मी,ही,तो व ते (भाग-२)
या कथेतील `मी’ व `ही’ म्हणजे
मी व आमच्या सौभाग्यवती,`तो’ म्हणजे आमच्या `ही’ ला झालेला किडनी स्टोन व `ते’ म्हणजे
आम्ही त्या स्टोनवर केलेले विवीधांगी ईलाज आहेत.
मी,ही,तो
व ते (भाग-२)
विशेष सूचनाः
१. भाग-१ वाचून भाग-२ ला हात घातल्यास
काहीतरी समजेल अन्यथा `संदर्भहीन लेखन आहे’ व `ते काहीही न समजल्याचा’ आरोप सहन केला
जाणार नाही.
आता पुढे वाचा…
आम्ही दर ७-८ दिवसांनी चौकशी करत असल्याने एक दिवस डॉक्टर
भाटवडेकरांनी नाईलाजाने आम्हाला दुस-या एका मोठ्या हॉस्पीटलमधील डॉ.नाडकर्णी यांच्या
नावाची चिट्ठी लिहून दिली व यांच्याकडे तसेच मशीन आहे तेथे लिथोट्रिप्सी करू म्हणून
सांगीतले. डॉ.नाडकर्णींनी आधी काही टेस्ट्स पुन्हा करायला लावल्या.मग पुन्हा सोनोग्राफी.ह्या
हॉस्पीटल मध्ये मात्र तो स्क्रीन इतका मोठा होता की आम्हाला तो बदमाश खडा एकदम स्पष्ट
मोठ्या पडद्यावर दिसला.मग त्यांच्या ज्युनिअर डॉक्टर ने एक फुटपट्टी घेऊन तो खडा त्या
मोठ्या स्क्रीनवर मोजला व एका कागदावर नोंद करून डॉ.नाडकर्ण्यांकडे दिला.ते वाचून गालातल्या
गालात हसत ते म्हणाले `अजित,स्केल मिली मिटर मध्ये आहे सेंटी मिटर मध्ये नाही’.हे ऐकल्यावर
मी ही वाकून पाहीले असता त्या ज्युनियरने २० मि.मी.च्या ऐवजी २० से.मी. अशी नोंद केरून
आपली ज्युनियरकीची लाज राखली होती.त्या खड्याच्या आकाराच्या नोंदीची दुरुस्ती करतानाच
डॉ.नाडकर्णींनी एकदम `अरे रे..’असे नैराश्यजनक विधान केले. आता आणखी काय? या माझ्या
चेहे-याला ओळखत ते म्हणाले,`मला वाटतं लिथोट्रिप्सीनी हा खडा जाणार नाही.हा थोडा मोठा
आहे.त्या पेक्षा तो ऑपरेट करून काढलेला चांगला. ’मला आता उपचार पुन्हा दोन महीने पुढे
सरकल्यासाचे चित्र दिसायला लागले.`डॉक्टर आमची तयारी आहे,कधी यायचे तेवढे सांगा.’ मी
क्षणाचाही विलंब न लावता निर्णय घेतला.यापुर्वी मी इतका झटपट निर्णय ५-६ वर्षांचा असताना
आकाशपाळण्यात पहिल्यांदा बसल्यावर `या `चक्रा’त यापुढे पुन्हा बसून अडकायचे नाही’ हे
ठरवतांना शेवटचा घेतल्याचे माझ्या स्मरणात आहे.त्यावेळीही माझ्या मनात आता कधी एकदा
हे आकाशभ्रमण थांबते व आपण घरी जातो असे झाले होते.तिच भावना मनात ठेवत मी डॉक्टरांकडे
उत्तराची अपेक्षेने पाहीले.डॉ.नाडकर्णी खांदे उडवित म्हणाले,`सॉरी,माझ्याकडे सर्जरी
होत नाही.तुम्हाला त्यासाठी डॉ.महालें कडे जावे लागेल.
आता अजून तिसरा डॉक्टर..? डॉ.महालेंचे हॉस्पिटल झटकन
सापडले.त्यांच्या रिसेप्शनच्या बाहेर चप्पल बुटांचा सडा पडलेला होता.त्यात निरनिराळ्या
जातीच्या,पंथांच्या,आकाराच्या व अवस्थेतील चपला,जोडे,सॅंडली मनमुराद झिम्मा खेळत पसरलेल्या
होत्या.(पुर्वी घरात चपलेवर चप्पल चढलेली दिसली तर बाहेरगावी प्रवास करावा लागणार असे
म्ह्टले जायचे.एकंदरीत इथल्या चपलांची `चढाओढ’ पाहता आज बाहेरगावी जाण्यासाठी येस टी
श्टॅंड फुल्ल असायला हवे होते.)नुकतीच दंगलीत पळापळ झाल्यावर जसा सिन साधारणतः असावा
अगदी तसा तो होता.बाहेर त्यांच्या नावाखाली युरोलाजीस्ट अशी पाटी होती व त्याच्या पुढे
साधारणतः मध्ये अनेक टिंब असलेल्या व एकूण
१५-१६ अक्षरांच्या अनेक पदव्या लिहीलेल्या होत्या.त्या पदव्यांच्या लांबीवरून फी ची
रूंदी ठरत असल्यामुळे रिसेप्शन वर त्यांनी भिंतीवर लिहीलेला प्रथम तपासणी फी चा आकडा वाचून मला अगदीच `आकडा’ आला नाही.आम्ही निमुटपणे
नंबर ची वाट पाहू लागलो.बरीच गर्दी असल्याने आता येथे बराच वेळ बसण्याची तपश्चर्या
करावी लागणार होती.थोडा वेळ बसून मग मी सहज पाय मोकळे करण्यासाठी उठलो व तेथे लावलेले
काही फोटो,वर्तमानपत्रातील कात्रणं वाचू लागलो.
डॉ.महालेंचे वेगवेगळया काळातील व वेगवेगळ्या वर्तमानपत्रात
छापून आलेले यशस्वी शस्त्रक्रीयांचे फोटो व बातम्या तेथे लावलेल्या होत्या. त्यातील
डॉक्टर महाले ओळखण्यासाठी मी एका वेळेस दोन फोटो नजरेसमोर ठेऊन दुस-या फोटोत पुनरावृत्ती
कुठल्या चेहे-याची होते ते शोधत होतो.पण त्या अनेक कागदांचे रंग,आकार,छपाई व काळ इतका
वेगवेगळा होता की त्यातील एक कॉमन चेहेरा ओळखून त्याला डॉ.महाले नाव देण्याचा माझा
उपक्रम पुर्ण फोल ठरला.अखेर ब-याच बारकाईने पाहील्यावर कुठे हसणारे,कुठे थकलेले,कुठे
पेशंटच्या नातेवाईकांनी फोटो काढताना दाखवलेल्या अतिउत्साहामुळे त्यांच्या मागे लपलेले,कुठे
चष्मा घातलेले तर कुठे डोळे बंद आलेले (आणी एका फोटोत तर चुकून अनावधानाने एकच डोळा
बंद असलेले) असे डॉ.महाले मी मनात पक्के केले.प्रत्येक फोटोत ते पुर्णतः निराळे वाटत
असल्याने मला ते सध्या नक्की कसे दिसतात याचे कुठलेही अनुमान लावता आले नाही.
त्या फोटोंशेजारी असलेल्या एका काचेच्या कपाटात अनेक
वेगवेगळ्या आकाराच्या गारगोट्या,विवीधरंगी समुद्रातील दगडं मांडून ठेवलेले होते.`डॉ.ना
इतक्या व्यस्त जीवनातून दगड धोंडे गोळा करायचा छंद जपायला बरा वेळ मिळतो.?मी आदरयुक्त
आश्चर्याने कुजबुजलो.आता माझी ही कुजबुज अंमळ थोडी मोठ्यानेच झाल्याने ती त्या रिसेप्शनीस्ट
च्या कानावर आदळली.त्यावर तिने मला सांगीतले `अहो ती समुद्रतील दगडं नाहीत,डॉक्टर सरांनी
ऑपरेट करून काढलेले पेशंटच्या किडनीतील स्टोन्स आहेत..हे ऐकल्यावर मात्र मला फेफडं
यायची बाकी होती.`अहो काय सांगता?इतका मोठा दगड,किडनीत.?मी एका भीमकाय दगडाकडे आश्चर्याने
बघत म्हणालो.`अहो याला उचलायला तर क्रेनच आणावी लागली असेल’ असा एक पाचकळ विनोद मारत
मी स्वतःच खदा खदा हसलो.पण रिसेप्शनीस्ट व आमच्या सौभाग्यवतींच्या चेहे-यावरील सुरकुतीही
हलली नाही.उलट हीने माझा शर्ट खेचला.तेथे या किडनी स्टोन वा तत्सम आजारांनी पिडीत पेशंटची
टोळी च्या टोळीच बसलेली असल्याने( आम्हीही त्या टोळीतील अधिकृत नवनिर्वाचीत सदस्य असल्याने)
त्यांच्या दुखणा-या दगडांवरून घासत घसरून माझा विनोद जखमी होऊन खाली पडला.मग मी ही
काहीही झाले नसल्यागत पुर्ववत खाली बसलो व निमूटपणे नंबरची वाट बघायला लागलो.
डॉक्टरांच्या केबिनचा दरवाजा उघडला व आतून एक धोतर बाहेर
आले.थोडा वेळ धोतर तेथेच दरवाज्यात उभे राहून डॉक्टरांशी पुन्हा काही सल्ला मसलत करत
होते.मग ते पुर्ण आत गेले व दरवाजा पुन्हा धडकन बंद झाला.आता नंबर आमचा असल्याने मग
मी जवळ जवळ दरवाज्याला चिकटूनच उभा होतो.दरवाजा पुन्हा बंद झाल्याने मग आम्ही थोडे
मागे सरकत पुन्हा तेथेच धोतर बाहेर येण्याची वाट बघत उभे राहिलो.पुन्हा दरवाजा उघडला
आणी पाहतो तर काय चक्क धोतराऐवजी आतून एक नऊ वारी हातात एक काचेची बाटली घेऊन बाहेर
आली. ही डॉक्टरांची केबिन आहे का चेंजीग रूम ? मी आश्चर्यचकीत होऊन तोंडात बोट घातले.
(आता तोंडात बोट घालणे हे फक्त वाक्प्रचार या अर्थाने घ्यावे अन्यथा मी जर ह्या वयात
इतक्या लोकांदेखत तोंडात बोटे घालू लागलो व त्यातल्या त्यात त्यातील एखादे बोट जर अंगठा
असेल,तर माझे डॉक्टरला दाखवायचे हॉस्पिटल चुकले असे कोणीही म्हणेल.)पण मी समजलो तसला
काही चमत्कार पहायला मिळाला नाही.नऊवारी पाठोपाठ धोतर ही आतल्या रांगड्या व्यक्तीसकट
बाहेर आले.काऊंटरवाल्या रिसेप्शनिस्टला नऊवारीनी गोडसे स्मितहास्य दिले व आपल्या हातातील
बाटली तिला दाखवत `आमचा दागिना घेऊन जाते’ असे उदगार काढले यावर त्या दोघी खळखळून हसल्या.
`दागिना’ हा शब्द कानावर पडताच सौं नी तशीच १८० अंशा मान वळवत बाटलीकडे पाहीले.( आत
पेशंटला दिवाळीनिमित्त डॉक्टर दागिने भेट देत आहेत असे क्षणभर वाटून `रिकामी बाटली
आहे का एखादी’ हे ही विचारेल असे क्षणभर मला वाटले.) इतक्यात नउवारीच्या हातातील त्या
बाटलीत चक्क एक पांढरा दगड ठेवलेला होता हे मी पाहिले.आता इतका वेळ बाहेर बसून असले
अनेक दगड धोंडे पाहिले असल्याने तो दगड नऊवारीच्या स्वकमाईतला होता व इतका वेळ किडनीच्या
लॉकरमधे दडवलेला होता हे मी तात्काळ ओळखले.
एव्हाना मी दरवाज्याच्या आत पोहोचलो व मागे रेंगाळलेल्या
सौ.ना जवळ जवळ आत ओढली.आत एका प्रशस्त केबीन मध्ये एका पडद्याआड तपासणी कक्ष व बाहेर
डॉक्टरांचा टेबल,समोर दोन खुर्च्या अशी नेहेमीच्या धाटणीचीच मांडणी होती. मी समोर बसलेल्या
डॉक्टरांकडे पाहून स्मितहास्य केले व आम्ही दोघे खुर्चीत बसलो.नकळत मी फोटोतील डॉक्टर
महालेंच्या चेहे-याची तुलना वास्तवातील डॉक्टरांशी केली व एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.डॉक्टर
फोटोत खुपच फ्रेश वाटत होते.आता त्यांच्या चेहेरा खूपच ओढलेला व तणावग्रस्त वाटत होता.त्यावरून डॉक्टरांचे फोटो
हे लग्नाअगोदरचे असावेत हा एक सर्वसाधारण चपखल बसणार वैचारीक तोडगा मी काढला.डॉक्टरांना
अभिवादन केल्यावर आम्ही त्यांच्या समोर बसलो.मी थोडक्यात आत्तापर्यंत झालेला इतिहास
सांगीतला.त्यात खड्याच्या जन्मापासून ते शेवटच्या डॉ.नाडकर्णींच्या तपासणी पर्यंतचा
सगळा तपशील होता.इतक्या वेळ अतिशय धीरगंभीर चेहेरा करून आमची कथा ऐकणारे डॉ.महाले लिथोट्रीप्सी
मशीन बंद पडण्याच्या घटनेला मात्र अचानक खुदकन हसले.आपण अनावधानाने जरा जास्त जोरात
हसलो हे लक्षात येऊन ते लगेच सावरले व लगेच त्या घटनेविषयी त्यांनी `ओह नो’ असे उदगार
काढत परिस्थीती नियंत्रणात आणली.यावेळी मला एक मिनीट स्तब्धता पाळून श्रद्धांजली देतानाही
काही केल्या हसू न आवरता येणा-या आमच्या एका मित्राची आठवण झाली.कालांतराने तो एक निष्णांत
डॉक्टर झालेला आहे.थोडक्यात समोरचा कुठल्याही दुःखात असताना (व ब-याचदा आपल्या ट्रीटमेंटमुळे
दुःखात असताना) पेशंट दिसल्यावर हसता आले पाहिजे हा डॉक्टर होण्यासाठी लागणारा किमान
गुणवत्ता निकष तर नव्हे.?
डॉक्टर महालेंना आमची ही कथा फारच रोचक वाटली असावी
कारण ते अगदी निवांत कर्र कुई आवाज करणा-या गोल भ्रमण खुर्चीवर मस्त मागे पुढे रेलत
कथा ऐकत होते.नकळत त्यांनी त्यांच्या हातात एक गोल काचेचा पेपरवेट घेतला व ते रोखून
माझ्याकडे बघायला लागले.त्यांच्या त्या `फेकू का मुस्काटात पोस’ मुळे दचकून मी माझी
कथा लगेच आटोपती घेतली.मग डॉक्टरसाहेबांनी सगळे रिपोर्टस पाहीले. एका रिपोर्टकडे मात्र
ते रोखून बराच वेळ बघत त्यांनी अत्यंत खेदपुर्वक मान हलवत म्हणाले `यांचा एच.बी.फक्त
७.६ आहे.एवढ्यात ऑपरेशन करता येणार नाही.यांना आधी एच.बी.वाढवावा लागेल.मी औषध लिहून
देतो.’ `अरेच्या इतका कमी झाला का?’ शेअरबाजार पडल्यावर पुर्णवेळ नेटवर ऑनलाईन ट्रेडींग
व फावल्या वेळेत काम करणा-या सरकारी कर्मचा-याने सेन्सेक्स आकड्यावर टिप्प्णी करावी
त्याप्रमाणे मी बोललो.वर जणू काही स्वतःच्याच पिशवीतून काढून दिलेल्या त्या रिपोर्टने
लबाडाने एच.बी.बद्दल काही सांगितलेही नाही असा नाराजीचा सुरही होता.आता एच.बी. वाढवणं
म्हणजे काय करणं याची काहीच कल्पना नसल्याने मला आता हे ऑपरेशन प्रकरण किती पुढे सरकणार
याचा अंदाज येईना.शेवटी मी त्यांना तसं विचारूनच घेतलं.`त्याच काय आहे की एक महिन्यात
ते वाढायला हवं.मध्ये काही त्रास झाल्यास दुसरं औषध देतो.’डॉ.म्हणाले.
खिन्न होऊन आम्ही बाहेर आलो.रितसर फी दिली.रिसेप्शनिस्ट
कडे बघून कुठलेही `दागिने’ दाखविण्याची संधी मिळाली नाही.चपलांच्या त्या खचामधून एकमेकांची
पादत्राणे ओळखत व ती आपापल्या पायात बिनचूक घालत आम्ही बाहेर पडलो.आता एक महिना अजून
वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.तो संपुर्ण महिना अत्यंत घाणेरड्या वासाचे ते औषध गोड
मानून सौ मोठया हिमतीने घेत होत्या.बाजारात पिशव्या धरायला कमीत कमी शुक्रवारच्या सुटीच्या
दिवशी नवरा नसेल तर त्यांच्या होणा-या लाल पिवळ्या चेहे-यावरून त्यांना वरचेवर औषध
मानवून त्यांच्या चेहे-यावरील तेज वाढत चालल्याचे जाणवत होते.विशेष म्हणजे एकदाही त्यांना
स्टोन चा त्रास न झाल्याने दोन-तीन महिने पुन्हा तसेच पुढे सरकले.
दरम्यान एकदा आमच्या एका काकांनी मला निसर्गोपचार करणा-या
एका तज्ञ डॉक्टरांची माहीती दिली.डॉ.पटेल हे गुजराती होते व आमच्या शहरात १५ दिवसातून
दोन दिवस येत असत.त्यांच्या हाताला असणा-या गुणाची चर्चा सर्वदूर असल्याने त्यांची
अपॉईंटमेंट मिळवणे हे पहिले कठीण कर्तव्य होते.पण अचानकच तेथे काम करणा-या एका संबंधिताची
भेट झाल्याने मला लगेच अपॉईंटमेंट मिळाली.गोलंदाजीत व क्षेत्ररक्षणात अत्यंत सुमार
कामगिरी करतो म्हणून नाईलाजाने नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला पाठविलेल्या इशांत शर्मा
ने अचानकच ३० धावा काढून धोनीला आश्चर्यचकित करावे त्या प्रमाणे माझ्याकडून किमान दोन
महिने हे अपॉईंटमेंट घेण्याचे काम होणार नाही
याची खात्री असलेल्या सौ.ना अचानक लगेच अपॉईंटमेंट मिळाल्याने आश्चर्याचा धक्का बसला.
(अर्थात इशांत सोडा टेस्ट मॅचेस मध्ये युवराज सिंग,कोहली,गंभीर,सेहवाग ही नाईट वॉचमनला
साजेशीच कामगिरी करीत आहेत म्हणा.) ठरलेल्या दिवशी आम्ही डॉ.पटेलांच्या त्या नॅचरोपथी
उपचार केंद्रात गेलो.एका मोठया प्रशस्त हॉल मध्ये ते एका अतिशय साधारण लाकडी खुर्चीवर
बसलेले होते.त्यांच्या बाजूला एक शिकाऊ महिला डॉक्टर कागद पॅड ला लावून डॉक्टर सांगतील
ते उपचार पेशंट ला लिहून देत होती.डॉक्टर अतिशय वयस्क होते.त्यांची बोलण्याची,हसण्याची
शैली अतिशय लोभसवाणी होती.गुजराती टोन लगेच समजत होता.आमचा नंबर आल्यावर अतिशय हसतमुखाने
त्यांनी आम्हाला बसायची खूण केली.पेशंटच्या नावाच्या यादीत सौभाग्यवतींचे नाव असल्याने
त्यांनी हिच्याकडे बघतच `केम छो’ केले.व `शूं समस्या छे’ असले काहीतरी मला ऐकू आले.आता
समस्या जरी `शू खडया’ ची च होती पण हा गुजराती हल्ला अगदी कॉंग्रेसपेक्षाही आमच्या
सौभाग्यवतींना जड गेला.रणजीत त्रिशतक मारून संघात आलेल्या फलंदाजाची अचानक डेल स्टेन
समोर आल्यावर होते तशी गांगरलेली परिस्थिती आमच्या हि ची झाली.त्यामुळे डॉक्टरांनी
मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे पाहीले.मी `इनको किडनी के खडे का त्रास है’ अशी सुरुवात
करून राष्ट्रभाषेत कशीबशी पहिली धाव घेतली व घाईघाईत पुन्हा स्ट्राईक सौ.कडे दिली.यावर
डॉक्टर साहेबांनी पुन्हा हिच्याकडे बघत `तमारा हसबॅंड कहे तमे किडनी पथरी छे.Is he
correct? Where you feel the pain?’ असे विचारले.आता या आमच्या गुजराती डेल स्टेन आजोबांनी
एका षटकात दोन बाऊंसर टाकले.एक म्हणजे `हसबॅंड’ असे म्हणत त्यांनी आमचा बॅंड वाजवून
सौभाग्यवतींना गालातल्या गालात हसायला लावले( अगं बाई यांना काय माहिती घरी बॅंड कोणाचा
वाजतो ते? असले हावभाव तिच्या चेहे-यावर होते.) व दुसरा गुजरातीवरून आमच्या सौं चा
जालीम शत्रू इंग्रजीच्या खांद्यावरून त्यांनी नेम लावला. सौ.नी पर्स मधे हात टाकला.`where
आणी pain’ या दोन शब्दांचा अर्थ लावत पर्स मधील पेन बाहेर काढतात की काय या भितीने
मी दचकून त्यांचाकडे पाहिले.पण तसले काही जादूचे प्रयोग न दाखवता त्यांनी आतून रुमाल
बाहेर काढला व भर जानेवारीच्या थंडीत आलेला घाम पुसला. हिला पेपर सोपा जावा म्हणून
मी लगेच भाषांतर करून `अगं तुला कुठे दुखतय ते सांग ना?’ असे सांगितले.यावर डॉक्टरसाहेबांनीही
`हो,हो शांग शांग’ असे अनुमोदन दिले.त्यांच्या या (बाल)मराठी उदगारांनी धीरात धीर येऊन
मग हिने सविस्तर कथा `शांगी’तली.मग डॉक्टरांनी काही प्रश्न विचारले जसे `तू पानी किती
पिते?,तू नारियल पानी घेते की नाय?’ त्यावरून मग डॉक्टरसाहेबांनी काही गोष्टी टिपून
घेणा-या मुलीला सांगितल्या.ते सर्व लिखाण झाल्यावर त्यांनी तो कागद तिच्याकडून घेऊन
आमच्या समोर ठेवला.तो एक मोठा निबंधच होता.
क्रमशः लवकरच…
1 Comments:
This comment has been removed by a blog administrator.
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home