीक) उत्तर देइल ही खात्री होती.

मनीष गाडी मात्र ब-यापैकी चांगली चालवत होता.आणी मी नुकतेच परम हिंदोळे खाउन आलो असल्याने,त्यापेक्षा थोडेही बरे ते चांगले अशीही मानसिकता झालेली होती.त्याच्याशेजारी डॉ.सचिन काळे पाय वगैरे पसरून ऐस पाईस बसलेले होते.त्यांचा एकंदरीत पोषाख ते केव्हाही कवीता सादर करायला सुरुवात करतील असा होता.पण त्यांच्याबाबतीतला अनुभव सोज्वळतेचा असल्याने ती भिती बाळगायचे काही कारण नव्हते.मागच्या सीटवर माझ्या शेजारी टाकळकर व त्याच्याशेजारी विनायक कुलकर्णी आपल्या वन फोर्थ बर्मुडा,सिगरेटचे पाकीट व चश्म्यासह बसलेले होते.मधून मधून टाकळकर विनायकशी काहीतरी पुटपुटत होता.`घरून कॅश घेउन ये,शेख ला देऊन टाक’ ही काही वाक्ये माझ्या कानावर आली.त्यामूळे या दोघांचे काही व्यावहारीक संबंध असावेत असे मला वाटले.` काही बोलला तर त्याला गप्प कर’ या त्याच्या वाक्याने मात्र मला थोडी भिती वाटायला लागली.हल्ली बरेच अतिरेकी मागासलेल्या, उपेक्षित मराठवाड्याला जगापुढे आणण्याचा अटोकाट प्रयत्न करीत आहेत म्हणे.न राहवून मी विनायकची प्रतिक्रीया पाहण्यासाठी वाकून त्याच्याकडे पाहीले असता तो निर्वीकार पणे नव-याने बायकोच्या बडबडीसमोर, कारकुनाने साहेबाच्या रागावण्यासमोर व मनमोहनाने सोनियासमोर बसावे तसे बसला होता.किंबहुना झोपलेला होता हे त्याच्या सुक्ष्म घौर्यामुळे लक्षात आले.

थोडं अंतर आम्ही गेले असूत अचानक टाकळकर माझ्याकडे बघत `तुमच्याकडे पैसे बाकी आहेत कधी देताय’ असे करड्या आवाजात (जवळपास धमकीच्या सुरात) उदगारला.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मी बावचळून गेलो.`माझ्याकडे? कुठले? अबे मी तर मागच्याच गाडीत १२०० रु दिले.मी सांगीतलं ना तसं मनिषला.’.कावराबावरा होत मी उदगारलो.(माझा आवाज थोडासा किशोरदांनी माझ्या आवाजात यॉडलींग केल्यासारखा आला.)हा भीषण वाटमारीचा प्रकार असल्याची मला तीव्र शंका आली.मला गोड बोलून लेकाच्यांनी ह्या गाडीत बोलवले आणी आता पैसे काढ म्हणतायेत..आणी टाकळकर तुम्ही सुद्धा?का हा तुमचा जोडधंदा? दोस्ती गेली खड्ड्यात मी नाही जाणार लोणावळ्यापर्यंत.गाडी थोडी हळू झाल्यावर दरवाजा उघडून बाहेर उडी घ्यावी असा एक क्रांतीकारी विचारही मनात आला. एवढ्यात `ठीक आहे मी तुम्हाला अजून २ दिवस देतो.माझ्या पैश्यांची व्यवस्था करा’ असे टाकळकर पुन्हा गुरगुरला. म्हणजे अजून दोन दिवस मुदत आहे हे समजून मला एवढ्यात उडी टळली असे वाटले असतानाच त्याने कानाचा हॅण्ड्स फ्री काढला आणी `बोल नानक्या काय हात वारे करत होतास?’ ह्या थाटात माझ्याकडे पाहीले.म्हणजे…हा माझ्याशी बोलत नव्हता तर..अरेरे उगाच मित्रांवर संशय घेतला…या संशयकल्लोळामुळे टाकळकर मधून मधून काहीतरी जे पुटपूटत होता ते पलिकडच्या बाजूच्या कानाला लावलेल्या हॅंड्स फ्री वर हे आता लक्षात आले.त्याचे इतके फोन चालू होते की तो मला कधी उद्योजक,कधी कॉल सेंटर ऑपरेटर,कधी वसुली एजेंट,कधी भाई(डॉन या अर्थाने,रक्षाबंधन वाला भाई नव्हे.) तर कधी बुकी वाटत होता.पण टाकळकर हा साधा फेसबुकीही नसल्यामुळे त्याने बुकी होऊन बोली लावण्याची शक्यता नगण्य होती.त्याच्या लग्नालाही आता बरीच वर्ष झाल्याने हुंड्याची उधारीची वसुली इतकी वर्ष बाकी ठेवण्याइतका तो अव्यवहारीही नाही.त्यामुळे त्याचे वसूली त्याच्या व्यवसायातली असावी असा अंदाज बांधला.

गाडीत बसताना `तू असलास तर मजा येईल’ हे टाकळ्याचे वाक्य काही वेळातच `यार ह्या नानक्याच्या कॉमेडीने टाईम पास चांगला होतो’ मध्ये रुपांतरीत झाले.एका महान विनोदी लेखकाला त्याने रंगबिरंगी कपडे चढवून,डोक्यावर विदूषकी टोपी ठेवून,तोंड शक्य तेवढे भयंकर लाल पांढ-या रंगांनी रंगवून,नाकावर एक आवळ्याच्या किंवा त्याहून मोठी साईझ म्हणजे सफरचंदाच्या आकाराचा गोल लाल रंगाचा गोळा चिटकावऊन व सरते शेवटी हातात एक हृदयाच्या आकाराचा लाल भडक रंगांचा कटाआऊट देउन कमरेखालचा पार्श्वभाग अर्धवर्तुळाकार हलवत,चेहे-यावर संसदेत मीराकुमार ठेवतात तसे सतत हास्य ठेवत( अहो मीराकुमारनी मागे कुठल्याश्या शोकसभेतही चेहे-यावर असेच हास्य ठेवत अनास्था प्रसंग ओढवून घेतला होता म्हणे) व मानेखाली कोणी गुदगुल्या केल्यागत मानेची हालचाल करत `जिना यहा,मरना यहॉ’ (असे सर्कशीला उद्देशून) म्हणणा-या विदूषकाच्या पातळीवर नेऊन ठेवलेले होते.या भीषण अपमानाने लाल होत मी `या करमणूकीचा करमणूक कर द्यावा लागेल’ असे रागाने म्हटले त्यालाही विनोद समजून सर्वांनी टाळ्या दिल्या व हसावे का रडावे हे न कळल्याने मी गप्प बसलो.

सचिन टाकळकरांना सकाळी झालेल्या किडनी स्टोनच्या त्रासाला आठवून मग या झालेल्या विदूषकी अपमानाचा बदला मी त्याला चांगलाच `स्टोन वाश’ देउन घ्यायचा ठरविला व माझी एक कथा सुरु केली.त्यापुढील एक तास टाकळकर,काळे,मनिष व जेव्हा झोपेतून जाग येईल तेव्हा विनायक पोट धरून धरून (स्वतःचे) हसत होते.माझ्या या कथे चा विषय होता ` मी,ही, तो आणि ते’…त्यातील `ही’ म्हणजे आमच्या सौभाग्यवती. आता मी,ही आणि तो म्हटल्यावर एकदम दचकू नका ..माझ्या संसारात सगळं व्यवस्थित चाललेलं आहे (शेवटची बातमी हाती येईस्तोवर)…आणि `तो ‘म्हणजे आमच्या सौभाग्यवतींना झालेला किडनी स्टोन आणि `ते’ म्हणजे आम्ही त्या स्टोनवर केलेले अनेकाविध उपाय. सोनोग्राफी, लिथोट्रीप्सी,ऑक्टोपसी,सर्जरी, जर्जरी, निर्जळी पासून ते रामदेवबाबा, शब्बर दवासाज, अकबर दवासाज, बाबर, हुमायू, बिरबल सगळे दवासाज असे अनेक युनानी, अल्युपथी, होमियोपथी, आयुर्वेदी, ऋग्वेदी, यजुर्वेदी, साम्यवादी, आतंकवादी इलाज व हाती आलेले धक्कादायक निकाल याची एक कथा आहे.हा एक स्वतंत्र कथेचा विषय असल्याने इथे न टाकता आपण वाचायला उत्सुक असल्यास `खास लोकाग्रहास्तव’ लिहीण्याची माझी तयारी आहे.

क्रमशः लवकरच..

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home