Friday, January 18, 2013

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -९

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -९

विशेष सूचनाः
१. आपण सर्वांच्या मिळालेल्या अभूतपुर्व प्रतिसादाने माज चढून लेखक नववा भाग आपल्या माथी मारायचा क्रूर प्रयत्न करित आहे. तरी आपआपले माथे ताळ्यावर ठेवावे जेणेकरून लेखाचा नेम धरणे सोपे जाईल.

२. प्रस्तुत लेखकाने चालवलेल्या सुक्ष्म अनुभवकथनाचा धसका घेऊन `पुढच्या वेळेस तू नाही आलास तरी चालेल’ असे प्रेमळ निरोप काही मित्रांचे आले आहेत.तर काहींनी प्रस्तुत लेखक २८ तारखेला रात्री लोणावळ्यास मुक्कामी नसल्याचे कालपरवाच समजल्यावर आता पुढचा वृत्तांत चव्हाटावर येणार नाही या आनंदात रात्री दहा वाजेनंतर आपाआपल्या घरांच्या बाहेर फटाके फोडल्याची पक्की वार्ता आहे.व `फटाके का फोडले’ अशी घरी विचारणा झाल्यावर `भारताने १९८३ मध्ये जिंकलेल्या विश्वचषकाचे सेलेब्रेशन होते’ असे अनावधानाने उत्तर देउन मानसोपचारतज्ञ डॉ.विनय चपळगावकरांकडील अपॉईंटमेण्ट्स अचानक वाढवल्या आहेत.

३. हा भाग खूप खेचला गेला आहे ,प्रतिभा कमी पडत आहे व तोच तोच पणा वाढत आहे, आता लिहीणे थांबवा असे ह्या भागाचे प्रकाशनपुर्व समिक्षण सौभाग्यवतींनी केले आहे.त्यांच्या या अहवालानंतर प्रस्तुत लेखकाने पुन्हा स्वयंवाचन केले असता त्यात तथ्य असल्याचे वाटते.त्याचबरोबर शुक्रवारच्या या लेखनकामामुळे बाजारहाटीत पिशव्या धरण्यासाठी होणारी प्रस्तुत लेखकाची मदत टळत असल्याने त्यांचे समिक्षण स्वार्थाने प्रेरीत असणे नाकारता येणार नाही.तरी निर्णय लवकरच घेण्यात येईल.

आता पुढे,

रिसोर्ट समोरील पार्कींगमध्ये विविध आकाराच्या,धर्माच्या,जातीच्या,वजनाच्या,वृत्तीच्या व सौंदर्याच्या गाड्यांचे आवक जावक सुरू होते.काही शिस्तप्रिय गाड्यांनी आपले पार्कींग अतिशय व्यवस्थित एका रेषेत केले होते तर काही मनमोकळ्या स्वभावाच्या गाड्या दुस-या एखाद्या गाडीच्या अक्षरशः अंगाला झोंबत होत्या. काही एकदम गेटजवळ असणा-या पार्कींगमध्ये मनमुराद हसत खिदळत,एकमेकांशी गप्पा मारत,टिंगल टवाळी करत बॅकबेंचर्स सारख्या लावलेल्या होत्या. जुनी ओळख असणा-या पांढ-या रंगाच्या क्वालीस व ईनोव्हा या गाड्यांनी आपाआपल्या माहेरच्या मंडळींची चौकशी केली.आपल्या दुस-या एका क्वालीस बहिणीला झालेल्या अपघाता बद्दल ऐकतांना पांढ-या क्वालीस ला तिचे हुंदके आवरेनात.मग इनोव्हा ने तिच्या ड्रायव्हरला सांगून क्वालीसचे अश्रु फडक्याने पुसुन दिले.`जन्माला आले म्हणजे मृत्यू हा अटळ आहे’ असे डोळ्यात अश्रु आणत इनोव्हा म्हणाली.पण याच इनोव्हाच्या सौंदर्याला भाळून आपल्या मालकाने आपल्याला घराबाहेर काढली हे ठाऊक असल्याने ते मगरीचे अश्रू असल्याचे क्वालीसला माहीत होते.दुस-या एका कोप-यात रिट्झ,डिसायर व स्वीफ्ट या एकाच जातकुळातील भगिनी त्यांच्या कुटूंबात नव्याने येऊ पाहणा-या एरटीगा चे हेवे दावे करत एका कोप-यात लावलेल्या होत्या.या सगळ्यांशी इंजिनाची `नाळ’ जुळलेली फियाट लिनियाही थोड्या वेळात लांबूनच फ्ल्यायींग किस देत त्यांच्याशेजारी येऊन उभी राहिली.तिचे `इटालीयन’ सौंदर्यच भारतावर राज्य करते हे सर्वज्ञात असल्याने तिला सर्वांनी आदराने नमस्कार केला.

बिमडब्ल्यू,स्कोडा व मर्सिडीज या सगळ्या शाही कुळातील गाड्या मात्र असल्या मध्यमवर्गीय चर्चेत न पडता एका वेगळ्या कोप-यात आपल्या घराण्यातल्या इतर गाड्यांचे विवाह बाह्य संबंध मोठया चवीने चर्चा करत बसलेल्या होत्या.एवढ्यात तिथे एक ह्युंदाई व्हर्ना मोठ्या दिमाखात येऊन दाखल झाली.रस्त्यात एका हलक्या दर्जाच्या छोट्या हत्तीने अतिप्रसंग करायचा प्रयत्न केल्याने `दुखावलेल्या’ व्हर्ना ने तिथे उभ्या असणा-या आय-२० ला पाहताच जणू हंबरडाच फोडला व आपल्या ए.सी.चे पाणी बाहेर टाकून अश्रुंना वाट करून दिली.मग आय-२० ने ही आपल्या वायपरने तिची `रडू नको’ म्हणून समजूत काढली. आय-२० स्वतः ,मालकाने लोणावळ्यातच तिची नुकतीच `टाकी फुल्ल’ केल्याने, डोळे सुजवून बसली होती.(याचा संदर्भ आपण आय-२० कडे निरखून पाहील्यास आपल्याला लागेल.) `श्री गणेश’ असे देवाचे नाव धारण केलेली एक पांढरी बस मात्र एका टाटा ८०९ शी झालेल्या आपल्या प्रेमभंगाचे शल्य मनात ठेवून रुसून बसल्यासारखी एका कोप-यात उभी होती.टाटा एरिया ही भव्य गाडी नुकतीच येऊन थांबली.तिच्या मालकाशी बहुदा तिची बाचा बाची झालेली असावी कारण मालकाने खाली उतरून रिमोट डोअर लॉक लावताच तिने `क्याव क्याव क्याव क्याव’ असा मोठा आवाज काढायला सुरुवात केली.सगळी मंडळी त्यांच्या या भांडणाकडे बघायला लागल्याने मग लज्जित होऊन मालकाने रागाने दरवाजा उघडला व पुन्हा जोरात आदळला व तिला गप्प बस असे सांगितले.मालकाचे हे अपमानास्पद वागणे अजिबात न आवडून एरियाने मालकाने डिक्की उघडताच आतील गच्च बरलेले सामान बाहेर लोटून दिले व झालेल्या अपमानाचा सूड उगवला.

गाड्यांच्या या सगळ्या गेट टुगेदर मध्ये आपणही काही अशाच कार्यक्रमासाठी आलेले आहोत हा क्षणभर मला विसर पडला होता.पण मिहीर राउतांनी आपल्या हा..हा…हा अशा केलेल्या चित्कारांनी मी आजुबाजूला बघायला लागलो. कदाचीत `हा’ `तो’ असावा असे वाटणारे काही तर काही केल्या ओळख न लागणारे काही असे चेहेरे दिसायला लागले.इंद्रजीत थोरात,विशाल कदम जपलेले चेहे-यावरील तारूण्य वाखाणण्यासारखे वाटले.१० वी फ मधील १०-१२ मुले एका कोप-यात नेहेमीप्रमाणे `आम्ही बाबा वेगळे’ असे दाखवत असल्याचा भास झाला.त्यातील प्रफुल्ल बल्लाळ,आनंद बुग्धे व चुडीवाल सोडल्यास एकाचेही नाव मला आठवेना.चेहेरे मात्र भूतकाळातील जुन्या फ्लॉपीवरून डाउनलोड होत होते.पण काहींच्या बाबतीत मात्र सारखी `रिड एरर’ येत होती.

`नानक्या चेक ईन करून घे’ मनिष म्हणाला.मग भिडेंनी एका यादीवरील आमच्या नावासमोर मला सही करायला सांगीतली.रुमची चावी व माझ्या रोमॅंटीक स्वभावाच्या बॅग ला घेऊन मी निघालो.कोप-यात एका टेबलावर ट्रे मधील अनेक ग्लासांमध्ये लाल गुलाबी रंगाचे द्रव्य ठेवलेले होते.ते `अपेय पेय’ असल्याची मला शंका आली.`नानक्या घे…बाहेर आल्यावर सगळे चालते’.मनिष ने माझा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला.त्यावरून ते द्रव्य म्हणजे सोमरसच असणार हे जाणवले.पण चित्रपटात दाखवलेले ते पेय इतके लाल गुलाबी नसते ही कुठेतरी शंका असल्याने मग मी कोणीही आपल्याकडे बघत नाही ही खात्री करून बॅग खाली ठेवण्याच्या निमित्ताने हळूच खाली वाकतांना एक बोट सगळ्यात कोप-यावरच्या ग्लासमध्ये बुडवत पटकन चव घेतली.ती चव कुठेतरी ओळखीची वाटली.पण काही केल्या कशाची ते आठवेना.एवढ्यात खाली रिकामे ग्लास ठेवण्यासाठी वाकलेला वेटर टेबला पलिकडून वर निघाला व मी एकदम ओशाळलो.मी केलेले हे जल सिंचन त्याने बहुदा पाहिलेले होते.मग एकदम अनावधानाने अस्खलीत हिंदीमधे ` ये क्या है बुवा..?’ असे माझ्या तोंडातुन वाक्य घरंगळले.का कोण जाणे त्यावेळी मी माझे डोळे चौफेर फिरवले.दारूची सवय नसली की मळमळ उलट्या होतात असे मी ऐकून होतो.त्या प्रमाणे त्या थेंबानेही मलाही कसेसेच होत असल्याची भावना झाली.माझ्या या `बुवा’बाजीकडे एक टक बघत तो मला म्हणाला..`कोकम सरबत आहे साहेब..’ अरे हो…खरंच की…तरीच चव ओळखीची वाटली..मी तातडीने तोच ग्लास उचलत गटा गटा ते पिऊन टाकले.त्यानंतर मी जवळून जाणा-या अनेकांना कोकम सरबतच आहे,घ्यायला हरकत नाही असे सांगत होतो पण का कोण जाणे उलट मी `कोकम सरबत’ आहे म्हटल्यावर मनिषकडे रागाने पाहणा-यांची संख्या वाढत होती.

रुम नं.२०३ होती बहूतेक माझी.आता २०३ म्हटल्यावर दुसरा मजला हे माहीत असण्याइतकेही हॉटेलींग माझे नसल्याने मी बापडा पहिल्या मजल्यावरच पहात बसलो.पण त्या मजल्यावर सगळ्या एकशे वाल्या रुम दिसल्या.चुकून आपला क्रमांक पाहण्यात चुकला असे वाटून मी चावीवरील क्रमांक पुन्हा पुन्हा पडळताळून पाहिला.बॅगचे ओझे वाहत मी हताश होऊन फिरत असतानाच तेथून जाणा-या एका वेटर ला मी शेवटी पत्ता विचारला.त्याने मग माझ्याकडे नखशिखांत बघत `चेहे-यावरून तर सुशिक्षित वाटतो’ असे भाव ठेवून मला पत्ता सांगीतला.`पुढे जाऊन डावीकडे वर जा आणी मग उजवीकडची चौथी रूम’.वर गेल्यावरही मला बहुदा नंबरही वाचता येणार नाही याची खात्री वाटल्याने त्याने `उजवीकडची चौथी’ वगैरे तपशीलही सांगितला होता.आता `वर जा’ सांगणारा माणूस डॉक्टर नसल्याची खात्री असल्याने मी निश्चींतपणे त्यानी दिलेल्या पत्त्यावर जाण्यासाठी निघालो.जाताना पायी जाऊ का रिक्षा करू असला पाचकळ विनोद मारायची माझी इच्छा दाबून मी पटकन वर जाण्याच्या रस्त्याला लागलो.

लॉबीमध्ये लावलेले दिवे बहुदा दिव्यांना स्वतःच्या प्रकाशात त्यांचेच निघणारे `दिवा’ळी अंकही वाचता येणार नाहीत इतका कमी प्रकाश पाडत होते.मला तर माझ्या मोबाईल मधील टॉर्च चालू करावा असे वाटले.अखेर मजल दरमजल करीत मी दिलेल्या पत्त्यावर सुखरूप येऊन पोहोचलो.लगेच मी घरी तसा फोनही केला.मी केलेल्या या पराक्रमाचा जराही अभिमान न बाळगता सौभाग्यवतींनी `मी दाण्याचं कूट करते आहे आपण नंतर बोलूयात का?’ असे विनंतीवजा वाक्य टाकून फोन ठेवला.त्यामूळे त्या वाक्यातून विनंती `वजा’ होऊन आदेश उरलेला होता हे आपणातल्या अनेक नवरेलोकांना मी पुन्हा पटवून देणे म्हणजे आपल्या प्रदिर्घ अनुभवाचा निव्वळ अपमान केल्यासारखे होईल.

बराच वेळ चावी कुलूपात घालून उघडायचा प्रामाणिक प्रयत्न केला.आधी उलटे सुलटे मग सुलटे उलटे त्यानंतर दोनदा उलटे एकदा सुलटे शेवटी दोनदा सुलटे व एकदा उलटे अशी अनेक वैविध्यपुर्ण प्रात्यक्षिके करूनही दरवाजा उघडेना.मग एखाद्या जुन्या हिंदी चित्रपटातील नायीका जशी लाडाने आपल्या नायकाच्या छाताडावर दोन्ही हातांच्या मुठी करून ड्रम वाजवल्यासारखी बडवून `चलो हटो तुम चोर हो’ म्हणते तसे दोन्ही हात मी दरवाज्या छाताडावर ठेवून बडवणार इतक्यात दरवाजा माझ्या हाताच्या थोड्या धक्क्यानेच उघडला गेला.मघाचे एखादे कॉंबिनेशन उपयोगात येऊन तो उघडलेला होता.आत पाऊल ठेवल्यावर पुन्हा प्रकाश जवळजवळ नसल्याचे जाणवले.मग मी दिव्यांचे बटणं शोधायला लागलो.ब-याच चाचपडण्यानंतर मला अखेरीस स्विचबोर्ड मिळाला.मग मी त्यावरील जेवढे होते नव्हते तेवढे सगळी बटणं चालू केली पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही.प्रथम वीज गेलेली आहे असा मी काढलेला निष्कर्ष बाहेरील लॉबीमध्ये नावाला का होईना दिवे चालू असल्याने धुळीला मिळाला.मग ब-याच दिवसांपासून गाढ झोपेत असलेला(किंबहुना घोरत पडलेला) माझ्यातला विद्युत अभियंता जागा झाला.मी कुठे फ्यूज वगैरे आहे का हे पाहिले तर मला कुठेच काही दिसले नाही.
बहुदा ट्रान्सफॉर्मर पासूनच एक फेज येत नसेल असे वाटून मग तो ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीसाठी नेल्यास किमान साठ सत्तर हजाराचे बील होईल,म्हणजे त्यातून मनिष चे ३००० आणी निलेशचे १२०० इतके पैसे तर सहजच मोकळे होतील असले काहीसे व्यवहारीक विचार मनात येऊन त्या अंधारातही मला प्रकाश दिसायला लागला.तो रुमच्या एका बाजूनी असलेल्या खिडक्यांमधल्या पडद्यामागून येत असल्याचा नंतर साक्षात्कार झाला.मग मी ते पडदे बाजूला करून प्रकाश वाढवायचा प्रयत्न केला परंतू बाहेर `नभ मेघांनी आक्रमिले’ले असल्याने सुर्य ही `डीम’ च होता. शेवटी मी एका लांब लाकडी टेबलावर माझी बॅग ठेवली आणि ब-याच वेळेपासून भरून आलेले मन मोकळे करण्यासाठी स्वच्छतागृहाकडे धाव घेतली.तेथे याही पेक्षा जास्त काळोख होता.आत मध्ये ऐन भरात असताना कोणी कानफटात जरी मारली असती तरी पत्ता लागला नसता आणि महत्वाचे `कार्य’ अर्धवट राहीले असते (अथवा क्षणार्धात मोकळे झाले असते).

तसाच पुन्हा बाहेर येऊन दरवाजाबाहेर डोकं काढलं.काही क्षणातच तेथे पुन्हा तोच तेव्हाचा वेटर लॉबीत दिसला.त्याला हॉटेलने फक्त मला मदत करण्यासाठी मोकळे सोडले असावे असे वाटून मला व्यवस्थापनाच्या या सेवातत्पर धोरणाचा कमालीचा आदर वाटला.तो माझ्यापाशी येऊन थांबेल व `कुछ हव्या का साब…?’ असे विचारेल असे वाटून मी तसाच उभा राहीलो तेव्हा तो समोरील रुम मध्ये स्वच्छतेसाठी जात असल्याने `सेवा’ भ्रमाचा भोपळा फुटला.मग अधिक वेळ न दवडता मी त्याला उद्देशून `हॅलो…हॅलो असे आवाज काढले.ते काढतांना काहीही कारण नसताना सवयीमुळे माझ्या हातातला मोबाईल मी कानाला लावलेला होता.त्यामुळे माझा आवाज ऐकूनही कानाला फोन पाहून तो आल्या पावली परत जाऊ लागला.मग मी पुन्हा `अहो वेटर ईधर ईधर..’ असे म्हणून त्याचे लक्ष वेधून घेतले.` मेरे रुम का दिवा क्यू बंद है..?’ शब्द एकदम बरोब्बर योग्य वेळेत जुळवत मी राष्ट्रभाषेचे `दिवे लावले’.तो दरवाज्यातून आत आला व एका कोप-यातल्या झडपेकडे हात करत म्हणाला…`इसमे चाबी डालो..’ चावी हरवू नये म्हणून ठेवण्यासाठी स्वतंत्र्य गुपीत कप्पा आहे की काय..आणि त्याचा विजेशी काय संबंध असे वाटून मी `अरे नही..मेरा की नई दिवा बंद है रूम का..दिवा…दिवा..लाईट…’ त्याला एका लाईट कडे बोट दाखवत मी किंचाळलो.अतिशय तुच्छतेने माझ्याकडे बघत व माझ्या हातातली चावी जवळजवळ हिसकावत त्याने सुरा खुपसावा त्याप्रमाणे त्या झडपेत चावीचे मागचे रुम नंबर लिहीलेले `की चेन’ खुपसावले आणि काय आश्चर्य..लगेच दिवे लागले.

मला हा रुम सर्व्हिस वाला म्हणजे थॉमस अल्वा एडिसनचा (का अलेक्झांडर ग्राहम बेल हो..?) खापर पणतू वाटला.पुन्हा कदाचीत संधी येणार नाही असे वाटून लगेच त्याच्यासोबत एक छायाचित्र काढून संग्रही ठेवावे असे विचारही मनात आले.पण मी त्याला `थॅंक यू’ असे चेहे-यावर ओशाळलेले हास्य आणून म्हणायच्या अगोदरच तो तेथून अदृश्य झाला होता.पण जाता जाता त्याने मला रूम मधील टी.व्ही. व इतर जी जी बंद होती ती सर्व उपकरणे दयेपोटी चालू करून दिली.

मग मी दरवाजा बंद करून पुर्ण रूम ला न्याहाळले.आकाराला किमतीच्या मानाने रूम जरा अंमळ लहानच वाटली पण शांत,सुंदर व टापटीप होती.(त्याचे काय आहे..घरात दोन मुलं व बायको (ती मात्र एकच..थॅंक गॉड…), एक कुत्रा, एक ससा या सर्व पशु पक्षांनी केलेल्या पसारा, घाण, धूळ किंबहूना चिखल,रंगबिरंगी चिरखडे, ओरखडे, उलटलेले पेले, सांडलेले रंग,मळालेल्या चादरी, मांडलेले(?)अस्त्याव्यस्त खेळणी, कपडे व यासगळ्यासोबत प्रत्येकाचे वेगवेगळे मंजुळ आवाज या तुलनेत हा सर्व निटनेटकेपणा व शांतता सुखावह होतीच).त्या रुम मधील बेडसाईजही, नगावर मोजल्यास एक भिडे, एक राउत व राठींनी जर थोडे आवळून घेतले तर तेही मावतील अशी होती.(थोडक्यात वजनावर जरी बसवायचे झाल्यास एक टन वजन घेऊ शकतील असे होते) फक्त चुडीवाल बसवायचे झाल्यास ८ तर नक्की बसले असते नवव्यासाठी मात्र एकाला बाजूनी पडू नये म्हणून पकडून ठेवावे लागले असते.

बेडवर पांढ-या शुभ्र चादरी टाकलेल्या होत्या.त्या इतक्या पांढ-या होत्या की त्यावरील एक छोटासा काळा डागही उठून दिसत होता.मी त्याकडे एक टक पाहत असतानाच तो अचानकच हलायला लागला.ते काय आहे हे निरखून पाहिल्यावर ती एक मुंगी असल्याचे कुशल विश्लेषण मी केले.मग ती कुठे चालली आहे हे पाहण्यासाठी मी ,मिकी माऊस कार्टून मधील प्लुटो कुत्रा जसा मागचे बुड वर करून समोरचे लांब नाक जमिनीवर टेकवत जसा सुंगत सुंगत जातो त्याप्रमाणे,तिच्या मागे जायला लागलो.मग लक्षात आले की ती दुस-या एका मुंगीचा पाठलाग करत आहे.`अगं लबाडे तिच्यावर वॉच ठेवतेस काय..नव-याचे दुसरे प्रकरण वाटतं..’ असे काहीसे विचार येत असताना पुढे ब-याच मुंग्या आहेत व त्यातील काही परत येताना झिंगत येत असल्याचे लक्षात आले.वापस येणा-या मुंग्या जाणा-या मुंग्यांच्या कानात काही निरोप देत होत्या.तो ऐकून जाणा-या मुंग्या अजूनच लगबगीने जात होत्या.शेवटपर्यंत माग काढल्यावर तेथे एका `बाटली’चे झाकण बेडच्या व गादीच्या फटीत अडकलेले आढळले.परत येणा-या मुंग्या `अगं..पार्टीतले ड्रींक्स संपत आलेत लवकर जा’ हे सांगत असणार हे उघड होते..माणसाने आपल्या या व्यसनाधिनतेच्या सवयी मुंगीइतक्या सुक्ष्म प्राण्यापर्यंत पोहोचवल्या आहेत हे पाहून माझ्या बुद्धीलाही `मुंग्या’ आल्या.

क्रमशः लवकरच..

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home