Friday, May 17, 2013

मी,ही,तो व ते (भाग-४)


 या कथेतील `मी’ व `ही’ म्हणजे मी व आमच्या सौभाग्यवती,`तो’ म्हणजे आमच्या `ही’ ला झालेला किडनी स्टोन व `ते’ म्हणजे आम्ही त्या स्टोनवर केलेले विवीधांगी ईलाज आहेत.
मी,ही,तो व ते (भाग-४)
विशेष सूचनाः
१.      आमच्या अनेक मित्रांचे व वाचकांचे दोन भागात खूप मोठा गॅप राहत असून तो इतका ठेऊ नये असे सल्ले आले आहेत.आम्ही त्याबद्द्ल दिलगीरी व्यक्त करतो.प्रयत्न करू नक्कीच एवढेच सध्याला सांगू शकतो.
२.      `ही कथा खरी का कल्पनेतली’ असे खोचक प्रश्न काहींनी विचारले आहेत यावर मी `आम खाने से मतलब रखो पेड क्यू गिनते हो’ असा `बॉलीवूडी'क सल्ला देत आहे.

आता पुढे वाचा…

रामदेवबाबांच्या त्या औषधात शुद्ध हिंदी मध्ये लिहीलेले अनेक नाविन्यपुर्ण नावे होती.त्यात टमाटर,बैंगन,तली हुई चिजे न खाना असा स्पष्ट आदेश होता.आणी `तली हुई चिजे’ म्हणजे काय हे  कदाचीत आमच्यासारख्या हिंदीच्या बाबतीत मागासभागातल्या लोकांना समजणार नाही म्हणून पुढे `फ्राईड फूड’ असा अर्थदेखील लिहीलेला होता.सौ नी ह्या तळलेल्या वस्तू न खाण्याचा दिलेला सल्ला बिनचूक पाळत सोबत `तली हुई चिजे घरमे किसीको भी न खिलाना’ असा सोयीस्कर विस्तारीत केला व घरातले सगळे तळण बंद झाले.तळकट चमचमीत मधून मधून खाण्याची चव लागलेल्या माझ्यासारख्याला मग जाता येता पाण्यासोबत थोडे तेल टाकून प्यावे की काय अशा भावना होऊ लागल्या.रामदेव बाबांनी दिलेल्या औषधांची नावेही अतिशय क्लिष्ट होती.जसे `वृक्क अश्मरी’ अर्थात किडनी स्टोन घालविण्यासाठी त्यांनी श्वेतप्रवटी,यवक्षार,जवाक्षार,पाषाण वेद,वरूण छाल,चंद्रप्रभावटी असल्या भयंकर नावांच्या औषधाची यादी युद्धात बॉम्ब फेकावेत तशी भिरकावलेली वाटत होती. पुढे लिहीलेले `पुनर्नवामुल’ नावाचे औषध मला पुढील अपत्याच्या जन्मासाठी उपयोगी असावे असे वाटून मी तसे सौ.ना `अजून नको आधी हा स्टोन जाऊ दे’ असली संवादफेक करत पुढची पंधरा मिनीटे अनेक सुविचार कानी पडायची सोय करून घेतली.  त्यातल्या त्यात `गोक्षुरादी गुग्गुल’ ह्या औषधाचे नाव मात्र मला कुठेतरी त्या `गुग्गल’ शब्दामुळे थोडे माणसाळलेले वाटले.मला तर असे वाटून गेले की रामदेवबाबांच्या औषोधोपचाराला यश मिळत असेल तर त्याचे सगळ्यात मोठे रहस्य त्या औषधींच्या नावात आहे.ही असली भितीदायक नावे पाहूनच रोग मागच्या दाराने हळूच सटकत असतील.

त्यांच्या त्या `पत्थरचट्टा’च्या पानांचा शोध घेण्यासाठी आम्ही भाजीमंडी,गुलमंडी,अब्दीमंडी या `मंडयां’पासून पासून ते किराडपुरा,उस्मानपुरा,औरंगपुरा,जयसिंगपुरा,भावसिंगपु-या पर्यंत सगळे `पुरे’ही पालथे घातले.पैठणगेट,रोशनगेट,भडकलगेट,दिल्लीगेट,मकईगेट,कटकटगेट असले सारे औरंगाबादचे दरवाजेही आम्ही ठोठावले तरी तो पत्थरचट्टा काही सापडेना.आम्ही दिल्लीगेट परीसरात पत्थरचट्टा एकाला विचारला असता जवळच असलेल्या शासकीय महाविद्यालयाच्या आवारात तो बदमाश पत्थरचट्टा शेवटचा पाहिल्या गेल्याची गुप्त बातमी त्या खब-याकडून मिळाली मग लगेच आम्ही घटनास्थळी धाव घेतली.आणी एखाद्या रहस्यकथेत जसे संशयीताचा सुगावा लागताच त्याला पकडायला गेलेल्या पोलीसांना त्याआधीच त्याचाही खून झालेला सापडतो त्याप्रमाणे आम्ही तेथे पोहोचल्यावर आम्हाला गेटवरच्या वॉचमनने कालच सर्व झाडे काढून टाकल्याचा घक्कादायक निरोप दिला.शेवटी अथक प्रयत्नांनंतर व संशोधनानंतर पत्थरचट्टा नावाचे हे एक दुर्मीळ वाटणारे झाड आम्हाला आमच्याच परसात `पानफुटी’ असे छुपे मराठी नाव धारण करून वेडेवाकडे वाढलेले सापडले.ते सापडताच मी प्रेमाने,उत्साहाने,अत्यानंदाने,हर्षोल्हासाने व दिर्घ निःश्वासाने त्याला अलिंगन दिले व हळूच १०-२० पाने पटापटा तोडून घेऊन सौभाग्यवतींच्या नाश्त्याची सोय केली.शेवटी आपलेच संकटात कामाला येतात हेच खरे…

रामदेवबाबांनी सांगीतलेल्या कपालभाती,प्राणायाम योगोपचारांची प्रचंड आदराने भल्या पहाटे उठून साधना सुरू झाली.एका नाकपुडीतून हवा आत घेऊन ती दुसरी कडून काहीही प्रक्रीया न करता सोडून देणे म्हणजे नाकासारख्या प्रचंड रुपवान व कामसू अवयवाला निव्व्ळ आळशी बनविण्यासारखे मला वाटले.कपालभाती पाहताना मला प्रथम तर सौ.ना ह्रदयविकाराचा झटका वा फिटस आले आहेत असे वाटून (अत्यानंदाने पण काळजीपोटी) त्यांना दिलेल्या हाकेला त्यांनी फक्त डोळे मोठाले उघडून दिलेल्या प्रतिसादाने हा फक्त प्राणायामाचा एक प्रकार असल्याचे लक्षात आले (व माझ्या आनंदावर विरजण पडले).

रामदेवबाबांनी दिलेला हा तीन महिन्याचा कार्यक्रम अतिशय श्रद्धेने व भक्तिभावाने सौभाग्यवतींनी पुर्ण केला.शेवटच्या दिवशी तर मला वाटतं तिने तीन महिन्यात एखादा डोस राहिला असेल असे मानून चुक भुल देणे घेणे म्हणत ७-८ पत्थर चट्टयाची पाने तशीच अतिरिक्त मटकावली व कपालभाती करताना १०-१२ वेळेस हृदयाचे भाते अतिरीक्त हलवून घेतले.आता चेंडू रामदेवबाबांच्या कोर्टात होता.त्यांनी दिलेला प्रत्येक व्यायामप्रकार,काढा,पाने,फुले,फळे,वनस्पती आम्ही त्या धन्वंतरीची आराधना करत मनोभावे पुर्ण केली होती.लगेच सोनोग्राफी केंद्रात नंबर लावला.सोनोग्राफी झाली व तीन वेळेस अपक्ष म्हणून निवडणूक हरणा-या पुढा-याने शेवटी सत्ताधारी पक्षाकडून तिकीट मिळवावे व त्यातही त्याचे डिपॉझीट जप्त झाल्यावर जसा त्याचा चेहेरा होईल त्याहीपेक्षा पडका चेहेरा घेऊन मी,ही व तो (खडा) सोनोग्राफी सेंटर बाहेर पडलो.मी लग्नाचा वाढदिवस विसरल्यावही आमच्या हि चा चेहेरा इतका लाल होत नाही.चुकून रामदेवबाबा आमच्या औरंगाबादेत असले असते तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन `क्या क्या नही किया हमने तुम्हारे कहनेपर…लेकीन तुमने…तुमने हमारे अरमानोंका गला घोट दिया है बाबा….’ असले डायलॉग्ज मारून आमचे मन मोकळे करू शकलो असतो.पण शेवटी त्यांचा इलाज हजारो लोकांना उपयोगीही पडला आहे हे तितकेच खरे.ठीक आहे,नव्हते आमच्या नशिबात इतकेच..म्हणतात ना `वक्त से पहले और जरुरत से ज्यादा किसीको कुछ नही मिलता…’

दिवस पटापट पुढे सरकत होते.मागच्या वेळेस डॉक्टर महालेंना आम्ही एच.बी.वाढला की लगेच येतो असे सांगून आलो होतो.त्यानंतर जवळपास चार महिने पुढे लोटले होते.आता पुन्हा त्यांच्या दरबारात कुठल्या तोंडाने जावे ह्याचा विचार करत आम्ही त्यांच्या रस्त्याला लागलो.त्यांच्या दाराशी पोहोचताच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे बाहेर असणारा चपला बुटांचा खच आज अचानक गायब होता.`डॉक्टर साहेबांनी आज सगळ्यांना अनवाणी इथवर येण्याचे प्रिस्क्रीप्शन दिले की काय?’ हा मी मारलेला विनोद नेहेमीप्रमाणे सौ ने दारात आलेल्या सेल्समनला झिडकारावे त्याप्रमाणे हाताची `बोर नका करू हो’ अशी हालचाल करत झिडकारला.व यानंतर `अय्या डॉक्टर बंद पडले वाटतं..?’ असा सुविचार तिने `अय्या कुलर बंद पडले वाटतं..?’ असे म्हणावे इतक्या सहजतेने उच्चारला व माझ्याकडे प्रतिक्रियेसाठी बघू लागली.आता या विनोदाला हसावे का नाही हा चेंडू माझ्या कोर्टात अचानक आल्याने मग मी ही प्रचंड आत्मशक्ती एकवटून `फालतू बडबड करू नकोस’ असा त्याला टोला मारत आज संध्याकाळच्या जेवणात चुकून जास्त पडू शकणारे मीठ पाडू देऊ नकोस ही प्रार्थना भगवंताकडे मनोमन केली.बायकोवर शेरास सव्वाशेर होण्याचा हा एक दुर्मीळ क्षण आज तुमच्यासोबत ह्याच जन्मात शेअर करू शकलो ह्या अतिव अभिमानाने आज माझे उर भरून आले आहे.

हॉस्पिटल मध्ये आतही ब-यापैकी शांतता होती.थोडासा बिचकतच मी रिसेप्शन ला आलो.त्या ठिकाणी तीन चार नर्सेस व रिसेप्शनीस्ट यांची एक गोलमेज परिषद भरलेली होती.त्यांच्या चेहे-यावर अतिशय तणावरहीत भाव होते.मधूनच त्या एकेमेकींना टाळ्या देत खिदळत होत्या.मला क्षणभर कॉलेज कॅंटीनमध्ये आल्यासारखे वाटले.`डॉक्टर साहेब नाहीयेत का आज?’ मी उदगारलो.त्यावर अतिशय निरीच्छेने त्यातील एक बाई उठून आली व तिने डॉक्टर अमेरीकेत कुठल्याश्या परिषदे ला गेले असून आजून १० दिवसांनी येणार असल्याचे सांगितले.तसे त्यांनी वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन दिले असल्याचेही तिने सांगितले.
आता `फुटकं फुटकं म्हणतात ते हेच का?’ अशा आमच्य नशिबाला शिव्या देत आम्ही तिघे पुन्हा घरी परत आलो.(ह्या वेळेस तिघे कोण हे मी तुम्हाला पुन्हा सांगायची गरज पडत असेल तर आधी पुर्वीचे तीन भाग वाचावेत मग ह्या भागाला हात घालावा.)

क्रमशः लवकरच…