Wednesday, March 27, 2013

मी,ही,तो व ते (भाग-१)


मी,ही,तो व ते (भाग-१)
विशेष सूचनाः
१.या कथेतील `मी’ व `ही’ म्हणजे मी व आमच्या सौभाग्यवती,`तो’ म्हणजे आमच्या `ही’ ला झालेला किडनी स्टोन व `ते’ म्हणजे आम्ही त्या स्टोनवर केलेले विवीधांगी ईलाज असल्याचे पहिल्याच ओळीत जाहीर करीत आहे.त्यामुळे काहीच चवदार वाचायला न मिळाल्याचे निरोप पाठवू नयेत.तरी पुढचे लिखाण वाचावे अथवा नाही हे लगेच ठरवावे.
२. आपल्या वाचनात आले नसेल कदाचीत पण प्रस्तुत लेखकाने यापूर्वी काही लेखन केलेले आहे तरी अगदीच नवखे आहेत असे समजत चुका काढून उगाच लेखकाचे मानसीक खच्चीकरण करू नये.

परवाच कोणीतरी किडनी स्टोन चा विषय काढला आणी मलाही माझ्या आयुष्यात आलेल्या एका आदरणीय खड्याची कथा आठवली.त्या बहुगुणी खड्याच्या आठवणीत मी इतका मोहरून गेलो आहे की त्याच्या बद्दलची `खडा नी खडा’ माहीती तुम्हाला कधी एकदा सांगून माझे मन हलके करतो असे मला झाले आहे.

लग्नानंतर मला (म्हणजे माझ्या बायकोला) साधरणतः दोन वर्षांनी मुलगा झाला.यावर आमच्यात लग्नानंतरच मुलं होतात असला अतिशय सुमार दर्जाचा विनोद मारण्याची आपल्यापैकी काहींची इच्छा होत असेल तर ती दाबा कारण सुमार दर्जाचा ठेका आताशा फक्त झहीर खान यांचेकडे त्यांच्या एकंदरीतच मैदानवरील हालचालींमुळे (अथवा त्याच्या अभावामुळे) राखीव आहे.अहो मागे अहमदाबाद कसोटीत इंग्लंडविरुद्ध या महाशायांनी दोन सोडलेले झेल,पायाजवळून जाणारा चेंडू निव्वळ खाली वाकताना `मोडेन पण वाकणार नाही’ या निर्धारान्वये वाकता न आल्याने शेवटी सिमारेषेपलिकडे उभ्या असणा-या बॉल बॉय साठी सोडेलेले पाहताना फार वेदना झाल्या.

असो तर सांगण्यासारखी गोष्ट अशी की आमच्या चिरंजीवांच्या जन्माच्यावेळेसच मला आणखी एक अपत्य झाले.आता तुम्ही म्हणाल `अभिनंदन, चला तर मग भगवान ने छप्पर फाडके दिया’.पण थांबा एवढे एकदम निष्कर्ष काढू नका.म्हणजे मला जुळे वगैरे झाले नव्हते तर आमच्या सौभाग्यवतींनी एक गोंडस,लोभसवाणा व अतिशय आकर्षक खडा ज्याला अनेक लोक (इंग्रजीच्या) प्रेमाने `किडनी स्टोन’ ही म्हणतात तो किडनीत जन्माला घातला होता.सोनोग्राफी यंत्रात डॉक्टर भाटवडेकरांनी पांढ-या चंद्रावर असलेला एक काळा डाग दाखवावा त्याप्रमाणे त्या काळ्या स्क्रीनवर तो पांढरा खडा मला दाखवला त्यावेळी त्या भयंकर काळ्या निळ्या चित्रातील तो खडा मला प्रचंड रुपवान व राजबिंडा वाटला. मुलगा पोटात असतानाच हा आमचा खडाही बाजूला किडनीत गुण्यागोविंदाने वाढत होता.पहिल्या सोनोग्राफीत डॉक्टरांनी आम्हाला ही गुड न्यूज दिली.सौभाग्यवती लाजल्या आणी त्यांच्या लाजण्यामुळे मला घाम फुटला.याचे कारण मागे एकदा आमची कामवाली बाई `भाभीजी दुबली हो गयी’ असे चक्क राष्ट्रभाषेत खोटं बोलली तेव्हा आमच्या सौभाग्यवती अशाच लाजल्या होत्या आणि त्यानंतर ती कामवाली पुन्हा कधीही दिसली नाही.पुढे जाउन ती मनोरूग्ण असून (ती म्हणजे मोलकरीण) वाट्टेल ते बडबडत असे हे समजले. त्यानंतर आता हा लाजण्याचा प्रसंग आल्याने कित्येक दिवस मी जाता येता डॉक्टरांच्या क्लिनीकला जाऊन बाहेर रिसेप्शन ला डॉक्टर साहेब `आहेत ना’ अशी काळजीयुक्त चौकशी करित असे.

असो तर आमचे डॉक्टर भाटवडेकर म्हणाले की `अहो त्यात घाबरण्यासारखं काही नाही छोटासा खडा आहे.आता बाळाला आत खेळायला सोबत मिळाली असे समजा.आता अशा अवस्थेत तशीही काही ट्रीटमेंट करता येत नाही नंतर आरामात काढता येईल हा खडा.खूप त्रास झाला तर हे औषध लिहून देतो’.औषधाच्या त्या प्रिस्क्रीप्शन ची चिठ्ठी मी मेडीकल दुकानदारासमोर ठेवली.प्रेग्नंसी व वरून किडनी स्टोन हा दुग्धशर्करा योग पाहता गि-हाईकाचे उज्ज्वल भविष्य लक्षात घेत त्याने लगेच मला बसायला खुर्ची वगैरे दिली. उरलेल्या दोन रुपयाच्या सुट्याऐवजी चॉकलेट न देता चक्क त्याने चक्क मला अजून तीन रुपये माफ करून पाच रुपयाचे नाणे हातात टेकवले.असा दुकानदार जर मला लहानपणापासून भेटला असता तर असेच पाच पाच रुपये जमा करून मला आतापर्यंत मुंबईत वरळी सी फेस ला फ्लॅट बुक करता आला असता असे काही महत्वाकांक्षी विचार माझ्या मनात तरळून गेले.पाच रुपयाचे ते नाणे मी मोठ्या सन्मानाने पॅंटच्या खिशात टाकले आणि फुकटात मिळालेले पैसे मग ते बक्षिसात मिळालेले का असेना अजिबात टिकत नाहीत हा माझा इतिहास असल्याने  लागलेले लॉटरीचे तिकीट सांभाळावे त्याप्रमाणे चार चार वेळा ते नाणे खिशात तपासत मी घरी आलो.दाराशीच मुलं क्रिकेट खेळत होती.मला पाहताच क्षणी `काका,काका..’ असे म्हणत ती आली आणी टॉस करण्यासाठी नाणं मागू लागली(मी वास्तववादी लेखक असल्याने स्वतःचा उल्लेख `दादा दादा’ असा न करता `काका काका’ असाच केला आहे हे लक्षात घ्यावे) .मी नाही नाही म्हणत असतानाच जवळ जवळ माझ्याकडून लुटूनच त्यांनी ते पाच रुपयांचे नाणं नेलं आणी परस्पर त्याचा टॉस झाला.माझ्या डोळ्यादेखत गटांगळ्या खात वर हवेत उडालेलं ते नाणं स्वतःचे हेड आपल्या टेलमध्ये घुसवत महापालीकेच्या एका उघड्या गटारात `डुबूक’ असा आवाज करत आत गेलं आणी मुलं स्टंप व बॅट तेथेच सोडून पळाली.जाउ द्या पुन्हा एकदा सिद्ध झालं की फुकटातलं काहीही पचत नाही.(कमीत कमी मला तरी.हा काही सगळ्यांसाठीचा वैश्विक सिद्धांत नव्हे हे कुठल्याही राजकारण्याकडे पाहून आपल्याला पटेल.)

त्यानंतर पुढची काही महिने सौभाग्यवतींचे बाळंतपण,बाळाचे आगमन,त्याचे सतत झोपणे व आमच्या झोपायच्या वेळा जोरजोराने रडत जागणे (व जागविणे),सर्व विधी जागच्या जागी करणे,मग पाळणा, पाळणा देतांनाची अंगाई गिते व ते गायल्यामुळे बाळाची झालेली झोपमोड मग पुन्हा त्याचे रडणे, त्याच्या अनेक बाललीला या सगळ्यात फारच लवकर गेले.दरम्यान सौभाग्यवतींच्या किडनीतील खड्याने त्याचे  अस्तित्व असे कधी वेदनेवाटे न दाखविल्यामुळे तो कदाचित परस्पर पडला असावा असा आम्ही एक भाबडा कयास बांधला होता.पाहता पाहता बाळ एक वर्षाचे झाले.किडनीतील त्या खड्यानेही आपला पहिला वाढदिवस साजरा केला.मग लवकरच मजल दरमजल करीत खडा व बाळ दोघेही दोन वर्षांचे झाले.

अचानक एक दिवस सौभाग्यवतींना पुन्हा कळा (वेदना या अर्थाने) सुरू झाल्या.यावेळी डॉक्टरांनी पुन्हा हा त्रास किडनी स्टोनचा असल्याचा साक्षात्कार केला.काही टेस्टस लिहून दिल्या.त्यांनी त्या प्रिस्क्रीप्शनवर जे काही गोल गिरगिरीत अक्षरात लिहीलेले होते ते वाचू शकणारा माणूस अमुक अमुक सोनोग्राफी सेंटर मध्येच फक्त असतो हे समजल्याने मग तेथेच गेलो.त्याने मात्र तो नुसत्या नजरेच्या एका कटाक्षाने वाचला व लगेच एका कागदावर तीन आकडी दोन संख्या लिहील्या व तिथेच खाली त्याची बेरीजही करून दाखवली.प्रथम तोंडी केलेली बेरीज त्याने नंतर कॅलक्यूलेटर ने पुन्हा केली.पण तो समाधानी दिसला नाही.कॅलक्युलेटर वरचा शुन्य दाबत त्याने ते आकडे पुन्हा मिटवले व पुन्हा बेरजा मांडल्या.तो काय करत आहे हे पाहत मी थोडा पुढे झालो व मी तो आकडा वाचला.तो पाच आकडी दिसल्याने तो त्या कॅलक्युलेटर वरील बेरजेच्या ऐवजी गुणाकाराच्या कळा दाबत असावा असे लक्षात आले. मग ते कॅलक्यलेटर मी हातात घेत त्याला बेरीज करुन दिली.माझ्या आलेल्या उत्तरावर त्याच्या चेहे-यावरील समाधान ओसंडून वाहू लागले.का कोण जाणे त्याने तोंडी केलेल्या बेरजेचा आकडा माझ्या लावलेल्या आकड्याशी मिळताजुळता असावा.आम्हाला येणा-या टेस्ट्स च्या खर्चांचे ते आकडे होते.मी ते पैसे (नाईलाजाने) त्याच्या हातावर ठेवले.त्यानंतर पुढील तीन तास सौभाग्यवतींच्या निरनिरांळ्या यंत्रावर आलटून पालटून तपासण्या झाल्या.`ह्यांना स्टोन आहे’ अशी एक शिळी बातमी डॉक्टरांनी आम्हाला मोठ्या खुशीत दिली.(खुशी होणे साहजिकच आहे म्हणा.मलाही नविन मोठी ऑर्डर बुक झाल्यावर असाच आनंद होतो).`पण डॉक्टर अजून तो पडला नाही?’ मी आपण मत न दिलेला उमेदवाराचा निवडणुकीचा निकाल विचारावा त्या पद्धतीने कुजबुजलो.
`तो आपोआप पडणारही नाही,तो किडनीत एकदम तळाशी आहे.गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध तो वर येऊन मुत्रनलिकेत येणार नाही.आणि मला वाटतं आता ऑपरेट करायला हवा तो आता २० मिमि चा झाला आहे.’ डॉक्टर म्हणाले. `अहो म्हणजे चांगला घोडा झालाय म्हणा की’ मी मनातल्या मनात खाऊन पिउन धष्टपुष्ट झालेल्या त्या २०मिमि दगडाला शिव्या देत पुटपुटलो.न्यूटन जर त्या दिवशी झाडाखाली झोपण्याच्या ऐवजी झाडावर सफरचंद तोडत बसला असता तर गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्धही ते फळ त्याच्या हातात पडून तसा शोध त्याने लावला असता व आमच्या या तळाशी असलेल्या खड्याचाही प्रश्न आपोआप मिटला असता.व याबदल्यात आमच्या या खडयाला मी `न्यूटनस्टोन’ असे नावही द्दयायला तयार होतो.पण शेवटी नव्हतं बिचा-याच्या नशीबात.असो,ऑपरेशन हा शब्द ऐकून न्यूटनचे ते झाडावरून खाली पडलेले फळ माझ्याच डोक्यात पडून ते मला गुरुत्वाकर्षणाने जमिनदोस्त करेल की काय असे मनात वाटले.त्याही अवस्थेत (त्या फळाचा नेम चुकवत) मी स्वतःला सावरले.
`मग डॉक्टर पुढे काय.?’..`त्याचे असे आहे की ऑपरेट केले तर लगेच खडा जाईल.दुसरा उपाय लिथोट्रिप्सीचा आहे.त्यात तुम्हाला दोन तीन वेळेस सिटींग कराव्या लागतील.त्यात आम्ही ऑपरेशन न करता,तो खडा शॉट देऊन बाहेरूनच फोडतो,त्याचे छोटे तुकडे करतो व ते मुत्रनलीकेतून काढतो.काय करायचे ते तुम्ही ठरवा.’
त्यांचा लिथोट्रिप्सी हा शब्द मला कुठेतरी शितपेयांच्या जाहीरातीतून सांडून इकडे आल्यासारखा वाटला.अगदीच नाही तर तो `ऑक्टॉपसी’ या एका आठ पायांच्या प्राण्याच्या नावावर गेलेल्या बॉंडपटाच्या नावाशी (ज्यात आपल्या दोन पायांच्या अमृतराजांच्या विजय ने काम (?) केले आहे) साधर्म्य करत होता.  डॉक्टर बोलत होते आणी मी कल्पना करत होतो की माझ्या बायकोच्या पाठीत,कमरेत ते मशीन गदा गदा गुद्दे मारत आहे व प्रत्येक वेळेस आत खडा फुटून दगड फोडल्या सारखा आवाज निघत आहे.आता हेच करायचे तर ते नेक काम मी सुद्धा घरच्या घरी मॅनेज केले असते असे क्षणभर वाटून गेले.तसेही साल्याने लग्नात कान ओढल्यापासून ते अगदी परवा परवाला `आमच्या ह्यांना ना काही व्यवहारज्ञानच नाही’ असे सौ.नी फोनवर माहेरच्या मंडळींकडे केलेल्या जाहीर प्रगटना पर्यंतच्या सगळ्या अपमानांची परतफेड बाकी आहेच.

मग आम्ही चौघेही (मी,सौ,मुलगा व खडा) डॉक्टरांच्या क्लिनीकच्या बाहेर आलो.सौभाग्यवतींशी चर्चा केली.ती लढाईवर निघालेल्या झाशीच्या राणीसारखी काहीही करायला तयार होती.मी स्वतः ऑपरेशन या शब्दालाच अतिशय घाबरतो.एक वेळ मी `बायको’ या शब्दाला त्यातल्या त्यात कमी घाबरेन पण ऑपरेशन म्हटल्यावर माझी बोबडी वळते.(इथे मुद्दाम घाबरण्याची परिसीमा लक्षात यावी म्हणून `बायको पेक्षा जास्त’ अशी तुलना केली आहे.वास्तवात काय असावे हे आपल्यातले अनेक पुरूषमंडळी मनोमन जाणताच.)
मी शेवटी ऑपरेशन टाळून लिथोट्रिप्सी करायचे ठरवले.वेळ,वार ठरवून आम्ही सगळ्या तयारीने एका सकाळी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो.हॉस्पीटलचा गाऊनसुद्धा आदेश भाऊजींनी दिलेली पैठणी नेसावी त्या ऐटीत घालून सौ मोठ्या दिमाखात ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्या.आत आधी तिला भुल देणार होते म्हणे.मी मनात म्ह्टले `ही ला काय भुल द्दयायची काय गरज?,नुसतं पडलं की झोप लागणा-या सुदैवी लोकांपैकी ही आहे.ती झोपेत असताना बुलडोझर चालवला तरी जाग येणे नाही.काळजी नसावी.’

बराच वेळ गेला.एव्हाना भुल देऊन हिने स्वप्न पाहायलाही सुरूवात केली असणार.आतापर्यंत झोपेत बाजारातील सगळे मोत्या,खड्यांचे दागिने पाहून झाले असतील हिचे.माझ्या मनात हे विचार चालू असतानाच डॉक्टर भाटवडेकर त्यांचा ऑपरेशन चा पोशाख व तोंडाला मास्क लावून आत गेले.चुकून डॉक्टर ऑपरेशन करायचे नाहीए `लिथो’ करायची आहे हे विसरले नसतील ना?असा प्रश्न माझ्या मनात आला.(असले प्रश्न लहानपणापासून माझ्या मनात येत असत.मी लहानणी एकदा भाबडेपणाने झोपताना माझ्या आईला `उद्या सुर्य उगवायला विसरणार नाही ना? असे विचारून प्रत्यक्ष सुर्यनारायणाला सुर्यनमस्कार घालायला लावले असल्याची आख्यायिका आहे.) मी शांतपणे बाहेर येरझा-या मारायला सुरूवात केली.बराच वेळ गेला पण आतून कुठलाही स्टोन क्रशर सारखा आवाज येईना.धक्का बुक्की ही ऐकू येईना.डॉक्टरांनी मशीन साईलेंट मोडवर लावले वाटतं.

साधारणतः अर्ध्या तासाने एक नर्स सलाईन लावलेल्या आमच्या हीला गाढ झोपेत असलेल्या अवस्थेत स्ट्रेचर वर घेऊन आली.एका रुम मध्ये स्ट्रेचर लावताना मी नर्स ला `झाली का लिथोट्रीप्सी?’ म्हणून विचारताच तिने असा काही पडका चेहेरा केला की मला क्षणभर धस्स झाले.घाई घाई ने मी हिचा श्वास झालू आहे याची खात्री केली.(अरेरे तो चालूच होता.) मी डॉक्टरांकडे घाव घेतली.डॉक्टरांचा ही चेहेरा विशेष विजयी दिसत नव्हता.मी पुन्हा `झाली का लिथोट्रिप्सी?’ म्हणून विचारले.डॉक्टरांनी शांतपणे चेहे-यावरचा मास्क काढला व म्हणाले `ते काय झालं.. आम्ही भूल दिली त्यांना व पहिला शॉट मारताच आमचे मशीन बंद पडले.मी प्रयत्न केला पण ते काही चालू होत नाही.मला मुंबईहून तंत्रज्ञ बोलवावा लागेल.त्यांची भूल उतरायला ५-६ तास लागतील तोवर आराम करू द्दया.पंधरा दिवसांनी पुन्हा पाहू..’सौभाग्यवतींच्या ह्या एका झटक्यातच मशिन बंद पाडण्याच्या कर्तुत्वाचा मला मनोमन अभिमान वाटला. मग लावलेले ( व पैसे मोजलेले) सलाईन पुर्ण उपभोगून व्यवस्थीत शुद्ध आल्यावर आम्ही घरी परत आलो.काम धाम न करता असे आरामात ७-८ तास पडायला मिळाल्याचा एक निराळाच निखार सौभाग्यवतींच्या चेहे-यावर होता.इतका वेळ आपली ट्रीटमेंट झाली अशा समजात ती होती.झालेली हकीकत सांगताच तिचाही मस्त झोपेच्या उपभोगाचा उन्माद गळून पडला.हताश अवस्थेत डॉक्टरांचे मशीन चालू होईस्तोवर पुन्हा काही दिवस वाट पाहण्याखेरीज दुसरा इलाजही नव्हता.

त्यानंतर दर १५ दिवसांनी येणा-या अमावस्या व पोर्णीमेसारखे आम्ही नित्यनियमाने डॉक्टरांच्या मशीन चालू होण्याची आराधना करित होतो.तीन महिने उलटले पण मशीन काही चालू होईना.आमच्या सौभाग्यवतींच्या त्या किडनीतील कणखर दगडाने त्या दगड फोडायच्या मशिनलाच कायमचे खडी फोडायला पाठविले होते.मशीन मुळे माणसे दगावतात हे ऐकले होते पण माणसाने आणी ते ही एका स्त्री मुळे मशीन कायमचे यमसदनी गेल्याच्या त्या विलक्षण प्रसंगाची नोंद कायमची इतिहासात पितळाक्षरांनी व्हायला हवी.(सोने,चांदी चे सध्याचे भाव बघता आता विशेष घटनांच्या ऐतिहासिक नोंदी सुवर्णाक्षरांनी न करता पितळाक्षरांनी करायचा वाक्प्रचार रुढ करण्याचा साहित्य संमेलनानिमित्त सर्वांसाठी प्रस्ताव..यावर कमीत कमी वाद नको.)
क्रमशः लवकरच…

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home