बेडका बेडका नाच रे...भाग-२
बेडका बेडका नाच रे….भाग-२/३ (प्रशांत नानकर लिखीत एक वायफळ
लेख )
वाचकांच्या काही प्रश्नांना उत्तरेः
१.माणसांना टोमणे मारण्यासाठी
बेडकासारख्या निष्पाप प्राण्याची मदत का?..ह्यावर उत्तर म्हणजे
बायकोला मुके पाहण्याची निव्वळ मनोरंजक अशक्यप्राय स्वप्न पाहण्यासाठी ह्याच निष्पाप
प्राण्याची मदत घेतलीतच ना..
२.वेळ मिळतो कसा इतकं सगळं लिहायला?
आम्हाला तर विष खायला वेळ नाहीए...उत्तरः व्हॉटसप
मधील दोन-तीन अनावश्यक ग्रुप व टीव्ही वरील एक सास-बहू मालीका आयुष्यातून डिलीट करा…(आणी हो…आपल्या आपल्यातच ठेवा..पण…`बसण्याच्या’
वेळा व प्रमाण कमी करा…) १० पाने लिहीण्यासाठीचा
वेळ वाचतो हे समीकरण पाळले आहे… छंद व आवडी जोपासण्यासाठी आजच्या
काळात हा एक खात्रीलायक उपाय आहे.
रस्त्यांवर जागोजागी असलेल्या डबक्यांमध्ये भरणा-या पब्ज व नाईटक्लब्स वर बंदी आणण्यात आली.त्या जागांचा उपयोग एका स्थळावरून दुस-या स्थळाकडे आपदकालीन सामान वाहताना एक तात्पुरती लपण्याची सोय व सामान भरण्याचे भुयारी ठिकाण म्हणून करण्याचे ठरले.हिटलर ह्या मनुष्यजातीतील एका असामान्य हुकूमशाह ने अशा भुयारी लपण्याच्या जागेचा युद्धनितीत केलेला वापर याचा संदर्भ देऊन हा निर्णय घेण्यात आला.आधी नोटीस देऊनही कोणीही नाईटक्लब खाली केले नव्हते.शेवटी गृहखात्याला कारवाई करावी लागली.`बेडकी बदनाम हुई’ ह्या गाण्यावर मद्यधुंद अवस्थेत तरूणाई थिरकत होती.अचानक मेंडकनगर पोलीसांनी `टोडधाड’ टाकून अनेक तरूण व मध्यम वयीन बेडकांना अटक केली.तोंडात पकडून आणलेले स्वादीष्ट किटक ते जिभ लांब फेकून `टॉडबालां’वर उधळत होते..अटक झालेल्या टॉडबालांनाही समुपदेशन करून मनुष्यविरहीत वस्त्यांवर पुनर्वसीत करून तेथे नृत्य शिबीरं घेण्यास प्रोत्साहीत करण्यात आले.सामुदायीक नृत्यातून बेडूकभाव वाढतो ही त्यामागची योजना होती.
सामान वाहताना होणा-या मनुष्यहल्ल्यातून वाचणे खूप अवघड असल्याने जीव धोक्यात घालून ते काम करायचे होते.यासाठी गृहखात्याने एका विशेष अधिकाराखाली तातडीने ठराव पास करून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना या कामासाठी वापरले जाईल असे जाहीर केले.त्यातल्या त्यात मृत्यूदंडाची शिक्षा प्रलंबीत असलेल्यांना प्राधान्य द्यावे अशीही शिफारस केली.यावर त्यांच्या नातेवाईकांनी दयेचा अर्जही दाखल केला.पण असे अर्ज काही दशके प्रलंबीत राहण्याचा मानवी इतिहास लक्षात घेऊन तो अर्ज राज्यकर्त्यांनी स्वीकारलाच नाही.यावर प्रसारमाध्यमांकडे धाव घेणा-यांवर देशद्रोहाचे इतर आरोप लावण्याची धमकी देऊन त्यांना गप्प करण्यात आले.(पुढे जाऊन मानवी विद्यापीठांमधे `हाऊ फ्रॉग स्टेट्स क्लीयर द मर्सी पेटीशन्स ईन अ डे- अ केस स्टडी’ हा शोधनिबंध डॉक्टरेट साठी ठेवला होता म्हणे…)
आणीबाणीला तोंड देण्यासाठी तरूण पिढीला सैन्यात भरती होण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी मिनीटात ५० `फ्रॉग जंप’ ही किमान पात्रता ठेवण्यात आली.हिरवी त्वचा असलेल्या बेडकांना तलावाकाठच्या हिरव्या झाडीजवळील सीमेवर तर तपकीरी काळसर बेडकांना खडकाळ नदीपात्राच्या सीमेवर ह्या पद्धतीने अनेक रंगांची बेडके भरती करण्यात आली.यामुळे सीमेवर मानवाने केलेल्या दहशतवादी दगडफेकी हल्ल्यात प्राणाची आहुती जाण्याचे प्रमाण लक्षणीय घटण्याची आशा निर्माण झाली.माणसांना त्यांच्या वैद्यकीय शिक्षणासाठी स्वकीयांशी गद्दारी करून कापायला बेडूक पुरविणा-या काही बेडूकतस्करांवर बंदी घालण्यात आली व मानवजातीशी पुर्ण असहकार पुकारण्याचे आवाहन करण्यात आले.
ह्या सगळ्या
राजकीय व प्रशासकीय हालचाली चालू असतानाच गर्भश्रीमंत तरणाईला आजूबाजूला चाललेल्या कुठल्याच असंतोषाची साधी भणकही नव्हती.सामान्य बेडूकजातीत मानवाच्या दहशतवादी ह्ल्ल्यांमुळे तयार झालेल्या
असुरक्षीततेच्या वातावरणाची कुठलीही झळही या रत्नजडीत कवचाला भेदू शकत नव्हती..अशीच एक `मॉड’ बेडकी नुकतीच पाण्यात पोहण्याचा मनसोक्त आनंद लूटून पूलच्या काठावर येण्यासाठी वर चढायला लागली..आज तिने ठरविलेल्या कॅलरीज पुर्ण बर्न झाल्या मुळे तिच्या चेहे-यावरचा आनंद ओसांडून वाहत होता…इतक्यात घात झाला….`मारा..मारा….’ अशे शब्द तिच्या कानावर आले…तिने पटकन आत उडी मारण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी तिच्या दिशेने आलेला एक दगड तिच्या पायाचा वेध घेणार इतक्यात…दुस-या दिशेने आलेल्या दुस-या एका दगडाची या दगडाशी टक्कर झाली…प्रचंड तुकडे उडाले आणी…बेडकी ह्या संधीचा फायदा घेत पाण्यात बुडाली…..तिने पाण्यात उडी मारताच तिच्या कमनीय बांध्यावर भाळून तिच्या मागे अंग फुगवत वर येणा-या व घा-या रंगाचे डोळे व पिळदार शरीर यष्टी असणा-या तिच्या बॉयफ्रॉगने झटका लागावा तशी पाण्यात जोरदार धूम ठोकली.नंतर तुफान दगडफेक त्या पाण्यावर सुरू झाली पण तोवर बेडकी सुरक्षीत पाण्यातल्या एका कपारीत लपून गेली होती…तिचे उर भितीने वर खाली होत होते.बॉयफ्रॉग दूरदूर्पर्यंत कुठे दिसत नव्हता..चिंब भिजलेल्या अंगावरही तिला घाम सुटेल की काय असे तिला वाटायला लागले..आज घाम पुसण्याचे टिश्यू पेपर्सही घरी राहिले असल्याने ती अजूनच बिचकली..आजचा अनुभव वेगळाच होता..अचानक काय झाले याचा तिला काहीच अंदाज येईना..इतके दिवस सापांपासून सावध राहण्याचे शिक्षण तिने शालेय जीवनात घेतलेले होते…पण माणसापासून संरक्षणाची गरज नाही कारण तो एकमेकांशीच लढून मरतो हे ती ऐकून होती.त्या आत्मघातकी वृत्तीचा आज तिला अनुभव आला…
हाती आलेला बेडूक `तुझ्यामुळे पळून गेला’ असा प्रत्येक माणूस दुस-यावर आरोप लावत जोर जोरात भांडू लागला..बायकोची वाचा बंद करण्याची आयती संधी तर घालवलीच पण त्याचबरोबर स्वतः
मुका होण्याच्या भितीपोटी आलेल्या ह्या अतिव निराशेमुळे काही क्षणानंतर एकेमेकांवारच प्रचंड दगडफेक झाली.त्यात अनेक मानव जखमी झाले. दरम्यान तलाव रक्षक दलाच्या एका हॅंडसम गार्ड ने तिला विरूद्ध दिशेने मार्ग काढून एका कपारीचा आधार देत बाहेर काढले आणि रस्त्यावरील एका डबक्यातल्या भुयारात पोह्चवले..ती त्या गार्डकडे बघतच राहीली..आज तिला तिच्या बॉयफ्रॉग च्या पळपूटेपणाचा राग व फ्रॉगगार्डच्या मर्दानी मदतीचा आनंद दोन्हीही आज मिळाले होते..फ्रॉगगार्डने तिला बंकर प्रोटेक्षन फोर्सच्या जवानांचा ताब्यात दिले. त्याचा फ्रॉग नंबर घेण्याच्या आतच तो देखणा गार्ड नाहीसा झाला..खिन्न मनाने ती त्या बंकर मधून पोहत पुढे सरकली. मानवनिर्मीत रस्त्यांच्या निकृष्ठ दर्जामुळे रस्त्यांखालील बंकर्स एकमेकांना आधीच जोडलेलेच होते.त्या संधीचा फायदा घेत प्रस्तुत बेडकीला आरामात बाहेर काढण्यात आले व ती तिचा आवडता `फ्रॉग वॉक’ करत झुडूपांकडे दिसेनाशी झाली.(ही फ्रॉग वॉक चाल ती `हॉव टू स्टे स्लीम ऍंड विन फ्रेंडस ’ या मानवी पुस्तकाचा बेडूक पुस्तक महामंडळानी केलेला स्वैर अनुवाद `हाऊ टू विन क्रॉक्स फ्रॉम यूअर फ्रॉग’ या पुस्तकातून शिकली होती.)
क्रमशः
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home