Friday, January 18, 2013

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -७

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -७
विशेष सूचनाः
१. भाग १,२,३,४,५,६ झाल्यावर ७ येतो हे विसरु नये.किंवा १ ते ६ वाचला नाही आता सातव्यातलं काही समजणार नाही अशी कचखाऊ वृत्ती न ठेवता निष्ठेने वाचन करावे.पुर्ण भाग वाचणा-यास या लेखांच्या प्रकाशन सोहळ्यात मोफत प्रवेश देण्यात येईल.

२. या भागात आनंदराव,निलेश,मकरंद व सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमच्या सौभाग्यवतींचा कुठलाही उल्लेख न करता विनोदनिर्मीती करायचा एक मोठा शूर प्रयत्न या किटाणू नी केला आहे.तरी विनोद न झाल्यामूळे शांततेची रोगराई पसरल्यास आनंदरावांकडे रूग्ण पाठविण्यात येतील.

३. या भागा अखेर जवळजवळ लोणावळा वेशीपर्यंत आलेले आमचे लोणावळा प्रवासवर्णन प्रस्तुत लेखक लोणावळ्यातून २८ तारखेला रात्रीच स्वगृही परत आल्याने लवकर खंडण्याची शक्यता आहे.२८ तारखेला रात्री व २९ तारखेला परत निघेपर्यंतच्या घडामोडी सविस्तर तोंडी अथवा लिहून प्रस्तुत लेखकाकडे पाठवल्यास अथवा स्वतः लिहील्यास एक परिपूर्ण कथानक तयार होईल.

आता पुढे….

या माझ्या किडनीस्टोन कथेतून पुरण (मूळ विषय चोरुन नविन कथेत टाकणे) व स्फुरण घेउन मनिष पाडळकरही कथाकथनास तयार झाले.त्यानी थोडक्यात सांगितलेल्या हकीकतीचा कल्पनाविस्तार पुढील प्रमाणे.

मनिष म्हणाला….

`२८ जुलै रोजी मी नाही नाही म्हणत असतांना शेवटी सचिन टाकळकर आणि विनायक कुलकर्णी या दोन कुंभकर्ण कुळी मित्रांना सकाळी पिकअप करून लोणावळ्याकडे कूच करायची महान तपस्या माझ्या वाटेला आली.टाकळकर च्या घराबाहेर चांगल्या ५-२५ कुत्र्यांचे प्रणयगितांचे सामुदायीक काव्यवाचन सुरू होते.प्रत्येक चांगल्या कवितेला सगळे `वूssssssss वू वू’ अशी शेपट्या हलवत दाद देत होते.काही काही अतिशय निरर्थक व तद्दन फालतू व गल्लाभरू कवीतांना मिळालेली दाद पाहून मला सर्व कुत्रे एकमेकांचे फेसबुक फ्रेंड्स आहेत याची खात्री झाली व `हल्ली नानक्यालाही लाईक्स मिळतात तिथे या त्याच्यापेक्षा एक शेपटी अधिक असणा-या श्वानांचे काय नवल?’ असे वाटले .

पहाटेच्या प्रहरी मोठ्या मोठ्याने हॉर्न वाजवून त्यांच्या काव्यसाधनेत बाधा आणणे इष्ट न वाटल्याने मग मी मोबाईलवर प्रयत्न केल्यावर `आपण ज्या मोबाईलवर नंबर वर कॉल करत आहात तो बंद आहे.’ असे पलिकडच्या बाई म्हणाल्या.बाईंचा आवाज ब-यापैकी पुरूषी वाटल्याने सचिन टाकळकरच आवाज बदलून बोलत असल्याचा प्राथमिक भास नंतर पुन्हा एकदा आवाज ऐकून बाईंचाच असल्याची खात्री करून घेतला.बाई थोड्याश्या विसरभोळ्या असाव्यात कारण मी तिस-यांदा फोन लावल्यावर त्या ` हा नंबर उपलब्ध नाही असे म्हणाल्या’.शेवटी नाईलाजाने दोन जिने वर चढून दारावरची बेल वाजवल्यावर दोन पोपटांनी एका पोपटीणीच्या वडिलोपार्जीत पिंज-यासाठी भांडावे तसा काहीसा बेलचा आवाज आला.`आत या दरवाजा उघडा आहे’ सचिन च्या सौं चा आवाज आला(सौंचा आवाज असावा असा, इतक्या पहाटे स्वतःच्याच घरी सचिनसोबत दुसरे कोणी असण्याची शक्यता नसल्याने बांधलेला अंदाज).

मी बिचकतच दरवाजा उघडला असता आत दरवाज्यासोबत सचिनही उघडा असल्याचे खळबळजनक दृश्य पहायला मिळाले.रात्र संपायच्या खुपच आधी आपण आलो हे वाटून मी पटकन लज्जेने नजर फिरवली व सचिनला म्हटले `सच्या लवकर तयार होऊन खाली ये,मी बाबा आपला खालीच थांबतो,उशीर होतोय’.मी आल्या पावली माघारी फिरणार तेवढ्यात पाठीमागून `आई…ग…’ अशी आर्त वेदनावजा किंकाळी ऐकू आली.`एवढ्या सकाळी बोलवाल का पुन्हा मित्रांना ‘असे म्हणून सचिनच्या पेकाटात वहिनींनी घातलेल्या लाथेने तो केकाटला असावा असे वाटून मी माफीवजा काही बोलण्यासाठी सचिन कडे पाहिले असता तो खरंच वेदनेने कळवळत होता.वहिनी त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करीत होत्या. समाधान म्हणजे सचिन फक्त वरच उघडा होता.या हृदयविकाराच्या कळा असल्याचा संशय आल्याने आता `एक महिन्याच्या रियुनियनच्या तयारीवर विर्जण पडणार’ अशा आत्मकेंद्री विचारांना वहिनींच्या `किडनी स्टोन चा त्रास सुरू झाल्याय यांना’ असे केलेल्या उद्गारांनी दिलासा आला.किडनी स्टोन आणि माझे फार जुने पारिवारीक संबंध(मी व माझा भाऊ दोघही स्टोनट(चावट च्या चालीवर आहोत) असल्याने `हात्तिच्या, मग घाबरायचे काही कारण नाही’ असे मी सचिन व वहिनींना समजावले. मी त्याला आपण जातांना पद्मावती हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन घेऊ तुला लगेच बरं वाटेल हे खुप समजवण्याचा प्रयत्न केला.पण वेदनेने व्यथित होऊन `एक पैर नाचोरे मुकूंदा’ झालेल्या सचिन कुठल्याही वाटाघाटीस तयार नव्हता.काही झाले तरी मी लोणावळयाला जाऊ शकत नाही असा सुर त्याने लावला.मग मी हळूच त्याच्या कानात काहीतरी सांगीतले ते ऐकल्यावर त्याने लगेच वहिनींना उद्देशून `अगं माझे कपडे काढ….’ असं आक्षेपार्ह्य विधान केलं.मी दचकून वहिनींकडे पाहीले.वहिनीही नव-याच्या आक्षेपार्ह्य विधानाचा योग्य अर्थ लावत, या अचानक झालेल्या वैचारीक कायापालटाकडे आश्चर्याने बघत व अलमारीतून कपडे काढत शांतपणे त्याची बॅग भरू लागल्या.सचिनच्या चेहे-यावर एक गोड हास्य तरळले होते.मी सचिनच्या कानात काय सांगीतले असेल असा सचिनच्या अंगापेक्षाही उघडा प्रश्न वहिनींच्या चेहे-यावर होता.लवकरच आम्ही पद्मावती कडे कूच केली.

`पण मनीष तू सांगितलेस काय सचिनला कानात..?’ न राहवून मी मनिषच्या कथेला मधेच थांबवत विचारले.`अरे काही नाही मी त्याला म्हटले पद्मावतीत नाजूक हाताने इंजेक्शन देतात.त्यावरच स्वारी अर्धी बरी झाली.’मग पद्मावती च्या गेट बाहेर रस्त्यावर गाडी उभी करत मी सचिनला आत घेऊन गेलो.आधीच कळवून ठेवल्याने तोवर नर्सने इंजेक्शन तयार ठेवले होते.सचिनच्या टोचण्याचा कार्यक्रम झाला.विशेष म्हणजे सचिन अजिबात रडला नाही.तो गुणी ( की अवगुणी) बाळासारखा शांत झोपून टुकूर टुकूर `इकडे तिकडे’ बघत होता.मग त्याला थोडा आराम करायला सांगून मी विनायकला घ्यायला पुढे कुच केली.

विनायकच्या बिल्डींगबाहेर उभे राहून मी त्याला कॉल केला.विशेष म्हणजे त्याने फोन उचलला.`मी त्याला खाली लवकर ये’ म्हटल्यावर त्याने मला `कशासाठी?’ असा प्रतिपश्न केला. `बाळा, स.भु.रीयुनीयअन, १९८९,लोणावळा,मनिष पाडळकर काही शब्द ऐकल्यासारखे वाटतायेत का?’ या माझ्या प्रश्नाला त्याने `अरे वा कोण जातय लोणावळ्याला?’ असे उद्गार काढून मला फेफरं आणायची बाकी ठेवली होते.`विन्या फालतू विनोद नकोयत..लवकर खाली ये..’त्यावर तो निवांतपणे सौभाग्यवतींना `अगं उठ,पाणी तापायला ठेव’ असे म्हटल्याचे ऐकताच मी टुणकन गाडी उघडून बाहेर आलो व आता इथे तासभर मोडणार या भितीने परिस्थीतिचा आढावा घेण्यासाठी विनायकच्या फ्लॅटकडे धावलो.माझे स्वागत करायला लक्ष्मी नारायणाचा जोडा आजूबाजूला पडलेल्या बूट,चपला,सॅंडल,स्लीपर यांच्या मध्ये उभा होता.विनायक कडे शक्य तेवढ्या रागाने बघत मी वहीनींना नमस्कार केला व `विन्या लवकर चल,तिकडे त्या टाकळ्या ला झोपवून आलोय’ हे आवाहन केले. त्याने नखशिखांत माझ्याकडे `माझं टोनर रिफीलींग चे बिल थकले आहे रे त्याच्याकडे..एवढी काय घाई होती तुला त्याला टपकावायची..’ या नजरेने बघत प्रश्नार्थक चेहेरा केला.त्याच्या प्रश्नचिन्हाला थोडक्यात कथा सांगत मी अल्पविराम दिला.त्यावर तो थोडी गडबड दाखवत लवकर तयार होईल अशी माझी झालेली अपेक्षा त्याच्या `अगं चहासोबत भजी तळ थोडी..’ या वाक्याने पार कोलमडून निघाली.
`विन्या भजी कुठली खातोयस लेका…रस्त्यात तुला भजी,जहीर,युवराज,धोनी,सेहवाग गेलाबाजार एखादा डंकन फ्लेचरही खाउ घालेल हं…चल..तयार हो लवकर..’ मग त्यानंतरचा अर्धा तास मी व वहीनींनी त्याला न्हाउ माखू घालणं,कपडे घालणे,माझ्या हाताचा अंगठा विन्याच्या डाव्या गालावर व उरलेली बोटं त्याच्या उजव्या गालावर ठेवून मधोमध त्याचे थोबाड जोरात दाबून त्याचा भांग पाडून देणे..पहीली हेअर स्टाईल न पटल्यामुळे मग ती विस्कटून पुन्हा दुसरा पाडणे,ते झाल्यावर सरतेशेवटी कुठल्याही सौंदर्यप्रसाधनांचा परिणाम न होणा-या मळखाऊ रंगावर निव्वळ लहान मुलांना घाबरवण्याचा उद्देश ठेवत पांढ-या रंगाची पावडर थोपणे इत्यादी (प्रातः र्विधी सोडूनची इतर सर्व) दिनचर्या आटोपून दिली व एकदाचे विनायकराव प्रस्थानास तयार झाले. या विनायकाला कसेबसे मिरवणुकीला सोबत बसवत मग मी आधी पद्मावतीत विसर्जीत केलेल्या सचिनदेवांना घ्यायला तिथे आलो.ते अगदी आमच्या मिरवणुकीत नाचायला तयार असल्यासारखे दारात येऊन उभे होते…’

असा शेवटी आमचा लोणावळा प्रवास सुरू झाला…मनिष पाडळकरांनी त्यांची सचिन व विनायकची ही पिकअप स्टोरी सांगीतली..
मनिषची कथा संपता संपता आम्ही चाकण पार करून जुन्या पुणे मुंबई हायवे ला लागलो होतो.इतक्या वेळ आपली हनुवटी (स्वतःच्या) गळ्याच्या खालच्या भागाला लावून निष्ठेने घोरत पडलेल्या विन्या अचानकच चुळ बुळ करू लागला.बाहेर छान पाऊस पडत होता लोणावळा जवळ येत चाललं आहे याची चिन्हे दिसायला लागलेले होते.हायवेवर गाडीने कमालीचा वेग पकडला व पावसाचा आवाज जसा जसा वाढला तसा तसा विन्या जास्तच अस्वस्थ झाला आणी अचानकच त्याने `मनिष गाडी थांबव थोडी’ म्हणून फर्मान सोडले. मनिषने गाडी थांबवली. विनायक मोठ्या त्वरेने खाली उतरला. बाहेरच्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी विन्याला खाली उतरायचे असेल असा आमचा झालेला समज तो घाईघाईत झुडुपाआड गेल्याने निसर्गाच्या हाकेला `ओ’ देण्यासाठी गेल्याने मोडीत निघाला.बाहेर पाउस चालू असल्याने आम्ही गाडीतनच आजूबाजूला दिसणा-या निसर्गाला न्याहळत बसलो होतो.ब-याच वेळ झाल्यावरही विन्या परत न आल्याने त्याला निसर्गाने नुसतीच हाक नव्हे तर मोठी आरोळी दिलेली आहे हा निष्कर्ष आम्ही काढला.१० मिनीटे कुठल्यातरी झुडुपाआड साधना केल्यावर प्रसन्न चेहे-यानी विनायकराव रामराव कुलकर्णी परत आले.विन्याला लोणावळा आता फार दुर नसल्याने त्याने आत्ता केलेली साधना तो तिथे जाऊनही करू शकला असता व `काय वाटेल तिथल्या स्वच्छ्तागृहांना?अरे ३००० रुपये मोजलेत तर सर्व व्यवस्थित `उपभोगायला’ नको..?’ अशी मी आठवण करुन दिल्यावर आपल्या व्यावहारीक उपेक्षेने व्यथिय होऊन तो ताबडतोब `तिथल्या स्वच्छतागृहांना समान न्याय देण्यात येईल’ असे ठासून म्हणाला त्यामुळे अखिलभारतीय स्वच्छतागृह संघटनांचा समान नागरी हक्कांसाठीचा पुकारला जाउ शकणारा राज्यव्यापी संप तुर्तास स्थगित होइल अशी शक्यता निर्माण झाली.

आमच्या या सर्व प्रवासादरम्यान बरेच मित्र आधीच लोणावळ्याला पोहोचायला सुरुवात झालेली होती.विशेष म्हणजे जवळपास अर्ध्या मंडळींना लोणावळ्यात कुठे जायचे याची पुसटशी कल्पनाही नव्हती.आणि यात मनिषची चूक नसून सर्व कर्तुत्व त्यांचे स्वतःचेच होते.सर्व माहीती वेळोवेळी फेसबुकवर आल्यानंतरही मनिषला आलेले फोन पुढील प्रमाणे ` मन्या पोहोचलो लोणावळ्यात आता पुढे..?,अरे ते होटेल ऑर्कूटच ना..?मनिष, प्यायला खंडाळ्यात घेऊ का तिथे होईल सोय.?,मन्या किती क्रेट्स घेऊ..? अरे यार `आर पार’ रिसोर्ट नाहीच आहे लोणावळ्यात...,पहिला टर्न की दुसरा…अरे मनिष डावीकडचा दुसरा की उजवीकडचा…अरे पण माझ्या का तुझ्या उजवीकडचा ते नाही सांगीतलं म्हणून पुन्हा फोन लावला…मनीष इथे पंक्चरचं दुकान आहे का रे…मन्या अबे तो राइट टर्न सरळ खाली खोल दरीत जातोय…जाऊ की थांबू..मनिष शाहरूख चा बंगला लागलाय..इथेच सोय बघायची का…मनीष च्यायला आपल्याआधीच सगळे ढग,धूके लोकं येऊन थांबलेत रिसोर्ट मध्ये…’

या प्रत्येकाला पत्ता व लोणावळ्याची भौगोलीक माहीती देता देता मनिषचाही ए.सी.मध्ये घाम निघायला लागला.काही काही प्रश्नतर निव्वळ निरर्थक होते..जसे…`संध्याकाळच्या डी.जे.ला फक्त नाचणार आहात की `नाचवणारही’ आहात..ही रेव्ह पार्टीतर नाही ना..मनीष चिक्कीची चव लोणावळा चिक्की सारखी नाही वाटत यार…मन्या रिसोर्टपर्यंत जाणा-या रोडवरील डांबर उखडलेले का आहे…? हा प्रश्न ऐकल्यावर मात्र मनीष त्या रोडपेक्षा जास्त उखडला…`तो रिसोर्ट आपल्या पिताश्रींनी खरेदी केलेला नाही नविन रोड बांधायला…आणि तीन हजारात तिथे बुडं टेकवायला मिळाली तरी पुष्कळ समजा…’ असे एक शारीरीक विधान करून मनिष ने पुढच्या आलेल्या `कुठं वळू’ कॉल ला `यू टर्न घेऊन वापस औरंगाबादला जा’ असे दिशाहीन उत्तर दिले.

काही योग्य भाषेत विचारलेल्या प्रश्नांना मात्र तो पुर्ण तल्लीन होऊन उत्तरे देत होता..` अरे लोणावळ्यात आल्या आल्या चिक्कीची दुकाने लागतील..ती पार करून पुढे या…तिथे एल ऍंड टी ची पाटी लागेल तेथे उजवीकडे वळा….’ हे सांगतांना त्यानेही आपले स्टेअरींग उजवीकडे वळवले व मागून आम्हाला ओव्हरटेक करू पाहणा-या एका रेसबाईक वरील प्रेमी युगुलामधील मागे बसलेल्या `तिने’ त्याच्या दोन्ही बगलेखालून हात घालून `त्याच्या’ तोंडात भरविण्यासाठी दिलेले पॉपकॉर्न `तो व ती’ एकदम दचकल्याने हवेत उडून कारेत बसलेल्या मनीष पाडळकर नामक तरुणाच्या तोंडात पडता पडता वाचले होते.त्यावेळी खिडकी बंद असल्याचा कमालीचा खेद करत नंतर बराच वेळ मनीष पुन्हा असा प्रसंग येईल ही भाबडी आशा धरत खिडकी उघडी ठेवून सारखा सारखा `उजवी कडे वळा’ `उजवी कडे वळा’ असे स्टीअरींग वळवत सांगत होता.पण पॉपकार्न सोडून बरीचशी हवा,काही माश्या,चिखलाचे शिंतोडे,वाहनांचा कर्कश्य आवाज,समोरच्या कारमधून उडणारे बियरचे थेंब आत आले.त्यातील काही पदार्थांची चव आवडल्याने खिडकी बराच वेळ तशीच उघडी होती.पण बाजूनी जाणा-या एस.टी.तील डोक्याला गांधीटोपी व गळ्यात मफलर घातलेल्या एका काकांनी जेव्हा तोंडात तयार झालेला ताम्र मुखरस विसर्जीत करण्यासाठी तोंड बाहेर काढलेले मनिषनी डोळ्याच्या कोप-यातून जेव्हा पाहीले तेव्हा मात्र त्यानी रात्री उशीरा बायका पोरं झोपल्यावर आरामात चालू असलेला `फॅशन टी.व्ही.’ कोणी जागं झाल्याची चाहूल लागल्यावर जसा पटकन बंद करावा तशी कारची खिडकी बंद केली.

क्रमशः लवकरच….

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home