Saturday, January 18, 2014

बुंग-२…(भाग-१)

बुंग-२…(भाग-१)

वरिल बुंग-२ हे नाव धूम-२ (धूम टू) या धर्तीवर वाचावे…

विशेष सूचनाः

१. ब-याच दिवसांनी आलेल्या या लेखामुळे आता ही श्रुंखला किती भाग चालेल यावर जास्त विचार करून आपले मनःस्वास्थ बिघडावून घेऊ नये.(बिघडल्यास लेखक त्याला जबाबदार राहणार नाही..)

२. बुंग-२ वाचून बुंग-१ शोधत बसू नये.ते केव्हाच उडाले आहे..त्याचा संदर्भ पुढे येईलच.. 

आता गप वाचा…

मित्रांनो,
(नमनालाच मैत्रीणींचा उल्लेख करणे म्हणजे परमवीर चक्राचा एक प्रबळ दावेदार बनण्यासारखे आहे (आणी सारखा उल्लेख केल्यास मरणोत्तर) त्यामुळे सुरूवात फक्त मित्रांपासून केली आहे.तरी सर्वांनी लेख वाचावा…उगच आपल्याला आग्रहच नाही म्हणून लेख सोडून देउ नये.)

तर मित्रांनो…बुंग…या शब्दाचा अर्थ माहित नाही असा कमीत कमी महाराष्ट्रात तरी माणूस सापडणे अवघड आहे.कै.लक्ष्मणराव देशपांडेंनी त्या शब्दाला अजरामर केले आहे.व-हाड निघालय लंडनला या एकपात्री प्रयोगातील `बुंग’ हा एक अविस्मरणीय शब्दप्रयोग आहे.ते बुंग-१ व-हाडाला घेउन लंडनला उडाल्यावरच्या गमती आपण पाहिल्या आहेतच..पण असे अनेक बुंग रोजच्या रोज उडत असतात आणि त्यातील अनेकात प्रथमच बसलेले अनेक बप्पा आणि बबन्या सापडतात. (अनेक असल्याने खरं म्हणजे बप्पे व बबने म्हणायला पाहिजे). हा लेख विमानात प्रथमच बसलेल्या या सगळ्यांच्या प्रातिनिधीक प्रेरणेतून लिहीला आहे.म्हणून हे बुंग-२. हा लेख वाचताना प्रत्येकाने आपला पहिला वहिला विमान प्रवास आठवावा म्हणजे त्याचा ख-या अर्थाने आनंद घेता येईल.ज्यांना तो योग अजून यायचा आहे त्यांच्यासाठी हे एक चांगले `इन्स्ट्रक्शन मॅन्युअल’ ठरेल.

`मुंबईला जायचे आहे..विमानाचे तिकीट मिळेल का?एक फुल्ल..?’यातला फुल्ल हा शब्द ऐकून काउंटर पलिकडच्या अतिकृश ललनेच्या चेहे-यावर पुसटशे हास्य दिसल्याचे जाणवले..मी ही वरमलो..माझा हा देहविस्तार हाफ तिकीटात घेण्याइतकेही वाईट दिवस विमान कंपन्यांवर आलेले नसावेत.पण त्यानंतर मला तिने ३५०० रु.तिकीट सांगितल्यावर मी तिला पुन्हा `एक फुल्ल’ ची आठवण करून दिली.`सर जेट कनेक्ट मुंबई ८ ए.एम. फ्लाईट..ऍण्ड वन फुल्ल’.तिनेही फुल्ल चा उच्चार `मल्ल’ सारखा `फुल्ल’ केला. विमानाला विमान म्हणत नाहीत तर फ्लाईट म्हणतात हा पहिला धडा मी घेतला.माझ्या अपेक्षेपेक्षा हे तिकीट बरेच कमी होते.हे म्हणजे गळा कापून घेण्याच्या तयारीने खाटकाकडे गेलेल्या बोकडाची त्याने फक्त दाढी करून ( व नंतर आफ्टर शेव्ह लावून ) सोडून दिल्यासारखे होते.`मॅडम थोडे स्वस्तातले बघाना…हे खूपच महाग आहे..’ (तोच बोकड थोडा धिट होत आपली काख वर करून तिथलेही केस काढून देण्याची खाटकास विनंती करू लागला.)..`सॉरी सर..धिस इस ऑलरेडी मिनीमम..यु आर लकी टू गेट धिस रेट…’माझ्या कडून काही उत्तर न आल्याने..मग ती पुन्हा सर..विचार करून सांगा…ओके? नेक्स्ट प्लीज…माझ्या मागच्या माणसाला पुढे येण्याची विनंती करत ती म्हणाली.(खाटकाने बोकडाच्या पेकाटात हाणली) मी नाईलाजाने तिकीट काढले.

सकाळी ०८.०० चे फ्लाईट आहे पण तिथे एक तास अगोदर पोहोचावे लागते हे ट्रॅवेल्सवाल्या बाईने दोन-तीनदा सांगितले.`सिट पकडायला लवकर जावं लागतं बहुदा’ आणि तशी जास्तच गर्दी झाली तर अर्धा पाऊण तास उभा राहिलो तरी हरकत नव्हती माझी...अगदीच वेळ पडल्यास ट्रॅवेल्स वाले नाही का ड्राईव्हर शेजारी बसू देतात तसेही चालले असते... असे विचार मनाला चाटून गेले….``ऍण्ड सर ओन्ली २०केजीस अलॉउड..एक्स्ट्रा विल बी चार्जड…’२० किलो…? नक्कीच बाईने माझे हाफ तिकीट काढले असणार…अहो हा ७५ किलोचा देह एक्स्ट्रा चार्ज भरत तर दहा हजारात जाईल…अहो बाई विस किलोत काय होतय? माझं स्वतःच वजनच ७५ किलो आहे..यावर ` सर यू आर सो फनी’..`मी लगेज बद्दल बोलतेय…तुमचे वजन त्यासोबत फ्री आहे….हा..हा..हा…’ तिच्या शरीर यष्टीच्या मानाने जरा जास्तच जोरात हसत ती म्हणाली.तिने तिच्या उभ्या आयुष्यात मारलेला तो एकमेव विनोद असावा कारण त्यानंतर बराच वेळ ती हसत होती.. अशा मोठ्या हसण्याला असूरी हास्य का म्हणतात हे मला तिच्या दंतपक्तींच्या दोन टोकावर असणा-या सुळ्यांकडे पाहून जाणवले.एकंदरीत २० किलो बॅगा चालतील हा साक्षात्कार झाला.` `आणि सर..स्वतःची आयडेंटीटी राहू द्या सोबत…’ मी विमानप्रवास प्रथमच करत असल्याचे मात्र त्या किडकिडीत किडूकलीने ताडल्याचे उघड होते.माझ्या चेहे-यावरील प्रश्नाचिन्हाचे तिने पुन्हा उत्तर दिले…`म्हणजे तुमचे ड्राईव्हींग लायसेन्स,आधार कार्ड,इलेक्शन कार्ड वगैरे….’ कितीही नाही म्हटले तरी तिने फार मोलाची मदत केली होती…म्हणून मी तिला `थॅंक्स हं….’ असे उत्तर दिले..`त्यावर ती `वेलकम सर…’ म्हणत अशी काही गोड हसली की चार चौघे आजूबाजूला नसले असते तर `फ्लाईंग किस…(कमीत कमी) दिला असता ( तिने.. मला …चावट कुणीकडचे).

मी फ्लाईट ने जाणार असल्याचा निरोप एव्हाना सगळया आप्तेष्ट मित्रमंडळ नातेवाईक यांना गेला होता.त्यातल्या त्यात जे कधीही विमानात बसलेले नाहीत व नजिक भविष्यात बसण्याची शक्यताही नाही अशांची विशेष निवड यादी सौभाग्यवतींनी केली होती व त्यांना फोन केले गेले होते.वास्तवीक विमान प्रवासाला निघालेली व्यक्ती हल्ली काही दुर्मीळ लोकांच्या यादीत येत नाही..पण तरीही सौभाग्यवतींनी केलेल्या नव-याच्या ह्या सलेक्टेड मार्केटींगला जोरदार प्रतिसाद मिळाला.

त्यातून मग `वरून आपआपल्या माहेरचे गाव दिसेल का?,विमानातून उडी मारण्याचे पॅराशूट कुठे असते?,विमानाच्या आत आवाजाचा कर्कश्यपणा किती असतो, खूप वर गेल्यावर आमच्या म्हैसमाळला असतो तसा वारा असतो का?,शिटं भरले नाहीत तर पॅशिंजरसाठी पायलट आपल्या ऍपे रिक्षा अथवा ट्रॅव्हेल्स वाल्यांसारखा वाट बघतो का? अश्या कौतुहोलिक प्रश्नांपासून ते वरून उडणा-या घारेची विमानाची टक्कर होते अथवा नाही,पतंगाचा मांजा विमानात अडकल्यास कसे?,विमानाचे इंजिन वर असतानाच बिघडल्यास काय करावे? विमान चालवताना पायलट ला झोप लागल्यास काय?  असे भितीदायक प्रश्नही होते.आमच्या चिरंजीवांनीही या अपेक्षीत २१ प्रश्नसंचामध्ये काही मौलिक भर घातली.त्यांचे काही प्रश्न पुढीलप्रमाणे…`विमानाला रिव्हर्स गियर असतो का?,विमानाला वायपर अथवा इंडीकेटर असते का?विमानाची नंबरप्लेट दिसत नाही मग ती आर.टी.ओ. पासिंग होत नाहीत का? विमान हे तीन चाकी असल्याने त्याला एयर बस असे न म्हणता एयर रिक्षा का म्हणू नये?’  या सर्व प्रश्नांवरून चिरंजीव आर.टी.ओ.ऑफिसर होणार असे मनात येऊन मन प्रसन्न झाले.घरात सुबत्ता येण्याची ती नांदी होती.

त्यानंतर मात्र त्यांनी असा काही गुगली टाकला की त्याचे शंभर टक्के खात्रिलायक उत्तर जोवर मिळत नाही तोवर मी या पुढे पावसात भिजणार नाही.छत्री वापरल्यास ती दहा वेळेस शांपू ने धुवून काढेल व रेनकोट ३ दिवस पाण्यात भिजवून शिकाकाईने धुवून वापरेल.चिरंजीवांचा प्रश्न होता की वर विमानात `सू’ आली तर ती करण्यासाठीची छोटी खोली असते का? असल्यास त्यात होणारे विसर्जन सरळ खाली जमिनीवर येते का? (चिरंजीवांना रेल्वे प्रवासाचा अनुभव असल्याने तेथे होणारे मलविसर्जन त्यांनी पक्के ध्यानात ठेवल्याचे उघड होते.) त्या वेळी मनात हा ही विचार येऊन गेला की नशिब चिरंजीवांनी `सू’ ऐवजी जोडीने वापरला जाणारा शब्द वापरला नाही. नाही तर मी रोज चालत जातानाही हेल्मेट लावून फिरलो असतो.

तर असल्या अनेक प्रश्नांचे ओझे डोक्यावर घेऊन मी विमानतळाच्या आवारात शिरलो. जातानाच एक रूपयाचे दोन नाणे खर्च करून बॅग चे व माझे अशी दोन्ही वजने स्वतंत्र्यपणे करून घेतलेली होती.बॅगचे वजन जास्त झाल्यास त्यातील काही सामान सोबतच्या हॅंडबॅगेत टाकण्याचा सल्ला त्यातल्या त्यात अनुभवी असणा-या गोंदविलकरकाकांनी दिला होता.काटे,सुरे,तिखट,नारळ चालत नाही हे सांगतांना त्यांनी मला बहुदा काटे सुरे समजणार नाहीत की काय ह्या थाटात आपल्या बोटांचे आकार करून मला दाखविले होते.त्यांच्याच गाडीत ते मला सोडायला आले होते.सोबत सौभाग्यवती व चिरंजीवही होते.विमानतळाच्या त्या प्रशस्त इमारतीला बाहेरून पाहतानाच मला भव्यतेचा अंदाज आला व नकळतच मी छातीत थोडी हवा भरून घेतली.(खोल व रुंद श्वास घेऊन..पेट्रोल पंपावर थांबून नव्हे.) येथे पाच मिनीटाच्या वर थांबल्यास गाडीचे ४० रू.पार्किंग लागते हे गोंदविलकरांनी येतांना रस्त्यात चार वेळेस घोकून पाठ करून घेतले असल्याने उगाचच वेळ घालविणेही व्यर्थ होते.मी लगोलग बॅग काढली.हॅंडबॅग खांद्याला लटकावली व मागे वळून सगळयांना हात केला.त्यावेळेस गोंदविलकर त्यांच्या घड्याळाकडे,चिरंजीव बाजूला येऊन उभी राहिलेल्या ऑडी कडे तर सौभाग्यवती त्या ऑडीतून बाहेर पडून चूकून जवळ जवळ माझ्या शेजारी येऊन थांबलेल्या एका पावणेसहाफूटी विदेशी तरूणीकडे पाहण्यात गुंग होत्या.

क्रमशः लवकरच...

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home