Monday, May 1, 2017

चोराच्या सुलट्या बोंबा भाग-२

*चोराच्या सुलट्या बोंबा भाग-*

विशेष सूचना
.कल्पकता आवडली,उपहास विनोद आवडला यासारख्या प्रतिक्रीया आल्या आहेत.आभारी आहोत.त्याचबरोबर कथा आहे का आत्मकथा?,काही तरी खरं वाटेल असे लिहीत चला. संस्थेत प्रवेश मिळेल का? या सारख्या प्रतिक्रीयाही आहेत.एवढच म्हणेन की चुकीच्या गोष्टींचे ट्रेनींग समाजात पदोपदी कुठेही मिळते.आमची संस्था निव्वळ प्रतिकात्मक आहे.

 आता पुढे

अलिकडे वाहिन्यांवर दाखविल्या जाणा-या अनेक डिटेक्टीव्ह मालीका अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.सी आय डी सारखी मालिकेसाठी तर शुटींगला संस्थेची जागा मोफत देण्याचाही प्रस्ताव व्यवस्थापनाकडे विचाराधीन आहे.तसेच मालिका लिहीणा-या लेखकांना विशेष मानधन देऊन संस्थेच्या सल्लागार समितीत घ्यावे. त्यामुळे होतकरू मुलांना संस्थेतून बाहेर पडल्या पडल्या चांगल्या प्रॉजेक्टसवर काम करण्यायोग्य चोरी करण्याच्या चांगल्या स्क्रीप्टस लिहून मिळतील असा मतप्रवाह संस्थेत आहे.सी आय डी मालिकेमधील दया या अतिशय कनवाळू नावाच्या तब्येतीनी मजबूत पण चेहे-याने मंद वाटणा-या व्यक्तीरेखेच्या, जोर लावून खांद्याने दरवाजा तोडण्याच्या जन्मजात सवयीचा, शुटींगदरम्यान विद्यार्थांकडून सराव करून घेण्याचाही व्यवस्थापनाचा मनसूबा आहे. त्यामुळे चोरी करताना होणारा बराच वेळ त्रास वाचेल हा अंदाज आहे.

कुलूप किल्ली यांचे अनेक कॉम्बीनेशन्स,मास्टर की,हातोडी ने कुलूप तोडणे,दगडाने तोडणे,हिसका देऊन तोडणे,टॉमी ने तोडणे ( टॉमी हे एक लोखंडी ह्त्यार आहे.या नावाचा श्वानजातीतील लोकप्रिय नावाचा काहीही संबंध नाही..असल्यास तो केवळ योगायोग समजावाप्राणीमित्रांचे हल्ले सहन केले जाणार नाहीत.) ह्या सर्व कुलूप तोडण्याच्या प्रक्रीयेची दिवसाची कार्यशाळा घेतली जाते.त्यात याशिवाय करवतीने गज तोडणे, पकड अथवा कटर वापरून जाळी तोडणे,कुंपणातून पलिकडे जाणे,भिंतीवरून उडी मारून पळणे,पळताना पडले तरी हातातील वस्तू सुटू देणे याचेही प्रशिक्षण दिले जाते.

मंगळसूत्र चेन स्नॅचींग या ऐच्छीक विषयाच्या अभ्यासक्रमात सोने या धातूची सखोल माहिती दिली जाते.त्यातील घटक,चमक रंगावरून -या  नकली सोन्याची पारख हा या विषयातील प्राविण्याचा महत्वाचा घटक आहे.त्यावरच या क्षेत्रातील नैपुण्य आणि यश ठरले जाते.नकली सोन्याची चेन ओढून पळाल्यानंतर समस्त चोरकुळाची होणारी मानहानी संस्थेच्या व्यवस्थापनाला कदापिही खपणार नाही हे मुलांवर बिंबवले जाते.कुठल्या प्रकारचे मंगळसूत्र किती जोराच्या झ्टक्याने तुटते तो झटका किती अंतरावरून किती अंशाच्या कोनावरून दिला गेला पाहिजे याचेही ज्ञान ऑटोकॅड  ॲनिमेशन च्या माध्यमातून दिले जाते.मंगळसूत्र घेऊन पळाल्यानंतर रस्त्यावर असणा-या सीसीटीव्ही फूटेज मधे आलेच तर चेहरा अथवा गाडीचा नंबर लक्षात येऊ नये यासाठी गाडी चालविण्याची मागे बसणा-याने आपला चेहरा कसा दिसणार नाही याची घ्यावयाची काळजी याचाही अभ्यासक्रमात समावेश आहे.

गाड्यांची,दुचाक्यांची,मोटारसायकलींची चोरी हा ही एक ऐच्छीक विषय म्हणून निवडला जाऊ शकतो.यात गाड्यांची अनेक मॉडेल्स त्यांचे आजचे बाजारभाव,गाड्यांमधे चोरी होऊ नये म्हणून केले जाणारे उपाय याविषयी सखोल माहिती विद्यार्थ्यास असावी असा संकेत आहे.चोरी करू इच्छीणा-या गाडीत पेट्रोल आहे अथवा नाही याचाही अंदाज आधी चोराला असावा लागतो अन्यथा चोरी करूनही फायदा होत नाही उलट दमछाकच होते.इतर -याच चोरीप्रक्राराप्रमाणे यातही पाळत ठेवणे हा एक महत्वाचा घटक आहे.

स्वाक्षरी चोरी वापर, नकली नोटा छापणे बाजारात उतरवणे या विषयी तीनतीन दिवसांची शिबीरे होतात.यात या विषयाची मुलांना फक्त तोंडओळख होते.त्यात पारंगत होण्यासाठी आपआपल्या आवडीप्रमाणे पुढे डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत. करचोरी हा देखील एक स्वतंत्र सामाजिक निकडीचा विषय आहे.त्यासाठी विद्यार्थाला प्रवेश परिक्षा देऊन आधी त्याचे वाणीज्या शाखेचे ज्ञान दाखवावे लागते.अशा मुलांना मोठ्या उद्योगात तसेच बिल्डर्स,डॉक्टर्स यांच्याकडे सल्लागार म्हणून लगेचच काम लागते.

साहित्य,सॉफ्टवेअर,संगीत,कथा ह्यांच्या चोरीसाठी असामान्य मेहनत लागते.त्यात बराच अभ्यास जगात कुठल्या कोप-यात कोणी काय तयार करुन ठेवलेलं आहे ह्याची चौफेर माहिती असावी लागते.-याचदा ह्यात निव्वळ साहित्य वा तयार वस्तू ह्यांची चोरी नसून -याचदा त्याबद्दल ज्ञान असणारे तंत्रज्ञही चोरून आणावे लागतात.पुन्हा एकदा मानवी तस्करी संस्थेच्या नियमात बसत नाही.तरीही वरील विषयाचे मूलभुत ज्ञान देण्यासाठी हिंदी संगीतातील काही संगीतकार,काही दिग्दर्शक यांची विशेष कार्यशाळा घेतली जाते.( संस्थेने वरील विषयाची आवड विद्यार्थ्यात निर्माण व्हावी यासाठी काही परदेशास्थित चोरी निगडीत संस्थांचा अभ्यासक्रम चोरूनच आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला असल्याचे आपल्या प्रॉस्पेक्टस मधे प्रांजळ पणे नमूदही केले आहे.)

पुर्ण संस्थेमधे चोरी या विषयात पारंगत होण्यासाठी अतिशय पोषक असे व्यावसायीक वातावरण तयार केले आहे.अनेक चोरवाटा,लपून नजर ठेवण्यासाठीची ठिकाणे, तसेच चोरलेला माल विक्री करण्यासाठी काही बनावट दुकानांची निर्मीती केलेली आहे.येथे आलेल्या प्रत्येकास कुठल्याही सहकारी विद्यार्थ्याची वस्तू चोरी करण्याची पुर्ण मुभा आहे.त्यामुळे सायंकाळच्या वेळेस विक्री दुकानांवर पेन,कंपास पासून ते पाकीट,मोबाईल पर्यंत अनेक वस्तू जमा होतात.एका पुर्ण सत्रात विद्यार्थ्याने केलेल्या चोरीवर त्याचे क्रेडीट्स ठरले जातात कमीत कमी ५० क्रेडीत त्याला एका सत्रात पुर्ण करावेच लागतात.(संस्थेच्या इमारतीचे सुटे भाग मात्र चोरण्यास सक्त मनाई अशात केली गेली आहे.कारण क्रेडीट्स मिळविण्यासाठी विद्यार्थी संस्थेचेच गज,तोट्या,पाण्याच्या मोटारी,तसेच पथदिवे,केबल्स,वसतीगृहातील दिवे,तारा,पंखे गहाळ करून विक्री दुकानांवर जमा करून आपल्या नावाचे क्रेडीट्स वाढवत होते.यामुळे ऐदीपणाची भावना वाढत जाऊन उद्यमशिलतेचा विकास होत नसे.म्हणून आता व्यवस्थापनाने संस्थेच्याच इमारतीचे सुटे भाग क्रेडीट म्हणून वापरले जाण्याचा नियम केला आहे.)

दिवसभरात चोरी झालेल्या वस्तू संध्याकाळी दुकानात जमा झालेल्या वस्तूंचे मोजमाप होते काही वस्तू गहाळ झालेल्या आढळल्यास त्याची सखोल चौकशी संस्थेतीतच उभ्या केल्या गेलेल्या बनावट पोलीस ठाण्यातर्फे केली जाते.मध्यंतरात गहाळ झालेल्या काही कच्छे बनियान, दुकानात आल्याने पोलीसांनी पुर्ण संस्थेच्या विद्यार्थ्यांना मैदानात उघडे उभे करून आवश्यक तो कच्छा शोधून काढल्याचीही नोंद आहे.चोरीतही प्रामाणिकता आणण्याचा दृष्टीने संस्थेने चालविलेले हे प्रामाणीक प्रयत्न आहेत.

बनावट पोलिस ठाण्यात पुर्ण नियम कायदे हे -या पोलिस ठाण्यासारखेच ठेवलेले आहेत त्यामुळे मुलांना पुढे जाऊन -या ठाण्यातील वातावरण अतिशय परिचीत वाटते भांबाऊन जाऊन अथवा दबावाखाली येऊन गुन्हा कबूल करण्याच्या प्रवृत्तीला लगाम लागतो.खोटे रक्त काढणे,बेशुद्ध पडल्या्चे नाटक करण्याचे प्रशिक्षण तसेच निरागसतेचा आव अशा नाट्यप्रकारांचेही रितसर धडे दिले जातात.चिरीमिरी,मांडवली या शब्दांचे वास्तववादी अर्थ मुलांना समजावून सांगितले जातात.कैदेत असताना मोबाईल तथा इतर उपयोगी वस्तू सहजपणे सर्वसामंजस्याने कशा मिळविता येतील त्यासाठी शिष्टाचाराचे वाटाघाटीचे कुठले नियम वापरावेत याचे सखोल ज्ञान देण्यासाठी काही अनुभवी कैद्यांना विशेष अधिकाराखाली काही वेळ सुटका करून बोलावले जाते.पोलीसांना बंधनकारक असणारे काही नियमही नीट समजावले जातात जसे मारहाण कराताना ती कमरेखाली असावी मस्तकावर नसावी आदीपुर्ण पदवीअभ्यासक्रमाच्या शेवटी कमीत कमी १५ दिवस कैदेत काढणेही बंधनकारक आहे.या दरम्यान विद्यार्थ्याला रोज १० फटक्यांची शिक्षा भोगावी लागते.(यासाठीची रितसर परवानगी एका परवानगीपत्रावर पालकाची सही घेऊन नोंदणीच्यावेळेसच घेण्याची संस्थेची रीत आहे.)कधी कधी पकडले जाऊ शकते पण ह्यातून निराश होता लावलेल्या आरोपातून सहीसलामत निर्दोष मुक्तता व्हावी ह्यासाठी भारतीय दंडविधान (इंडीयन पिनल कोड) चे प्राथमिक ज्ञानही दिले जाते.पोलिस ठाण्यात कुठल्या कलमाखाली अटक केली जात आहे याचे ज्ञान त्यासाठी लागणा-या योग्य वकीलाचा नंबर पाठ करणेही विद्यार्थ्यास बंधनकारक आहे.त्यासाठी पाठांतराची वेगळी परिक्षा घेतली जाते.तसेच चोरीच्या वस्तूंचा पंचनामा तसेच मुद्देमाल जप्तीच्या वेळी उभे केलेले साक्षीदार त्यांची साक्ष कशा पद्दतीने आपल्या पुढील निर्दोष सुटकेच्या दृष्टीने असावी वेळप्रसंगी करवून घ्यावी याच्या टीपस ही दिल्या जातात.

येथून बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी हा पारंगत चोर (सर्टीफाईड थीफ) असल्यामुळे त्याची निवड शेवटच्या वर्षात असतानाच एखाध्या मोठ्या गॅंग मधे झालेली असते(रोजगाराची हमी अथवा जॉब अश्युरन्स) .-याचदा तर तो काही व्यावसायीक चोरांचा स्वीय सहाय्यक म्हणून काही लाखांच्या पॅकेज वर रूजू होऊन जातो.काहींना डेप्युटेशन वर दूरदेशीचेही प्रबंध मिळतात.त्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे तसेच या व्यवसायातील अत्याधुनिक आयुधांचे तंत्रज्ञाचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.काही जण स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करतात.ज्यांना राजकीय पिढीजात कौटुंबीक व्यवसायाचे पाठबळ आहे असे हे काम अधिक आत्मविश्वासाने सुरू करतात लवकरच नावारूपासही येतात.यातील काही पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही जातात ज्यात वर उल्लेखल्याप्रमाणे बॅंक रॉबरी,दरोडा,चीट फंड स्कॅम्स,पतसंस्था घोटाळे,अपहरण तसेच पुरातनवस्तूंची चोरी तथा तस्करी चा ही समावेश होतो.(तस्करी हा थोडासा मस्करीच्या वळणावर जाणारा शब्द असला तरी तसा जहाल आहे कारण तस्करी चा खरा संस्कृत अर्थ `चोराची बायकोअसाच होतो.त्यामुळे त्यात आपोआप येणारा एक जहालपण आहे.पुरातन वस्तू,मानवी अवयव,प्राणी,सर्प,अमली पदार्थ अशा अनेक गोष्टींची तस्करी केली जाते.पण आपण फक्त पुरातनवस्तूंच्या तस्करीपुरती मर्यादा ठेवली आहे.)

पदव्युत्तर अभ्यासक्रम आपण अशातच सुरू केले असून सध्या आपण अपहरणासाठी अपहरण प्रशिक्षण केन्द्र,बिहार, बॅंक पतसंस्था घोटाळ्यांसाठी सरल पतसंस्था घोटाळा प्रतिष्ठान,पुणे,महाराष्ट्र आणि दरोड्यासाठी फूलन निर्माण केन्द्र,चंबळ,मध्य प्रदेश या अतिशय अनुभवी नामांकीत संस्थांशी संलंग्नता घेतलेली आहे.यातील `विमान अपहरणहा अपहरणप्रकार मात्र देशद्रोहाशी संबंधीत असल्याने तो अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे.त्यासाठी ऐअरवेज हायजॅक कन्सलटन्ट्स ,कंदाहर येथून आपल्याकडे बराच तगादा आहे मात्र आपण आपला पवित्रा आजतरी बदललेला नाही.

चोरी हा एक मान्यताप्राप्त व्यवसाय म्हणून सरकारने घोषीत करावा ह्या साठी संस्थेने वेळोवेळी आपली ठाम भूमीका सरकारला कळवलेली आहे.चोरी ही एक शास्त्रीय कला असून यात अनेक तांत्रीक वैज्ञानीक बाबींचा विचार करावा लागतो.त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतनाचा शासकीय अभियांत्रीकीचा दर्जा ह्या संस्थेस मिळून त्यात डीप्लोमा इन थेफ्ट इंजीनियरींग तसेच बॅचलर ऑफ थेफ्ट टेक्नोलोजी असे अभ्यासक्रम राबविण्यास शासकीय अनुदान मिळावे या साठीही संस्था प्रयत्नशील आहे.किंबहुना संस्थेच्या माजी विद्यार्थ्याकडेच शिक्षण खाते आल्यास सगळेच प्रश्न सुटतील या दृष्टीनेही आखणी सुरू आहे.

येथून बाहेर पडणारा प्रत्येक चोर एक आदर्शवादी,शिस्तप्रिय रॉबीन हूड सारखा समाजप्रिय असावा हे आमचे ध्येय आहे.चोरीला कुकर्म समजता निव्वळ एका व्यक्तीकडे जास्त झालेला पैसा दुस-या व्यक्तीपर्यंत पोहोचवणारे समाजहिताचे कार्य समजावे हे करण्याचे पुण्य करण्या-या चोराला एक साम्यवादी देवदूताचा दर्जा मिळावा हाच ह्या संस्थेचा उद्देश.

आपल्या सगळ्यांचे सहकार्य आशिर्वाद एका अतिप्राचीन मान्यताप्राप्त कलेच्या संवर्धन कार्यात राहतीलच ही आशा बाळगतो. *अखिल भारतीय चोरनिर्माण निवासी महाविद्यालया*च्या वतीने हा एक वारसा जपण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न.


सदरील विचार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच एक निष्णात चोर यांचे असून अनेक धाडसी चो-या,दरोडे यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे.अनेक वेळेस अटक होऊनही पुराव्याअभवी त्यांची सुटका झाली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमधे त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.येणा-या काळात ते देशाच्या राजकीय समीकरणातही महत्वाची भूमीका बजावतील याची सर्वांना खात्री आहे.