Friday, May 8, 2015

मूषक वध – एक संघर्षमय साहसकथा भाग-४

मूषक वध – एक संघर्षमय साहसकथा भाग-४

दरम्यान माझ्या एका बालमित्राची भेट झाली. इलेक्ट्रिकल इंजीनियर असलेला आमचा हा मित्र `पवन’, त्याच्या कंपनीत होणा-या चो-यांविषयी बोलत होता.त्यात चोरांचा बिमोडासाठी त्याने वीजप्रवाह व तारांचा वापर कसा केला हे तो त्याच्या नेहेमेच्या सवयईप्रमाणे एक मोठी कथा कथन केल्यागत रंगवून रंगवून सांगत होता…`म्हणजे बघ महेश…..त्या साल्यांचे  दिवस आता भरले होते.. (चोरांसाठी वापरले गेलेले आदरवाचक विशेषण..त्याचा नावाशी साधर्म्य असणा-या नातेवाईकांशी संबंध नाही) मग मी त्या रात्री ठरवले की आज इस पार या उस पार…आज एक तर ते चोर राहतील नाही तर मी…सालं इंजीनियरींग काय झक मारायला केलं आपण..?’..आता हा प्रश्न असा होता की त्याला माझ्यासारखा इंजीनियरींग करूनही कुठल्याही तांत्रिक बाबींशी संबंध न राहिलेल्या माणसाने लगेच..हो झक मारायलाच झालो इंजीनियर असे उत्तर दिले असते..पण आमचा हा मित्र कुठल्याही प्रश्नाचे समोरचा उत्तर देऊ शकेल अशी सूतराम शक्यताही शिल्लक न ठेवणारा आहे..तो लगेच स्वतःच उत्तर देतो…

तर `सालं इंजीनियरींग काय झक मारायला केलं आपण..?’. अरे ह्ट्ट…मी त्यांना पुरून उरणारच मला माहित होते…मग मी काय केले असेल सांग..? (येथे उत्तर देणे अपेक्षित नव्हते…) मी लगेच दोन वायर घेतल्या…मग त्या गुंडाळल्या कंपाऊंडच्या तारेला…त्यातून टाकला साला ४४० व्होल्ट चा सप्लाय…आणी मग…पवन सांगत होता…मी ऐकत होतो….(तो नेहेमीच फक्त बोलतो आणि आम्ही नेहमीच सगळे फक्त ऐकतो)...
युरेका…… (एखाद्या गहन प्रश्नावर उपाय सुचल्यानंतर ताबडतोब कपडे काढून आंघोळीला बसून या शब्दाचे उच्चारण करावे व आंघोळ अर्धवट सोडून जगाची पर्वा न करता (तसेच) रस्त्यावर पळत सुटावे असा सर्वसाधारण संकेत आहे..)

दुस-याच दिवशी दोन लांब तारा,सॉकेट,प्लग,बटन या सर्व सामुग्री सकट आणी मित्राने दिलेल्या मोलाच्या सल्ल्याप्रमाणे पुर्ण तयारी झाली…तार बिळाच्या आतून जितक्या आत टाकता येतील तितकी टाकून फिरवून बाहेर काढली होती. माझे हे सगळे चाललेले प्रयोग जोशीकाका बघत होते.आणि त्यांच्या हाताची मुठ नाकापाशी गेली..त्यांची नजर वर आकाशाकडे गेली विचार करत ते आत निघून गेले. याचे कारण म्हणजे वीज,शॉक ह्या गोष्टींना जोशीकाका प्रचंड घाबरत असत.बाहेर खांबावरची विजेची तार वा-यानी थोडी जरी हलली तरी यांना ती आपल्याच अंगावर पडण्यासाठी `रनअप’ घेत असल्याचा भास होत असे आणि मग वर बघत बघत ते शेपुट आत घातलेल्या कुत्र्यागत रस्ता पार करत असत.त्यांना वर बघताना पाहून अनेक जण उत्सुकतेपोटी आभाळाकडे पहात आणि मग जोशीकाकाही हे सगळे वर का बघत आहेत असे वाटून थांबून पुन्हा वर पहात असत…बराच वेळ केलेल्या निरीक्षणानंतर काहीच कुठे नाही म्हटल्यावर त्यांची हाताची मुठ नाकापाशी जी जाई ते अगदी घरी परत येईपर्यंत.

त्या उलट ह्या बाबतीत जोशीकाकू मनानी अतिशय खंबीर होत्या.घरातील फ्युज,ट्युब यशस्वीरित्या बदलण्यापासून ते मामुली बिघाड झालेल्या वीजेच्या उपकरणांना आत्मविश्वासाने उघडून ठेवून कायमचे स्वर्गवासी करण्यापर्यंत त्यांचे आजवरचे कर्तुत्व होते.एकदा तर हौशीनी आणलेल्या इलेक्ट्रॉनिक कॅसीयो चा  `नि’ बरोबर वाजत नसल्याची शंका आल्याने त्यांनी चार स्क्रू खोलून काही प्रयोग केले असता, `ध’ व `नि’ या दोन सुरांनी `मिले सुर मेरा तुम्हारा’ अशा आणा भाका घेत एकमेकांसोबत मिलन केले आणी सप्त सुरांना आपले एक भावंड गमवावे लागले. हे जरी असले तरी काकूंची असल्या तांत्रिक वस्तू उघडणे व आत काहीतरी हात घालून खटपट करण्याची हौस कुठेही कमी झालेली नव्हती. ह्याचे महत्वाचे कारण कदाचित चार उघडलेल्या उपकरणातून एखादे काकूंचा तडाखा बघून घाबरूनच चालू होत असत..हे असणार.

मला आज वायर,सॉकेट असले प्रयोग करताना बघून काकू पदर खोचून हिरहिरीने सामील झाल्या नसत्या तरच नवल..`महेशराव, आज एकदम न्यूट्न घुसला की काय अंगात…वायर,लाईट वगैरे….’ काकूंना सगळे विज्ञानातले शोध न्यूटनरावांनी लावलेले नसून एडिसन नावाचा लाईट लावणारा शास्त्रज्ञ वेगळा होऊन गेला हे मी सहज सांगायला गेलो असता…अहो महेशराव,शेवटी न्यूटन काय आणि तुमचा एसिडन काय…शेवटी ते एकाच काळातले..कोणी कोणता शोध लावला तरी असे श्रेय ओरबाडायला काय ते काही वाटवेबाई आहेत?...असे म्हणत जोशीकाकूंनी एडिसनाला पार `एसिड वाश’ देऊन आपले काळ,काम,वेगाचे गणित विसरायला लावले होते. तसेच सार्वजनिक गणपतीत स्वतःचे वजन वापरून (ओळख या अर्थाने) आमदाराच्या हस्ते एक आरती ठेवल्यामुळे लोकप्रिय झालेल्या वाटवेकाकूंचा स्थानिक पातळीवर शाब्दीक सूड उगविला होता.
सॉकेट पासून निघालेली वायर बिळात फिरून पुन्हा घरातील सॉकेट पाशी आली होती.आता तयारी पुर्ण झालेली होती.कधी एकदा बटन दाबतो आणि शॉक लागून घूस मरते असे मला झाले होते.ती आतच मरून पडली तर तिला ओढून बाहेर काढण्यासाठी एक लांब बारीक सळईही मी आणून ठेवलेली होती.

`जय हो पवन बाबा की’ अशी भावनात्मक साद मैत्रीच्या भक्तीरसात न्हाऊन निघाली आणि देवळाच्या गाभ्यात घंटानाद करावा तसा बटनावर हात मारला….जोरात आवाज झाला….. फटाका हातात फुटल्यागत असह्य चटका बसला…मी गर्भगळीत झालो…त्यातच गाभा-यातल्या उदबत्तीच्या सुगंधाऐवजी जळका उग्र वास आसमंतात दरवळला आणि..आणि…आमच्या सौ ची ती पेटंट किंकाळी पुन्हा येऊन आदळली….मी भानावर आलो….वायर खोचलेल्या सॉकेट पासून घूर येत होता..त्या सॉकेटच्या सर्वांगावर काळे डाग उडून ते कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचे राहिले नव्हते…वायरही तोंड काळे करत दूर फेकली गेलेली होती….धूर घराचे धुराडे सापडत नसल्याने रुसून तिथेच घुटमळला होता…काहीतरी जोडणी करण्यात गडबड झाली हे मी मनोमन ताडले.धावत बाहेर आलो…बाहेरचे दॄश्य हेलकावणारे होते.बाहेरच्या विजेच्या पोलवर काहीतरी स्पार्कींग झाल्याने तेथे बघ्यांची गर्दी जमली होती.सगळीकडची वीज गेल्याचेही लक्षात आले. बिळात जाणा-या त्या दोन्ही तारा पार कळकभिन्न झालेल्या होत्या.लांबवर सौ व जोशीकाकू एकेमेकींना घट्ट बिलगून उभ्या होत्या.आत आलेल्या फटाक्याच्या आवाजामुळे आत माझे काही बरेवाईट झाले असेल असे वाटल्याने (कदाचित) पण जोशीकाकू तर जवळपास आमच्या हिची समजूत काढायच्या पोझ मध्ये पाठीवर एक हात ठेवून होत्या.मी बाहेर आलेले बघताच दोघीही धावतच पुढे आल्या…घराच्या आत न्याहाळत माझ्याकडे बघताना सौ च्या चेहे-यावर कमालीच्या आनंदाची लकेर उमटली…( फार भाबडी आहे हो ही…खूप प्रेमही करते माझ्यावर)..

`अय्या…मला वाटलं घरातला टी.व्ही.च उडाला….बरं झालं बाई…आताच नवा घेतला होता.’.टी.व्ही.उडाला नाही म्हटल्यावर जोशीकाकूंचा चेहेराही टवटवीत झाला.कधी कधी फुलटॉस चेंडू ही यॉर्कर ठरू शकतो हे मला पटले..दरम्यान मी सारखा हाताच्या बोटांकडे बघत होतो हे जोशीकाकूंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सौ ला खाणाखूणा करून सांगितले…त्यानंतर मग `अगं बाई…तुम्हालाही लागलं की काय..? असे म्हणत मग मलमपट्टी साठी साहित्य आणायला सौ आत गेली.

जोशीकाकाही दरम्यान बाहेर आले होते.`महेशराव,झेपतील तेच प्रयोग करा…’ माझ्या हाताकडे बघत ते म्हणाले.पुन्हा त्यांचा हात मुठ आवळून नाकापाशी गेला..विचारांचा गरूड गगनझेप घ्यायला तयार झाला होता.थोडा वर गेला असता तर मी त्यालाच ही घूस कुठे वरून दिसली तर झडप घालायला सांगणार होतो.

अखेर मुषक वधा चा हा तांत्रिक उपायही फोल ठरला. पवन ला फोन लावावासा वाटत होता पण तो काय म्हणणार मला माहित होते..`साल्या…तुला कोणी नसते उपद्व्याप करायला सांगितले..मला सांगितले असतेस तर मी कोणाला पाठवून त्या हरामखोराला असा भाजला असता ४४० व्होल्ट देऊन…(येथे हरामखोर म्हणजे मुषक, मी अथवा जोशीकाका नव्हे..)’ आता हे शब्दामृत या क्षणीतरी फुकट पिण्याची माझी इच्छा नव्हती.कोप-यावरच्या इलेट्रीशियनला निरोप दिला (गुंता निस्तरण्यासाठी) आणी मी शांतपणे फे-या मारण्यासाठी गच्चीवर गेलो..

सौ मलम गच्चीवर घेऊन आली.श्रावण महिन्याची नुकतीच सुरूवात होती..वारा सुटला होता..वातावरणात एक वेगळाच रोमांस होता.गच्चीवर माझी एक आरामखुर्ची कायम टाकलेली असते.प्रपंच चालवताना कधी कधी होणारी शारीरिक व मानसिक दमछाक विसरण्यासाठी मला ही आरामखुर्ची खूप कामी आली आहे.मी वर असा आलो तर मला शांततेची गरज आहे हे सौ ओळखते. मी आरामखुर्चीत डोळे बंद करून पडलो.काळोख पसरला होता…तिने शांतपणे माझा हात हातात घेतला (मलम लावण्यासाठी...)…आज त्या स्पर्शात कमालीची उब होती…

`चिऊ’,खूप निराश झालोय मी आज…’मी हिला प्रेमाने चिऊ म्हणत आलो आहे…
हाताला मलम लावत ती म्हणाली…`तरी मी तुम्हाला म्हणत होते,आपण हे असले प्रयोग करताना पवनभाऊजींना बोलावून घेऊ.’

`जाऊ दे…त्याला तरी कसं असल्या फालतू गोष्टीत अडकवणार आपण..’ आराम खुर्चीतून थोडा वर होत मी म्हणालो.खाली इलेक्ट्रिशियन कसलीसे ठोकाठोक करण्याचे आवाज येत होते.

`पण मग आता काय?..ती डुचकी घूस तर आपले घर पाडायला बसली. ती ह्या घराची मालकीण आणि आपण आपले कैदेत असल्यासारखे…’ सौ च्या आवाजात कापरे भरलेले होते.
(`डुचकी’ हा शब्द दुस-या स्त्री विषयी संताप व वेळप्रसंगी तिच्या कर्तुत्वाविषयी असामान्य आदर व्यक्त करणासाठी सामान्य बोलीभाषेने दिलेला विशेष दागिना मी मानतो. ही `दुसरी’ स्त्री जवळची नातलग असल्यास ह्या शब्दाची धार अधिक वाढते.पुर्वी माझी आई व सौ एकेमेकींविषयी आपापल्या माहेरी खाजगीत बोलतना या सामान्यनामाचा यथेच्छ वापर करत असत हे मी ऐकून होतो.)

एवढ्यात `येऊ का महेशराव?’ हे शब्द कानावर आले.जोशी काका व काकू वर गच्चीवर आले होते.आता सिन असा…मी आरामात आराम खुर्चीवर पडलेलो,माझा हात मोठ्या प्रेमाने(?) सौ च्या हातात, मलम लावताना ती थोडीशी माझ्या जवळ झुकलेली आणी मी ही थोडे अंग अवघडले असल्याने थोडा पुढे झुकलेलो…त्याचा परिणाम असा झाला की मी काही बोलण्याच्या आतच जोशीकाकू…`अगं बाई,सॉरी हं…मला वाटतं…आम्ही जिना वाजवूनच आत यायला हवे होते..’..आता जोशी काकूंचा बलदंड देह साधा अंगणातून चालला तरी कंपनं देऊन जातो..इथे ५० वर्षांपुर्वीचा जिना धडधडला असणारच..त्या वेळी इलेक्ट्रिशियनच्या त्या ठोकाठोकीत जोशीकाकूंची ती द(आ)बकी पाउले विरून गेली असावी एवढेच..पण `जिना वाजवून येणे’ ह्या सामान्य दिसणा-या वाक्यात गच्ची बंद करण्याचा दरवाजा मागेच सडून पडून गेल्याने गच्चीवर ठेवलेला काकूंचा जुना कुलर कोणीतरी उचलून नेल्याची आठवण करून देणे हा छुपा उद्देश असेल हे आपल्यापैकी किती जणांनी ताडले बरं…? असो…

इतक्यात वीज परत आली...रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात मला काकांच्या व काकूच्या हातात भागिदारीत एक लांबट पिंजरा दिसत होता.त्याला एका बाजूने काकांनी तर दुस-या बाजूने काकूंनी धरलेला असल्याने तो बराच जडही असावा..`महेशराव, ही आमच्या जोशी कुटूंबाकडून आपणासाठी सप्रेम भेट..’ , मी बघतच राहिलो..मी हिला `चिऊ’ म्हणतो यापलीकडे माझा पक्षीकुळाशी काडीचाही संबंध नव्हता. माझ्या चेहे-यावरचे गोंधळलेले भाव ताडत काका म्हणाले,`हा त्या घुशी साठी..ह्याच्या आत केक ठेवायचा आणि मग तो खायला घुस आत आली की तिच्या वजनानी अशी ही  झडप दाबली जाते..आणी असा हा दरवाजा बंद होतो…सटकन आवाज झाला आणी त्यानंतर काकंचे `ओय…आ…आई गं….’ अशी आरोळी…काकांनी चुकून त्या पिंज-याचे दार आपल्याच हातावर पाडून घेतले होते.मग आम्ही ते हातानीच वर करून काकांचा तो दुखावला गेलेला `मदतीचा’ हात बाहेर काढला.आता मलम लावून देण्याची वेळ काकूंची व आरामखुर्चीत बसण्याचे सौभाग्य काकांचे होते…आम्ही कुणीही न सांगता `जिना वाजवत’ व पिंजरा घेऊन खाली गेलो.

पिंजरा तसा वजनाने नाही तर आकारानेच मोठा होता.दोन मोठ्या घुशीतर आरामात डबल बेड टाकून या झोपू शकल्या असत्या.मला आजची रात्र वाया जाऊ द्यायची नव्हती.आणलेला केक संपलेला असल्याने शेवटी कणकेचा गोळा टाकायचे मी ठरवले.`मुझे किसीभी हालत मे गब्बर चाहिये ..सिर्फ जिंदा’… हे डॉयलॉग आठवून त्या घुशीला जिवंत का होईना पकडण्याचे मनात होते.एकदा का ती पिंज-यात आली की मग…ही ही हा हा हा हा… असे क्रुरपणे हसत मी तिला यमसदनी धाडू शकलो असतो…

दरम्यान प्रचंड सोसाट्याचे वादळ सुरू झाले.आकाशात काळेकुट्ट ढग गोळा होऊ लागले.कुठल्याही क्षणी मुसळधार वृष्टी होणार याचे पुर्ण संकेत होते.कणकेचा गोळा पाण्याने विरून जाऊ नये म्हणून मी पिंज-यावर एक प्लॅस्टीकची ताडपत्री टाकली व पिंजरा उडून जाऊ नये म्हणून मी त्यावर दोन तीन ठिकाणी दगडं ठेवले.पिंज-याचा दरवाजा उघडा करून त्याची दांडी कणकेचा गोळा ठेवलेल्या त्या ताटावजा चौथ-याशी जुळवली.पिंज-याच्या मागचा बाजूनी एक काडी आत घालून ताटावर घुस बसली तर दरवाजा बंद होतो हे प्रात्यक्षिक करून पाहिले.अचानक मला काय वाटले माहिती नाही पण मी एका छोट्या फडक्याची घडी करून त्या पिंज-याच्या पृष्ठभागावर अंथरली.

पाण्याच्या प्रवाहात पिंजरा येणार नाही अशा पद्धतीने मी तो ठेवला.काकांनी इतक्या काळजीपोटी दिलेला तो पिंजरा कमीत कमी वाहून जाऊ नये ही भूमिका.आता पुर्ण तयारी झाली होती. दरम्यान पाऊस सुरू झाला.दहाच मिनीटात पावसाचा वेग प्रचंड वाढला होता.थोड्याच वेळात रस्त्यावरून पाणी दुथडी भरून वाहायला सुरूवात झाली..अचानक जोराने वीज कडाडली आणी वीजपुरवठा पुन्हा बंद झाला.आता जवळपास पुर्ण शहराची वीज खंडीत झाली होती.पाऊस रात्रभर कोसळत होता.गेल्या अनेक वर्षात इतका पाऊस एका रात्रीत झाला नसेल.रात्रभर खळखळून वाहणा-या पाण्याचा आवाज येत राहिला.

अर्धवट झोपेतच रात्र सरली.उजाडताच लगबगीने बाहेर आलो..रस्त्यावरचे झाड उन्मळून खाली पडले होते.रस्त्यावर पाणी अजूनही वाहतच होते.अंगणात जवळजवळ पोटरीएवढे पाणी होते.पाऊस मात्र थांबलेला होता.पिंजरा मी थोडा उंचावरच्या जागेवर ठेवल्याने तो मात्र जसाच्या तसाच होता.इतक्या पावसात घूस त्यात येऊन गोळा खाण्याची सूतरामही शक्यता नसल्याने मी आधी घराला काही हानी झाली नाही ना हे पाहण्यासाठी अवती भवती पाण्यातून रस्ता काढत गेलो.झाडाने पुर्ण रस्ता बंद केलेला होता.रस्त्यावरून वाहून येणा-या पाण्यात अनेक वस्तू होत्या ज्यात चपला,काड्या,काही प्लॅस्टीक थैल्या,फेकलेले शहाळे…आणि…आणि….हो…एक मोठ्या घुशीचे शव….हो….मोठ्या घुशीच शव…..मी त्या पाण्यातही जागच्या जागेवर उडीच मारली..टम्म फुगलेले व तोंड उघडे असणारे ते घुशीचे शव..ज्याची मी सकाळी तीन दिवसाआड येणा-या नळाच्या पाण्यापेक्षाही जास्त वाट पाहिली…ते शव…

मी हे घरी सांगण्यासाठी सौ ला हाक मारणार तोच….`अहो…..अहो…’ हा सौ चा,`बाबा …बाबा….’ हा साक्षीचा आणी `महेशराव….लवकर या….महेशराव…’ हा जोशीकाकांचा अशा तीन आरोळ्या प्रादेशिक बातम्या,विवीधभारती व गांधी वंदना एकत्र लागल्यासारख्या आल्या..मी पाणी तुडवत धावत कंपाऊंडच्या आत गेलो..सगळे त्या पिंज-या जवळ उभे होते… सौ धूर निघून जळालेल्या दुधाच्या पातेल्याच्या तळाकडे बघावी तशी बघत होती.. त्या धुराचा त्रास झाल्याने बहुदा काकांच्या हाताची मुठ नाकापाशी जाऊन नाक जोरजोरात श्वास आतबाहेर टाकत होते,साक्षी जागच्या जागेवर उड्या मारत टाळ्या पिटत खिदळत होती तर जोशी काकू नुकत्याच काकांना शोधत त्यांच्या मागे येऊन थांबलेल्या होत्या..
मी धावतच पिंज-यापाशी गेलो..पिंज-याचा दरवाजा बंद झालेला होता.त्याच्या वर असणारे ताडपत्रीचे आवरण थोडेशे बाजूला केलेले होते.आणि आत…आत…

(इथे क्रमशः टाकून सस्पेन्स वाढविणार होतो पण अशा अनेक कथा पुढे वेळेअभावी अपु-या राहिल्याचा अस्मादीकांचा इतिहास आहे.त्यामुळे आज शेवट करूनच टाकूयात..पता नही कल हो न हो..)

आणी आत…जिच्यासाठी आम्ही जंग जंग पछाडले,जिच्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस आणी सी एलच्या विदाऊट पे लिव्ह करून पायावर धोंडा मारून घेतला,जिच्या साठी शरीराच्या अनेक भागातला मुका मार आणि तळबोटावरचा फोडही आम्ही आनंदाने सहन केला,जिच्या साठी आम्ही आमच्या पांढ-याशुभ्र सॉकेट वरचे आणी गव्हाळ ( किंबहुना काळ्या) गुडघ्यावरचे डागही हसत हसत घुवून काढले,जिच्या खाण्यासाठी आणलेला केक दाखवून आम्ही आमच्या मुलींच्या तोंडचे पाणी पळवले त्याच आमच्या या कथेच्या नायिकेला तिच्या पिलावळांना स्तनपान करताना आम्हाला बघावे लागत होते…

मी स्तब्ध होऊन बघतच राहिलो.मी टाकलेल्या त्या कपड्याच्या घडीवर आरामात घुस पहूडली होती व तिला ५-६ पिले लगडून स्तनपान करत होती..बाहेर रात्रभर झालेल्या हैदोसाची कुठलीही चिंता घुशीणी च्या चेह-यावर नव्हती.तिच्या त्या काळ्याकुट्ट चेहे-यामुळे तिच्या चेह-यावर आम्हाला पाहून काही प्रतिक्रिया उमटल्याचे मला जाणवले नाही.पिले मात्र ब-यापैकी उजळ आणि गोंडस होती हे मान्य करायला हवे.

मी सर्वांकडे नजर टाकली..आई आणि पिले या दोन शब्दांची सांगड घालताना फक्त मातृत्वच शिल्लक राहते हेच खरे..क्षणभर विचार केला आणि शांतपणे पिंजरा उचलला. `बाबा…प्लीज त्यांना फेकू नका….’ साक्षीने टाहो फोडला…..…`अहो..म्हणते..त्यांचे पिणे होऊ द्या मग मारू त्यांना…’ सौ पुटपुटल्या…काकांच्या विचारांची गती अचानकच वाढली…मी त्यांच्याकडे बघितले..काय समजायचे ते समजून त्यांनी घरात जाऊन गाडीची चावी आणली…व गाडी चालू केली…`साक्षी…चलतेस…पिल्लांना दूरवर डोंगरात सोडून येऊ….’

त्यावेळेस तिच्या चेहे-यावर बापाविषयी वाटलेला अभिमान ओसांडून वाहत होता. माझ्या या निर्णयावर काका,काकू ही खूश दिसले…आणी सौ नी पदर डोळ्यांना लावला….काका गाडीचा गियर टाकतात न टाकतात..तोच….पुन्हा ती सौ ची पेटंट किंकाळी मागून आली..मी लगबगीने खाली उतरलो तेव्ह्या सौ व जोशीकाकू पुन्हा एकमेकींना बिलगून रस्त्यावरच्या पाण्याकडे पहात होत्या आणी त्यात तरंगणारे ते मघाचे घुशीचे शव तोंड वासून त्यांच्याकडे बघत होते……`अहो हे काय आणखी….?’

मी शांतपणे एक जुन्या वर्तमानपत्राच्या कागदात ते शव उचऊन मागच्या डिक्कीत टाकले…आणि म्हणालो..

`हाच तो..…`मूषकवध’…निसर्गाने केलेला….’ आणी आमची गाडी दूर त्या डोंगराच्या दिशेने जाऊ लागली….

कथा संपली...

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home