Tuesday, January 21, 2014

बुंग-२…(भाग-२)

बुंग-२…(भाग-२)


वरिल बुंग-२ हे नाव धूम-२ (धूम टू) या धर्तीवर वाचावे…

विशेष सूचनाः
१) तुमच्या मागच्या लेखांपेक्षा विनोद कमी वाटतो असे काही आदरणीय वाचकांनी कळविले आहे.यावर मी इतकेच म्हणू शकेल की विनोदावर बळजबरी करता येत नाही.(तसेही `बळजबरी’ हा गुन्हा आहे.) माझा लेखक म्हणून दॄष्टीकोन वाचकाला दिवसाच्या ताणतणावापासून थोडा विरंगुळा देणं हा आहे.व त्यानिमीत्ताने वाचन पूर्ण सुटलेल्या आम्हा सगळ्यांना थोडंफार पुन्हा वाचनाकडे वळता आल्यास हे लेख सफल आहेत असे मी मानतो.

२) काही मित्रांनी याचे कथाकथन स्वरूपात रुपांतर करून व्हिडीयो करावा असा आमच्या (अति) प्रेमापोटी सल्ला दिला आहे.आज खरं म्हणजे दॄकश्राव्य माध्यमातून कुठलीही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते हे खरे आहे.वाचनापेक्षा पाहण्याकडे/ऐकण्याकडे कौल जास्त आहे हे ही खरे आहे पण त्याचबरोबर सादरीकरण हा तोंडचा खेळ नाही.त्यासाठी प्रतिभा (टॅलेंट या अर्थाने )असावी लागते. तरीही हा विचार नक्कीच करू.पण तोवर लेख वाचण्याची व (आवडल्यास) प्रेरणा देण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. 

मी लगोलग बॅग काढली.हॅंडबॅग खांद्याला लटकावली व मागे वळून सगळयांना हात केला.त्यावेळेस गोंदविलकर त्यांच्या घड्याळाकडे,चिरंजीव बाजूला येऊन उभी राहिलेल्या ऑडी कडे तर सौभाग्यवती त्या ऑडीतून बाहेर पडून चूकून जवळ जवळ माझ्या शेजारी येऊन थांबलेल्या एका पावणेसहाफूटी विदेशी तरूणीकडे पाहण्यात गुंग होत्या.आणि नेमकी त्यावेळेस ती विदेशी तरूणी माझ्या (रुपड्या) कडे बघत होती ( असा मला दाट संशय आहे ).म्हणजे बघा..सौभाग्यवती तिच्या कडे..ती माझ्याकडे ..आणी मी आमच्या सौं कडे…(आणी कोणाला बोंब मारून सांगणार नसाल तर मी ही तिच्याकडेही भरभरून ) असा काहीसा तो कटाक्षांचा त्रिकोण तयार झाला. पण इथे पायथागोरस वगैरे मंडळींना त्यांचे कर्ण वर्ग पाया वर्ग चे कुठलेही प्रमाणं मांडण्याचा वेळ न देता अचानक त्या त्रिकोणाला पालवी फुटली व त्यातून एक लघुकोन, विशालकोन, पंचकोन, अष्ट्कोन, अर्धवर्तुळ, समद्विभुज, समांतरभुज व गरज पडल्यास शंकाकृती,अष्टभुजाकृती,अंडगोल या सर्व भुमितीय आकृत्यांचा एकत्र परिपाक असणारा एक अतिविशाल लाल गोरा मानवी देह (घाईघाईत सांगतो पुरूष जातीचा) त्याच ऑडीतून बाहेर पडला व त्या तरूणीच्या शेजारी जाऊन उभा राहिला.

ते भूमितीचे न सुटलेले लाल गोरे कोडे, ती पावणे सहा फूटी विदेशी गोरीपान तरूणी व त्यांच्या शेजारी उभा साडेपाच फूटी व ब-यापैकी उजळ गव्हाळ रंगांचा मी म्हणजे ऑलींपीक स्पर्धेत असणा-या पोडीयम च्या तीन पाय-या वाटत होतो.आणि त्यातल्या त्यात ब्रॉन्झ मेडल वरील पायरी ही खूपच खोलगट,अनाकर्षक व तीन स्पर्धकात तिसरे आल्यावर मेडल घेतांना ज्या लायकीचे वाटत असेल त्याच लायकीची दिसत असणार. आपल्या भारतीय प्रमाणानुसार गोरा वाटणारा मी त्या दोघांसमोर अगदीच `इष्टमनकलर’ होतो. असो ही वेळ पुन्हा हवा भरून घेण्याची होती.पुन्हा खोल श्वास घेत हवा भरून घेतली. पुन्हा सौ.कडे पाहिले…ह्या वेळेस मी कुठे पाहतोय ह्याची चाचपणी करणारी तिची नजर माझ्या कडे रोखून पाहत होती.

मी तिच्याकडे बघून हसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.(तिच्याकडे म्हणजे माझ्या बायकोकडे नतद्र्ष्टांनो…) मी हसत आहे हे लक्षात आल्यावर अचानक सौ.भानावर आल्या व त्यांनी आपला हात बाहेर काढत मला टाटा केला.चिरंजीवही हात हलवत होते. का कोण जाणे अचानक अंगावर शहारे आले..मी ओरडूनच बायकोला सांगितले..मुलांची काळजी घे…पॉलीसी चे हफ्ते कालच भरलेत..जमा खर्चाचा हिशेब तुझ्या पर्समध्ये टाकलाय…काही पैसेही ठेवलेत…आणि नकळतच मी बोलून गेलो…काही झालं तर…..’.यावर सौं चे डोळे अचानकच मोठे झाले व आपले बोट ओठांवर ठेवत त्यांनी मला गप्प राहण्याची खूण केली…..आणी माझे ` काही झालंतर …तुझा भाऊ आहेच सगळं सांभाळून घ्यायला’ हे वाक्य हवेतच विरले. बाकी बायकांना आपल्या माहेरच्या मंडळींवर येणा-या आपत्तीची चाहूल आधीच कशी लागते काय ठाऊक?.. असे विचार माझ्या मनात आले… 

गोंदविलकरांना या निरोपसमारंभात काडीचाही रस नव्हता.त्यांचा घड्याळाचा काटा आता बहुदा पाचव्या मिनीटांच्या शेवटच्या ट्प्प्यात घोडदौड करत होता.चाळीस रुपयांचा चिमटा त्यांना पार्श्वभागावर बसणार होता.(कारण त्यांचे पैशांचे पाकीट ते मागच्या खिशात ठेवतात.आणि मागे बसलेल्या चिरंजीवांचा त्यात काहीही `हात’ नाही) त्यांनी कारचा गियर टाकून तिला पुढे दामटली व बायकोने व मुलाने मागे वळून मला शेवटचा टाटा केला.त्यांची गाडी नजरेआड झाल्यावर मी बॅग उचलून मी आजूबाजुला नजर टाकली.
विमानतळाला आत जाण्यासाठी दोन दरवाजे दिसत होते. त्यातील एकावर `आगमन’ तर दुस-यावर `प्रस्थान’ असे लिहीलेले दिसले.दोन्ही दरवाज्यांवर गर्दी होती. `आगमन’ म्हणजे विमानासाठी आलेल्या लोकांचे का विमानातून आलेल्या लोकांचे हे माझ्या लक्षात येईना.तोच मुद्दा `प्रस्थान’ च्या बाबतीत होता.`प्रस्थान’ विमानासाठी आलेल्यांचे का विमानातून बाहेर जाणा-यांचे? शोले तील जय-विरू च्या त्या नाण्यासारख्या दोन्ही गोष्टी दोन्ही बाजूनी सारख्याच वाटू लागल्या.(स्वतंत्र्य भारताच्या त्या `शोले’ कथेत जॉर्ज -६ एम्परर लिहीलेले नाणे का वापरले असेल हे मला अजूनही न सुटलेले कोडे आहे.) मग अराईव्हल व डिपार्चर या दोन इंग्रजी जुळ्या बहिणींवरून काही बोध होतो का हा अंदाज घेतला आणी शेवटी नाईलाजाने अस्सल भारतीय जे करतो तेच मी केलं..चार चौघे ज्या दिशेने आत जात आहेत तो रस्ता मी पकडला.(एकला चालो रे केलं असतं तर विमानतळाच्या व्यस्त वेळेस मी फार तर स्वच्छतागृहात पोहोचलो असतो.)

तो रस्ता डिपार्चर च्या दिशेने जात होता.रांगेत उभा राहिलो.रांग अक्षरशः रांगत पुढे जात होती.प्रत्येक आत जाणा-या व्यक्तीला दोन खाकी कपड्यातले काही मागत होते.( खाकी कपडे आणी मागणे हा समानार्थी शब्द असल्याचा बहुतेकांचा समज आहे )प्रत्येक जण त्यांना काहीतरी कागद दाखवित होता.तो कागद वाचल्यावर मग आत जाण्यास मिळत होते.माझ्या पुढच्या व्यक्तीने त्याचे तिकीट बाहेर काढल्याने मी देखील लगोलग तिकीट खिशातून खेचून बाहेर काढले व मोठ्या ऐटीत ते त्या खाकी वर्दीच्या हातात ठेवले.माझ्या हातातली ती जड बॅग व खांद्यावर अडकविलेल्या हॅंड्बॅगेत मी (जास्त) अजागळ वाटत असावो.`सर युअर आयडेंटीटी’ खाकी वर्दी कडून इंग्रजी ऐकताना मला `उपेक्षू नको..गुणवंता अनंता..रघूनायका मागणे हे ची आता…असे म्हणत नंतर खड्या आवाजात जय जय रघूवीर समर्थ’ म्ह्णत भिक्षा मागणा-या आमच्या रामदासी बाबा सातारकर जोशींनी अचानकच `वो जब याद आये...बहोत याद आए’ हे भक्तीगीत म्हटल्याचा भास झाला.

मी जपून खिशात माझे ड्राईव्हींग लायसेन्स आणलेले होते. सर्व नियम आधीच ठाऊक असल्याच्या आत्मविश्वासात मी खिशात हात घातला (स्वतःच्या) पण लायसेन्स तेथे नव्हते.मग थोडासा बावचळून मी बॅगा ठेवल्या व खालचा,वरचा,मागचा सगळे खिसे खसा खसा हात घालून लायसेन्स पाहिले पण ते कुठेच नव्हते.पण गेले कुठे…मला दरदरून घाम फुटला.`मी लायसेन्स आणले होते कुठे गेले समजात नाही’ असे काहीसे पुटपुटत आर्जववजा खुलासा केला पण खाकी वर्दी ठाम होती.`सर आयडेन्टीटी लागेलच…’ मी कमालीचा हादरून गेलो होतो.आता वेळेवर इलेक्शन कार्ड किंवा काही घरून आणायचे तर तेवढा वेळही नव्हता.थरथरत्या हातांनी मी पुन्हा खिसे चाचपडायला लागलो आणी तेवढ्यात मला `एक्स्क्युज मी’.. असा इंग्रजी फोडणी लावलेले शब्द कानावर आले. मी गर्रकन वळून आवाजाचा वेध घेतला. तेव्हाचा तो लाल गोरा आडवा उभा विदेशी पहेलवान माझे लायसेन्स पुढे करून `इट ड्रॉप्ड फ्रॉम युअर पॉकेट..’ असे उदगारला.बहुदा माझे लायसेन्स मी तिकीट बाहेर काढले तेव्हा पडले असावे. भूमितीच्या जाड पुस्तकाला नागरिकशास्त्राची पाने चिकटून आल्यासारखी वाटली. मी त्याचे हातात हात घेऊन धन्यवाद मानले. तेहतीस कोटी भगवंतांनीच या गॉड ला `देवा’सारखा माझ्या मदतीला पाठविला होता बहुदा.

लायसेन्स एकदाचे दाखवून व नंतर त्याला व्यवस्थित पाकीटाच्या कार्ड होल्डर मध्ये ठेवत मी एकदाचा आत प्रवेश केला.

क्रमशः लवकरच..

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home