Tuesday, August 6, 2013

खड्डे मे रहने दो…खड्डा न हटाओ.

खड्डे मे रहने दो…खड्डा न हटाओ.

विशेष सूचनाः
१.या लेखातील कुठलाही रस्ता,सिग्नल वा खड्डा काल्पनिक नाही.कल्पनेत बसलेले हिसके,दणके कमरेत ( व बहुतांशी खाली) रात्री दुखत नसतात.

२.हा लेख वाचल्यानंतर कोणीही केलेला अब्रु नुसकानी (का नुकसानी)चा दावा स्विकारला जाणार नाही.दावा करताना ती शिल्लक असण्याचा पुरावा तयार ठेवावा.

३.या लेखाची प्रेरणा शहरातील एकाहून एक असे जातीवंत खड्डे व अमित कुलकर्णी ( हे खड्डे नव्हेत हे आमचे परममित्र) यांच्याकडून मिळाली आहे.एकाच्या असण्याची सवय झालेल्या आम्हाला दुस-याने आठवण करून दिली आहे.दोघांचेही आभार.

औरंगाबाद जिंदाबाद….१५० मर्सिडिझ ची रातोतात विक्री,शेकडो बी.एम.ड्ब्ल्यू.ची क्षणार्धात नोंदणी…दिल्ली मुंबई कॉरीडॉर औरंगाबा्द मधून….व्वा….मस्त…असं वाटतय धरतीवरील स्वर्गच जणू हा…रायझींग औरंगाबाद..

तर अशा या रायझिंग औरंगाबाद मध्ये आज जिकडे तिकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे खड्ड्यांची.आणी ती इतकी वाढली आहे की दिवस रात्र,प्रत्येक गल्ली बोळ,सरकारी/निमसरकारी/खाजगी कार्यालयं,पान टप-या,दवाखाने, परवाना दारूखाने, आम्लेटच्या गाडीआड लपलेले विनापरवाना दारुखाने, वसतीगृह, बस स्टॉप्स,स्टेशन, शाळा, वर्तमानपत्रे व शिशु विहार या सगळीकडे या प्राणप्रिय खड्ड्यांशिवाय बोलायला विषयच राहिलेला नाही.अहो मी तर इथवर ऐकलयं की एक रस्ताही दुस-याला `तेरे खड्डे मेरे खड्डोंसे ज्यादा कैसे’ असे असूयेने विचारत आहे.

आताशा तर हा विषय गमतीचा व विनोदाचाही झाला आहे.खड्डे पार करण्यासाठीची लांब उडी शर्यत,त्यात साचणा-या पाण्यात होडी स्पर्धा यामुळे वैचारीक नूतनिकरण झाले आहे.या खड्ड्यांमध्येही प्रचंड वैवीधता आहे.जसे देवाने एक माणूस दुस-यासारखा बनवलेला नाही त्याप्रमाणेच कुठलाही एक खड्डाही त्याने दुस-यासारखा बनविलेला नाही.काही खड्डे गोल तर काही निमुळते,काही चौकोनी,षट्कोनी तर काही अगदी अमिबा च्या आकाराचे (जिवशास्त्र ह्या विषयाची चिकटलेली पानेही न सोडवलेल्यांसाठी अमिबाचा आकार  म्हणजे ढोबळमानाने शाळेत पेनाने उडवलेली शाई मास्तरांच्या पॅंट वर मागून दिसायची तो आकार) .काही खूप खोल अगदी एखाद्या थोर तत्ववेत्त्याप्रमाणे आमच्यासारखे तर काही अगदीच उथळ (अगदी तुमच्या सारखे).   काही राजबिंडे ,अगदी शिल्पकाराने घडवावेत असे, तर काही एकदमच पु-यांच्या ओमच्या चेहे-याचे, ओबड्धोबड. जरा निरखून पाहीलं तर एक असाच ओबडधोबड खड्डा जरा थोड्या पलीकडल्या गल्लीतल्या एका रुपवान खड्ड्याला ( ती बहुदा खड्डी असावी) उद्देशून `आप जैसा कोई मेरे जिंदगीमे आये…’ असे गाणे मर्दानी आवाजात म्हणाला (यातील जिंदगी तला `ज’ जेम्स या शब्दातल्या `ज’ सारखा करावा) आणी त्यावर लगेच त्या खड्डी ने `गेला खड्ड्यात’ असा फुत्कार केला. हे आभारप्रदर्शन चालू असतानाच पलीकडून आलेल्या एका मर्सिडिजचे चाक अंगावरून गेल्याने एक नाजूक खड्डयाने आपल्या कमनीय बांध्याला आळोखे पिळोखे देत `हट मुडद्या…काय डोळं फुटलं कारं तुझे…काय खड्डा दिसत नाही का…?  असे सुविचार ऐकविले.तोवर मर्सिडीजच्या त्या अस्मानी सौंदर्याचा अस्वाद पलीकडच्या एका वयाने व आकाराने वाढलेल्या खड्डयाला मिळाला.मर्सिडीजचे एक आख्खे चाक त्या खड्ड्यात तयार झालेल्या जलतरण तलावात `चला आंघोळीला जाऊ..चला आंघोळीला जाऊ..अशी लावणी वजा कवीता म्हणत उतरले.व पुर्ण तलावातील पाणी बाहेर फेकत ईतर आजूबाजूच्या छोट्या छोट्या सखल भागातल्या खड्ड्यांना आंघोळ घातली गेली.आता ह्या खडड्यांमध्ये अनेक उंदीरांनी आपआपली बि-हाडे थाट्ली होती.अचानक आलेल्या ह्या पुराचा फटका या पुर्ण उंदीरपुरमला बसून अनेक उंदीर मिसींग झाल्याची एफ.आय.आर. दाखल झाल्याचे समजते.

त्याच रस्त्यावर थोडं पुढे एक सिग्नल होता.त्या सिग्नलच्या आधी गतिरोधक व त्या आधी अनेक छोट्या मोठ्या खड्ड्यांची वसाहत असा एकंदरीत अडथळ्याच्या शर्यतीत असतो त्याप्रमाणे असणारा प्रपंच होता.थोडक्यात सिग्नल पार करेपर्यंत दुचाकीस्वाराला गणपती उत्सवात सापडणा-या स्लो सायकलींग चा गाढा अभ्यास करता येईल हा सरंजाम.

असाच एक खड्डा पार करता करता उधळलेल्या एका दुचाकीवरून मागे बसलेल्या एक प्रचंड काकू अखंड खाली पडल्या आणी विशेष म्हणजे दुचाकी चालवणा-या (त्या मानाने) किरकोळ काकांना या घटनेचा मागमूसही लागला नाही.काकू `अहो अहो मी पडले’ अशा काही गगनचुंबी आवाजात किंचाळल्या की खरं म्हणजे पंचक्रोशीतील समस्त `अहों’च्या गाड्यांना करकचून ब्रेक लागला असणार. हे काका मात्र निर्वीकारपणे सिग्नल पर्यंतची अडथळ्याची शर्यत पार पाडून पुढे निघून गेले.या ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार असणा-या काहींनी मग अक्षरशः त्या (पळून जाणा-या) काकांना पाठलाग करून थांबीवले व जवळपास जबरदस्तीनेच काकूंना घेऊन जायला लावले.का कोण जाणे पण काकूंना परत घेऊन जातांना काकांच्या चेहे-यावर कमालीचे नैराश्य होते.

अजून थोडं पुढे आल्यावर एका मोठ्या महाकाय खड्ड्यासमोर एक मोठा शामीयाना टाकलेला होता व त्यावर `या खड्ड्यावर पुल बांधला जावा यासाठी आमरण उपोषण’ सुरू होते.यातील आमरण व उपोषण या शब्दांच्या मध्ये खूप जागा सोडलेली होती व त्या ठिकाणी आयत्यावेळी चिटकवण्यासाठी `साखळी’ हा शब्द वेगळा बनवून बाजूला ठेवलेला दिसला.गरज पडल्यास हे उपोषण साखळी होणार आहे हा त्यावरून बोध झाला.उपोषणाचा आज तिसरा दिवस होता व बहुतांशी उपोषणकर्ते हे भांग वगैरे पाडून,साफ दाढी करून हसत खेळत,कोणी मोबाईलवर गप्पा मारत बसलेले होते.यावरून `साखळी’ सुरू आहे हे लक्षात आलं.तेवढ्यात महापालीकेची एक गाडी तेथे येऊन थांबली व हास्य अभिवादन झाल्यानंतर त्यातून आलेल्या अभियंता टीम ने त्या खड्ड्याचे मोजमाप घेतले.अनेक खलबतं झाल्यानंतर साधारण या खड्ड्यांवर बांधण्यात येणा-या पुलाच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला व लगेच एका कागदावर या पुलाच्या बांधकामासाठी काढाव्या लागणा-या निवीदेचा मजकूर तयार करण्यात आला.त्यावेळी शामियान्याच्या मागे असलेल्या एकमेव मोकळ्या खड्ड्यारहीत जागेमध्ये (म्हणजे एका खूप मोठ्या कॉंक्रिट सोक पिट च्या छता वर) चार पाच व्यक्ती व हे अधीकारी यांच्यात सखोल चर्चा झाली.बहुदा ही निवीदा कोणाला दिली जावी याविषयी ठराव पास झाला असावा कारण लगेच त्यानंतर ते उपोषण सोडण्यासाठी मुद्दामून आधीच तयार करून ठेवलेला मोसंबीच्या रसाचे प्राशन केले गेले (मोसंबी हे फळ फक्त उपवास सोडायला चालते असे समजून मी अनेक दिवस ते उपवासी पदार्थ म्हणून खात नसे.) तुडूंब पोटानी पुर्ण रस्ता अडवत उभी असलेली ही वरात निरनिराळ्या वाहनांमधून स्वरगृहाकडे निघाली.

कसाबसा हा महाकाय खड्डा मी पार करत पुढे आल्यावर साधारण एक १०० मिटरवर जोरदार भाषणे चाललेली होती. अरे हो आज `आंतरराष्ट्रीय खड्डा दिन ‘ नाही का?.या दिनानिमीत्त काही विशेष लक्षणीय योगदान दिलेल्या खड्ड्यांचा जाहीर सत्काराचा हा कार्यक्रम होता.अतिशय कमी वयात जास्तीत जास्त वाहनांची शॉक अब्जॉरबर्स निकामी करण्याचा विक्रम आपल्या नावावर करत जालना रोडवरील खड्ड्यांनी बाजी मारली.त्यांनी समर्थनगरच्या होतकरू तरूण खड्ड्यांना मोठ्या फरकाने हरविले.त्यावर समर्थनगर गटाने निकृष्ट दर्जाच्या कामाचे पुर्ण प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने खंत व्यक्त केली व एकूणच रस्त्याच्या भौगोलीक स्थितीमुळे नेहेमीच वर्दळ जालना रोडला जास्त राहणार असून  निवडीचे निकष बरोबर नसल्याची निवड समितीवर जाहीर टिकाही केली.

काही इतर स्पर्धांमध्ये स्टेशन रोड खड्ड्यांना कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त मानवी अवयव निकामी केल्याचा विशेष पुरस्कार देण्यात आला.त्यांनी सिडको भागातील खड्ड्यांना काही `हाडांच्या’ अंतराने हरविले.शेवटच्या क्षणी स्टेशन रोड वर फ्रॅक्चर झालेल्या एका विदेशी तरूणाची माहीती निवड समितीकडे आल्याने सिडकोला हार मानावी लागली.त्यावर सिडको प्रवक्त्याने यात `विदेशी’ लिंक असल्याचा खळबळजनक आरोप केला.

याच प्रसंगी `लॉंग लेग,फाईन लेग,स्क्वेअर लेग,लेग ब्रेक ही सर्व नावे खड्ड्यांमुळे क्रिकेट या खेळाला मिळाली असल्याने त्याच्या प्रत्येक वापरावर बी.सी.सी.आय. व आय.सी.सी. ह्या परोपकारी सामाजीक संस्थांनी `आंतरराष्ट्रीय खड्डा महासंघास’ रॉयल्टी द्यावी असा ठराव पास करण्यात आला.
यावेळी हिमालयन कार रॅली सारख्या क्रॉस कंट्री स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविण्यासाठी काही साहसी तरूणांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने खड्डा महासंघाच्या वतीने औरंगाबाद शहरात कुठल्याही रस्त्यावर सराव करण्यास विशेष वेळ देण्यात आला.यावर काही जाणकारांनी अशा पायाभूत सुविधा औरंगाबाद सारख्या प्रगत शहरातच नव्हे तर प्रत्येक छोट्या छोट्या शहरात दिल्यास लवकरच नुसत्या कार रॅलीसाठीच नव्हे तर स्लो सायकलींग,अडथळ्याच्या शर्यती,लांब उडी,उंच उडी व वरचेवर प्रत्येक रस्त्यावर वाढत चाललेले जलतरण तलाव बघता जलतरण,वॉटर पोलो अश्या विवीध स्पर्धांमध्ये भारताला लवकरच ऑलंपीक पदके मिळू लागतील असा आशावाद व्यक्त केला.

खडड्यांमध्ये रस्त्यांचे आंतरपीक घेण्याच्या या अभिनव प्रयोगाला शासनाचा या वर्षीचा `खड्डामित्र’ पुरस्कार निर्विवाद औरंगाबादेतील खड्ड्यांना देण्यात यावा व हे आंतरपीक यापुढे `औरंगाबाद पॅटर्न’ या नावाने ओळखले जावे हे सर्वानुमते ठरले. यावर काही इतर शहरातील जातीवंत खड्ड्यांकडून विरोध व्हायची शक्यता लक्षात घेता आतापासूनच त्याचे व्यवस्थीत विपणन ( मराठीत मार्केटींग)  करण्याची जबाबदारी औरंगाबाद महापालीकेनी घेण्याचा ठरावही पास झाला. त्यासाठीचा एक उपाय म्हणून खड्ड्यांची तिव्रता मोजमापक यंत्र हे भूकंपमापक `रिक्टर स्केल’ तत्वावर विकसीत करून त्याचा उपयोग खड्ड्यांची प्रत ठरविण्यासाठी लवकरात लवकर येथील होतकरू खड्ड्यांसाठी करण्यात यावा असेही ठरले.

 खड्ड्यांच्या विकासासाठी काही निधी उभारावा लागणार असल्याचे खड्डा महासंघाचे आर्थीक सल्लागार उदगारले.त्यावर झालेल्या वैचारीक उहापोहीत काही असाधारण विचार मांडून शहराच्या वैचारीक विकासाचीही जाणीव उपस्थितांनी करून दिली. त्यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे

१.शहरातील सर्व खड्ड्यात मिळून साचणारे पाणी नदी जोडो च्या धरतीवर `खड्डा जोडो’ अभियान राबवून जायकवाडीला विकल्यास त्यातून मिळणारा निधी खड्डा एकात्मीक विकास प्रकल्पावर खर्च करता येईल.बरेचसे खड्डे हे एकमेकांना या आधीच्याच रस्ता उभारणी कामातच जोडले गेले असल्याने त्यावर तसाही जास्त पायाभूत खर्च लागणार नाही.यावर काही उपस्थितांनी जायकवाडीपेक्षा हे पाणी नगर जिल्ह्याला दिल्यास जास्त उत्पन्न मिळेल याची जाणीव करून दिली. त्यावर स्थानिक सामाजिक बांधीलकी जपावी केवळ आर्थिक उद्धार बघू नये असा मौलीक शेराही ऐकायला मिळाला.

२.काहींनी हे पाणी जायकवाडीला देण्यापेक्षा यात साचलेल्या पाण्यामुळे व धक्क्यांमुळे पसरणा-या रोगराईकडे लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.आपण हे पाणी केवळ तसेच साठवून ठेवण्याची तयारी दाखवल्यास अनेक औषधी कंपन्या व काही स्थानिक डॉक्टर्स व रुग्णालयांकडून मोठ्या देणग्या मिळवून निधी उभारू शकतो व त्यातून मोठे मोठे खड्डे विकसीत करता येतील असाही विचार मांडला.याला सर्वांनी एकमताने अनुमोदन दिले.

३.  औरंगाबाद मधील खड्ड्यांकडून सर्वांना प्रेरणा घेता यावी व त्याचबरोबर स्थानिक खड्ड्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा या उद्देशाने येथे एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कायमस्वरूपी `खड्डा प्रदर्शन केंद्रा’ला मान्यता मिळवावी असा आदेश पालीकेला देण्यात आला.

४. स्थानीक खड्ड्यांनी नुसत्या आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा न करता आंतरग्रहीय स्तरावरील स्पर्धेचा या २१ व्या शतकात विचार केला पाहिजे हे सांगतांना वक्त्यांनी काही चंद्र व मंगळ ग्रहावरील खड्ड्यांची छायाचित्रे दाखविली.ती बघितल्यानंतर स्थानिक खड्ड्यांचा दर्जा किती सुधारण्याची गरज आहे याची जाणीव उपस्थितांना झाली.

५.मर्सिडीज व बी एम डब्ल्यू कंपन्यांनी औरंगाबादमधे त्यांची झालेली विक्री ही केवळ नवीन गाड्यांपुरती मर्यादीत न राहता सुटे भागही जोमाने विकले जावे यासाठी काही खड्ड्यांना प्रायोजकत्व देऊ केल्याची आनंदाची बातमीही यावेळी देण्यात आली.या मिळणा-या निधीतून काही खड्डेविकास कार्यक्रम राबविले जातील हे ही जाहीर झाले.त्याचबरोबर काही जास्त `ग्राऊंड क्लियरन्स’ असणा-या गाड्यांना सुट्या भागाच्या विक्रीतील नफ्याची जाणीव करून देण्यासाठी काही खड्ड्यांची खोली प्रयत्नपुर्वक वाढावी यासंदर्भात एक तांत्रीक समितीही स्थापन झाली.त्या समितीचे मुळ काम हे ग्राऊंड क्लियरन्स’ जास्त असतानाही गाडी कशी खड्ड्यांमध्ये खिळखिळी करू शकतो याचा अभ्यास करणे हा होता.

६.समस्त खड्ड्यांकडे तरूण वर्गाला आकर्षीत करण्यासाठी काही लोकप्रिय गाण्यांचे रिमीक्स करण्याचा निर्णय झाला. त्यात मुख्यतः `हम तुम एक खड्डे मे बंद हो और पाऊस आ जाए’,`खड्डे मे रहने दो …खड्डा न हटाओ..’ तसेच `खड्डा है खड्डा…खड्डे के पिछे…खड्डा नशी है’ या प्रणयगितांसोबतच ..`खड्डे के पिछे क्या है खड्डे के पिछे….’ अशी स्फुर्तीगितेही समाविष्ट करण्यात आली. `एक दोन तीन..चार पाच छे सात आठ नौ दस ग्यारह बारा तेरा….’ह्या तेजाब चित्रपटातील गितावर एक चौरस फूटात सर्वसाधारण प्रत्येक औरंगाबादच्या रस्त्यावर असणा-या खड्ड्यांची संख्या बिनचूक टॅली होत असल्याने ते गीत खड्ड्यांची जनगणना करणा-या अधिका-यांसाठी एक अधिकृत गणनागीत म्हणून जाहीर करण्यात आले.तसेच या अल्बम ची जाहीरात करताना खड्ड्यांच्या व्हिडियोच्या पार्श्वभुमीवर `हमे और जिनेकी चाहत न होती..अगर तुम न होते…ह्मे जो तुम्हारा सहारा न मिलता ..भॅंवर मे ही रहते किनारा न मिलता….’ हे गीत खड्ड्यांना उद्देशून वाजवावे हे एकमताने ठरले. यामुळे जनसामान्यात खड्ड्यांविषयी प्रेमभावना उत्पन्न होईल असा एक युक्तीवाद झाला.

७. काही दुष्ट समाजसेवकांनी खड्डे बुजविण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर चालवलेले आहेत.ही बाब खूप गंभीर असून त्यासाठी मोठी जनजागरण मोहीम `बेटी बचाव’ आंदोलनाच्या धरतीवर `खड्डे बचाव’ आंदोलनाच्या स्वरूपात राबवायचा निर्णय झाला.त्यासाठी काही सामाजिक संस्थांची मदत घेऊन खड्डे बुजविण्यासाठी लागणारी खडी तयार करणा-या अनाधिकृत स्टोन क्रशर केंद्रावर धाडी टाकण्याचे ठरले.पण नंतर थोड्यावेळाने (मध्ये आलेल्या काही मोबाईल कॉल्सनंतर) यासंदर्भात एक ३ सदस्यीय चौकशी समिती स्थापन करून तिच्या अहवालाची वाट पहायचे ठरले. दरम्यानच्या काळात खड्डे बुजविण्यासाठी पालीकेकडून करण्यात येणारे उपाय कंत्राटदाराला हाताशी धरून मुद्दाम खूप पाऊस चालु असताना करावे जेणेकेरून ते लगेच वाहून जातील हे ही ठरले.

८.खड्ड्यांकडे पर्यटक आकर्षीत व्हावेत यासाठी बिबीका मकबरा ही जशी ताजमहलची प्रतिकृती तशी येथील कुठलाही रस्ता म्हणजे लोणारची प्रतिकृती अशी प्रसिद्धी करायचे ठरले व लोणार विवराला मिळालेल्या ऐतेहासिक पार्श्वभूमीचा फायदा करून घेण्याचा निर्णय झाला.

हुश्श…खूप लिहीलं हो…पण काय आहे ना…वेळ खूप आहे माझ्याकडे…नुकताच अशाच एका खड्ड्यातून उधळल्यामूळे मानेच्या का पाठीच्या मणक्यात गॅप तयार झाला आणी बेड रेस्ट चा सल्ला दिला डॉक्टरांनी…पण काही म्हणा तुम्ही दोष यात ना पालीकेचा ना सरकारचा…दोष आपलाच…
म्हणूनच सगळे म्हणू या
खड्डे मे रहने दो…खड्डा न हटाओ.
जय हो..रायझींग औरंगाबाद….