Friday, January 18, 2013

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -१४ (निरोपाचा भाग)

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -१४ (निरोपाचा भाग)

विशेष सूचनाः

१.आज समारोपाचा भाग असल्याने कुठलीही सुचना नाही हे लक्षात घावे उगाचच दिवाळीच्या शुभेच्छा व इतर सुचना असलेले पान राहून गेल्याचा व्रात्य निरोप पाठवू नयेत.

आता पुढे..

दिवाळीचा भरगच्च फराळ रिचवून व एक शेवटची चकली तोंडात टाकत येणारा कुरूम कुरूम आवाजाने प्रोत्साहीत होऊन हा शेवटचा भाग लिहीण्यास घेत आहे.(बायकोच्या हातच्या वातड चकल्याही पाडव्याच्या दिवशी कुरुम कुरुम वाटून घ्यावेत हा एक अलिखीत नियम आहे व हीच तर आपली संस्कृती आहे नाही का?)

माझे भाषण झाल्यावर मग जणू स्टेजवर येण्या-यांमध्ये चढाओढ लागली.प्रथम अशिष जरिवाला जे मुद्दाम दुबईवरून या कार्यक्रमासाठी आलेले होते त्यांनी सर्वांना पुढचा रियुनियनचा कार्यक्रम दुबईत घ्यावा असे आवाहन केले व त्याच बरोबर तो कार्यक्रम ते स्वतः प्रायोजीत (स्पॉन्सर) करतील अशी घोषणा त्यांनी केली.याला मात्र सर्वांनी अगदी मनःपुर्वक टाळ्या दिल्या.अनेकांनी बाहेरच्या देशात जायची चर्चा सुरू आहे हे लक्षात आल्यावर लगेच तेथूनच आपला पासपोर्ट काढायला घेण्याची सुचना आपल्या ट्रॅव्हल एजंट ला केली.दुबईत प्रसिद्ध असणा-या सोन्याच्या बाजारपेठेमुळे जर तेथे रियुनीयन झालीच तर ति ही ह्या वेळेसारखीच सर्व कुटूंबासाठी नसावी व तशी ठेवल्यास तेथील बाजारहाटीचे बिलही अशिषने स्पॉंन्सर करावे अशी कुजबूजही कानावर आली.माझ्या मनात मात्र निराळेच विचार चालू होते.मला औरंगाबादहून येताना स्वर्गरथात बसण्याचा आनंद देणा-या निलेशला वर विमानातूनच खाली ढकलण्याची स्वप्न मला उघड्या डोळ्यांनी पडायला लागली.त्यासोबतच वरून विमानातून दिसणा-या ढगरूपी कापसाला तोडून त्याच्याच वाती वाळून त्या घरी दिवाळीला पणतीत टाकायला कामी येतील अशीही एक विनोदी अतिशयोक्ती मनात आली.

मुन्शी राठींनी आपल्या खुमासदार किस्सा कथनामुळे (इतरांना आपाआपले) पोट धरून हसवले.मराठी ची त्यांनी केलेला संधीविग्रह `मर-राठी’ भरपूर टाळ्या देउन गेला.शाळेच्या त्या पोस्टर कडे बघून त्यांनी तो कचोरीवाला जेथे बसायचा त्या जागेकडे बोट दाखवत काही काल्पनीक कचो-या उभ्या उभ्याच मनातल्या मनात रिचवल्याचे त्यांची देहबोली सांगत होती.त्यांच्या शरीराचा मनोरा भाषण देतांना इतका जास्त झुकल्यासारखा वाटत होता की त्यामुळे पालीकेची जुन्या संभाव्य धोकादायक इमारतीची नोटीस लवकरच त्यांना डकवण्यात येईल असे वाटते.

त्यांच्या त्यानंतर आलेल्या शेखर सोळुंक्यांनी मोजक्या शब्दात त्यांना शाळेचे कुंपण मोठे,कुलूप लावलेले नसल्याने मधल्या सुट्टीत पळून जाण्याच्या सोयीमुळे शाळा कशी आवडत होती हे मोठया भक्तीभावाने सांगतानाच शाळेच्या अनेक गुरुवर्यांचा आदरपुर्वक उल्लेख केला.त्यांनी काढलेल्या `आमच्या वर्गातच मुली असल्याने वर्गात आचारसंहिता कायम असायची’ हे वाक्य मला स्वतःला ऐकताना खूप छान वाटले.जसे आचारसंहीतेच्या काळात मंत्र्यांच्या गाडीवरील दिवे काढून टाकण्याचा नियम आहे त्याप्रमाणे दहावी फ च्या विद्यार्थ्यांचे त्या काळात अभ्यासात (इतर काही तुकड्यांचा तुलनेत) दिवे का लागले नव्हते याचे कारण मला आत्ता समजले.(आचारसंहितेमुळे ते काढून टाकलेले होते.)

महेश फडणीसने त्याचे काका असणा-या फडणीस सरांच्या सलग ३६ वर्ष विदाऊट लिव्ह सर्वीस च्या रेकॉर्ड चा उल्लेख केला आणी खरोखरच आश्चर्य व कौतुक वाटले.आता नविन पिढीत कामावरील माणसांची महिन्यात एकही सुटी नसेल तर त्याला कामाची खुपच गरज आहे असे समजून मालक त्यांना हलक्या दर्जाची कामे सांगतात म्हणे.आणी त्यामुळे आजची पिढी महिन्यातून किमान ३ सुट्ट्या मारून आपली गरज मालकाला पटवून देतात हे समजते. गुरुवर्यांच्या कपड्यांवर आपण शाई शिंपडून त्यांना रंगवत होतो हे सांगताना महेश चे उर अभिमानाने भरुन आले होते.महेश अरगडेनेही त्याला प्रिया सुपारी खाल्ली म्हणून तोंडात तंबाखू पान ठेवून रागावणा-या सरांचा किस्सा सांगून आपला जुना राग `थुंकून’ टाकला.

रणजित देशमुखांनीही मित्रांच्या पार्श्वभागाखाली बसताना कर्कटक ठेवण्याची एक प्राचीन लोककला कशी लोप पावत चालली आहे या विषयी खेद व्यक्त केला.त्या कलाप्रकारामधल्या अपु-या सरावामुळे घडलेल्या एका अपघाताचेही त्याने उदाहरण दिले.त्या काळी आपण कसे नाटकं करत होते हे सांगतानाच त्याने महेन्द्र ठोंबरे सोबत एकाने दुस-याचे खांद्यावर चढून केलेल्या चेटकीणीच्या नृत्याचा उल्लेख केला.(त्यांच्या या चेटेकीणीला घाबरून शेवटी त्यांचे सहकारी बेंचमित्र आनंद साकळे लड्डाखला सैन्यात तर शरद कल्याणी अमेरिकेत पळून गेल्याचे त्यांच्याच भाषणातून समजले.) मधल्या सुट्टीत पळून जाण्याची विचीत्र वाटत असली तरी आवश्यक प्रतिभा आजच्या विद्यार्थाने टिकवून ठेवणे कसे आवश्यक आहे हे पटवून दिले.सरस्वती भुवन मध्ये एक सुरक्षीत वातावरणामुळे व इको सिस्टीम मुळे आज इथवर आल्याचे त्याने प्रांजळपणे कबूल केले.(त्याच इको सिस्टीमच्या सवयीमुळे दुस-याने आपल्याला हासडलेली शिवी दहा वेगवेगळ्या शिव्यांच्या माध्यमातून साभार परत करण्याचे प्राविण्य समस्त स.भु.बांधवांकडे आले आहे.)

योगेश भारतीयाने इंग्लीश कॉन्वेन्ट शाळेतून सरस्वती भुवन मध्ये आल्यावर झालेल्या हालापेष्ठांचे वर्णन केले.मराठीचा कुठलाही गंध नसताना तेथे आल्यावर शिकाव्या लागलेल्या `राजा स जी महाली सौख्ये कधी मिळाली’ सारख्या कवीतांमुळे मराठीत मिळालेल्या ९ मार्कांना सरांकडून ११ कश्या खुबीने करून घटक चाचणीत पासांतर केले याचेही वर्णन केले.त्यावेळी मी दहावीत मराठीतले मार्क्स कमी वाटून रिकाऊंटींग ला टाकलेल्या उत्तरपत्रींकांना बोर्डाचे छापील `गुणांमध्ये कुठलीही वाढ झाली नाही’ चे आलेले उत्तर आठवले.त्यातील पुर्ण मजकूर छापील पाहून माझी कुठलीही फेरतपासणी न करताच मला उत्तर पाठवण्यात आले आहे ही भावना अजूनही कधी कधी मनाला खट्टू करून जाते.त्यानंतर मी अभ्यास करूनही कमीच मार्क मिळणार असतील तर ते अभ्यास न करताच मिळवलेले काय वाईट असा एक `अभ्यासू’ विचार करून पुढे आरामात इंजिनियर झालो.

प्रफुल्ल बल्लाळांनी एका अतिशय वैशिष्ट्यपुर्ण शैलीत आपले आजच्या शाळांचे अनुभव सांगितले.त्या च्या मुलाच्या शाळेचे अनुभव सांगताना ` त्याची डायरी नाही वाचलीत का?’ ह्या मुलाच्या वर्गशिक्षीकेने प्रफुल्लला विचारलेल्या प्रश्नाला त्याने दिलेले `तो डायरी लिहीत नाही’ हे दिलेले उत्तर खुप टाळ्या देऊन गेले.

त्यानंतर मकरंद कुलकर्णींनी केलेले अतिशय वेधक पद्धतीचे विशीष्ट शैलीत केलेले भाषण मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेले.त्यांच्या वक्तृत्वात एक वेगळाच मिश्कीलपणा दिसला.त्यांनी आजही पाठ असणारे आर्किमिडीजचे तत्व ज्या वेळेस सांगितले ते ऐकताना मनात त्या काळात आर्किमिडीज,न्यूटन,पायथागोरस (या पायथागोरसपंतांचा जन्म गोरज मुहूर्तावर झाला आहे असा एक अतिशय साधारण विनोद करून मी त्या काळी `गोरस’ या त्याच्या आडनावावर कोटी करायचा केविलवाणा प्रयत्न करीत असे.थोडक्यात काय समोरचा हसो वा न हसो आपण आपले बाष्कळ विनोद जाहीरपणे मांडणे ही सवय जुनीच बरं का..’) यांचे शोध व त्यांनी ते आपल्यापुरते मर्यादीत न ठेवता समस्त जगातल्या पाठ्यपुस्तकात छापायचा केलेला आगाऊपणा याच्याविषयी असणारी प्रचंड मोठी खदखद मी टेबलावर रॅंप वॉक करणा-या एका डासाला माझ्या पंजाचा आघात करून बाहेर काढली.त्यावेळी आलेल्या धप्प अश्या आवाजाने आमच्या शेजारी बसलेल्या व छायाचित्रणात व्यग्र असणा-या सचिन काळेंचा कॅमेरा हलून त्यांचे लक्ष १० वी ड च्या खिडकी बाहेर शारदा मंदीर कडे बघताना व्हावे त्याप्रमाणे विचलीत झाले.संसदेमध्ये बेंच बडवून प्रशंसा व्यक्त करायची पद्दत कशी सुरू झाली याचा उगम अशाच डास,माश्या आदीक मंडळींच्या उच्छादात आहे हे सहज लक्षात येईल.(अर्थात माश्यांच्या संख्येपेक्षाही त्या मारणा-यांची संख्या वाढल्याने मग कालांतराने एकेमेकांना बडवायचा आधुनिक बदल आपल्या राजकारण्यांनी केला तो भाग प्रशंसनिय आहे.)

त्यानंतर पराग केंद्रेकर,प्राची रत्नपारखी,स्वाती बुग्धे,आनंद कुलकर्णी व इतर काहींनी आपआपले विचार मांडले.मधेच हर्षल ने आमच्या नावाचा उल्लेख करत `याला नुसतेच मुलांचेच नाही तर त्यांच्या वडीलांच्या नावासकट पुर्ण नावे पाठ आहेत अशी जाहीर घोषणा केली.मग खास लोकाग्रहास्तव आम्ही पुन्हा स्टेजवर गेलो.मग तेथे आमची एक तोंडी परिक्षा घेण्यात आली.त्या परिक्षेत आम्ही पहिल्या नंबरात उत्तीर्ण होऊन १० वी ड ची `एकही मेरीट मधे न येण्याची’ उणीव भरून काढली.

बाकीचे काही भाषणे चालू असतानाच मला काही अपरिहार्य कारणामुळे औरंगाबादेस वापस कूच करण्याचा एसएमएस खलिता मोबाईल यंत्राद्वारे आला होता.त्यानुसार आम्ही परतीच्या प्रवासासाठी शिदोरी व घोडा (वाहन) याचा बंदोबस्त करण्याचा मनसुबा रचून पुन्हा स्वर्गरथाचे सारथी निलेश यांना शब्द टाकला.तेही एका पायावर (त्यांना दोनच पाय आहेत हा एक विलक्षण गौप्यस्फोट या निमीत्ताने करत आहे)तयार झाले.आमची ही चाललेली कुजबूज शेजारणीने सासू सुनेचे चाललेली धुसफूस दाराला कान लावून ऐकावी व परस्पर २०० मैल लांब त्यांच्या आत्येसासूला कळवावी त्याप्रमाणे मकरंद ने ती सगळी कडे जाहीर केली.दरम्यान त्यानेही सोबत येण्याचा त्याचा छुपा मनसुबा जाहीरपणे सांगितला.मग आम्ही तिघांनी आमचा हा बेत येताना आमच्या सोबत निघालेल्या अजय काळेला कळवला.त्याने आमचे मन वळवायचा बराच प्रयत्न केला पण मला सकाळपर्यंत तेथे पोहोचणे गरजेचे असल्याने मी तो साभार नाकारला.अजय च्या आग्रहाला मकरंद जवळजवळ बधला होता पण रात्री लोणावळ्यात थांबून त्याला शुद्धीतली सोबत न मिळण्याच्या भितीने त्याने अखेर साश्रुनयनांनी अजय ला नकार दिला व आमच्या सोबत येण्याची तयारी सुरू केली.

दरम्यान आमचा बेत ब-याच जणांना समजला होता पण मला जाणे आवश्यक असल्याने शेवटी मग वळे,मिरजकर,रायबागकर,अजय काळे,कुलूवाल,मिहीर,चुडीवाल आम्हाला पोहोचवायला गाडीपर्यंत आले.पण का कोण जाणे काहीतरी सारखं राहिलय असे वाटत होते.चारदा खिसे चाचपडून पाहीले (स्वतःचे).मग नंतर वाटलं कॅमेरा बॅग मधे टाकायचा राहीला.म्हणून शेवटी पुन्हा एकदा बॅग तपासली.कॅमेरा जागेवरच होता.तरी पाय निघत नव्हता.मग आत रूम मध्ये गेल्यावर काही राहिलेले दिसेल म्हणून पुन्हा रुम मध्ये गेलो.मग मनात एक खिन्न भाव येण्यास सुरुवात झाली.कोणी मोठमोठ्याने हसत होतं,कोणी टाळ्या देत होतं,कोणी एखाद्याला त्याच्या जुन्या आठवणी काढून चिडवत होतं …मग लक्षात आलं की गेल्या तीन दिवसांपासून रियुनियनच्या निमीत्ताने तयार झालेले हे वातावरण मन मागे सोडायला तयार नव्हते.` ये दिल मॉंगे मोर’ या जाहिरातीला मी पुर्वी हसत असे व म्हणायचो `असे `मोर’ खाणारे मॉंसाहारी दिल नको,मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे.’ पण कदाचित मला माझ्याच त्या वेळेस मारलेल्या त्या पाचकळ विनोदाबद्दल स्वतःची कीव आज वाटत होती. आज खरंच `दिल मॉंगे मोर’ चा अर्थ जाणवत होता.आणी अशीच एक रियुनियन पुन्हा लवकरच करू हे एकमेकांना वचन देत मी पुन्हा एकदा कार पर्यंत आलो. दुरवर विनायक,मुन्शी,मिहीर उभे होते.त्याला ओरडून सांगावेसे वाटले `अबे विन्या,सिगरेट काढ ना यार..ओढ पुन्हा,आता जातोय मी..एकदा बघून घेऊ दे…तुझी धुराची नळकांडी..’ अरे मुन्शी,मिहीर यार खूप विनोद केले यार तुमच्या या हेवीवेट शरीरावर..पण राग नाही आला ना तुम्हाला..?’ सुहास वळे ने आम्ही निघताना ` सांभाळून जा रे…’ हे निलेश कार चालू करत असताना सांगितले. मी निलेशच्या त्याच स्वर्गरथात बसून सुद्धा आता तो कार खूपच व्यवस्थीत चालवेल असे उगचच खात्री वाटली.कार चालू झाली,रिसोर्ट च्या गेट पर्यंत येतांना अनेकांना दुरून हात हलवत अलविदा केले. आणी माझ्या गळ्यातला आवंढा नकळत गिळला गेला.

आभारप्रदर्शनः
मित्रांनो,अशा प्रकारे आमचे हे लोणावळा कथानक आम्ही मजल दरमजल करीत १४ भागांच्या तपश्चर्येनंतर पुर्ण करत आहोत.यानंतर झालेले रात्री च्या डी.जे. चा वृतांत प्रयत्नपुर्वक लिहून पुर्ण करण्याचा विडा आनंदराव वा मनिषरावांनी अथवा इतरही कोणी उचलावा ही मनापासूनची इच्छा.मला खात्री आहे की भाग १ ते भाग १४ पर्यंत बराचसा मजकूर आपण वाचला असेल (व आपल्याला समजला असेल)..यापुर्वी नमूद केल्याप्रमाणे जेव्हा पहिला भाग लिहीला तेव्हा तो विनोदी असावा असे ठरवलेले नव्हते.मात्र लिखाण जसे चालू केले तसे ते थोडे विनोदी अंगाने जात आहे हे लक्षात आल्यावर मात्र त्यानंतरच्या भागात ते प्रयत्नपुर्वक थोडे विनोदी ठेवले आहे.कधी कधी हा प्रयत्न अपुरा पडला कधी तो काही वाचकांना पचला नाही.एका भागात काही शारिरीक व्यंगावरील टिकात्मक विनोदाचा अतिरेक झाल्याची अतिशय तिखट प्रतिक्रिया काही वाचकांकडून आली आहे.याबद्द्ल मी आपल्या सगळ्यांची मनःपुर्वक माफी मागतो.येथे कोणालाही दुखावणे हा उद्देश नव्हता.उलटपक्षी दुर गेलेले आपल्या सर्वांसारखे हे पक्षी पुन्हा एकाच घरट्यात परत येण्याच्या या सोहळ्याला मिश्कील धाटणीत साहित्यरुपाने संग्रहीत करणे व रोजच्या धकाधकीत दमलेल्या तुमच्या आमच्या मनाला काहीतरी हलकेफुलके वाचायला देऊन एकेमेकांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करणे हा होता.
आपल्यापैकी बहुतांश वाचकांचा अभूतपुर्व मिळालेला प्रतिसाद,वेळोवेळी आपण केलेल्या सुचना,दिलेल्या प्रतिक्रिया यामुळे सतत हे लेखन करण्याची प्रेरणा मिळत गेली.दर शुक्रवारी एक भाग लिहायचाच असा कधी नाही इतका शिस्तीत निर्धार ब-याच अंशी पाळू शकलो यात अतिव समाधान मिळाले.प्रत्येक भाग लिहीताना मला आमचे परम मित्र उपेन्द्र नागापूरकर व मकरंद सातारकर यांची आठवण येत राहीली आहे कारण लहानपणापासून कॉलेज संपेस्तोवर जसा वेळ मिळेल तसा एखाद्या कट्ट्यावर यातील ब-याचश्या विनोदांच्या रंगांची उढळण आम्ही एकेमेकांवर करत आलेलो आहे व त्याचा विनोदबुद्धी अधिक बळकट होण्यास निश्चीतच उपयोग झाला आहे.

शेवटी जाता जाता माझ्यासारख्या नवख्या लेखकाला सांभाळून घेतलेत त्याबद्द्ल आपले सर्वांचे आभार, मनिष पाडळकर,सारंग भिडे,शैलेश पत्की,आनंद देशमुख,अमित कुलकर्णी,संभाजी अतकरे या सर्वांचे असा कार्यक्रम आयोजीत केल्याबद्दल आभार व सरतेशेवटी ज्या शाळेने रचलेल्या पायावर आम्ही आज खंबीरपणे उभे आहोत त्या शाळेच्या शिक्षकांपासून ते शिपायांपर्यंत सगळ्यांचे आभार.

समाप्त.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -१३

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -१३

विशेष सूचनाः

१.भाग १ ते १२ वाचा व १३ व्या भागाला हात घाला हे सांगण्याईतके लहान तुम्ही राहिलेले नाही त्यामुळे चुपचाप आधी बारा भाग वाचण्याची साधना करावी व मग इकडे वळावे.

२. हा लेख चालू करण्याच्या पूर्वसंधेला अचानकच निलेशला असले काही लिखाण प्रस्तुत लेखक करीत आहेत व त्यामधे त्यांची सुरुवातीच्या ६ भागांत मुख्य कलाकार (मनिष ने त्याला मुख्य खलनायक असे सांगितले होते) म्हणून वर्णी लागलेली आहे याची माहीती मिळाली.प्रचंड गर्जना करत त्यांनी आदळ आपट करत आमचे पुर्ण भाग मनिषकडून हस्तगत करत ते पुढच्या २० मिनीटांमध्ये एकदम गिळले व काहीही न समजल्याने त्यानी नाईलाजाने खास लोकाग्रहास्तव लिखाण उत्तम असल्याचा आम्हाला फोन केला.निलेश ने स्वतःच्या खर्चाने स्वतःहून केलेला फोन व तेही कोणाचे कौतुक करण्यासाठी ही एक दुर्मीळ घटना असल्याने ती आम्ही आमच्या पुढच्या युगा युगांतल्या पिढ्यांना एक सुवर्णाक्षरांनी लिहावा असा क्षण म्ह्णून नोंद करण्यासाठी मुद्दाम इथे टाकत आहोत.दरम्यान मनिषरावांना अश्या रेडीमेड प्रिंट्स गनिमांना देउन पुढच्या पुस्तक प्रकाशनाच्या वैचारिक बुरुजाला `आधीच वाचल्याने पुस्तक खपणार नाही’ या विचारांचा सुरूंग न लावण्याचा मोलाचा सल्ला देण्यात येत आहे.अजून कोणी प्रिंटस मागितल्यास त्याला फेसबुक अकाऊंट ओपन करण्यास सांगावे अथवा एक काल्पनिक प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रणाची वाट पाहण्यास सांगावे.व आपल्याकडील उर्वरीत प्रती आमच्यासाठी कुरकुरीत केलेल्या व जास्त तेल झालेल्या चकल्यांमधील अतिरिक्त तेल शोषण्यासाठी वापराव्यात.

आता पुढे…

मोठ्या गलक्यामध्ये सगळे आपाआपल्या जागेवर विराजमान झाले.यावेळेस मात्र कोणीही उंचीप्रमाणे बसलेले नव्हते.बसायची व्यवस्था साधारणतः प्रत्येक गोलाकार टेबलाभोवती चार-पाच गोल फिरणा-या व पाठीने दाबल्यास हलकासा `कर र कुई’ आवाज करून मागे रेलणा-या खुर्च्या टाकून केलेली होती.व सगळ्यात मागे स्वतंत्र एक लांब सोफा टाकलेला होता.शेळके,आशुतोष पटवर्धन,लांबे,ठाकूर,मकरंद कुलकर्णी यांनी पटापट मागच्या बॅकबेंच च्या जागा पटकावल्या.निंबाळकर,जहागिरदार व इतर वळे,रणजीत देशमुख हे छ्यायाचित्रणामुळे त्या मागच्या जागांशी कोपरापाणी खेळ खेळत होते.मकरंद च्या शारीरिक उंचीचा विचार करता त्याला मागून काय दिसत होते हा मात्र विशेष संशोधनाचा भाग आहे. पण भाषणांचा सारांश भाषण न ऐकताही छापण्याची त्याची बौद्धीक उंची लक्षात घेऊन तेथे जे काय चालू आहे ते तो बॅकबेंच च काय पण तेथे असलेल्या त्या गोल टेबलांवरच्या पायघोळ पांढ-या टेबलक्लॉथ मध्ये लपूनही त्याने ग्रहण केले असते हे नक्की.

सुरुवातीला हर्षल ने अतिशय सुंदर मोजक्या शब्दांमध्ये कार्यक्रमाची सुरूवात केली.यामध्ये एकमेकांचा परिचय हा एक महत्वाचा कार्यक्रम होता.वास्तविक प्रत्येक जण हा एकमेकांना चेहे-याने त्या काळात ओळखत होताच पण २३ वर्षांच्या या प्रदिर्घ प्रवासानंतर अनेक चेह-यात,आकारात,रंगात,ढंगात झालेल्या बदलांमुळे हा कार्यक्रम आवश्यक होताच.हा बदल काहींच्या बाबतीत कमी होता पण काही मित्रांमध्ये अतिप्रचंड झालेला होता.परिचयाची सुरूवात हर्षल ने मुन्शी राठी याला करायला लावली.मुन्शी खुर्चीवरून वर उठला व हातात माईक घेत त्याने स्वतःचा परिचय करून दिला.तो खुर्चीवरून उठला तेव्हा मी त्याच्या मागच्या सीट वर होतो(त्याच्या म्हणजे मी माझ्याच सीटवर होतो पण मागच्या बाजूस होतो).इतके प्रचंड मोठ्या वस्तुमानाने त्या खुर्चीवरील फोम इतका खाली दबला होता की आता त्याचा परिचय देऊन झाल्यावर तो पुन्हा आपल्यावर बसणार आहे हा विचार करून फोमने परत वर यायचा निर्णय ऐन वेळेस रद्द करून पुन्हा मुन्शी बसायची वाट बघत दबून थांबणे प्रेफर केले होते.मुन्शी त्या खुर्चीतून उठला खरा पण तो पुन्हा मावेल का या प्रचंड उत्सुकतेने मी खाली वाकून दोन्ही आकार एकेमेकात कशे मावतील याचा अंदाज घेतला व प्रथमच कपात बशी कशी ठोसून ठोसून आत जाउन बसते हा चमत्कार पाहीला.

दरम्यान मुन्शी राठी आपल्या पानपराग(वा तत्सम) च्या डब्ब्यात चमचा घालून मधून मधून चमचाभर पान मसाला मोठ्या चविने तोंडात टाकत होते.ब-याच वेळ योगेश जहागिरदार त्यांच्याकडे एकटक पाहत त्यांच्या प्रत्येक तोंडात जाणा-या चमच्याचा थ्रो चा स्वतःला झेल पकडावा लागणार आहे या थाटात शॉर्ट लेगला उभे राहून लक्ष केंद्रीत करावे त्याप्रमाणे एकाग्र होत होता.अखेर दोन चार झेल योगेश कडे न येता मुन्शीने स्वतःच्या तोंडात टाकल्याने न राहवून योगेश ने अतिशय धिटाई दाखवत एखाद झेल त्याच्याकडेही टाकायचे आवाहन मुन्शीला केले.त्यावर अतिशय कडवट चेहेरा करून मुन्शीने मी तंबाखू मिश्रित पान मसाला खात असून ते तुला पचणार नाही अशा आशयाचे बोधप्रवचन योगेश ला केले.आपल्या कर्तुत्वाचा हा जाहीर अपमान वाटून योगेशने त्याला स्वतःच्या आजपर्यंतच्या याबाबतीतील अनुभवाचा पाढा वाचला व शेवटी अतिशय धेर्याने एक मोठा घास ग्रहण केला व नंतर दोन पानटप-या शेजारी शेजारी बसून सुगंध टाकू लागल्या.

एकामागे एक परिचय सुरु झाले.सुहास वळे यांनी आपल्या कामाचा परिचय करताना ` नॉन आय टी जॉब इन आय टी इंडस्ट्री’ असा केला व माझ्या मनातही स्वतः विषयी नेहेमी वाटणारे ` द मोस्ट नॉन प्रोफेशनल पर्सन रनींग अ प्रोफेशनल इंडस्ट्री’ असे विचारांचे शब्दांकन झाले.अनेकांनी आपला परिचय देताना `एकच बायको आहे’ असा केला व मला तसे न करणा-यांच्या घरी ३-४ बायका १२-१३ मुले,मोठमोठ्याने आरडाओरडा,मुलांचे किंचाळणे,बाया एकेमेकींच्या झिंज्या ओढत आहेत,मुले एकेमेकांच्या उरावर बसवून `गंगनम;नृत्य करीत आहेत,नवरा गाडीत सर्वांना बसवता बसवता घामेघूम झाला आहे.एका दरवाजातून दोन मुले आत कोंबली तर इतर दोन दुस-या दरवाजातून बाहेर पडत आहेत असे भास व्ह्यायला लागले.मी स्वतःचा परिचय करताना माईक हातात घेतला व `मी प्रशांत नानकर’ असे बोलताच मी माझाच आवाज ऐकून दचकलोच.माझी अशी भावना होती की माझा आवाज ब-यापैकी चांगला आहे पण मी बोलताना जे काही तेथील स्पिकरमधून ऐकू येत होते ते भयंकर होते.माझ्या आवाजात रजा मुराद सारखी `खोली’ असल्याची माझी कल्पना प्रत्यक्षात आवाज ऐकल्यावर ती `खोली’ भिंती,दरवाजे,खिडक्यांसोबत खाली पडली व नैराश्याचा मोठा धुराळा उडाला.आपण सामान्य आहोत हे मान्य करणे हे बायकोचा पगार जास्त असल्याचे पुरूषाने चारचौघात कौतुकाने सांगण्याइतकेच अवघड आहे.

माझा परिचय चालू असतानाच तीन कॅमेरे माझ्यावर रोकले गेल्याचे जाणवले.त्यातील दोन तर परिचीत मित्रांचे होते.तिसरा मात्र खुपच बुटका,अर्ध्या चड्डीतला ( म्हणजे फोटो काढणारा,कॅमेरा नव्हे) गुलाबी शर्ट करड्या रंगाची पॅंट घातलेला होता.इतक्या कमी उंचीचा हा छोटा गोड फोटोग्राफर डॉ.स्वाती अहिरे यांचा मुलगा असल्याचे नंतर समजले.आमचेही चिरंजीव सोबत आणले असते तर खालच्या हिरवळीवर क्रिकेटचा चांगला डाव रंगला असता असे काहिसे विचार मनात आले.त्याने आधी सुरुवात त्याच्या उंचीच्या हिशोबाने माझ्या ढेरीवर कॅमेरा रोकून केली.पण बहुतेक त्याच्या कॅमेरात ती मावेना म्हणून नाईलाजाने त्याने माझ्या चेहे-यावर कॅमेरा रोकला.

वेगवेगळ्या मित्रांची नावे पुन्हा स्मरणात आली.ज्यांची अजिबात माहीती नव्हती त्यांचीही नावे माहीती झाली.परिचय झाल्यानंतर एक अतिशय भावस्पर्शी असा कार्यक्रम झाला आणी मला आनंद वाटतो की तो घ्यावा ही माझी विनंतीवजा सूचना आयोजकांनी अतिशय योग्य पद्धतीने अंमलात आणली.तो कार्यक्रम म्ह्णजे जुन्या मित्रांपैकी जे आज या जगात दुर्देवानी नाहीत त्या सगळ्यांना वाहीलेली श्रद्धांजली.योगेश कोठावाला,प्रशांत देवकाते,महेश आठवले यांना श्रद्धांजली वाहताना त्या तिघांविषयी असणारे अनुभव आठवले व नकळत अश्रु तराळले.काय विचीत्र दुर्देवी योगायोग आहे बघा.हे तिघेही खेळाडू होते.योगेश उत्तम बुद्धीबळपटू होता,प्रशांत हा एक अफलातून टेबल टेनिस प्लेयर होता तर महेश एक आदर्श जिमनॅस्ट होता.महेश शेवटी जो मला भेटला तेव्हा त्याने केलेले ह्स्तांदोलन मी अजूनही विसरलेलो नाही.व्यायामाने व जिमनॅस्टीक खेळून कडक झालेल्या त्याच्या हाताशी केलेले ते शेक हॅंड्स शेवटचेच ठरले.आता उगिचच विनोद करायचाच ठरला तर मी ही चांगला क्रिकेट खेळाडू होतो याचा बहुदा देवाला विसर पडला की काय? किंवा त्याच्याकडे स्वर्गात होणा-या ऑलंपिक्स मधेही बहुदा क्रिकेटचा समावेश नसावा.असो.

त्यानंतर शाळेविषयीच्या आठवणींची देवाणघेवाण करण्याआधी हजेरी घेण्यात आली.१३ ९ ६ २५ २ ३८ ही संख्या जिल्हा पंचायत समिती सदस्याने केलेल्या आर्थिक घोटाळ्याची नसून (मी मंत्र्याने केलेल्या आर्थिक घोटाळ्याची असे लिहीलेले खोडले आहे कारण आकडा पाचशे कोटीच्या खाली असल्याने मी मंत्रीपदाचा अपमान करू इच्छीत नाही.हल्ली राज्यमंत्र्याला ५०० कोटी व कॅबीनेट मंत्र्याला १००० कोटी घोटाळ्याच्या टार्गेट दिलेले असते ते साध्य न झाल्यास त्याला रेड कार्ड दाखवून बेंचवर बसवतात म्हणे) तेथे उपस्थित असलेल्या अनुक्रमे अ,ब,क,ड,ई व फ तुकडीतील बालमित्रांची होती.अर्थात ही संख्या कार्यक्रम चालू असताना वाढत गेली.

त्यानंतर ज्यांना बोलायचे असेल,शाळेविषयीच्या आठवणी शेअर करायच्या असतील त्यांना ते समोर स्टेज वर येऊन बोलण्याचे आवाहन करण्यात आले.डोळ्याची पापणी लवते न लवते तोच आनंदरावानी स्टेज कडे कूच केली.चुकून आपला पेशंट बील न देता पळून चालला असे समजल्यावर त्याला ओढून आत आणायची सवय असल्यागत ते स्टेजपर्यंत पोहोचले.त्यांची शाळेवरील कवीता त्यांनी अतिशय व्यावसायिक शैलीमध्ये वाचून दाखवली.प्रथम ते हातावर लिहून आणलेली कविता वाचत आहेत असे वाटले पण नीट पाहिल्यावर ते मोबाईलवरील वाचून दाखवत असल्याचे निदर्शनास आले.कवीता वाचन करताना योग्य ठिकाणी घेतलेले पॉस व आवाजाची चढउतार यामुळे त्यांची ती कवीता अधिकच खुलून निघाली व सगळ्यात महत्वाचे म्हणजे बोलताना उजव्या खांद्यावर जास्त आलेल्या जोरामुळे थोडे उजवीकडे झुकलेले मजबूत शरीर यामुळे पिसाच्या झुकत्या मनो-याची प्रसिद्धीही त्यांच्या वाट्याला आली.

त्यानंतर अस्मादिक उठून पुन्हा कोणाला `आनंद’ व्ह्यायच्या आधी स्टेज कडे सरसावले.का कोण जाणे पण अचानकच मला खूप टाळ्या मिळाल्या.त्या कशासाठी हे मात्र मला सांगता येणार नाही.बहुदा मी असे एकदम उठून लगेच कोणीही आग्रह न करता स्टेज कडे सरसावेल याची कोणालाही अपेक्षा नव्हती.अगदी मला स्वतःलाही.मग मोठ्या धैर्याने मी माझे `छोटेसे’ भाषण वा विचारांचे जाहीर प्रगटन पुढचे अर्ध्या पाउण तास यथेच्छ केले.मला त्या दिवशी भाषण ठोकताना कमालीचे मोकळे वाटत होते.कदाचीत संसाराच्या रहाटगाड्याच्या प्रचंड मोठ्या घरघर आवाजात माझा आवाज गेली ९-१० वर्ष कुठेतरी दबला गेला होता तो आता बाहेर पडत होता.वास्तवीक बोलायच्या आधी किंवा बोलताना कुठलेही पुर्वनियोजन नव्हते कुठलीही तयारी नव्हती व मी काही उत्स्फुर्त वक्तृत्व वालाही नाही पण त्या दिवशी काहीच जड वाटले नाही.एरव्ही बाहेर काय घरात सुद्धा मी इतके बोलत नाही.माझे ` एवढ बोलून मी `दोन शब्द’ संपवतो’ म्हटल्यावर मोठा हशा झाला.निंबाळकरांनी आम्हाला दोन बाट्ल्या पिउन घे असा आग्रहाचा सल्ला दिला.आता दोन बाटल्या एरव्ही मी पाण्याच्यास समजलो असतो पण तो सल्ला निंबाळकरांचा असल्याने शंकेला जागा होती.माझ्या त्या पुर्ण भाषणात आनंद देशमुखांचे,निंबाळकरांचे,महेश फडणीसचे उत्स्फुर्त व यथायोग्य टॉंट्स व इतर बालमित्रांचा मिळालेला प्रतिसाद यामुळे वेगळीच मजा आली.

जाता जाता…

नुकतेच मोहीत पाडळकर भारतात येऊन धडकल्याचा धक्का जाणवला आहे.ते सॅंडीच्या आधीच आल्याने बचावले आहेत.किंबहुना सॅंडी ते जातायेत हे पाहून खवळून त्यांच्या मागे लागल्याचीही वार्ता आहे पण त्यांनी स.भु.चे पाणी प्यायले असल्याने `पळून’ येण्यात ते सफल झाले नसते तरच नवल..

क्रमशः शेवटच्या भागात दिवाळीत….

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -१२

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -१२

विशेष सूचनाः

१.पाहता पाहता या भागांची मालीका १२ भागांपर्यंत मोठ्या हिमतीने पोहोचली आहे.(यावर ` खेचून पोहोचवली आहे’ म्हणा या प्रतिक्रिया आताच आल्यासारख्या वाटत आहेत.) शेवटचा व चौदावा भाग दिवाळीत लिहीण्याचा मानस आहे व ते झाल्यावर या लिखाणाचा वनवास संपेल.वनवास एवढ्यासाठी की रामाला चौदा वर्ष बाहेर पडल्यावर त्याच्यासाठी काय काय वाढून ठेवले आहे हे कदाचीत इश्वरी अंशामुळे जाणीव असेलही पण प्रस्तुत पामर लेखकाला मुळातच हे चौदा भाग होणार आहेत हेच माहीती नव्हते व त्यावर प्रत्येक भागात विनोदी चव ठेवायची आहे याचे नियोजन आधी नव्हते त्यामुळे रामाच्या वनवासातल्या खडतर हालापेष्टांसारख्याच हाल अपेष्ठा अपु-या प्रतिभेमुळे,वेळेमुळे व शब्दभांडारामुळे विनोद निर्माण करताना भोगाव्या लागल्या आहेत.( व पर्यायाने आपणासारख्या वाचकांनाही भोगाव्या लागल्या आहेत).

आता पुढे…

हाती आलेल्या आयस्क्रीम वर यथेच्छ ताव मारून व ते झाल्यावर कोणाचेही लक्ष जाऊ नये अशा कोनात उभे राहून तोंडाच्या वरच्या व खालच्या जबड्याच्या मधला हाड नसलेला जिभरूपी वळवळणारा अवयव बाहेर काढत मी शक्य तेवढा लांब करत त्या आयस्क्रीम कपाच्या तळाशी पोहोचवला व मौत का कुँवा मधील मोटारसायकलस्वाराने त्या लाकडी विहीरीवरून गोल मोटारसायकल फिरवावी त्या प्रमाणे जिभेचा एक सराईत फेरफटका मी त्या कपाच्या गोलाकार भिंतींवरून फिरवला.एका चक्कर मध्ये समधान न झाल्याने मी पटापट तीन चार चकरा मारल्या व आता जिंकायला जग उरले नाही असे सिकंदरासारखे लक्षात आल्यावर मग ओठांवर (स्वतःच्या) एकदा शेवटचा हात जिभेने फिरवत मी मोठ्या जड अंतःकरणाने आयस्क्रीम ला निरोप दिला.जाता जाता पुन्हा फक्त एकच गोळा घ्यावा असे मन मनोमन सांगत होते.पण इतर सोबत असलेल्या अनेक मित्रांची बाहेर फेरफटका मारायला जाण्याची खूप घाई सुरू झालेली असल्याने तो एक आल्हाददायक विचार निर्दयी जगापुढे टाकून द्यावा लागला.

मग काळे,टाकळकर,मकरंद,निलेश व इतर आम्ही काही जण त्या भुर भुर चालू असलेल्या पावसात आजूबाजूचा तो रमणीय परिसर पाहण्यासाठी बाहेर पडलो. गेटमधून बाहेर पडून आम्ही एका टेकडीवर चढण्यासाठी कूच करणार तोच कोणाच्यातरी मोबाईल वर फोटोसेशन साठी परत येण्याचा निरोप आला.फोटो काढायचाय हे समजल्यावर सगळ्यात वेगाने मागे जाणा-यांमध्ये पत्रकार मकरंद कुलकर्णी आघाडीवर होते.आम्ही वापस निघायचा विचार केला तोवर मकरंद गेट पर्यंत पोहोचलेला होता.त्याच्या मानसिकतेचा खोलवर विचार केला असता खरे कारण ओळखणे अवघड नव्हते.सतत कोणाचे न कोणाचे छायाचित्र चांगले चांगले मथळे टाकत वर्तमान पत्रात छापणा-या मकरंद अथवा कुठल्याही पत्रकाराचा शेवटचा फोटो मला वाटतं त्यांच्या लग्नात साल्याकडून कान पिळून घेतांना केलेल्या कडवट तोंडाचा असावा.आता अशा पार्श्वभुमीत इतक्या आग्रहाने कोणी बोलवतय म्हटल्यावर त्याला गहिवरून न आल्यास नवल.आम्ही परत गेटपर्यंत आलो तेव्हा सगळे एकमेकांना फोटो काढण्यासाठी खालच्या बाजूला जाण्याचा आग्रह करत होते.हळू हळू रमत गमत सगळे खाली हिरवळीवर गोळा होऊ लागले.

त्यावेळेस एक उंच व किरकोळ देहयष्टीची वयस्कर व्यक्ती खुर्च्या व माणसं यांची सांख्यीकी जुळवत होती.काही वेळाने सगळी गोळाबेरीज बरोबर आल्याचे समाधान चेहे-यावर ठेवत त्याने सर्वांना आपआपल्या जागा पकडण्यास सांगीतले त्यावरून तोच आम्हाला शूट करणार असल्याचे समजले.उजव्या हातात कॅमेरा,गळ्यात लटकावलेला कॅमे-याचा पट्टा,केसांच्या मानाने खूपच पांढरी असलेली व एका कल्ल्यापासून सुरू होत दोन्ही ओठांभोवती गोल फिरून परत दुस-या कल्ल्यापर्यंत पोहोचलेली कोरीव दाढी,ओठांच्या हे दाढीभोवती झालेले बेटावर पोहोचण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडीया च्या लोगोच्या मध्यात खालच्या बाजूला असतो तसा खालच्या ओठाच्या खालून वर जाणारा रस्ता,चेहे-यावर (सतत)मॅच हरलेल्या अझहरुद्दीनच्या चेहे-यावर टीव्ही चॅनेलच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसायचा तो प्रचंड तणाव,कपाळावर थेट अगदी व्रात्य मुलांच्या वर्गावर बदली शिक्षकाच्या असाव्यात तसल्या आठ्या,आवाजात बाईने नणदेच्या उपद्व्यापी कार्ट्यांना रागवताना असते तशी विचारतली जरब पण आवाजात रुपांतरीत होताना व्यक्त होत असलेला भेदरलेपणा हे सर्व त्या फोटोग्राफर च्या चेहे-यावर लिहिलेले होते.त्याने प्रत्येक वेळेस केलेल्या शांत राहण्याच्या आवाहनाला आम्ही जवळपास त्या काळात शिक्षकांनी केलेल्या शिस्तीच्या आवाहनाला गोंधळ करायचे आव्ह्यान समजून अजून गोंधळ वाढवायचो त्याप्रमाणे प्रतिसाद दिला.`मुलं तर चांगले वाढ झालेले दिसतायेत मग असला पोरकट पणा का?’ ह्या त्याच्या चेहे-यावरील प्रश्नाचे उत्तर `ही २३ वर्षांनी होणा-या मुलांची दहावीच्या वर्गाची रियुनियन आहे’ हे होते.त्या दिवशी प्रत्येक जण जणू आपले शालेय जीवन पुन्हा जगण्याचा प्रयत्न करीत होता.त्यामुळेच मुलं नुसताच त्या फोटोसेशन मध्ये गोंधळ घालून थांबले व जाताना त्या फोटोग्राफर च्या मागे एखादी चिठ्ठी वा शाईचा मोठा डाग पार्श्वभागावर आठवण म्हणून टाकायला विसरले याचेच आश्चर्य वाटते.त्यामुळे घरी गेल्यावर फोटोग्राफीरीण काकूंचा मोठमोठ्याने केलेला आरडाओरड्याचे प्रतिध्वनी आम्हाला त्या लोण्यावळ्याच्या द-याखो-यातून ऐकायला मिळाले नाही हेच दुर्देव.

फोटोग्राफर काकांनी ब-याच वेळ राष्ट्रपतींनी २६ जानेवारीच्या पुर्वसंध्यला केलेल्या भाषणाचा अनुवाद जसा तीन भाषांतून ऐकवतात तसा कदाचीत आम्हाला समजत नसेल म्हणून आलटून पालटून इंग्रजी,हिंदी व मराठी अशा भाषांचा केविलवाणा आधार घेत आम्हाला आपआपल्या जागांवर स्थिर उभे राहण्याचे पुन्हा आवाहन केले.मी माझी जागा शक्यतो मुन्शी राठी,हरीश चौबे,मिहीर राऊत,मकरंद कुलकर्णी यांच्या मागे येऊ न देण्याचा प्रयत्न करत होतो जेणेकरून माझे अस्तित्व त्या छायाचित्ररूपी आठवणीत राहिले असते. शेवटी पाऊस सुरू झाल्याने मग त्यांनी घाईघाईत `शो युअर फेसेस’ रेडी…स्माईल प्लीज.. असे आवाज काढले.आता त्यांनी शो युअर फेसेस सांगतांना माझ्या कडे बघितल्याने मी चुकून माझा पार्श्वभाग दाखवत उलटातर उभा राहीलो नाही ना? असे वाटून मी गांगरून पाहत असतानाच `ओके थॅंक यू ‘या वाक्याने माझ्या काळजाचा घात केला.म्हणजे फोटो झाला काढून..?मला माझा चेहेराच काय तर पार्श्वभाग ही फोटोत आला नसणार याची खात्री होती.आणी हाय रे दैवा शेवटी माझी भिती खरी ठरली.घाई गडबडीत मी मिहीर व मकरंद यांच्या मध्ये सरकायचा प्रयत्न करीत असतानाच मिहीर च्या अवाढव्य शरीराच्या मागे मी कुठे दडला गेलो ते त्या परमेश्वरालाच माहीत.मला तर तो फोटोग्राफर चांगला दिसत होता मग त्या फोटोत माझा चेहेरा का आला नाही? असो..शेवटी काय हो शिवाजी महाराज,राणा प्रताप यांचे तरी कुठे छायाचित्रे आहेत पण त्यामुळे त्यांचे प्रभावी अस्तित्व कुठल्याच प्रसंगात लपले नाही….बाकी नाही म्हणायला माझा गोंडस,तेजस्वी,प्रेमळ चेहरा सोडला तर माझे केस,शर्ट,दोन डोळे ,भुवया,शर्टची दोनपैकी एक कॉलर इत्यादी जिनसा छायाचित्रात आल्या आहेत हेच ते काय कमी आहे..?( या सगळ्यात मिहीर,मकरंद,निलेश,आनंद,विनायक,महेश अरगडे वगैरे मंडळींनी कट रचून फोटोग्राफरला `हा आमच्या वर पुढे जाऊन लिहीणार आहे याला `कापा’ असे तर सांगून ठेवले नव्हते ना ही शंका मनात येत आहे.याचा पुरावा म्हणून महेशरावांनी आमच्या खांद्यावर मागून हात ठेवून आम्हाला मिहीरच्या मागे स्थानबद्ध केल्याचे छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे.)

`फोटोग्राफर ला इतका कॉंप्लेक्स झालेला पाहिला नव्हता’ अशी एक सार्वजनीक भावना मनात ठेवून आम्ही सगळे शक्य तेवढे चित्कार करत तेथून कॉन्फरंस रूम कडे सरकायला लागले.वर जाताना पुन्हा एकदा बाहेर एकेमेकांच्या कॅमे-यांनी फोटोसेशन झाले.यावेळेस मात्र मी शक्यतो अवजड वाहने टाळूनच ग्रुप फोटोत सहभागी झालो हे वेगळे सांगायला नको.

कॉन्फरंस रूम मध्ये आत आल्याबरोबर त्या टापटीप सुंदर हॉल मध्ये असलेली गोल गोल टेबलांभोवती असलेली खुर्च्यांची मांडणी,त्या टेबलांवर असलेले ते पांढरे शुभ्र टेबल क्लॉथ्स ,त्यावर असलेल्या त्या थाळ्या व त्या थाळ्यांमध्ये असलेली ती चॉकलेट्स पाहून आनंदरावांना सुर गवसला नसता तरच नवल.मग पुढच्या काही क्षणात त्यांनी दिसेल त्या टेबलावरचे चॉकलेट्स आपल्या मुठीमधे उचलायला सुरुवात केली.मग एका मुठीत मावेनात म्हणून दुसरी मुठ सोबत घेतली,मग दोन्ही भरल्या म्हणून खिशाचा आधार घेतला.पॅंटचे दोन्ही खिसे भरल्यावर वर शर्ट ला खिसा आहे असे समजून त्यांनी हात टाकला असता तो सरळ खाली आल्याने या टी शर्ट ला खिसा नसल्याचा साक्षात्कार त्यांना झाला व त्यांच्या चेहे-यावर आपण आज खिसे असणारा शर्ट घातला नसल्याची अपार खिन्नता दिसली.पण ते हार मानणा-यांपैकी नसल्याने त्यांनी मग हुशारी दाखवत आपली बसायची जागा आधी धरली व मग त्या टेबलवर दोन तीन चकरा मारत बरेचसे चॉकलेट्स एकत्र करून ठेवले.हे सगळे करतांना ते आपले परम मित्र मानसोपचारतज्ञ डॉ.विनय चपळगावकरांना एकदा `दाखवत’ का नाहीत अशी कुजबुज सुरू असतानाच असेच एक चॉकलेट दुस-याच्या टेबलावरून उचलताना काहींनी चपळगावकरांना पाहिल्याने आता मात्र `हे भगवान इन्हे माफ कर’ अशी अनाथपणाची भावना मनात आली.खरं सांगायचं तर त्यात काही मिन्ट च्या माझ्या आवडत्या चवी चे चॉकलेट्स पाहून हा प्रकार करायचा मोह मलाही आवरला नाही आणी आनंदच्याच टीम मधला भासवत मी पण त्या दंगलीत दुस-याचे घर लुटून घेतले.(आणी दंगलीच्या परिस्थितीचा फायदा उठवत दंगलीशी काहीही संबंध नसलेले लोक आपली जुनी भांडणे कशी निकालात काढतात हे औरंगाबादशी जुने संबंध असलेल्यांना चांगलेच माहीत असेल.)

फोटोसेशनच्या आधीपासून त्या काळातील आमच्या पाच शाळा मैत्रीणीही या रियुनियन मध्ये सामील झाल्या होत्या.ढीग भर मुलांच्या कळपात असणा-या बोटावर मोजण्याइतक्या कमी असणा-या मुलींना पाहून बहुतेकांना आश्चर्याचा (सुखद..) धक्का बसला.(त्यांना `मुली’ म्हटल्यामुळे माझा जाहीर सत्कार त्यांच्या त्यांच्या सासरच्या गावात त्यांनी आयोजीत केल्याची स्वप्न मला पडत आहेत पण मी एक सत्याचा आग्रह धरणारा लेखक स्वतःला समजत असल्याने त्यांना महिला म्हणणे जास्त योग्य व वास्तववादी राहील तरीही यापुढे `मुली’ हा शब्द त्यांनी स्वतःला उद्देशून व इतरांनी त्याजागी `महिला’ हा शब्द टाकून वाचावा म्हणजे दोहोंनाही वास्तववादी वाटेल. )अर्थात या मुली आमच्यासोबत होत्या हे मला बाहेर कुठे भेटल्या असत्या तर कदाचीत अजिबात ओळखूही आले नसते हे मी प्रांजळपणे कबूल करतो.( न करून सांगतो कुणाला..कुठल्याही महीलेकडे `ती ओळखीची वाटते का हो..? या सौभाग्यवतींनी विचारलेल्या प्रश्नाला `अजिबात नाही हे उत्तर द्यायची सवय लागली आहे.)मुळात त्या १० वी फ तुकडीत होत्या व तो वर्ग आम्हाला पहिल्यापासूनच परकीय शक्ती वाटत आला आहे.आमच्या मराठमोळ्या शाळेत असणारे ते एक आंग्ल माध्यम होते व आम्हा सर्व इतर तुकड्यांसाठी ते मेढेकर सरांनी अमेरीकेच्या म्युझियम मध्ये पाहिलेल्या चंद्रावरून आणलेल्या त्या दगडाइतकेच कुतुहलपुर्ण होते.मास पी टी ला बाहेत पटांगणात उभे राहिल्यावर ह्या वर्गाची रांग `फ’ तुकडीजवळ येत असे त्या वर्गावर जळण्याची एक प्राचीन प्रथाही तेथे होती.काही खिलाडूवृत्तीची मुले त्या रांगेतील मुलांचे अंगठे दाखवून अभिनंदन करण्याचीही वार्ता असायची.स्वतः इंग्रहीविषयात जेमतेम पास होणा-या आमच्या एका मित्राने आठवीतून नववीत जाताना आपल्या पिताश्रींकडे `फ’ तुकडीत स्वतःला घालायचा बालहट्ट धरल्याचे समजले होते.पण पिताश्रींना `पुत्र ऐसा गुंडा’ नको असल्याने त्यांनी मोठ्या चतुरपणे पुत्रा ला `तिहीलोकी झेंडा’ गाडण्यापासून वाचवले होते.

हळू हळू सगळेच त्या कॉन्फरंस रूम मध्ये जमा होऊ लागले.बाजूच्या त्या प्रशस्त खिडक्यातून निसर्ग खरोखरच दृष्ट लागावी असा बहरला होता.त्या दिवशीचे वातावरण व तो स्नेहमिलनाचा प्रसंग, मला वाटत नाही पुन्हा प्रयत्न करूनही अशा पद्धतीने योग जुळून येईल.खिडकीकडील सर्व टेबल्स १० वी फ त ल्या मुलांनी व्यापला होता.त्यांची संख्याही खूप जास्त होती.उरलेल्या भागात इतर तुकडीतील मुले व १० वी फ त ल्या मुली असा एक अविस्मरणीय व अभुतपुर्व योग योगा योगाने जुळून आला.दरम्यान आयोजकांनी आपला एक टेबल स्टेज च्या जवळ समोरच्या बाजूला निश्चीत केलेला होता.त्यावर ते सगळी मुलांची यादी,कार्यक्रमाची रूपरेषा व सगळ्यात महत्वाचे म्हणजे जवळपास सगळ्यांकडे बाकी राहिलेल्या ५०० रुपयांची वसूली ही महत्वाची कामे करत बसली होती.मनिष ने मग त्या ठिकाणी लावण्यासाठी तयार केलेले एक मोठे बॅनर काढले.हर्षल,मनिष,जहागिरदार,अजय काळे व मिहीर यांनी आकाराने अर्ध्या असणा-या एका व्हाईट बोर्ड वर ते मोठे बॅनर लावण्याचा धाट घातला.`सरस्वती भुवन हायस्कूल,औरंगाबाद,१९८९ बॅच’ असे मोठ्या आकारात वर तर खाली `पुनर्मिलन’ असे शाळेच्या त्या देखण्या इमारतीच्या छायाचित्र बॅकग्राऊंड वर ठेवून लिहीलेले होते..सगळ्यात खाली अनेक विद्यार्थ्यांच्या हात वर करून नाचत केलेल्या भांगडा पद्धतीच्या नृत्याची छाया दाखवत खाली जल्लोष,जल्लोष असे लिहिलेले होते.वरील शाळेच्या आठवणींचा व पुनर्मिलनाचा कार्यक्रम झाल्यानंतर जल्लोष करायचा आहे ही कार्यक्रमाची रुपरेषाच जणू चित्ररुपाने मांडलेली होती.हा जल्लोष सहा वेळेस त्या बॅनर वर लिहीण्यामागे आयोजकांनी तो सहाही तुकड्यांनी करायचा आहे हा संदेष दिला होता की काय असे वाटते.तसे खरच असल्यास मला त्यांच्या कल्पकतेचे अभिनंदन करावेसे वाटते.(तसे नसल्यास त्यांनी माझ्या कल्पकतेचे अभिनंदन करावे.) ब-याच वेळ झटापट केल्यावर ते बॅनर व खालचा बोर्ड यांची सांगड होऊ शकणार नाही हे सर्वानुमते ठरले शेवटी ते बॅनर तो बोर्ड बाजूला करत मागच्या भिंतीवरच लावण्याचा निर्णय घेण्यात आला.मग सेलो टेप ने चारही भाग चिटकावत ते सुंदर बॅनर अखेर दिमाखात उभे राहिले.

जाता जाता…

अमेरिकेत आलेल्या `सॅंडी’ मुळे तेथे स्थित असलेल्या आमच्या अनेक बालमित्रांना त्यांनी कुल्फी खायला,पान थुंकायला,दुधाची पिशवी आणायला,कोप-यावर भाजी घ्यायला,कचरा टाकायला वा काहीच जमत नसेल तर सरळ सॅंडीला भेटायला बाहेर रिक्षास्टॅंड पर्यंत येण्याचा सल्ला देत आहोत.त्यामुळे तुम्हाला सॅंडी आमच्या निलम पर्यंत आणून सोडेल ( ती दोघे क्लासमेट्स आहेत )व तेथून तामिळनाडू मधून तुम्हाला आणायची स्पेशल व्यवस्था केली जाईल.त्या निमीत्ताने तुम्ही अमेरिकेतून परत भारतात याल व आपली भेट होईल.

क्रमशः लवकरच..

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -११

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -११

विशेष सूचनाः

१.मागील शुक्रवारी वेळेआभावी भाग-११ लिहून न झाल्याने फेसबुक प्रकाशन करता आले नाही त्यावर `नानकर विसरलात का भाग-११?’ ,`शुक्रवार च्या फर्स्ट डे फर्स्ट शो ची सवय तुम्ही पुन्हा लावली आहे तरी त्यात खंड पाडू नये’ तर सगळ्यात परीसिमा म्हणजे फक्त `हाउ डेअर यू’ हा आलेला मेसेज यावरून प्रस्तुत लेखकाचे लिखाण काहीजण नियमाने वाचत असल्याची शंका येत आहे व त्याचा मनोमन आनंदही होत आहे.

२. हा भाग लिहीतांना काही गोष्टी आठविण्यासाठी मनिष पाडळकरांची मोलाची मदत कवडीमोल किमतीत घेतली आहे तरी आम्ही त्यांचे आभारी आहोत.त्यांच्या या उपकारांची परतफेड त्यांच्याच घरी सहकुटूंब दिवाळीच्या फराळाला जाऊन केली जाणार आहे.(तरी प्रस्तुत लेखकासाठी कुरकुरीत चकल्यांचा एक डबाभर बंदोबस्त आजच करण्याची वहिनींना विनंती..व घरी चकल्या वेगळ्या बांधून घेऊन जाण्यासाठी रिकामा डबा आपल्या विनंतीस मान देऊन आमच्याकडून आणण्यात येईल काळजी करू नये.तोवर आमच्या वाढत चाललेल्या मुलांचे लहान होत चाललेले कपडे बोहरणीकडे देण्याची सोय करत आहोत.)

आता पुढे…

एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागलेले होते.त्यांच्या ओरडण्याने जाग येऊन मग ते ज्यांच्या पाठीवर बसले होते त्या पोटातल्या गायी,म्हशींनीही हंबरायला सुरुवात केली.अगदी या योग्य वेळेस भिडयांनी आग्रहाने जेवणाचे आमंत्रण दिले.`जेवायचे वाढून ठेवले आहे लवकर गिळा’ अशा रोकठोक शब्दांची रोजची सवय असलेल्या आम्हाला इतक्या अदबीने कुठल्याच गोष्टीसाठी कोणीही बोलवत नसल्याने प्रथम हे बोलवणे दुस-याच कोणासाठी आहे असे वाटून त्याकडे दुर्लक्ष केले होते.पण या वेळेस भिडे `आता आला नाहीत तर जेवणाची वेळ संपेल’ असे गुरगुरल्यामुळे अखेर आम्ही भोजनकक्षाकडे प्रस्थान केले.आत गेल्यावर त्या भोजनकक्षात असलेल्या निटनेटके पणाचा आस्वाद घेतला.सगळ्या बाजूनी असलेल्या रूंद प्रशस्त खिडक्यांकडे पाहताना यावर जर कमानीला शिवकालीन नक्षीकाम केले तर नुसता शायिस्तेखानच नाही तर सोबत अफजलखान व दिलेरखान यांनाही आपाआपल्या बेगमांना घेऊन शिवाजी महाराजांना घाबरून लाल महलाच्या बाहेर सोबतच उडी टाकता येईल एवढी मोठी ही खिडकी आहे असा विचार मनात आला. त्या खिडक्यांचे सरकावून वर केलेले पांढरे पडदे मला पावसाळ्यात आपण दोन्ही हाताने पॅंटला वर करत पाण्यातून चालत गेल्यासारखे वाटले.या कक्षातील दिवे मात्र प्रखर लागलेले होते.सुंदर आयव्हरी व चॉकलेटी रंगांनी भिंती व लाकडी टेबल खुर्च्यांची घातलेली ती रंगसंगत नजरेला पंचतारांकीत सुख देत होती. दरवाज्याच्या बाजूला असलेल्या एका भिंतीवर धुम्रपान बंदी चा फलक लावलेला होता.विनायक व इतर काही साथिदारांसाठी असले फलक म्हणजे तडीपारीचे आदेशच होते.यासोबत जर मद्यपान बंदीचेही फलक असते तर मात्र `हे जरा अतिच झाले’ असे भाव चेहे-यावर आणून, तडीपार गुंड जसे राजरोस पुढा-यांच्या पार्ट्यांना हजर राहून फोटो काढून घेतात तसे, अनेक होतकरूंनी त्याच फलकाखाली भरलेल्या ग्लासेस चा चिअर्स करून फोटो फेसबुक वर टाकले असते यात शंका नाही.

भुकेने प्रक्षुब्ध झालेल्या नजरेने मी सुरुवात कुठून करावी याकडे लक्ष केंद्रीत केले.ताटाचा उगम शोधणे हे मुंग्यांची रांग कोठे संपली हे शोधण्याइतकेच कठीण आहे.ब-याचदा या ताटांच्या आजूबाजूला भरगच्च ताटं हातात घेऊन गप्पा मारण्यात लोक इतके गुंग होतात की `एक्सक्यूज मी’ वगैरे शब्दांची आंग्ल प्रतिभा कमी पडते.अशा वेळेस मला माणसाला आता वाहनासोबत स्वतःलाही एखादा हॉर्न बसवता आला तर किती बरे होईल असे सारखे वाटत आले आहे.ब-याचदा वाटते की अशा वेळेस एक दोन दा सांगून जर तो ताटधारी बाजूला झाला नाही तर सरळ सगळे शिष्टाचार बाजूला ठेवून सरळ त्याच्याच ताटातले खायला सुरूवात करावी.व जर यदाकदाचीत ती `ताटधारीण’ असेल तर एखादा घास तिला भरवायलाही हरकत नाही.असो..तर एकदाचे मी ताट मिळवले.ते मिळवल्याचा आनंद पुर्ण उपभोगायच्या आधीच तिथे सुप ही होते हे आमच्या आधी सुप पित `सुपी’क होत आलेल्या काही मित्रांकडे पाहून समजले. मग हातावर पेपर नॅपकीन,त्यावर ताट त्यावर सुपाची वाटी त्यात सुप व सुप पिण्याचा चमचा अशी लगोरी रचत मी सुप प्राशन केले.जसे `थुंकता येत नसेल तर पान वाईट’ असे पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे `फुर्र..’ असा आदरणीय आवाज काढता येत नसेल तर सुप पिणे वाईट असे मी म्हणेल.पुन्हा सगळे शिष्टाचार बाजूला ठेवत एरवी अतिशय शिस्तबद्ध असणारे माझे वागणे बदलत मी शक्य तेवढा मोठा फुर्र.. आवाज काढत व वरून तृप्तीची परिसीमा वाटणारा `हा..’ असा मोठा आवाज काढत सुपाचा आनंद घेतला.त्यावेळी `पुअर एटिकेट्स’ असे भाव आणून माझ्याकडे पाहणारे कमी नव्हते हे सांगायला नको.

आता एकदाचे मुळ जेवण्याकडे सरसावलो.आता या बुफे पद्धतीत दोन प्रकारचे लोक दिसतात.एक म्हणजे मोजकेच वाढून घेऊन नंतर जसे लागेल तसे घेणारे व दुसरे म्हणजे सगळे आधी ताटात एकदाच वाढून घेणारे.आता या पहिल्या प्रकारात परत परत उठून येणे,पुन्हा रांग लावणे,पुन्हा कसेबसे हवे ते पदरात पाडणे ,ब-याचदा हवे ते संपलेले असल्याने मग तोंडाची चव गेल्यागत वापस येणे,किंवा अगदी मिळालेच तर मग उश्टे हात व दुस-या हातात ताट अशी सर्कस करत पुन्हा आपल्या जागेवर येणे,आल्यावर आपल्या जागेवर दुस-यानेच हक्क दाखवला असल्याचा साक्षात्कार होणे ही कसरत आहे. तो करण्याइतका वेळ पोटाकडे नसल्याने मग मी दुसरा सर्वमान्य प्रकार निवडला व जे दिसेल ते ताटात टाकत सुटलो.त्यात वाट्या,चमचा,काटे,सलाड,लिंबू,रोटी,भात,डाळ,भेंडी मसाला,पणीर व इतरही अनेक गोष्टी.काही क्षणातच भातावर टाकलेल्या डाळीने भाताचे धरण फोडून शेजारच्या पुरीसारख्या आकाराच्या रोटयांना `पुर’ग्रस्त करून टाकले.त्यामुळे घाबरून दोन्ही भाज्या एकेमेकींना घट्ट बिलगून बसल्या.पिळण्यासाठी तीन बोटांच्या चिमटीत पकडलेल्या लिंबूने टुणकन उडी मारली व मी एखाद्या निष्णात राजकारण्याप्रमाणे घडलेला प्रकार दाबण्यासाठी स्वतःच्या बुटांचा वापर केला .`सलाड’ ने प्रथम खातांना आपलाच नंबर लागेल या भितीने वाटीखाली स्वतःला पुरून घेतले.दोन्ही वाट्या जागेची खूप अडचण झाल्याने एकमेकींना ढकलू लागल्या.ताटाबाहेर उडी मारून सुटका करू पाहणा-या काटे व चमचे या दोन सख्ख्या भावांना मी वेळीच आत ओढले.शांत,विचारी व संयमी चमचा चुपचाप एका वाटीत जाऊन बसला.पण क्रूर,शिघ्रकोपी व मांसाहारी काटा मात्र एका कोप-यात दबा धरून बसला.त्याला आवडणारे खाद्य शेवटच्या दोन टेबलांवर होते.मी जसा त्या टेबलांकडे सरकलो तसा तो काटा अधिकच सावध होऊन बसला.मला शुद्ध शाकाहारी समजणा-या काही मित्रांना मी शेवटच्या टेबलावरील मांसाहारी तंदूर चिकन नामक लाल वर्तुळांकीत पदार्थ ताटात टाकलेला पाहून आश्चर्याचा धक्का बसला.पण हा सगळा खटाटोप मी निव्वळ ताटात घेतलेल्या काट्याच्या मनाचा विचार करून केला हे मी मुद्दाम नमूद करतो.त्यावेळी तंदुराशेजारीच असलेला मटन मसाला माझ्याकडे तुच्छतेने बघत `तुम्ही काय राव तंदूरच्या पुढे सरकणारच नाही’ असे पुटपुटल्यासारखा वाटला.पण मागे एकदा अशाच एका लाल तांबड्या रस्स्याच्या आवाहनाला बळी पडून मोठ्या शौर्याने चावलेल्या एका मांसाहारी पदार्थामध्ये असलेला तिखट रस्सा चांगलाच झोंबल्याचे दुस-या दिवशी भल्या पहाटेच लक्षात आल्याचे चांगले स्मरणात असल्याने तसला काही पराक्रम बाहेरगावी आल्यावर न करायचे मी पक्के ठरवलेले होते.

हा सगळा ऐवज घेऊन मी एका लांबलचक टेबलावर येऊन बसलो (म्हणजे टेबलासमोरील खुर्चीवर).हळू हळू अविष्कार शेळके,सुनिल खिरड,निलेश,सचिन निसाळ,टाकळकर,दुधे असे अनेक मित्र पंगतीला आले.काही वेळाने सर्व डॉक्टरमंडळी,वळे,डोरले व काय आश्चर्य रोहीत विनय शहापुरकर यांचे आगमन झाले. रोहित ला मी बरोबर २१ वर्षांनी पाहत होतो.पुर्वीचे त्याचे ते नाजूक,हसरे,गोंडस व तेजस्वी रूप जसेच्या तसे मनात होते.चेहे-यावरील हास्य तसेच कायम होते पण रंग थोडा मावळलेला होता.ओठांवर असलेली काळपट छटा धुम्रपानबंदीच्या ठिकाणी तडीपारीचे आदेश त्याच्या नावचेही निघत असावेत हे स्पष्ट करणा-या होत्या.पुर्वीच्या त्याच्या कपाळावर सांडणा-या कुरळ्या केसांच्या बटा आता नाहिश्या झालेल्या होत्या.त्या कुठे गेल्या हे पहात पहात थेट मस्तकाच्या अर्ध्या वाटेवर मला काळे केस हुतूतू खेळताना भेटले.तोवरचा सर्व पृष्ठभाग केसांनी कपाळाला दानधर्मात दिलेला होता.गालावरील लांबवर ठेवलेले कल्ले मला सुजितकुमार वा रणजीत या खलनायकांची आठवण करवून गेले.मला रोहित ओळखेल असे का कोण जाणे मला वाटले होते.त्या विचारात मोठ्या आनंदात मी त्याला `हाय रोहित’ असे केले असता त्याने अत्यंत भुतदयेने एखाद्या नामांकीत नटाने सही मागणा-या आपल्या चाहत्याकडे बघावे त्या प्रमाणे पाहीले.त्याचा पुर्ण चेहेरा,डोळे,कान,नाक,उडालेले व राहिलेले केस माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते.त्याने मला ओळखले नाही या भयाण वास्तवाला पचवत मी ` अरे मी नानकर,प्रशांत नानकर’ असे थेट `माय नेम ईज बॉंड,जेम्स बॉंड’ या धरतीवर बोललो.मग त्याचे डोळे,भुवया,नाक,कान,तोंड (व आतील दात,जीभ असले ऐवज) व उडालेले व राहिलेले केस एकदम उभे राहीले व त्याने `नानक्या……’ या माझ्या त्या काळातील अपभ्रंशी नावाने प्राणांतीक आरोळी मारली.ती अनेकांनी ऐकल्यावर मी अजून जिवंत आहे हे पाहून अनेक चाहत्यांना(?) हायसे वाटले (असावे).ही आरोळी मारतांना रोहितच्या चेहे-यावरील आनंदामुळे जरी त्याने मला चेहे-याने ओळखले नसले तरी मी त्याच्या आठवणीत होतो हे उघड होते. `नानक्या’ हे अपभ्रंशी नाव त्या काळात प्रत्येकाच्या इतके तोंडी होते की तेव्हा एका शाळेत नवीन आलेल्या मित्राने थोडेसे बिचकतच मला `तेरे डोके के केस का सरदारजी जैसा बुचडा कायकू नही है’ हा मौलीक राष्ट्रभाषेतील प्रश्न अतिशय निष्पाप मनाने विचारला होता.शिख धर्मगुरू गुरू नानक व माझ्या नावातील साम्यामुळे त्याचा घोळ झाला असावा.माझ्या हातात `कडे’ आहे का हे त्यानंतर ही तो कित्येक दिवस खातरजमा करून घेत होता.तो स्वतः मराठी असूनही माझ्याशी हिंदी का बोलत असे हे मला त्यानंतर समजले.

त्याचवेळी सुहास वळेही आत आले (नावावर जाउ नका हा शुद्ध मुलगा आहे).आता सुहास माझ्यासोबत अभियांत्रिकीलाही असल्याने त्याने मला न ओळ्खायचा प्रश्नच नाही असा एक फाजील आत्मविश्वासपुर्वक केलेला विचार मी `हाय वळ्या…’ असे म्हटल्यावर त्याच्या चेहे-यावरील एक दोन सोडून एका पाठोपाठ एक उभ्या राहिलेल्या अनेक प्रश्नचिन्हांनी मावळला.मग अनेक हातवारे,ओळखी,आणा भाका घालून शेवटी वळेंनी आम्हाला ओळखले हे मान्य केले.(तेही बहूदा थोडा वेळ वाचावा म्हणून केलेले नाटक असावे.किंबहुना त्याला मी कोण हे अजूनही आठवलेले नाही असे मला उगीचच वाटत आहे. आणी खरेच तसे असल्यास त्याला मधला काळातला स्मृतीभ्रंश होण्याची व्याधी असल्याच्या निष्कर्षावर मी उडी टाकल्याचा `धप्प’ असा आवाज तुम्हाला एव्हाना आला असेल.)

दरम्यान जेवणाच्या टेबलावर पंक्तीला आनंदराव व इतर मंडळी पुन्हा लाभली होती.आनंद ला खूप भूक लागल्याचे (साहजिकच आहे हो बिचारा गेल्या तीन तासापासून उपाशी होता ) गच्च भरून आणलेल्या थाळीवरून जाणवत होते.त्याची रोटी संपल्यावर त्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करत व काही मित्रांकडून बसल्याजागी रोटीची घरपोच सेवा मिळावली.आम्ही मात्र आदर्श शिक्षकासारखा मेहेनतीने आपला क्रमांक कधी येईल याची वाट पाहत रांगेत रोटीसाठी उभे राहिलो.परत आलो तोवर माझ्या जागेवर दुसरेच कोणी बसले होते मग मी दुस-या एका तंदुर साठी उठलेल्या मित्राचे आसन बळकावत हातातल्या काट्याने माझ्या ताटलीतील तंदूरचा गळा कापला.

समोरच्या टेबलावर इंद्रजीत थोरात मटन मसाल्याने भरलेली वाटी व इतर ऐवज घेऊन विराजमान झाले.त्यांच्यात दहा दहा मिनीटात पोट भरत ठेवण्याचे `आनंदी’ कसब नसल्याने त्यांनी प्रचंड भूक लागल्यावर जसा माणूस तल्लीनतेने खातो त्याप्रमाणे आपला आहार चालू केला.

तिकडे दुरवर एका कोप-यात दहावी फ मधील अनेक मित्रमंडळींनी आपली वेगळी ओळख सकाळच्या जेवणातच `रंगीत पाणी’ रिचवत दाखविली. दरम्यान आमचे भोजन संपवून आम्ही पुढील गरम जिलबी व गुलाब जाम व थंड आईस्क्रीम या माझ्या अत्यंत आवडत्या स्वाद संगती कडे घोंगावलो.उंच आयस्क्रीम कपाकडे पाहताना मला नेहेमीच डोक्यावर खूप मोठी पृथ्वी घेऊन नेहेमीची खाली वाकलेली पोज देउन कंटाळलेला हर्क्युलस उठून उभा राहिला आहे असा भास होतो.त्याच्या डोक्यावरच्या त्या आयस्क्रीम व गरम गुलाबजामाचे अजब पण रूचकर मिश्रण खाताना मला अपार आनंद मिळून एकंदरीत लोणावळ्याची सफर सार्थकी लागल्याचे समाधान मिळाले.पुन्हा पुन्हा त्याच टेबलावर जाण्याचा मोह माझ्यातले शिष्टाचारी व्यक्तीमत्व टाळत असतानाच तिकडे आनंदरवांनी राजू वैष्णव यांना मोठ्या मोठ्याने आवाज देऊन `दोन दोन एकदम आण’ असे जाहीर सभेत नितीन गडक-यांनी `सत्तेवर आल्यास पंधरा सिलेंडर’ची घोषणा केल्यागत मोठ्याने सगळयांना ऐकू जाईल अशा खड्या आवाजात सांगितल्याने मग हिम्मत करून मीही वैष्णवच्याच आडोशाला उभे राहून पुन्हा दोन गोळे कपमध्ये टाकत माझा मार्ग सुकर करून घेतला.दरम्यान `दोन दोन एकदम आण’ हे वैष्णवच्या प्रत्येक हातासाठी दिलेले बीजगणीत होते हे त्याच्या लक्षात न आल्याने तो बिचारा आपले `दोन्ही हातात दोन दोन’ असे जवळपास पाठ करत पुन्हा माझ्यासोबत उभा होता.

ब-याच वेळेपासून एक मोबाईल फोन माझ्या थाळीशेजारी पडून होता व माझ्या प्रत्येक घासागणीक तो काहीतरी निषेध केल्यागत गोल गोल फिरत होता.नीट लक्ष दिल्यावर तो मोबाईल व्हायब्रेटर मोड मध्ये वाजत आहे हा साक्षात्कार झाला.इकडे तिकडे पाहिले असता कोणीही त्याला कोणीही `वाली’ काय `सुग्रीवही’ नसल्याचे जाणवले.मग उत्कंठेपोटी मी नंबर वाचला असता `सुनिल खिरड’ चा फोन येत असल्याचे छापून आले.मी लगेच फोन उचलला असता पलीकडून खिरड `गधड्या इतका वेळ काय व्हायब्रेटर ब्रश म्हणून फोन वापरलास काय’ या थाटात .. `हॅलो…कोण बोलतय..?’ असे खेकसले.`मी नानकर बोलतोय’ सांगितल्यावर (माझ्या निरुपद्रवीपणाची खात्री असल्याने) खूप हायसे वाटून त्याने हा फोन सचिन निसाळचा असून फोन तुझ्याकडेच ठेव ,सचिन घ्यायला येतोय हा आदेश दिला.मी जर त्याला मी अमूक बिल्डर,तमूक डॉक्टर,फलाना वकील बोलतोय असे सांगीतले असते तर त्याने नक्कीच `चोर,चोर,चोर’ असा गलका केला असता याची मला खात्री आहे.थोड्या वेळातच गळ्यातल्या जाड सोन्याच्या चेन वरून ओघळणारा घाम पुसत सचिन निसाळ आला व `देवमाणूस देवळात आला’ या कृतज्ञतेने माझ्यापासून मोबाईल घेउन गेला.`चेन असेल तरच चैन हरपते’ हे एक क्रांतीकारी वाक्य मी माझ्या मनात जुळवले.

जाता जाता…
विनोद कशाशी खातात हे ही ठाऊक नव्हते अशा उभ्या भारतातील असंख्य नागरिकांना ज्यांनी आपल्याच समाजव्यवस्थेवर व परिस्थीतीवर हसायला शिकवले त्या जसपाल भट्टींच्या निधनाची दुःखद वार्ता या भागाचे लेखन चालू असतानाच मिळाली आहे.ज्यांच्या विनोदाची पातळी कधी गाठता आली तर खरा विनोद जमला असे म्हणावे असे हे बोटावर मोजता येतील इतक्या कमी व्यक्तीमत्वांमधील एक.त्यांच्या स्मृतीला आमचा आदरणीय प्रणाम..

क्रमशः लवकरच….

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -१०

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -१०

विशेष सूचनाः
१.मागील एक-दोन लेख वाचून काहींनी आम्हाला दिव्यांनी न लावलेले `दिवे’, किडा मुंग्यांनी चाखलेले मद्य, गाड्यांच्या रडारडी वा टेकड्यांची प्रेम प्रकरणे वाचण्यात स्वारस्य नाही.माणसांविषयी असेल तर लिहा असे मौलीक सल्ले दिले आहेत.त्यांनी केलेल्या धमकीवजा विनंतीस मान देऊन या भागात व्यक्तीमत्वांवर नेम धरला आहे.तरी कोणाला राग आल्यास आम्हाला न लाजता व संकोचता कळवावे. त्यांना प्रस्तुत लेखकास ही विनंती करणा-यांचे नाव व पत्ते दिले जातील.तरी पुढील भानगडी आपण आपाअपल्या स्तरावर व ऐपतीप्रमाणे निस्ताराव्यात. लेखकाला नाहक त्रास देऊ नये.

२.एका परममित्राने प्रस्तुत लेखकाला सिरीयस लेखनाचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे.सांगण्यास आनंद होत आहे की प्रस्तुत लेखनाचा पहिला भाग हा `लोणावळा प्रवास’ असे शिर्षक टाकून अतिशय सिरियस लेखन म्हणूनच लिहीण्यात आला होता.त्या भागाच्या फेसबुक प्रकाशनपुर्व केलेल्या वाचनाचे वेळी (अतिशय सुमार दर्जाची विनोदबुद्धी असलेल्या) आमच्या सौभाग्यवतींनाही हसू आल्याने ते लेखन काही कारणास्तव सिरीयस नसून विनोदी झाले असल्याची शंका आली. आपणासारख्या जाणकारांना तर हे लेखन नक्कीच विनोदी वाटेल असे जाणवले व आमच्या `लोणावळा प्रवास’ या शिर्षकाचा `थोड्या विनोदी अंगाने’ असा नामविस्तार झाला.(नामविस्तार हा शब्द लिहीताना औरंगाबादचे आजन्म रहिवासी प्रमाणपत्र मिळाल्यासारखे वाटत आहे.)

३. हा भाग व्यक्ती केंद्रीत असल्याने इतर भागांइतके प्राधान्य विनोदाला देण्यात आलेले नाही तरी बोंबा मारू नये.

आता पुढे...

मुंग्यांना त्यांच्या पार्टीचा आनंद घेऊ देण्यास सोडून मी आधी स्वच्छतागृहात धाव घेऊन एकदाचा मोकळा झालो.बाहेर येऊन मी बॅग मधून माझा हॅंडी कॅम बाहेर काढला व पुन्हा एकदा त्या लॉबीतून न चुकता व कोणालाही पत्ता न विचारता एकटा खाली स्वागतकक्षात सुखरूप येउन पोहोचलयाने अभिमानाने माझे उर भरून आले होते.तेव्हाचा तो एडिसन चा खापरपणतू कोठे दिसतोय का शोधत होतो.दिसला असता तर मी त्याला माझी ही शौर्यगाथा ऐकवणार होतो.बाहेर स्वागत कक्षात एका कोप-यातल्या सोफ्यावर प्रफुल्ल बल्लाळ विराजमान झालेले होते.प्रफुल्ल कडे पाहून मी दोन चार वेळा हाय..हॅलो करायचा प्रयत्न केला पण तो कुठल्यातरी गर्तेत होता.खाली फरश्यांकडे पाहत त्याची तंद्री लागलेली होती.त्याचाही बुद्धीला माझ्यासारख्याच `मुंग्या’ आल्या की काय असे वाटून मी एकदा पुर्ण फरशी न्याहाळून घेतली तेथे चकचकीतपणाखेरीज काहीही दिसत नव्हते.बहुदा त्या फरश्यांचा आरसा बनवून तो बघत असावा कारण त्यांच्याकडे बघत व गालातल्या गालात हसत प्रफुल्लने आपल्या नेहेमीच्या स्टाईलने केसांचा कपाळावर येऊ पहाणारा झुपका वर बाजूला सरकावला.प्रफुल्ल कडे पाहून तो वेळेआधीच `फुल्ल’ झाला असे काहीसे भाव त्याच्या चेहे-यावर होते.पण शेवटी मी केलेल्या हातवा-यांकडे त्याचे एकदाचे लक्ष गेले व त्याने माझ्याकडे बघत शक्य तेवढे गोड हास्य केले.

आता हळू हळू बरीच मित्रमंडळी जमा होऊ लागली होती पण जवळपास सर्वच बाहेरच उभे होते.महेश फडणीसनी त्याच्या चेहे-यावर असलेले हास्य व गोडवा तसाच टिकवला हे बघून खुप आनंद झाला.तो ऍक्सीस बॅंकेत मॅनेजर झाल्याचे ऐकूनही अभिमान वाटला व त्याचबरोबर बॅंकेने सगळ्या ठेवी त्याच्याच पोटात साठवल्या की काय असे वाटण्याइतके त्याचे पोट लोंबल्याचे जाणवले.`महेश, आठवा का नववा? काळजी घे रे बाबा’ असे त्याला सारखे सांगावेसे वाटत होते. त्याने घातलेला तो टी-शर्ट आत तर घातलाय पण बाहेर काढताना त्याचा खालचा भाग ढेरीत अडकून वरच येणार नाही व खुपच खेचल्यास फक्त वरचा भागच वेगळा फाटून वर येईल असा अंदाज आहे. त्याच्या हातातील सिगरेटचा एक रुंद व खोल असा झुरका मारत त्याने तल्लीनतेने छोटी छोटी वर्तुळं काढत हवेत धूर लोटला.मी सिगरेट कधी प्यालो नसलो तरी मला सिगरेटच्या धुराचा वास मात्र खुप आवडतो हे मी प्रांजळपणे कबूल करतो.त्यामुळे त्याने हवेत टाकलेली वर्तुळं मी आदराने बघत शक्य तेवढी नाकाने ओढली व शांत धुम्रपान (पॅसीव्ह स्मोकींग) केले.एक सिगरेट संपवून त्याने जेव्हा दुसरीला हात घातला तेव्हा त्याच्या गुलाबी रंगाचा टी शर्ट वर लिहिलेल्या `फॅरेनहिट’ या तापमान मापक परिमाणासोबत फुफुसाचे वाढणारे तापमानही लिहून आले असते तर महेशला ते दाखवून धुम्रपानापासून वंचीत करता आले असते.

तेथे उभ्या एका उंच गॉगल घातलेल्या थोड्याश्या ओळखीच्या वाटणा-या चेहे-याच्या एका व्यक्तीने गोल वर्तुळांऐवजी साधारण समुद्रांच्या लाटांसारखे असे धुराचा लाटा बाहेर टाकून या धुम्रपानाला एक वेगळा आयाम दिला.त्याने घेतलेला झुरका पाहून आता विनायकला ख-या अर्थाने सोबत व स्पर्धा आल्याचे जाणवले. तेवढ्यात `मिरच्या…’ असे चित्कार मकरंद ने कोणाकडेतरी पाहून काढले.मला आनंदरावांनी सरदवाडीला रिचवलेल्या भज्यासोबतच्या मिरच्या आठवून `आता मात्र मी एकही मिरची सोडणार नाही व आनंदरावांचे कुशल हात मध्ये नसल्यास भजासाठीही प्रयत्न करीन’ असा निर्धार मनोननी केला.पण मकरंद `मिरच्या…’ हे कुठल्याही हिरव्या लाल,बोटाएवढ्या लांब,वर धरायला हॅंडल असणा-या व चवीने जमदग्नीच्या स्वभावाहूनही निखट असणा-या पदार्थाला उद्देशून नव्हे तर त्याच गॉगलधारी सिगरेट धारी व्यक्तीला उद्देशून म्हणाला होता.त्या दोघांमध्ये काही मैत्रीपुर्ण संवाद झाले.मग मकरंदने त्याला त्याचा गॉगल बाजूला करायची खूप आग्रहाने विनंती केली.ती का हे त्याने गॉगल बाजूला केल्या केल्या आमच्या जुन्या करप्ट वाटणा-या फ्लॉपीने अचानकच `बस्वराज शिवदास मिरजकर’ हे नाव छापून पाठवल्यावरून समजले. बस्वराज ओसामा बिन लादेन, अफजल गुरू किंवा सैबेरियातला हिममानव म्हणून जरी आला असता तरी कुठल्याही वयात व वेशात त्याच्या त्या कुप्रसिद्ध बकरीच्या घा-या डोळ्यांमुळे आरामात ओळखू आला असता.ही बकरी आता मात्र चांगलीच गेंड्याच्या रुपात आली होती.

काळा टी शर्ट व टाईट निळ्या जिन्स मनोज निंबाळकरांचे तेवढ्यात आगमन झाले.गाडीतून उतरतानंच त्यांच्या हातात एक डिस्टील्ल्ड वाटर ची बाटली होती.बस्वराज उर्फ मिरच्या ती पाहून अचानकच धावला.संभाव्य धोका ओळखून मनोज ने ती सरळ तोंडाला लावली ( ती म्हणजे पाण्याची बाटली).शेवटी मिरच्याने ती कशी बशी मिळवली व त्यानेही त्यातून प्राशन सुरू केले.अरेरे….आपण दुष्काळी भागातून आलो हे सगळ्यांना पाण्यासाठी असे पळापळ करून पटवायला हवे का..आणी तिथे आत टेबलावर `बेली’च्या ब-याच बाटल्या आहेत रे मिरच्या…कशाला त्याच बाटलीसाठी ओढाताण?’ माझ्या मनात विचार आला.पण त्यानंतर बस्वराज ने `कोणती आहे’ असे त्या बाटलीतल्या द्रव्याकडे बोट दाखवून विचारलेल्या प्रश्नाला जेव्हा मनोजने काही आंग्ल भाषेतील नावाने उत्तर दिले त्यावरून ते साधे पाणी नसून चढणारे पाणी असल्याची मला दिव्यप्राप्ती झाली.रिसोर्टच्या बाहेर नगरपालिकेची असते तशी सिमेंटची एक पाण्याची चौकोनी टाकी उंच जागी पाहून एखाद्या `विरू’ ला तिथे चढून आपले `शोले’ दाखवायला संधी असल्याची वार्ता मनोज व बस्वराज ला मला द्यावीशी वाटली.पण शोलेतला वीरू असल्या टाकीवर जाऊन पित असे व तिथे बसून आपले संवादफेकीतले कौशल्य दाखवत असे.इथे दोनही अध्याय खालीच पहायला मिळतील असे वाटले.

सर्वच जुन्या मित्रांशी एक एक करून ओळखी पुनर्जिवीत होत असतानाच काही विशेष चेहे-यांना पाहून खूप धक्के बसत होते.कुरळ्या केसांचा,ब-यापैकी शरीर सम प्रमाणात ठेवलेला व हस-या चेहे-याचा एक मित्र समोर येऊन `हाय’ म्हणाला.नाव आठवायला वेळ लागला नाही `अविष्कार सुखदेवराव शेळके’ उर्फ `छोटू’ त्या काळातील सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक. पण कपाळाने डोक्यावरच्या केसांवर हल्ला चढवल्याने त्यांची चांगलीच पिछेहाट होत ते अर्ध्यापर्यंत पोहोचू पहात होते.कपाळाने अजून काही काळ लढाईत आक्रमक धोरण स्विकारल्यास आता केसांचा गड पुर्ण पडण्यास वेळ लागणार नाही.पोस्टरमधील व्यक्तीचित्राच्या केस व मिशांना चित्रकाराने शेडींग करावे त्याप्रमाणे ब-याच ठिकाणी झालेल्या पांढ-या शेडींगमुळे त्या नावासोबत असणारा सध्याचा चेहेरा जुन्या फ्लॉपीतील त्या वेळेच्या चेहे-याशी साधर्म्य साधत नव्हता. `छोटू’चा झालेला हा नवा `अविष्कार’ पाहताना मन भुतकाळातल्या आठवणीत रमले.आम्ही एकत्र खेळलेले क्रिकेट कधी त्याच्या घरासमोर तर कधी माझ्या व दोन्हीकडील समप्रमाणात फोडलेल्या काचा.डायनींगटेबलाला टेबलटेनिस चा टेबल समजून त्यावर दोन पेल्यांच्यावर आडवी धुणं वाळवायची काठी ठेवून नेट म्हणून आपल्या घरातला टॉवेल घेतल्यास रागावतील म्हणून शेजारच्यांचा कॉमन वॉल वर वाळत टाकलेला टॉवेलचा केलेला वापर व त्यामुळे दुस-या दिवशी सकाळी `आयत्या’ प्रसंगी शेजारच्या पुरूष मंडळींची झालेली धावपळ व त्यांनी महिलावर्गाचा केलेला उद्धार,पिंगपॉंगचा चेंडू फुटल्यावर त्याला जाळून त्यातून कापरासारख्या बाहेर येणा-या ज्वाळा,`मारूती’ नामक नावाशी चेहे-याचे साम्य असणा-या त्याच्या भाडेकरूच्या मुलाला सोबत घेऊन क्रिकेटच्या स्टंपसनी खेळलेले हॉकी व प्रत्येक दिवशी एक दोन वेळेस घेतलेल्या `क’ व `दो’ या सर्व आठवणींमुळे नकळत मन भुतकाळात रमले. कोण म्हणतो जग जवळ आलंय..अंतरं कमी झालीयत..छे.. आता छोटू ला एकाच शहरात असूनही मला वाटतं मी १२-१५ वर्षांनी भेटत असेन.जग तर जवळ आणणारा पाहिजे..अंतरं नेहेमीच दुस-यानी कमी करावी अशी अपेक्षा न ठेवणारे व्यक्तिमत्व हवे आणी यामुळेच माझा, मनिषच्या या रियुनियनसाठी घेतलेल्या हर्क्यूलाईन प्रयत्नांना,मानाचा मुजरा…(खरं सांगायचं तर मी हा मुजरा शेवटच्या भागात शेवटच्या परिच्छेदात घालणार होतो पण भिती वाटते.. कल हो न हो…चुकून राहून गेले तर ती एक अक्षम्य चूक होईल..)

दरम्यान प्रत्येकाने फोटो शूट सुरू केले होते.छायाचित्रण हा वडिलोपार्जीत व्यवसाय असल्यासारखे सचिन काळे, डोरले, वळे आपाआपले कौशल्य पणाला लावत होते.महेश अरगडे, एखाद्या चित्रपट दिग्दर्शकाने दोन्ही हातांच्या बोटांचा चौकोन करून कॅमेरा ऍंगल तपासावा त्याप्रमाणे आपल्या एका हातामध्ये कॅमेरा ठेवून त्या पुर्ण रिसोर्ट्च्या परिसराचे छायाचित्रण करत होता.काही कारणास्तव त्याने इतक्या कमी प्रकाशातही काळाकुट्ट गॉगल लावलेला होता.त्याचा तो गॉगल पाहून मला नेत्र रुग्णालयातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर धीरगंभीर चेहे-याने गॉगल घालून फिरणा-या व्यक्ती आठवल्या.अर्थात वेदना व रूग्णालयाचे बिल पाहून गायब झालेले त्यांच्या चेहे-यावरील हास्य मात्र महेश च्या चेहे-यावर सुरक्षीत होते.तो ते छायाचित्रण करताना इतका भान हरपलेला होता की जाता येता जर मिहीर व मुन्शी राठी यांच्यामध्ये दबला गेला असता तर `लोणावळ्यात निसर्गभाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू’ वा `दोन अवजड वाहनांच्या धडकेत गॉगलधारी युवक गंभीर जखमी’ अशी वार्ता लोणावळा डेलीत येण्यास काहीही हरकत नव्हती.

प्रत्येक जण आग्रहाने एकमेकांसोबत फोटो काढून घेत होता व फोटो काढतांना एकमेकांना हसायचा आग्रह करतांना स्वतः ही खदा खदा हसत होता.भूकंप केंद्रापासून आजुबाजूच्या परीघामध्ये भुकंपाचे हादरे जसे बसतात तसे काही मंडळी खदा खदा हसताना स्वतः व शेजारच्याला गदा गदा हलवत होते. एक छायाचित्र घेताना मिहीर,मकरंद व औंढेकर यांना एका छायाचित्रात कैद करण्यासाठी अमाप धडपड करत निलेश मागे मागे सरकत इतका टोकावर पोहोचला होता की तेव्हाही जर ही तिघं त्यात मावले नसते तर निलेशचा कडेलोट खालच्या हिरवळीवर झाला असता.अर्थात निलेशचा एकंदर आकार व खाली पडताना डोक्यावरील विग निघाल्याने अजूनच कमी झालेले त्याचे फिदरवेट गटातील वजन पाहता खाली हिरवळीवर पाय मोकळे करण्यासाठी आलेल्या चार मुंग्याही त्याला खांदा देण्यासाठी पुरल्या असत्या.असल्याच दुस-या एका प्रयत्नात मकरंद,मिहीर,मनिष,आनंद औंढेकर यांना इतर दोघांसह लॉंगशॉट न घेता यशस्वीरीत्या कॅमेरात पकडण्याचा पराक्रम करणा-या व आपण एक निण्षात डॉक्टर असूनही कुठलाही मोबदला न घेता संपुर्ण कार्यक्रमाचे वेगवेगळ्या वेळेस सतत कॅमेरा गळ्यात अडकावून छायाचित्रण करणाचे समाजोपयोगी कार्य करणा-या डॉ.सचिन काळयांना आमचा मानाचा मुजरा.

या कार्यक्रमासाठी मुद्दाम थायलंडहून येथे आलेल्या समिर डोरलेंनेही छायाचित्रणात आपला जोर पकडला होता. जे दिसेल ते शूट करण्याच्या त्याच्या पद्धतीमुळे `दिसताक्षणी गोळ्या घाला’ या कर्फ्यु मधील आदेशाप्रमाणे त्याला आयोजकांनी दिसताक्षणी फोटो काढण्याचे आदेश दिले असावेत असे वाटले.भुर भुर सुरू झालेल्या पावसातही त्याच्या फोटो काढण्याच्या हौशेमुळे आजच्या डिजिटल पिढीलाही फोटो धुवायला टाकण्याचे प्रात्यक्षिक त्याला द्यायचे असावे.दरम्यान सुहास वळेंनीही आपले छायाचित्रणातले हात दाखवायला सुरूवात केली.(बहुदा) एका लांब टेकडीचे छायाचित्र काढताना तो तेथे पार्कींगमध्ये उभ्या एका लांब असलेले केस पांढ-या गोल आवळणीने बांधून ठेवलेल्या युवतीच्या इतक्या जवळ गेला होता की तो तिच्या केसात असणारा कोंडा टिपत आहे असे वाटून ती पटकन गाडीत बसली.

हळू हळू वाढत चाललेल्या मित्रपरिवाराचे आवभगत सारंग भिडे करत होते.मुळात असलेल्या अभिनय कौशल्याने तो आपणास ओळखत नाही असे कुठल्याही त्याच्याशी हात मिळवणा-या व्यक्तीला वाटत नसावे.उलट अरे आपल्यालाच कसा हा आठवत नाही हे भाव त्यांच्या चेहे-यावर होते.दरम्यान मुन्शी राठी १० वी फ च्या १४-१५ मुलांच्या घोळक्यातून बाहेर आले.(बाहेर आले म्हणजे ते त्या घोळक्यात असतानाही बाहेर सांडलेलेच होते पण तेव्हा त्यांचे नुसतेच ढेरीच्या बाहेरच्या वळकट्या दिसत होत्या ते कर्व्हज पुर्ण दिसायला लागले.)आता त्यांचे रूप काय वर्णावे महाराज… मेलबोर्न चे मैदान पुर्ण झाकण्याचा कपडा आणला तरी अपुरा पडेल असे वाटणारे त्यांचे शरीर म्हणजे घाटातल्या रस्त्यासारखे नागमोडी आहे.वर्तुळ चा अर्थ मला `मास्तर तुम्ही काढलेलं वर्तुळा’ पेक्षा `मुन्शींच्या शरीरातला प्रत्येक अवयव दाखवतो ते ‘असे जास्त व्यवस्थीत समजले असते.त्यांचा तो मिश्कील चेहेरा,त्यांचे ते जळालेल्या दुधाच्या सायीला येतो तसा पिंगट रंग आलेले केस,त्यांचा तो चंदेरी चष्मा व त्यालाच मॅचींग घातेलेल्या दोन बोटातील अंगठ्या,कमरेच्या खूप खाली घातलेली पॅंट,इतक्या मोठ्या ढेरीचा आधार असतानाही केलेला बेल्ट वरचा अनाठायी खर्च,त्यांचा आकाराच्या मानाने फारच कमी वाटणारा आवाज व विवीयन रिचर्ड्स प्रमाणे सतत तोंडात काहीतरी चघळण्याच्या स्टाईलमुळे ते चारचौघात काय दोन पाच हजारात उठून `ठळक’ दिसले असते. खुप फुगवलेल्या रग्बिच्या चेंडूसारखे त्यांचे शरीर जर त्या रिसोर्टच्या उतारावरून घरंगळत जर खाली दरीत पडले तर एक प्रचंड मोठा उल्कापात झाल्याशिवाय राहणार नाही व त्यातून लोणारला मान खाली घालायला लावणारे विवर तयार होऊन त्यात तयार होणा-या सरोवरास `मुन्शी लेक’ असे नाव द्यावे अशी एक परमोच्च कल्पना मनात आली.हे सर्व विचार चालू असतानाच मुन्शी हळूहळू सरकत माझ्या दिशेने येऊ लागले.माझ्या मनात झालेल्या सरोवरातील पाण्यात डुंबायची त्यांना इच्छा झाली की काय असे वाटून व सरोवराखालील गावांना पाणी ओसांडल्याने होणारा महापुराचा धोका लक्षात घेऊन मी काहीही कारण नसताना लक्ष नसल्याचे दाखवत मकरंद ला हाक मारली.दरम्यान माझ्या दिशेने येणा-या मुन्शी राठी इंद्रजीत थोरात व मनोज निंबाळकर यांच्याकडे जात असल्याचे दिसले व आलेले संकट टळले .मला त्यानंतर मुन्शी हे यशवंत दुधे ,हेमंत रायबागकर अथवा चुडीवाल यांच्याशी हस्तांदोलन करत आहेत असे भास व्हायला लागले.तसे खरंच लोणावळ्यात झाले असल्यास मला हे तिघेही कुठल्या ऑर्थोपेडीक कडे ईलाज करत आहेत हे जाणून घ्यायचे आहे कारण मी कालपरवाच केवल डोंगरे नामक मित्राशी हात मिळवून (दुखावून) आलो आहे जे उंचीने मुन्शींच्या दुप्प्ट पण गोलाईत अर्धे आहेत त्यावरून दोघांचा हाताने दिलेला दाब सारखा असावा असा एक माझा भौतीकशास्त्रीय सिद्धांत आहे.

क्रमशः लवकरच..

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -९

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -९

विशेष सूचनाः
१. आपण सर्वांच्या मिळालेल्या अभूतपुर्व प्रतिसादाने माज चढून लेखक नववा भाग आपल्या माथी मारायचा क्रूर प्रयत्न करित आहे. तरी आपआपले माथे ताळ्यावर ठेवावे जेणेकरून लेखाचा नेम धरणे सोपे जाईल.

२. प्रस्तुत लेखकाने चालवलेल्या सुक्ष्म अनुभवकथनाचा धसका घेऊन `पुढच्या वेळेस तू नाही आलास तरी चालेल’ असे प्रेमळ निरोप काही मित्रांचे आले आहेत.तर काहींनी प्रस्तुत लेखक २८ तारखेला रात्री लोणावळ्यास मुक्कामी नसल्याचे कालपरवाच समजल्यावर आता पुढचा वृत्तांत चव्हाटावर येणार नाही या आनंदात रात्री दहा वाजेनंतर आपाआपल्या घरांच्या बाहेर फटाके फोडल्याची पक्की वार्ता आहे.व `फटाके का फोडले’ अशी घरी विचारणा झाल्यावर `भारताने १९८३ मध्ये जिंकलेल्या विश्वचषकाचे सेलेब्रेशन होते’ असे अनावधानाने उत्तर देउन मानसोपचारतज्ञ डॉ.विनय चपळगावकरांकडील अपॉईंटमेण्ट्स अचानक वाढवल्या आहेत.

३. हा भाग खूप खेचला गेला आहे ,प्रतिभा कमी पडत आहे व तोच तोच पणा वाढत आहे, आता लिहीणे थांबवा असे ह्या भागाचे प्रकाशनपुर्व समिक्षण सौभाग्यवतींनी केले आहे.त्यांच्या या अहवालानंतर प्रस्तुत लेखकाने पुन्हा स्वयंवाचन केले असता त्यात तथ्य असल्याचे वाटते.त्याचबरोबर शुक्रवारच्या या लेखनकामामुळे बाजारहाटीत पिशव्या धरण्यासाठी होणारी प्रस्तुत लेखकाची मदत टळत असल्याने त्यांचे समिक्षण स्वार्थाने प्रेरीत असणे नाकारता येणार नाही.तरी निर्णय लवकरच घेण्यात येईल.

आता पुढे,

रिसोर्ट समोरील पार्कींगमध्ये विविध आकाराच्या,धर्माच्या,जातीच्या,वजनाच्या,वृत्तीच्या व सौंदर्याच्या गाड्यांचे आवक जावक सुरू होते.काही शिस्तप्रिय गाड्यांनी आपले पार्कींग अतिशय व्यवस्थित एका रेषेत केले होते तर काही मनमोकळ्या स्वभावाच्या गाड्या दुस-या एखाद्या गाडीच्या अक्षरशः अंगाला झोंबत होत्या. काही एकदम गेटजवळ असणा-या पार्कींगमध्ये मनमुराद हसत खिदळत,एकमेकांशी गप्पा मारत,टिंगल टवाळी करत बॅकबेंचर्स सारख्या लावलेल्या होत्या. जुनी ओळख असणा-या पांढ-या रंगाच्या क्वालीस व ईनोव्हा या गाड्यांनी आपाआपल्या माहेरच्या मंडळींची चौकशी केली.आपल्या दुस-या एका क्वालीस बहिणीला झालेल्या अपघाता बद्दल ऐकतांना पांढ-या क्वालीस ला तिचे हुंदके आवरेनात.मग इनोव्हा ने तिच्या ड्रायव्हरला सांगून क्वालीसचे अश्रु फडक्याने पुसुन दिले.`जन्माला आले म्हणजे मृत्यू हा अटळ आहे’ असे डोळ्यात अश्रु आणत इनोव्हा म्हणाली.पण याच इनोव्हाच्या सौंदर्याला भाळून आपल्या मालकाने आपल्याला घराबाहेर काढली हे ठाऊक असल्याने ते मगरीचे अश्रू असल्याचे क्वालीसला माहीत होते.दुस-या एका कोप-यात रिट्झ,डिसायर व स्वीफ्ट या एकाच जातकुळातील भगिनी त्यांच्या कुटूंबात नव्याने येऊ पाहणा-या एरटीगा चे हेवे दावे करत एका कोप-यात लावलेल्या होत्या.या सगळ्यांशी इंजिनाची `नाळ’ जुळलेली फियाट लिनियाही थोड्या वेळात लांबूनच फ्ल्यायींग किस देत त्यांच्याशेजारी येऊन उभी राहिली.तिचे `इटालीयन’ सौंदर्यच भारतावर राज्य करते हे सर्वज्ञात असल्याने तिला सर्वांनी आदराने नमस्कार केला.

बिमडब्ल्यू,स्कोडा व मर्सिडीज या सगळ्या शाही कुळातील गाड्या मात्र असल्या मध्यमवर्गीय चर्चेत न पडता एका वेगळ्या कोप-यात आपल्या घराण्यातल्या इतर गाड्यांचे विवाह बाह्य संबंध मोठया चवीने चर्चा करत बसलेल्या होत्या.एवढ्यात तिथे एक ह्युंदाई व्हर्ना मोठ्या दिमाखात येऊन दाखल झाली.रस्त्यात एका हलक्या दर्जाच्या छोट्या हत्तीने अतिप्रसंग करायचा प्रयत्न केल्याने `दुखावलेल्या’ व्हर्ना ने तिथे उभ्या असणा-या आय-२० ला पाहताच जणू हंबरडाच फोडला व आपल्या ए.सी.चे पाणी बाहेर टाकून अश्रुंना वाट करून दिली.मग आय-२० ने ही आपल्या वायपरने तिची `रडू नको’ म्हणून समजूत काढली. आय-२० स्वतः ,मालकाने लोणावळ्यातच तिची नुकतीच `टाकी फुल्ल’ केल्याने, डोळे सुजवून बसली होती.(याचा संदर्भ आपण आय-२० कडे निरखून पाहील्यास आपल्याला लागेल.) `श्री गणेश’ असे देवाचे नाव धारण केलेली एक पांढरी बस मात्र एका टाटा ८०९ शी झालेल्या आपल्या प्रेमभंगाचे शल्य मनात ठेवून रुसून बसल्यासारखी एका कोप-यात उभी होती.टाटा एरिया ही भव्य गाडी नुकतीच येऊन थांबली.तिच्या मालकाशी बहुदा तिची बाचा बाची झालेली असावी कारण मालकाने खाली उतरून रिमोट डोअर लॉक लावताच तिने `क्याव क्याव क्याव क्याव’ असा मोठा आवाज काढायला सुरुवात केली.सगळी मंडळी त्यांच्या या भांडणाकडे बघायला लागल्याने मग लज्जित होऊन मालकाने रागाने दरवाजा उघडला व पुन्हा जोरात आदळला व तिला गप्प बस असे सांगितले.मालकाचे हे अपमानास्पद वागणे अजिबात न आवडून एरियाने मालकाने डिक्की उघडताच आतील गच्च बरलेले सामान बाहेर लोटून दिले व झालेल्या अपमानाचा सूड उगवला.

गाड्यांच्या या सगळ्या गेट टुगेदर मध्ये आपणही काही अशाच कार्यक्रमासाठी आलेले आहोत हा क्षणभर मला विसर पडला होता.पण मिहीर राउतांनी आपल्या हा..हा…हा अशा केलेल्या चित्कारांनी मी आजुबाजूला बघायला लागलो. कदाचीत `हा’ `तो’ असावा असे वाटणारे काही तर काही केल्या ओळख न लागणारे काही असे चेहेरे दिसायला लागले.इंद्रजीत थोरात,विशाल कदम जपलेले चेहे-यावरील तारूण्य वाखाणण्यासारखे वाटले.१० वी फ मधील १०-१२ मुले एका कोप-यात नेहेमीप्रमाणे `आम्ही बाबा वेगळे’ असे दाखवत असल्याचा भास झाला.त्यातील प्रफुल्ल बल्लाळ,आनंद बुग्धे व चुडीवाल सोडल्यास एकाचेही नाव मला आठवेना.चेहेरे मात्र भूतकाळातील जुन्या फ्लॉपीवरून डाउनलोड होत होते.पण काहींच्या बाबतीत मात्र सारखी `रिड एरर’ येत होती.

`नानक्या चेक ईन करून घे’ मनिष म्हणाला.मग भिडेंनी एका यादीवरील आमच्या नावासमोर मला सही करायला सांगीतली.रुमची चावी व माझ्या रोमॅंटीक स्वभावाच्या बॅग ला घेऊन मी निघालो.कोप-यात एका टेबलावर ट्रे मधील अनेक ग्लासांमध्ये लाल गुलाबी रंगाचे द्रव्य ठेवलेले होते.ते `अपेय पेय’ असल्याची मला शंका आली.`नानक्या घे…बाहेर आल्यावर सगळे चालते’.मनिष ने माझा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला.त्यावरून ते द्रव्य म्हणजे सोमरसच असणार हे जाणवले.पण चित्रपटात दाखवलेले ते पेय इतके लाल गुलाबी नसते ही कुठेतरी शंका असल्याने मग मी कोणीही आपल्याकडे बघत नाही ही खात्री करून बॅग खाली ठेवण्याच्या निमित्ताने हळूच खाली वाकतांना एक बोट सगळ्यात कोप-यावरच्या ग्लासमध्ये बुडवत पटकन चव घेतली.ती चव कुठेतरी ओळखीची वाटली.पण काही केल्या कशाची ते आठवेना.एवढ्यात खाली रिकामे ग्लास ठेवण्यासाठी वाकलेला वेटर टेबला पलिकडून वर निघाला व मी एकदम ओशाळलो.मी केलेले हे जल सिंचन त्याने बहुदा पाहिलेले होते.मग एकदम अनावधानाने अस्खलीत हिंदीमधे ` ये क्या है बुवा..?’ असे माझ्या तोंडातुन वाक्य घरंगळले.का कोण जाणे त्यावेळी मी माझे डोळे चौफेर फिरवले.दारूची सवय नसली की मळमळ उलट्या होतात असे मी ऐकून होतो.त्या प्रमाणे त्या थेंबानेही मलाही कसेसेच होत असल्याची भावना झाली.माझ्या या `बुवा’बाजीकडे एक टक बघत तो मला म्हणाला..`कोकम सरबत आहे साहेब..’ अरे हो…खरंच की…तरीच चव ओळखीची वाटली..मी तातडीने तोच ग्लास उचलत गटा गटा ते पिऊन टाकले.त्यानंतर मी जवळून जाणा-या अनेकांना कोकम सरबतच आहे,घ्यायला हरकत नाही असे सांगत होतो पण का कोण जाणे उलट मी `कोकम सरबत’ आहे म्हटल्यावर मनिषकडे रागाने पाहणा-यांची संख्या वाढत होती.

रुम नं.२०३ होती बहूतेक माझी.आता २०३ म्हटल्यावर दुसरा मजला हे माहीत असण्याइतकेही हॉटेलींग माझे नसल्याने मी बापडा पहिल्या मजल्यावरच पहात बसलो.पण त्या मजल्यावर सगळ्या एकशे वाल्या रुम दिसल्या.चुकून आपला क्रमांक पाहण्यात चुकला असे वाटून मी चावीवरील क्रमांक पुन्हा पुन्हा पडळताळून पाहिला.बॅगचे ओझे वाहत मी हताश होऊन फिरत असतानाच तेथून जाणा-या एका वेटर ला मी शेवटी पत्ता विचारला.त्याने मग माझ्याकडे नखशिखांत बघत `चेहे-यावरून तर सुशिक्षित वाटतो’ असे भाव ठेवून मला पत्ता सांगीतला.`पुढे जाऊन डावीकडे वर जा आणी मग उजवीकडची चौथी रूम’.वर गेल्यावरही मला बहुदा नंबरही वाचता येणार नाही याची खात्री वाटल्याने त्याने `उजवीकडची चौथी’ वगैरे तपशीलही सांगितला होता.आता `वर जा’ सांगणारा माणूस डॉक्टर नसल्याची खात्री असल्याने मी निश्चींतपणे त्यानी दिलेल्या पत्त्यावर जाण्यासाठी निघालो.जाताना पायी जाऊ का रिक्षा करू असला पाचकळ विनोद मारायची माझी इच्छा दाबून मी पटकन वर जाण्याच्या रस्त्याला लागलो.

लॉबीमध्ये लावलेले दिवे बहुदा दिव्यांना स्वतःच्या प्रकाशात त्यांचेच निघणारे `दिवा’ळी अंकही वाचता येणार नाहीत इतका कमी प्रकाश पाडत होते.मला तर माझ्या मोबाईल मधील टॉर्च चालू करावा असे वाटले.अखेर मजल दरमजल करीत मी दिलेल्या पत्त्यावर सुखरूप येऊन पोहोचलो.लगेच मी घरी तसा फोनही केला.मी केलेल्या या पराक्रमाचा जराही अभिमान न बाळगता सौभाग्यवतींनी `मी दाण्याचं कूट करते आहे आपण नंतर बोलूयात का?’ असे विनंतीवजा वाक्य टाकून फोन ठेवला.त्यामूळे त्या वाक्यातून विनंती `वजा’ होऊन आदेश उरलेला होता हे आपणातल्या अनेक नवरेलोकांना मी पुन्हा पटवून देणे म्हणजे आपल्या प्रदिर्घ अनुभवाचा निव्वळ अपमान केल्यासारखे होईल.

बराच वेळ चावी कुलूपात घालून उघडायचा प्रामाणिक प्रयत्न केला.आधी उलटे सुलटे मग सुलटे उलटे त्यानंतर दोनदा उलटे एकदा सुलटे शेवटी दोनदा सुलटे व एकदा उलटे अशी अनेक वैविध्यपुर्ण प्रात्यक्षिके करूनही दरवाजा उघडेना.मग एखाद्या जुन्या हिंदी चित्रपटातील नायीका जशी लाडाने आपल्या नायकाच्या छाताडावर दोन्ही हातांच्या मुठी करून ड्रम वाजवल्यासारखी बडवून `चलो हटो तुम चोर हो’ म्हणते तसे दोन्ही हात मी दरवाज्या छाताडावर ठेवून बडवणार इतक्यात दरवाजा माझ्या हाताच्या थोड्या धक्क्यानेच उघडला गेला.मघाचे एखादे कॉंबिनेशन उपयोगात येऊन तो उघडलेला होता.आत पाऊल ठेवल्यावर पुन्हा प्रकाश जवळजवळ नसल्याचे जाणवले.मग मी दिव्यांचे बटणं शोधायला लागलो.ब-याच चाचपडण्यानंतर मला अखेरीस स्विचबोर्ड मिळाला.मग मी त्यावरील जेवढे होते नव्हते तेवढे सगळी बटणं चालू केली पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही.प्रथम वीज गेलेली आहे असा मी काढलेला निष्कर्ष बाहेरील लॉबीमध्ये नावाला का होईना दिवे चालू असल्याने धुळीला मिळाला.मग ब-याच दिवसांपासून गाढ झोपेत असलेला(किंबहुना घोरत पडलेला) माझ्यातला विद्युत अभियंता जागा झाला.मी कुठे फ्यूज वगैरे आहे का हे पाहिले तर मला कुठेच काही दिसले नाही.
बहुदा ट्रान्सफॉर्मर पासूनच एक फेज येत नसेल असे वाटून मग तो ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीसाठी नेल्यास किमान साठ सत्तर हजाराचे बील होईल,म्हणजे त्यातून मनिष चे ३००० आणी निलेशचे १२०० इतके पैसे तर सहजच मोकळे होतील असले काहीसे व्यवहारीक विचार मनात येऊन त्या अंधारातही मला प्रकाश दिसायला लागला.तो रुमच्या एका बाजूनी असलेल्या खिडक्यांमधल्या पडद्यामागून येत असल्याचा नंतर साक्षात्कार झाला.मग मी ते पडदे बाजूला करून प्रकाश वाढवायचा प्रयत्न केला परंतू बाहेर `नभ मेघांनी आक्रमिले’ले असल्याने सुर्य ही `डीम’ च होता. शेवटी मी एका लांब लाकडी टेबलावर माझी बॅग ठेवली आणि ब-याच वेळेपासून भरून आलेले मन मोकळे करण्यासाठी स्वच्छतागृहाकडे धाव घेतली.तेथे याही पेक्षा जास्त काळोख होता.आत मध्ये ऐन भरात असताना कोणी कानफटात जरी मारली असती तरी पत्ता लागला नसता आणि महत्वाचे `कार्य’ अर्धवट राहीले असते (अथवा क्षणार्धात मोकळे झाले असते).

तसाच पुन्हा बाहेर येऊन दरवाजाबाहेर डोकं काढलं.काही क्षणातच तेथे पुन्हा तोच तेव्हाचा वेटर लॉबीत दिसला.त्याला हॉटेलने फक्त मला मदत करण्यासाठी मोकळे सोडले असावे असे वाटून मला व्यवस्थापनाच्या या सेवातत्पर धोरणाचा कमालीचा आदर वाटला.तो माझ्यापाशी येऊन थांबेल व `कुछ हव्या का साब…?’ असे विचारेल असे वाटून मी तसाच उभा राहीलो तेव्हा तो समोरील रुम मध्ये स्वच्छतेसाठी जात असल्याने `सेवा’ भ्रमाचा भोपळा फुटला.मग अधिक वेळ न दवडता मी त्याला उद्देशून `हॅलो…हॅलो असे आवाज काढले.ते काढतांना काहीही कारण नसताना सवयीमुळे माझ्या हातातला मोबाईल मी कानाला लावलेला होता.त्यामुळे माझा आवाज ऐकूनही कानाला फोन पाहून तो आल्या पावली परत जाऊ लागला.मग मी पुन्हा `अहो वेटर ईधर ईधर..’ असे म्हणून त्याचे लक्ष वेधून घेतले.` मेरे रुम का दिवा क्यू बंद है..?’ शब्द एकदम बरोब्बर योग्य वेळेत जुळवत मी राष्ट्रभाषेचे `दिवे लावले’.तो दरवाज्यातून आत आला व एका कोप-यातल्या झडपेकडे हात करत म्हणाला…`इसमे चाबी डालो..’ चावी हरवू नये म्हणून ठेवण्यासाठी स्वतंत्र्य गुपीत कप्पा आहे की काय..आणि त्याचा विजेशी काय संबंध असे वाटून मी `अरे नही..मेरा की नई दिवा बंद है रूम का..दिवा…दिवा..लाईट…’ त्याला एका लाईट कडे बोट दाखवत मी किंचाळलो.अतिशय तुच्छतेने माझ्याकडे बघत व माझ्या हातातली चावी जवळजवळ हिसकावत त्याने सुरा खुपसावा त्याप्रमाणे त्या झडपेत चावीचे मागचे रुम नंबर लिहीलेले `की चेन’ खुपसावले आणि काय आश्चर्य..लगेच दिवे लागले.

मला हा रुम सर्व्हिस वाला म्हणजे थॉमस अल्वा एडिसनचा (का अलेक्झांडर ग्राहम बेल हो..?) खापर पणतू वाटला.पुन्हा कदाचीत संधी येणार नाही असे वाटून लगेच त्याच्यासोबत एक छायाचित्र काढून संग्रही ठेवावे असे विचारही मनात आले.पण मी त्याला `थॅंक यू’ असे चेहे-यावर ओशाळलेले हास्य आणून म्हणायच्या अगोदरच तो तेथून अदृश्य झाला होता.पण जाता जाता त्याने मला रूम मधील टी.व्ही. व इतर जी जी बंद होती ती सर्व उपकरणे दयेपोटी चालू करून दिली.

मग मी दरवाजा बंद करून पुर्ण रूम ला न्याहाळले.आकाराला किमतीच्या मानाने रूम जरा अंमळ लहानच वाटली पण शांत,सुंदर व टापटीप होती.(त्याचे काय आहे..घरात दोन मुलं व बायको (ती मात्र एकच..थॅंक गॉड…), एक कुत्रा, एक ससा या सर्व पशु पक्षांनी केलेल्या पसारा, घाण, धूळ किंबहूना चिखल,रंगबिरंगी चिरखडे, ओरखडे, उलटलेले पेले, सांडलेले रंग,मळालेल्या चादरी, मांडलेले(?)अस्त्याव्यस्त खेळणी, कपडे व यासगळ्यासोबत प्रत्येकाचे वेगवेगळे मंजुळ आवाज या तुलनेत हा सर्व निटनेटकेपणा व शांतता सुखावह होतीच).त्या रुम मधील बेडसाईजही, नगावर मोजल्यास एक भिडे, एक राउत व राठींनी जर थोडे आवळून घेतले तर तेही मावतील अशी होती.(थोडक्यात वजनावर जरी बसवायचे झाल्यास एक टन वजन घेऊ शकतील असे होते) फक्त चुडीवाल बसवायचे झाल्यास ८ तर नक्की बसले असते नवव्यासाठी मात्र एकाला बाजूनी पडू नये म्हणून पकडून ठेवावे लागले असते.

बेडवर पांढ-या शुभ्र चादरी टाकलेल्या होत्या.त्या इतक्या पांढ-या होत्या की त्यावरील एक छोटासा काळा डागही उठून दिसत होता.मी त्याकडे एक टक पाहत असतानाच तो अचानकच हलायला लागला.ते काय आहे हे निरखून पाहिल्यावर ती एक मुंगी असल्याचे कुशल विश्लेषण मी केले.मग ती कुठे चालली आहे हे पाहण्यासाठी मी ,मिकी माऊस कार्टून मधील प्लुटो कुत्रा जसा मागचे बुड वर करून समोरचे लांब नाक जमिनीवर टेकवत जसा सुंगत सुंगत जातो त्याप्रमाणे,तिच्या मागे जायला लागलो.मग लक्षात आले की ती दुस-या एका मुंगीचा पाठलाग करत आहे.`अगं लबाडे तिच्यावर वॉच ठेवतेस काय..नव-याचे दुसरे प्रकरण वाटतं..’ असे काहीसे विचार येत असताना पुढे ब-याच मुंग्या आहेत व त्यातील काही परत येताना झिंगत येत असल्याचे लक्षात आले.वापस येणा-या मुंग्या जाणा-या मुंग्यांच्या कानात काही निरोप देत होत्या.तो ऐकून जाणा-या मुंग्या अजूनच लगबगीने जात होत्या.शेवटपर्यंत माग काढल्यावर तेथे एका `बाटली’चे झाकण बेडच्या व गादीच्या फटीत अडकलेले आढळले.परत येणा-या मुंग्या `अगं..पार्टीतले ड्रींक्स संपत आलेत लवकर जा’ हे सांगत असणार हे उघड होते..माणसाने आपल्या या व्यसनाधिनतेच्या सवयी मुंगीइतक्या सुक्ष्म प्राण्यापर्यंत पोहोचवल्या आहेत हे पाहून माझ्या बुद्धीलाही `मुंग्या’ आल्या.

क्रमशः लवकरच..

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -८

हा लेख औरंगाबादच्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून १९८९ मध्ये कसे बसे का होईना १० वी काढलेल्या आमच्यासाख्या सदगुणी मुलांच्या स्नेहमिलनाबाबत आहे.हे स्नेहमिलन लोणावळा येथे दि.२८ व २९ जुलै २०१२ ला रंगले.

लोणावळा प्रवास (थोड्या विनोदी अंगाने) – भाग -८

विशेष सूचनाः

१. आज रियुनियनला बरोबर दोन महिने पुर्ण होत आहेत. सात भागांच्या सतत लेखनानंतर हा आठवा भाग लिहीतांना थकवा जाणवत होता.तो घालवण्यासठी एक बदल म्हणून थोडी वेगळी चव या भागाअखेर देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे जसे २ महिने सांभाळून घेतले तसेच सांभाळून घ्यावे.

२. आम्ही विनोदनिर्मीतीसाठी आजपर्यंत यथेच्छ वापरलेल्या या कथानकातल्या मुख्य पात्रांपैकी टाकळकर,निलेश व विनायक कुलकर्णी ह्यांनी आमचे लेखन अजून वाचलेच नसल्याची धक्कादायक बातमी नुकतीच समजत आहे.व विशेष म्हणजे आमचा एकही लेख न वाचता स्वतःविषयी व आमच्याविषयी असलेल्या प्रचंड आत्मविश्वासापायी विनायकरावांनी आम्हाला `प्रिंट आउट काढून विनोद शक्यतोवर लाल शाईने अधोरेखीत करून द्या’ असा प्रेमळ निरोप दिला आहे. त्यांनी स्वतःवरचे विनोद वाचून आमच्यावर राजकीय दबाव आणण्याच्या आधीच त्यांच्यावर पुन्हा विनोद लिहून सुड उगवून ठेवायचा मोठा चतुर निर्णय प्रस्तुत लेखकाने घेतला आहे.

आता पुढे….

लोणावळ्याची सरहद्द सुरु होताच अंगापिंडाने चांगला भरलेला हायवे अचानकच कुपोषीत बालकासारखा वाटायला लागला.चांगल्या ९०-१०० च्या वेगाने चालणारी आमची कार लोणावळा सुरु होताच १०-२० च्या वेगाने(?) रांगायला लागली. रस्त्यावर अचानकच गर्दी वाढल्याचे जाणवले.ती गर्दी फक्त `भाऊ’ गर्दी नसून त्यात अंगावर घालायच्या सगळ्यात लहान कपड्यातल्या जाहितातीतल्या वाटाव्यात अशा अनेक तुमच्या सगळ्यांच्या `ताया’ ही होत्या. विनायक, एखाद्या लहान भुकेल्या मुलाने आशाळभूत नजरेने मिठाईच्या दुकानातल्या भरलेल्या ताटांकडे पहावे तसे, एका चिक्कीच्या दुकानात एक टक आपले दोन्ही हात काचेवर ठेऊन बघत होता.`सकाळपासून सिगरेटशिवाय काहीही खाल्ले प्यायले नाही हो आमच्या विनुबाळाने ‘ असले काही कनवाळू विचार माझ्या मनात डोकवले असता `व्वा ! काय छान आहे` असे उदगार त्याने काढले.चिक्कीच्या एकंदर गुणवत्तेची एवढ्या लांबून त्याने केलेली मिमांसा व त्यावरचे मतप्रदर्शन जर आमच्या सौ.नी ऐकले असते तर `बघा..नाहीतर तुम्ही..साधा ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीतला फरक ओळखू येत नाही’ असे ताबडतोब ऐकायला मिळाले असते.आता आमच्या हिच्या ज्वारी, बाजरी, बेसण, गहू, पुरण, मका, कोथिंबीर, गाजर,बीट,कारलं,सोयाबीण व स्वतःचे केस एकत्र करून केलेली `पौष्टिक’ भाकरी जर ब्रम्हदेवानेही ही` ज्वारीची का बाजरीची’ एवढ्याच तपशिलात ओळखून दाखवली तर मी रणजित देशमुखांची झुपकेदार मिशी लिलावात विकायला करायला तयार आहे.असो, तर विनायकचे गुणवत्तेविषयीचे उदगार चिक्कीविषयी नसून तंग कपड्यात चिक्की खरेदी `करणारी’ विषयीचे होते हे लक्षात आले.इतक्या गर्दीत आपल्याला हवे ते हेरण्याच्या, त्या चश्मा लावल्याने अधिक तीक्ष्ण झालेल्या ,चार डोळ्यांच्या `चौफेर’ नजरेलाही आमचा मानाचा मुजरा.

लोणावळ्यात आम्ही जसे आत शिरत गेलो तसे गाडी इतकी मंदावली की शेजारून जाणारे सायकलवालेही आम्हाला ओव्हरटेक करत होते.एका ठिकाणी जेव्हा दोन चालणा-या माणसांनीही आम्हाला मागे सारले तेव्हा मात्र आपली कार थांबली असल्याचा एक मोठा चतुर अंदाज मी अचूक बांधला.लवकरच हा ट्रॅफिक जॅम आहे असा एक सार्वजनिक खुलासा झाला.पाउस व चिखल यामुळे चिक्की खरेदी करण्यासाठी थांबलेल्या काही हायवे प्रवास्यांनी आपाआपल्या गाड्या बाजूला दाबून न लावता भर रस्त्यात `बघू कोणात दम आहे आम्हाला बाजूला करायचा ‘अशा थाटात लावल्या होत्या.प्रत्येक गाडी आपल्या लगेच पुढे असणा-या गाडीला उद्देशून दात ओठ खात कर्कश्य हॉर्न वाजवित होती व त्या सगळ्या गाड्यांच्या त्या आवाजातून युद्धभुमीवर व्हावा तसा एक शंखनाद तयार झाला.मग चिक्की खरेदीसाठी उतरलेल्या प्रवाशांच्या दुकानदाराशी झालेल्या वाटाघाटी,चर्चा,चिक्कीची चव,त्यावरील समिक्षा,मग त्यावर होणारे मतभेद आणि सगळ्यात शेवटी चिक्कीच्या पिशव्यांची झालेली अदलाबदल असा एक पुर्ण कथा लिहीता यावी असा परिसंवाद त्या दुकानांवर चाललेला दिसला.
आपल्यामुळे रस्त्यावर काही हल्लकल्लोळ झाला आहे याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती हे मघाच्या त्या चिक्कीवाल्या सौंदर्यवतीच्या तोंडात मोठ्या लाडाने एक विंग्रजाळलेला थ्री फोर्थ विथ गॉगल तरुण चिक्की भरवतांना दिसल्याने समजले.खुल्या आसमंतात चाललेल्या या प्रणयक्रीडेकडे बघून इकडे आमची मराठमोळी थ्री फोर्थ मात्र आमच्या शेजारी बोटं मोडत बसलेली होती. मग काही मंडळीनी कारखाली उतरुन `चिक्की’क्षक गि-हाईकांना त्यांच्या या खरेदी दरम्यान रस्त्यावर निर्माण झालेल्या वाहतुकीच्या गळाचेपीची प्राथमिक माहीती दिल्यावर मग त्यांची या मंडळींसोबत उच्च माध्यमिकपातळीवरची बाचाबाची सुरू झाली.प्रत्येकाचा सुर हा `हा ट्रॅफिक जाम आमच्यामुळे झालेला नाही तर समोरच्यामुळे झाला’ असा होता.`आम्ही तर ट्रॅफिक जाम झाल्याय तोवर चिक्की खरेदी करावी म्हणून थांबलो’ असा त्यांचा युक्तीवाद होता.वादविवाद रंगत जाऊन एकमेकांच्या आई वडिलांची मोठ्या आस्थेने चौकशी सुरू झाली आणी आता हा वाद कुस्तीच्या फडात रुपांतरीत होणार अशी चिन्हे दिसायला लागली.मग काही जाणकारांनी मध्यस्थी करुन एकदाची ही कोंडी फोडावी म्हणून कोंडीच्या मुळाचा तपास करत करत ही चौकशी ब-याच पुढे उभे असणा-या एका खेचरावर ( मराठीत गाढव ) येऊन थांबली.
ते बिचारे दुकाना पलीकडे असणा-या एका गाढविणीकडे भान हरपून बघत उभे होते. तिच्याकडे बघताना मागे अचानक झालेल्या गलक्याने त्याची तपश्चर्या भंग झाली व इतकी गर्दी मागे पाहून त्याने तिथेच थांबण्याचा `गाढवपणा’ न करता तिथून `ह्यॅ ऊ, ह्यॅ ऊ, ह्यॅ ऊ’ असले अस्सल डॉल्बी साऊंड सिस्टिमला लाजवणारे आवाज काढत तेथून धूम ठोकली.त्याच्या या `ह्यॅ ऊ, ह्यॅ ऊ’ ला गाढविणीनेही `ह्यॅ ऊ, ह्यॅ ऊ’ असा आर्त सुरात स्टिरीयोफोनिक प्रतिसाद देउन जणू `कोई पत्थर से ना मारे मेरे दिवाने को..’ अशी आम्हाला करूणरसात याचना केली.त्या आर्ततेमुळे `माणुस’की दाखवत आम्ही त्यांना जाऊ दिले. यामुळेच कदाचीत आजही असेच एखादे गाढव गाढवीण पटवायचा एक हमखास इलाज म्हणून लोणावळ्याच्या त्या हायवे वर गाड्या अडवतांना दिसले तर आश्चर्य वाटणार नाही.
गाढव नजरेआड झाल्यावर आता लगेच वाहतुक सुरळीत होणार असा कयास बांधत आम्ही सावरून बसलो असता अचानक चहू बाजूंनी आपआपल्या गाड्या पुढे रेटण्याची जणू शर्यतच सगळ्यांमध्ये लागली. पण यावेळी आयत्या वेळी बाजूला होण्याचा योग्य निर्णय घ्यायला `गाढव’ समोर नसल्याने पुर्वीपेक्षाही मोठा पुर्णपणे मानवनिर्मीत ट्रॅफिक जाम तयार झाला.मग पुढची १५ मिनीटे आपआपली चालनक्षमता,शौर्य,चिकाटी,कोणाला धक्का लागला तरी दुर्लक्ष करायचा निलाजरेपणा,दंडातील स्नायूंची बळकटता,`अबे बाजू हट’ हे ओरडतांना लागणारे आवाजातले प्राबल्य,हॉर्न वर हाताचे दहा व अति गरज पडल्यास पायाचेही बोटं वापरून तो दाबून भयंकर आवाज करत गाडी दामटवण्याची हातोटी या किमान कौशल्यावर मदार ठेवून गाडी पुढे काढण्याची प्रक्रीया पार पडली.

त्या ऐतिहासीक एल ऍंड टी फाट्यावर आल्यावर आमची कार गर्रकन उजवीकडे वळली .वास्तवीक हा पुर्ण परिसर मी पहिल्यांदाच बघत होतो पण इतक्या वेळ मनिष ने वेगवेगळ्या कॉल ला दिलेली उत्तरे मला पाठ झाली होती.त्यामुळे मला माझा हा पुनर्जन्म आहे व मला मागच्या जन्मी माझे वास्तव्य असणा-या या खुणा, हे उखडलेले रस्ते,हे एल ऍंड टी चे गेट, हाच तो पुल, हाच तो लांब दिसणारा तलाव, हाच तो सरळ दरीत जाणारा रस्ता असे भास व्ह्यायला लागले..कानात ` एक हशीना थी एक दिवाना था…क्या उमर.. क्या समा.. क्या जमाना था….’ असे गाणे थेट किशोरदांच्या आवाजात घुमायला लागले( हशीना हा शब्द आपले लाडके मराठी नेते `समश्या’ शब्द वापरतात त्यावरून प्रेरित होऊन घेतला आहे त्याला व्याकरणाची नव्हे तर राजकारणाची चुक समजावी).पण नंतर पुन्हा अंगापिंडाने भरलेली,खात्यापित्या घरातली,रंगानी थोडीशी कमी पण देखणी,मादक चालीची,चंचल नजरेची,आकर्षक, थोडक्यात पाहताक्षणी कोणीही प्रेमात पडावी अशी आनंदरावांची सुमोसदृश्य गाडी आम्हाला दिसली.यावेळी त्यांनी ती एका निर्जन पुलावर उभी केलेली होती.त्या धुंद वातावरणात व त्या रम्य स्थळी ती अतिशय `पुल’कीत झालेली वाटली.तिच्या या दर्शनाने मी वास्तवात परत आलो.

आम्ही `ती’ ला पुलावर पार करून गेलो तेव्हा गाडीत कोणीही दिसले नाही.त्यामुळे चार डॉक्टरांच्या फौजेने `ति’च्या वरून वादविवाद होऊन एकमेकांना पुलाखाली ढकलत जीव दिला कि काय अशी एक कवी कल्पना मनात आली असतानाच गाडीच्या पलीकडून एका काचेच्या पेल्याची दुस-या काचेच्या पेल्याशी धडक झाल्याने जसा आवाज येतो तसा आवाज आल्याने सगळं `बरच’ चालू असल्याची खात्री झाली आणि जिवात जिव आला.आम्ही पुढे आल्यावर वेगवेगळ्या बंगल्यांसमोर वेगवेगळ्या नट नट्यांची नावे घेत मनिष एखाद्या गाईडने द्यावी तशी माहिती देत होता.`अरे हा सलमान चा बंगला..हा शाहरूखचा…तो एकदम मोठा ..हा..तो रे सगळ्यात उंच हा..तोच ..तो जलसा आपल्या अमिताभचा…परवाच येऊन गेला म्हणे तो…मनिष तेथील वॉचमनकडून रोज रात्री ब्रेकींग न्यूज मिळत असल्यासारखा सांगत होता.आणि हा….हा महितीये कोणाचाय तो…`मनिष हे बोलताना त्याच्या गव्हाळ वर्णावरही मला लाली चढल्यासारखी वाटली.(पुर्वी लाल गहू अमेरिकेतुन यायचे म्हणे ते हेच की काय असे वाटले).हा बिपाशा चा..हे बोलताना मनिष पाडळकर ,वय वर्षे ३८..दोन मुलांचा बाप..आपल्या स्टेअरींवरील डाव्या हाताने व्हील कॅप वरचा निघालेला एक दोरा बोटाभोवती लपेटत होता…तो लाजत होता हयावरुनच तो औरंगाबादच्या कौटुंबिक जाचापासून( वहिनी माफ करा सत्य खरंच कटू असतं) शरीरानेच नव्हे तर मनानेही खुप दूर लोणावळ्यात येऊन पोहोचलेला आहे याची प्रचिती आली. आम्हीही भक्तिभावाने त्या बंगल्याकडे बघितले.सचिन टाकळकर ने तर या भक्तिरसात डुंबून त्या बंगल्याचा नमस्कार वगैरे केल्याचा मला भास झाला.विनायक ची शोधक नजर त्या बंगल्याच्या आत डोकावण्याची काही शक्यता आहे का हे पाहू लागली.. इतक्या वेळ निर्विकार पणे बसलेले संसारमहर्षी सचिन काळे अचानकच सावरत बसले व `कुठेय कुठेय’ असे म्हणत पुढे सरसावले व हा फक्त बंगला आहे आत बिपाशा नाही हे समजल्यावर खा-या(विषय बिपाशा संदर्भातला असल्याने नमकीन) शेंगदाण्यातला एखादा खौट लागावा त्याप्रमाणे कडवट चेहेरा करून पुन्हा मागे टेकून बसले.

त्या अरूंद कच्च्या रस्त्यावरून मार्ग काढत आमची गाडी ऑर्चर्ड रिसोर्टच्या गेटमधून आत आली व मनिष ने मोठ्या स्टाईलने गाडी पार्कींगमध्ये लावली. पाय जमिनीवर ठेवले आणी एका वेगळ्याच विश्वात,वातावरणात आपण आलेले आहोत याचा अनुभव आला.आजूबाजूच्या निसर्गसौंदर्यात आकंठ बुडुन जात माझे मन विचारांच्या झोक्यावर झुलू लागले…..दरवर्षी येथे न चुकता घडणा-या एका कथेचा फास्ट फॉरवर्ड रिप्ले माझ्या डोळ्यासमोरून सरकला…..

….पांढ-या शुभ्र रिसॉर्ट च्या त्या इमारतीला त्याच्या समोर व आजुबाजूला असणारा निसर्गाचा सहवास कमालीचा खुलून दिसत होता.इमारती समोर असणारी टेकडी तिचा रोजचा सखा असणा-या घोंगावणा-या वा-याशी दवामध्ये चिंब होऊन रासक्रिडा करत होत्या.सारखे भिजून हुडहुडी भरू नये म्हणून तिने हिरवेगार उबदार `हरिततृणाच्या मखमलीचा’ शालू घातलेला होता.त्या दोघांच्या या प्रेमाला कोणाची नजर लागू नये असे वाटत असतानाच अचानक कुठूनतरी पांढरे ढग गोळा झाले.प्रथमदर्शनी ढगांचे वागणे `सोबर’ वाटल्याने वा-याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले व त्यांना हुसकाऊन लावले नाही.हळूहळू टेकडीच्या अप्रतीम सौंदर्याने पाघळून जाउन ढगाच्या मनात `काळं’ साठायला सुरूवात झाली. मग एकतर्फी प्रेमातून ढग टेकडीशी सलगी करू लागले.वेगवेगळ्या प्रदेशातल्या दुषित वायूंनी बरबटलेली त्या ढगांची नजर टेकडीला सरळ वाटली नाही.तिने आपल्या सख्या, वा-याला, याची भितभितच कल्पना दिली.अपेक्षेप्रमाणे वारा संतापला त्याने कोणाचीही मदत न घेता सरळ ढगांवर हल्ला चढवला.पण आज ढग पुर्ण अस्त्र सोबत घेऊन आले होते.खुप वेळ तुंबळ युद्ध झाल्यावर ढगाने आपले शेवटचे हत्यार म्हणजे विज अस्त्र बाहेर काढले व त्याने कडाड….असा आवाज काढत वा-यावर प्रतिहल्ला चढवला व एकहाती झुंज देत पुर्णपणे थकलेला वारा हळू हळू करत मुर्छीत होऊन पडला.आपल्या प्राणप्रिय वा-याचा झालेला हा असा करूण अंत पाहून टेकडी ओक्साबोक्षी रडू लागली.तिच्या डोळ्यातून निघणा-या त्या अश्रुंचा बांध फुटला व ओहोळ,ओढे बनून वाहू लागला.त्यावेळी टेकडीच्या नकाराने रागावलेल्या ढगांनी आपल्या जबरदस्त शक्तीच्या जोरावर तिच्यावर तिरस्काराचा पाउस पाडायला सुरुवात केली.टेकडी त्या पावसाने पार भिजून गेली.पण स्वतःच्या अंगावरच्या हिरव्यागार शालूचा पदर थोडाही ढळू न देता खंबीरपणे तशीच उभी राहीली.हिला आता आपल्याशिवाय कोणी नाही असे वाटून पावसाने तिला चांगलीच झोडपून काढली पण टेकडीने आपले शील सांभाळले.एका आदर्श पतिव्रतेप्रमाणे ढगांनी दिलेल्या या यातनांचा निश्चलपणे सामना करत टेकडी सुर्यदेवांची मनोमन प्रार्थना करू लागली.तिच्या डोळ्यातून वाहणारा अश्रुंचा पुर कितीतरी वेळ तसाच वाहत होता.तिच्या या सावित्री साधनेला देव पावले व त्यांनी वा-याला पुन्हा जिवंत केले.यावेळी वा-याने मागच्या वेळी केलेली एकट्याने आक्रमण करण्याची चूक केली नाही.सोबत सुर्यदेवांना `बॅक अप’ ला ठेवून वा-याने पुन्हा ढगांवर जोरदार हल्ला केला.यावेळी ढगही पुर्ण थकलेले होते.त्यांनी आपले नेहेमीचे गि-हाईक असणारे नद्या,नाले,तलाव,शेतं,कालवे यांना डावलून आपले पुर्ण `द्रव्य’ एका टेकडीला आपलेसे करण्यासाठी खर्च केले होते(एका स्त्री पायी आपले सर्वस्व पणाला लावण्याचा छंद फक्त मानवालाच नाही तर..).सुर्यदेवांच्या साथीने आलेल्या व पुर्वीपेक्षा कितीतरी ताकतवर वाटणा-या वा-याच्या या रौद्ररुपाला पाहून पाहता पाहता ढगांनी तेथून धुम ठोकली.वा-याने विनंती केल्यावर सुर्यदेवांनी पावसाने चिंब भिजल्याने हुडहुडी भरलेल्या टेकडीच्या अंगावर उन पाडून आपले `रुम हिटर’ चालू केले.टेकडीचे अश्रुही वा-याला पाहून पार पळून गेले व ती सुर्यकिरणांच्या त्या मायेच्या उबदार छत्रछायेखाली अधिकच निहारून निघाली.हिरवागार शालू, उन्हाने आहेरात दिलेल्या सोनेरी रंगाच्या गळ्यातल्या माळा,नथ,कानातले झुमके,पायातले पैंजण,केसात ओवलेला रंगबिरंगी फुलांचा गजरा यामुळे सौंदर्याचा कडेलोट वाटणा-या त्या टेकडीला मग वा-याने सुर्यदेवांच्या साक्षीनेच मागणी घातली आणी अधिक वेळ न दवडता सुर्यदेवांनी त्या दोघांचा यथासांग लग्नसोहळा पार पाडला…..शुभमंगल सावधान……मी नकळत पुटपुटलो..

अबे नानकर…? बिल्डरने प्रोजेक्टसाठी जंगलतोड करून भुभाग रिकामा करावा व त्यातील काही झाडं फक्त (पुन्हा लावली तर मोठी व्हायला अनेक वर्षे लागतील हा व्यावहारीक विचार करून) शिल्लक ठेवावीत त्याप्रमाणे बरेचसे टक्कल पण काही भागात केस असणा-या डोक्याचा सारंग मधुसुदन भिडे नामक बालमित्राच्या हाकेने मी भानावर आलो.सारंग आज इतक्या वर्षांनी भेटत होता .त्याचा हसरा चेहेरा,(भिड्यांचा ट्रेडमार्क असणारे) घारे डोळे,अबधित ठेवलेली गोलाई पुन्हा पाहताना एक गोष्ट मात्र खटकली की कधीकाळी शुद्ध पांढ-या पालीसारखे असणारे भिडे आज वर्णाने ब-यापैकी देशस्थ वळणाला लागलेले होते.

क्रमशः लवकरच..