बेडका बेडका नाच रे....भाग-१
बेडका बेडका नाच रे….भाग-१/३ (प्रशांत नानकर लिखीत एक वायफळ
लेख )
वाचकांना आवाहनः
१.लेख वेळ मोकळा असेल तरच वाचावा.घाई घाईत वाचून लेखकाची भाषाशैलीच क्लिष्ट असल्याचा आरोप सहन केला जाणार नाही.
२.वाचताना `असं कुठे असतं का?’ असा प्रश्न पडल्यास...हो असतं…आमच्या लेखात काहीही असतं…हे उत्तर आधीच देत आहे…प्रश्न पडताक्षणी उत्तर इथून कॉपी
पेस्ट ला सोपं जाईल..
काल रोजची
सवय म्हणून व्हॉट्स ऍप चाळत होतो…( याचा उच्चार
वॉसप,हॉट्सप,व्हॉट्स अप अशा वेगवेगळ्या
बाजा मध्ये करता येतो.अगदीच `लिपीश्टीक’
पुसली जाऊ नये असा छुपा उद्देश असेल तर मग `हॉट्स
अ’ असे म्हणून सोडून द्यावे..उरलेला
`प’ हातच्याला वा उधारीत ठेवावा..अथवा एखाद्या काकूबाई शेजारणीला म्हणायला लावावा.मी तर
एकदा दोन ओठ एकमेकांना भेटू न देण्याचा बाणा जपणा-या
(दोन ओठ म्हणजे स्वतःचेच..) एका ललनेला
`पाककला’ ह्या शब्दाचा चक्क `काककला’ असा उच्चार करताना पाहिले होते. आता हा कार्यक्रम आऊटडोर चालू असल्याने चुकून झाडावरच्या एखाद्या `काका’ च्या `काक’कलेची काकणभर काककृती आपल्या अंगावर पडू नये याची उपस्थीत काळजी घेत होते…)
व्हॉट्सअपला `चाळत’ पेक्षाही
`पळवत’ हा शब्द जास्त संयुक्तीक होतो कारण सकाळी
पडणारा गुड मॉर्निंगचा संदेश निव्वळ आवडला म्हणून रात्री १० वाजता टाकणारे वल्ली इथे
असतात..गुड मॉर्निंग,गुड नाईट कमी झाला
म्हणून की काय आता शुभ दुपार सुरू झालेला आहे…दुपारीतही सुरेल
मध्यानाची भर पडली आहे..दुपार आपण पचवत नाही तोवर…`टी टाईम’ पण आला आहे.मी तर आता
हॅपी १० am, हॅपी ११ am असे ताशी संदेश
येण्याची वाट बघतोय.. जगात कोणाचं कुत्रंही आपले आपले ऐकणार नाही
याची जाम खात्री असणारेही येथे ४-४ पानी मेसेज दुस-या ग्रुपवरून घाम येइस्तोवर उपसून उपसून टाकतात..आणी
आपणही अडीअडचणीला पाठीशी शुभेच्छूक असावेत म्हणून निव्वळ यांना अंगठे देऊन प्रतिसाद
देतो.याचा अर्थ आपण काही हा चार पानाचा मेसेज वाचतोच असे नाही..आपण त्याला नुसतेच पुढे पळवितो. तर असाच मेसेज पुढे पळवित
असताना पुढील मेसेज पटकन टिपला गेला आणी मी क्षणभर थांबलो…मेसेज
असा होता….
लहानपणी ची
अफवा...बेडकाला दगड मारला की मूकी बायको मिळणार ..जाम घाबरायचो तेंव्हा...
आता वाटतय, दगड मारला असता तर बरं झालं असतं .......
बायको आणि
मुकी या दोन विरुद्धार्थी शब्दांची वास्तववादी सांगड घालू पाहणारा हा विषय मोठा स्फूर्तीदायक
व प्रेरणादायी होता…आवडलेले गाणे जसे आपण डोळे
बंद करून हेडफोन लावून ऐकतो त्याप्रमाणे मी प्रस्तुत आव्हानात्मक विषयाचा विचार करीत
क्षणभर डोळे मिटले…पण १४ वर्षांच्या संसारातील अनुभवाच्या लाटा लगेचच वास्तवाच्या
रखरखीत किना-यावर परत घेऊन आल्या …आणी अशा
अशक्य आशेला लावण्या-या अफवा कोण पसरवतं आणी खरच ह्या
`ल्युक्रेटीव्ह ऑफर’ ला बळी पडून कोणी बेडकांना
दगडं मारायला सुरूवात केली तर काय?... खरंच काय वाटेल त्या बेडकांना…
मानवाचे त्यांच्याविषयी असले हिंस्त्र,दहशतवादी
विचार ऐकून….आणि विचार करता करता पोहोचलो त्या तिस-या जगात…जे आम्हा माणसांचेही नाही…वरच्या देवांचेही नाही…तिसरेच….उर्वरीत प्राणीमात्रांचे जग…ज्याची भाषा वेगळी,हावभाव वेगळे,सरकार वेगळे,दॄष्टीकोन
वेगळा…
`टोड न्यूज’ वर बातम्या चालू होत्या….गेल्या काही दिवसात मनुष्य प्रजाती कडून झालेल्या तुफान दगडफेकीच्या घटनांनंतर अखिलभारतीय बेडूक महासंघांची एक तातडीची बैठक नुकतीच `वर्ल्ड टोड सेंटर’ या खामनदी किनारी असलेल्या, वेलींनी वेढलेल्या, एका अलीशान इमारतीत पार पडली...सुरूवातीला डोळे व पोट मोठे मोठे फुगवून व एक लांब आर्त `डराव’नी किंकाळी मारून घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या काही बेडूकबांधवांना आदरांजली वाहण्यात आली. ह्या विषयी सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे…
मनुष्यजातीने नुकतेच स्वतःच्या प्रजातीतील स्त्री वर्गाला आपल्या अधिपत्याखाली ठेवून त्यांची वाचा बंद करण्यासाठी बेडूक प्रजातीला दगडं मारण्याचे आवाहन केले व व्हॉटसअप नामक त्यांच्या मुखपत्रातून त्याचा जबरदस्त प्रचार करण्यात आला. परिणामी अनेक ठिकाणी बेडूकजातीचा कुठलाही प्राणी दिसला तर त्याला निव्वळ `स्वतःची बायको मुकी असावी’ ह्या अतिशय असमंजस,अवास्तव व धाडसी लालसेपोटी हातात मिळेल त्या साधनाने मारण्याचे जणू सत्रच सुरू झाले. यामुळे शहरातील सखल भागात साचलेले पाणी,हर्सुल तलावाचा परिसर,सलीम अली सरोवराचा परिसर,खाम नदीचे पात्र,शहरातील रस्त्यांवरील ऐतीहासीक खड्डे,नहरी,विहीरी या बेडूक अधिग्रहीत स्थळांवर आपआपली पोळी भाजण्यासाठी जमलेल्या स्वार्थी मानवकुळातले वंशज घोळक्या घोळक्याने जमा झालेले दिसू लागले. बेडकाला दगडं मारून बायको मुकी मिळेल व इतर सरपटणारे प्राणी मारल्यास सोबत सासू ही अबोल मिळेल अशी `बंपर स्कीम’ येणार असल्याची वार्ता वा-यासारखी पसरली आणी मग आख्या शहरात हाहाःकार माजला. बेडूक,मंडूक, बेडकी हे बेडूककुळातील प्राणी मुख्य निशाण्यांवर होते पण त्याही पेक्षा त्या बंपर स्कीम मुळे सरडे,उंदीर,साप,सापसुरळ्या,पाली ह्यांना यमसदनी पाठवून एका वेगळ्यास आत्मतृप्तीची अनुभूती घेताना मानवकूळ दिसत होता.जागो जागी हातात दगडं घेऊन मानव उभे होते.त्यातच `नेम चुकल्यास नवराच मुका होईल’ हा एक सबक्लॉज आल्याचीही वार्ता येत असल्याने पुर्ण नेम बसल्याशिवाय दगड सोडायचा नाही असाही प्रयत्न मानवाकडून चालू होता. लढाई आधी तलवारीला धार लावण्याच्या तत्वात विश्वास असणा-या काहींनी तर नेमबाजीचे विशेष क्रॅश कोर्सेस सुरू केले होते..
परिस्थीती नियंत्रणाबाहेर असल्याचे बेडूक सुरक्षा दला कडून वेगळी कुमक मागवली गेली.गटार रक्षक दल व तलाव सीमा दलाच्या तुकड्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला. फ्रॉग नेव्हीने युद्धसदॄष्य परिस्थीतीचा अंदाज घेऊन आपल्या शार्प स्वीमर्सला तयार राहण्यास सांगितले. तलावाकाठी घेण्यात येणा-या `डराव’कारी संघटनेच्या प्रार्थनासभेच्या सुरक्षा बंदोबस्तासाठी बेडूक पोलीसांची एक दंगा प्रतिबंधक तुकडी तैनात करण्यात आली. माणूस दिसताक्षणी पाण्यात उड्या मारण्याचा फतवा काढण्यात आला.पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रेमी युगूलांचा सुळसुळाट असणा-या गवती पाणवठ्यांवर `क्रोक क्रोक’ करत मर्दानी साद प्रियतमेला घालणा-या टोडांच्या बेलगाम वृत्तीला आळा घालण्याच्या नोटीसा त्यांच्या काना कपारीतल्या घरांवर जाऊन डकविण्यात आल्या. साद घालताना छाती व गळा फुगवण्याची कमाल मर्यादा निश्चीत करण्यात आली जेणेकरून आवाजाची फ्रिक्वेन्सी मानवी श्रवणसंवेदनेपेक्षा कमी राहील. त्यासाठी विशेष प्रशिक्षणवर्ग राबविण्यात आले. या कामा साठी अनुभव गाठीशी असलेल्या अनेक शिक्षणसंस्थांवर काम करणा-या हंगामी शिक्षणसेवकांनाच अतिरीक्त भार देण्यात आला.उघड्यावर शौचाला बसणा-या बेडूकवर्गाला दगडफेकीचा संभाव्य घटनेमुळे होणा-या जिवीतहानीची माहीती देऊन सावधपणे पोट मोकळे करण्याचे स्थळ शोधण्याचा सल्ला देण्यात आला.शक्यतोवर पाण्यात राहूनच ही प्रक्रीया पुर्ण करण्याची सूचना देण्यात आली होती पण बेडुकराज्य प्रदूषण नियामक मंडळानी याला परवानगी न दिल्याने भूतलावर येऊनच निसर्गाच्या हाकेला ओ देण्याचे ठरले.
क्रमशः
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home