Tuesday, May 5, 2015

मूषक वध – एक संघर्षमय साहसकथा भाग-२

मूषक वध – एक संघर्षमय साहसकथा भाग-२


`अहो काचा कशाला?’ .
`मांजा बनवायचाय..’,आता मी ही वाकड्यात शिरलो.
`अहो,आयुष्यभर चक्री धरणा-यांनी मांजा बनवायचा विचार करू नये’…हे वाक्य हि ने कुठल्याश्या वाचलेल्या कादंबरीतील `आयुष्य भर चाकरी करणा-यांनी माड्या बांधायचा विचार करू नये’ या वाक्यातील निव्वळ चक्री व चाकरी या दोन `चक’व्या शब्दांच्या साधर्म्याचा आधार घेत फेकले.(एरवी साहीत्याशी हिचा संबंध `आता भगिनींनी साहित्य व कृती लिहून घ्या’ या मेजवानी कार्यक्रमातील उपदेशपुर्ण रिसीपी भक्तीभावाने लिहून घेण्यापलीकडे नाही. आणी ह्या साहित्याचे रसग्रहण आम्ही खारट,आंबट,तुरट झालचतर पांचट अश्या निव्वळ `ट’ कारांत चवीच्या पदार्थांना `व्वा व्वा’ असे म्हणत संसाराचा रथ आवाज न करता पुढे चालावत करत असतो.)
मग मी तिला थोडक्यात `ह्या काचा मी त्या बिळासमोर व आत ठेवण्यासाठी गोळा करत आहे’ हे समजावले.मग तिनेही हिरहिरीने जुन्या ट्युबलाईट,बल्ब,फुटक्या बांगड्या,,परवाची फुटलेली तेलाची बाटली,हिच्या माहेरच्या मिळालेल्या टिचलेल्या कप बशा (ज्या आमच्या कामवालीने फोडल्या असा आरोप लावत माहेरवासियांना पाठीशी घालण्याचा हिने अटोकाट प्रयत्न केला होता) ह्यांचा पाहता पाहता ढीग गोळा केला.
आमची ही जमवा जमव चालू असताना बाहेरील भंगारवालाही `आज जुने सामान आवरायला काढले आहे’ हे समजून `साब देना है क्या’? म्हणत त्या `काचे’ री ढिगाकडे बघायला लागला.माझ्या मनात उगिचच `भंगारात तर मीच निघालो आहे रे हा संसार चालवत..काय किलो घेतोस बघ…’ असे निरोपाचे वाक्य येऊ लागले… पण त्यावर तो ` साब, ये माल तो भंगार मे भी नही जायेगा’ असे म्हणेल याची खात्री होती.त्यामुळे मी गप्प राहिलो.असे आमचे भाडेकरू जोशी काकाही आज घरीच होते.आमचा हा काय उपक्रम चालला आहे याचा अंदाज घेत ते बाहेर आले.
`काय महेश राव? आज भंगार काढताय की काय?’ असे म्हणत त्यांनी हाताची मुठ माईक धरल्यासारखी आवळून तोंडाजवळ नेली व खोल श्वास घेतला.आता ही त्यांची एक स्पेशल लकब होती. ते काही विचार करायला लागले की असे हाताची मुठ आवळून नाकाजवळ नेऊन खोल श्वास घेत. त्यांचा हात तसा गेला की त्यांचा काहीतरी विचार सुरू आहे हे आम्ही ताडत असू. पण बाकी काही म्हणा त्यांची ही लकब थेट हातात लांब दांडीचे कमळाचे का गुलाबाचे फूल घेऊन सुंगणा-या त्या अकबर बादशाहाच्या ( का शहजादा सलीम हो) तैलचित्रावत मला वाटत आली आहे.बाकी आमचे जोशीकाका मस्तकावर तेलाचा अखंड अभिषेक केल्यासारखे तेल लावत असल्याने कुठल्याही भिंतीला टेकून बसले की एक अभिनव तैलचित्रकलेचा अध्याय सुरू करत असत. मी तर असेही ऐकून आहे की कुठल्याश्या तेल कंपनीच्या विक्रेत्याने जोशीकाकांचा हा तैल प्रपंच पाहून त्यांना त्या कंपनीचा ब्रॅंड अंबॅसिडर करण्याचीही ऑफर दिली होती म्हणे.पण काकांनी ते लावत असलेले तेल खोबरेल नसून जास्वंदाचे असल्याचा प्रामाणिक गौप्यस्फोट करत इतर कुठल्याही तेलाचा प्रसार व प्रचार करणार नसल्याचे छातीठोक पणे सांगितले आणी मग तो प्रस्ताव `तेल’ खात पडला.
जोशीकाकांनी अजून काही तर्क लढविण्या आधी मी त्यांना थोडक्यात माहिती दिली.त्यांनीही ते ढिगारे पाहिलेले होते.`अहो मग नुसत्या काचा टाकून काय होणार आहे?त्या बिळात पाणी टाकूयात आपण..’असे म्हणत कोणीही न सांगता जोशीबुवा आमच्या घरातला पाईप बाहेर काढण्यासाठी घुसले.मग त्यानंतरचे दोन तास..पाईपाने त्या बिळाच्या आत पाणी सोडणे,थोड्या थोड्या वेळाने दबा धरून बिळाबाहेर कोणी येते का याची वाट बघणे,पुन्हा पाणी टाकणे,पुन्हा वाट पाहणे यात मोठा छान गेला.
जोशीबुवा त्या बिळात पाणी सोडतांना पाईप घेऊन जेव्हा बिळाच्या तोंडापाशी जात तेव्हा ते उदबत्ती हातात घेऊन सुतळी बॉंब लावल्यासारखी पोझ घेत होते.आणी बिळाच्या आत काही काल्पनीक हालचाल जाणवली की बॉंब ला उदबत्ती लागल्याची शंका आल्यावर पळावे तसे मैलभर लांब मागे पळत होते.पण अखेर ब-याच निष्फळ पळापळीनंतर त्या बिळातून बाहेर तर कोणी आले नाही पण अंगण मात्र पुर्ण ओलेचिंब झाले. शेवटी एका प्रयत्नात पळत मागे येतांना त्यांनी त्यांच्या वयाला लाजवेल अशी गिरकी जागच्या जागी घेतली व घसरून भुईसपाट झाले.नको त्या भागाला ईजा झाली व नाईलाजाने त्यांना`रिटायर्ड हर्ट’ होत ही सर्कस थांबवावी लागली.एव्हाना संध्याकाळ झाली होती.शेवटी जमा केलेल्या काचा टाकून बघाव्यात असा मौलीक सल्ला जोशीकाकांनी दिला व आपल्या पराभवाचा बिगुल फुंकला.मग आम्ही काचांचे तुकडे व काही काटे व्यवस्थित त्या बिळांच्या तोंडावर अंथरले व पुन्हा पुन्हा मागे वळून आमच्या त्या काचेरी नवनिर्मीती कडे कौतुकाने बघत घराकडे परत फिरतानाच..का कोण जाणे पण मला दोन लुकलुकणारे डोळे त्या काचेच्या तुकड्यांचा आडून मला न्याहाळत असल्याचा भास झाला.फोटोग्राफर ने स्माईल प्लिज म्हणेस्तोवर तोंड हसतमुख करत फोटोत येण्याचा आटोकाट प्रयत्न करून शेवटी फोटो निघाल्यावर अजिबात अस्तित्वही त्या फोटोत न दिसणा-या दुर्देवी व्यक्ती सारखे ते डोळे, मी निरखून बघितले तेव्हा कुठेतरी गुडूप झालेले होते.
रात्री जेवण झाल्यावर मी जरा कुठे निवांत येऊन आडवा झालो तोच..सौभाग्यवतींची ती पेटंट किंकाळी पुन्हा आसमंतास भेदून गेली.(किं.नं.३).आता काय आणखी म्हणून मी धावत पुन्हा बाहेर पळालो..तर आमची सौ अचानक हातात बॅगा घेऊन आलेल्या सासरच्या माणसाला बघावं( तेही रात्रीचा स्वयंपाक संपवून झोपायची तयारी केल्यावर ) तशी अंगणातील एका कोप-या कडे सुन्न होऊन बघत होती.
`काय गं..आता काय आणखी?’,मी भित भितच विचारलं..
`अहो,काहीतरी पळालं..त्या कोप-यामध्ये…’. अंधारात हि ला काहीतरी भास झाला असल्याचा मला संशय आला.मी अविश्वास दर्शक काहीतरी बोलणार इतक्यात…..
एक प्रचंड मोठ्या आकाराचा काळा कुट्ट उंदीर हि ने दाखविलेल्या कोप-यातून आम्ही काचा टाकलेल्या बिळाकडे पळाला.मी अवाक होऊन बघतच राहिलो.इतका मोठा उंदीर मी माझ्या उभ्या आयुष्यात बघितलेला नव्हता.ह्यालाच घूस म्हणत असावेत असा तर्क मी बांधला.मी टॉर्च घेऊन त्या बिळावर मारला (मारला म्हणजे त्याच्यावर प्रकाश टाकला हो.उगाच फालतू विनोद नकोयत मी फार टेन्शनमधे आहे..) आम्ही टाकलेल्या काचा जशाच्या तशा ठेऊन त्याच्या शेजारून एक छोटे बीळ उकरलेले मला दिसले. तो उंदीर अथवा ती घूस यांनी बहुदा त्या नवीन बिळातच `घूस’ खोरी केली असावी.
एवढया रात्री आणी त्यातल्या त्यात त्या घूशीचे आकारमान बघता पुन्हा त्या बिळापाशी जाण्याची माझीतरी हिम्मत झाली नाही.पण तसे न दाखविता मी हि ला म्हटले…`तू झोप आता..मी बघतो काय करायचे ते..’ माझ्या या आश्वासक बोलण्यावर तिच्या चेहे-यावरील आलेले कृत कृत्य का कसलेसे भाव हे सर्वसाधारणपणे वट पोर्णिमा,हरतालीका या दिवशी (फक्त) तिच्या चेहे-यावर असतात.
माहेरच्या वारश्याला अनुसरून तिने पडल्या पडल्या लगेच वरचा `सा’ लावला.माझ्या मनःपटलावर मात्र आता फक्त आणी फक्त ती `घूस’ली होती.मी लगेच इंटरनेट चालू केले व काही माहिती वाचली. `रॅट किलर’ सारखे औषध रामबाण इलाज ठरेल हे मनोमन मी नक्की केले.
दुस-याच दिवशी संध्याकाळी पुन्हा बाजार पालथे घातले आणी उंदीर मारण्यासाठी मिळणा-या अनेक केक मधून एक जहाल व जालीम इलाजाचा केक खरेदी केला.विकणा-याने नुसता उंदीरच नाही तर आख्खा माणूसही सहज गतप्राण होईल हे खात्रीलायक सांगितले होते.त्यामुळे औषध उरलेच तर माझे अनेक जालीम शत्रू (उदाः माझी एक सी एल ग्रॅंट करताना माझ्या उभ्या आयुष्यात झालेल्या चुकांची चार चौघात आठवण करून देणारा साहेब,मी लहानपणी पोहाणे शिकण्यासाठी जलतरण तलावावर गेलो असता माझ्या पार्श्वभागावर लथ्थाप्रहार करून तलावात ढकलणारा तो जालीम कोच, जावयाविषयी कुठलाही आदरभाव नसणारी हिच्या माहेरची अनेक मंडळी (म्हणजे जवळ जवळ सगळेच देशपांडे खानदान), मी सकाळी फेरफटका मारायला निघालो असता घराच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतर धप्पा दिल्यासारखा अचानक `भो..भो..’ करत अंगावर येणारा शेजारच्या रत्नपारखींकडील कुतरडा (आणी सोबत तो कुतरडा भुंकला की गॅलरीतून थोबाड बाहेर काढत दात विचकावून हसणारे रत्नपारखी…),आणी सगळ्यात महत्वाचे (कुणाला सांगणार नसाल तर सांगतो..) म्हणजे मी एकीच्या नावाने दिलेले गुलाबी पत्र चुकून दुसरीकडे देऊन मला आजन्म शिक्षा भोगायला लावणारा तो नतद्रष्ट कुरीयर वाला या सर्वांना एका पाठोपाठ एक संपविता येतील असा एक क्रूर विचार मनात येऊन गेला.
घाई घाईत घरी आलो.मी आज केक आणला आहे हे ऐकल्यावर बापाविषयी मुलींना अचानक उमाळा आला व तो उंदराचा आहे म्हटल्यावर पुढच्या क्षणाला मावळला.आमचा शत्रूपक्ष आकाराने बराच मोठा असल्याने मी जरा मोठे मोठे तुकडे त्या केकचे केले व तिनही बिळांच्या आत टाकले.सकाळ पर्यंत सर्वनाश होण्याची मनोमन खात्री बाळगत मी शांत झोपी गेलो.इतकेच काय तर त्या माजो-या घुशीला मारल्यावर कुठे पुरायचे ती जागा ही शोधून ठेवली होती मी..
सकाळी सकाळी अजून एक किंकाळी ऐकू आली…या वेळेस सूर बराचसा टारझन शास्त्रीय संगीताच्या क्लासला गेल्यावर जसा ओरडेल तसा होता. रोजची कामे उरकत रियाझ करणा-या जोशी काकू आपल्या गोड गळ्यानी आज हंबरल्या होत्या.मी धावत पुन्हा बाजूला त्यांच्या घरापाशी गेलो तेव्हा जोशी काकू हातात काठी घेऊन तर जोशी काका हाताचा चंबू करत तोंडावर ठेवायच्या पेटंट पोझ मधे उभे होते. आज काकांचा दुसरा हात मात्र पार्श्वभागावर होता (स्वतःच्या…).यावरून परवाच्या चिखलात मारलेल्या त्या सुराने चांगलाच `सूर’ धरला आहे हे जाणवले. ऑर्केस्ट्रा मधील ड्रम वाजवणारा व गायक अशी काकू काकांची पोझ आहे असले विनोदी विचार या गडबडीतही माझ्या मनात येऊन गेले.मला पाहिल्यावर जोशी काकूंनी फेकलेले वाक्य मला भोवळ आणून गेले असते..त्या म्हणाल्या,`महेशराव आता तुम्ही तुमचे उंदीर आमच्याकडे आणून सोडले की काय?’..मला क्षणभर बिळात हात घालून मी एक एक गलेलठ्ठ उंदीर खेचून खेचून बाहेर काढत आहे,ते उंदीर एका मोठ्या थैलीत भरत आहे आणी मग ची ची करणारी ती उंदरे एक एक करून जोशी काकूंच्या खिडकीतून आत टाकत आहे व हे करताना `ही ही हा हा हा हा हा ‘ असे असूरी हसत आहे असे भास व्हायला लागले.
त्या `आमच्या’ उंदरांनी केलेला प्रताप म्हणजे जोशीकाकांच्या घरासमोरील पायरीखालची जमीन त्यांनी पुर्ण पोखरून ठेवली होती व परवाच रात्री दक्षिण ध्रुवाच्या दुखण्यापोटी सुटी टाकावी लागलेल्या जोशीकाकांना आज सकाळी पायरी सरकल्याने घसरून उत्तर ध्रुवाला बर्फ लावावा लागणार होता. जोशीकाकांचा नाकाजवळील हात आता मोकळा झाल्याने त्यांचे विचारमंथन थांबल्याचे मी ताडले.आता दोन्ही हात दोन ध्रुवांवर ठेवत काका पुटपुटले..`महेशराव,मला वाटतं आता काहीतरी जालीम इलाज करायला हवा.’ त्यांच्या बोलण्यातून संताप व कळा यांचे मिश्रण एकजीव झाल्यासारखे दिसत होते.
क्रमशः

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home