Wednesday, March 27, 2013

मी,ही,तो व ते (भाग-३)


किडनी स्टोन विषयावरील या लेखनाचे दोन भाग पुर्वीच फेसबुक प्रकाशीत झालेले आहेत.पण नंतर दोन-अडीच महिने तिसरा भाग लिहीता आला नाही.काल एका परममित्राने केलेल्या आग्रहाने पुन्हा लिहीण्याचा हुरूप आला आहे.तरी तिसरा भाग रंगपंचमी निमीत्त प्रकाशीत करीत आहे. हे करताना `मार्च एंड’ ला उदयोजकांनी खूप कामात असल्याचे व अजिबात जेवायलाही वेळ नसल्याचे दाखवावे हा अलिखित नियम मी धाब्यावर वा टेरेसवर बसवत आहे.त्यामागे सध्याची उदयोगांची `टाईट’ परिस्थिती दर्शविणे हा एक छुपा उद्देश आहे.(`टाईट’ म्हणजे आर्थीक मंदी या अर्थाने..)


या कथेतील `मी’ व `ही’ म्हणजे मी व आमच्या सौभाग्यवती,`तो’ म्हणजे आमच्या `ही’ ला झालेला किडनी स्टोन व `ते’ म्हणजे आम्ही त्या स्टोनवर केलेले विवीधांगी ईलाज आहेत.
मी,ही,तो व ते (भाग-३)
विशेष सूचनाः
१.      भाग-१ वाचून भाग-२ व भाग-३ ला वाचा म्हणजे वाचनाचा संदर्भ लागेल.

आता पुढे वाचा…

त्या सुचनापत्रिकेमध्ये जवळ पास सर्व प्रकारच्या आजारामध्ये घ्याव्या लागणा-या काळज्या व निसर्गोपचाराप्रमाणे असणारे विवीध उपाय यांचा एक अनुक्रमांकासह लिहीलेली यादी छापलेली होती.व त्यात त्या त्या व्यक्तीच्या आजाराप्रमाणे डॉक्टर टीक मार्क करून देत होते.जसे आमच्या हिचा आजार किडनी स्टोन असल्याने त्यावर त्या विकाराशी निगडीत उपचारांवर डॉक्टरांच्या सांगितल्याप्रमाणे त्या मुलीने टीक करून दिले.जसे अनुक्रमांक एक च्या सुचनेत `सुबह का पानी’ असे लिहीलेले मी वाचले.आता `सुबह का पानी’ यामुळे हे मोरारजींचे उपचारशास्त्र तर नव्हे असे वाटून मी तोंड वेडे वाकडे करत पुढे वाचले त्यात  `रोज मुंह धोने से पहले चार ग्लास ठंडा पानी मटके का पिना’ असा उल्लेख होता.सौ ने बहुदा `मुंह धोने से पहले चार मटके पानी पिना’ असे वाचले असावे कारण तिने (स्वतःच्या) तोंडाचा त्या मटक्यालाही गिळेल इतका मोठा आ करून चार..? असे उदगार काढले.त्या उपचारातले पुढील सेकना व मालीश तेल हे किडनी स्टोन ला लागू नसल्याने त्याला टिक नव्हती.मग पुढे लाल भोपळा रस व दुधीका रस असले दोन कुठल्याही ज्यूस सेंटर च्या मेनूत कधीही न पहायला मिळालेले ज्युस आईटेम्स दिसले.आता हे दोन्ही रस घरी करून प्यायचे आहेत हे समजल्यावर सौभाग्यवतींच्या चेहे-यावर अक्षरशः लाल भोपळ्याचा अर्क उतरला. तिने तिला रोज सकाळी उठून चार ग्लास पाणी पिऊन त्यानंतर हे भोपळ्याचे रस काढत बसणे अजिबात जमण्यासारखे नसल्याचे मोठया निर्धाराने सांगितले व तयार ज्युसच कुठे मिळत असल्यास सुचवावे अश्या सुचना ब-यापैकी स्पष्टवक्तेपणाने दिला.(हिच्या स्पष्टवक्ते पणाचा दुसरा एक अनुभव --  मागे एकदा आमच्या एका ओळखीच्या एक बाई आपल्या शरीराला व वयाला न शोभणारी जिन्स व पॅंट टी शर्ट घालून आम्हाला बाजारात भेटल्या.थोडया गप्पा झाल्यावर ही त्यांना चारचौघात म्हणते कशी `ऑंटी,ये अल्ट्रा एक्स्ट्रा लार्ज कपडे आप सिलवाती है या रेडिमेड मिलते है?’ त्यानंतर त्या बाईंनी जिन्सच काय पण पंजाबी ड्रेसही घालणे सोडले असेल (व साडया घालायला सुरूवात केली असेल).
पण डॉ.पटेल बरेच अनुभवी होते.सौभाग्यवतींच्या त्या `करत नाही जा’ अश्या या सरकारी पवित्र्याला त्यांनी `मग तुजे पथरी कोन काढनार? मने लागे छे के तमने एक बहादुर छोकरी छे’ अशी लहान मुलीची समजूत काढावी त्याप्रमाणे उत्तर दिले.आपला उल्लेख `छोकरी’ अशा एकदम षोडशवर्गात झाल्यामुळे सौ तुडूंब खुष झाल्याचे त्यांच्या चेहे-यावरून जाणवले.मग तिने एकदम आपला सगळा असहकार बाजूला करत एकदम `ठीक आहे पण ज्यूसच हो फक्त..’ असे एकदम `५० क्युसेक्स पाणीच हा फक्त’ असे नाशिक,नगर जिल्ह्यांनी मराठवाडयाला पाणी सोडताना म्हणावे तसे उपकाराच्या भावनेने सांगितले.
   
डॉ.पटेलांच्या त्या यादीमध्ये पुढे `मोड आए हुए मुंग हिंग +जिरा+नमक+लिंबू रस डालकर खाना, एक केला+२ चमच शहद+१ चमचा आवला पावडर+१ चमचा खडी साखर+ईलायची पावडर सब मिलाकर सुबह श्याम खाना’ असल्या पुष्कळ दिवस रात्र खाण्यापिण्याच्या गोष्टी होत्या.या सगळ्या पावडरी एकत्र केल्यावर तयार होणारे मिश्रण आतल्या त्या किडनीतील दगडावर ग्राईंडर सारखे घासले जाण्याइतके मजबूत होत असेल असे मला वाटले.आता वाचताना पान संपल्याने मला हायसे वाटले.एवढ्यात डॉक्टर तत्परतेने `पुढचा पान वाच’ असे म्हणाले.अजून एक पान आहे हे ऐकल्यावरच मला पहिल्या पानावर पोटात भरपेट रिचवलेले सगळे पदार्थ बाहेर येतील की काय असे वाटायला लागले.पुढे सदाफुली नावाच्या फुलाचे रोज एक-दोन-तीन असे वाढत्या क्रमाने फुले खायचा सल्ला देण्यात आलेला होता.पण त्याला टिक नसल्याने मला हायसे वाटले अन्यथा रोज सदाफुलीचे झाड शोधणे व तिथे कोणी आपल्याकडे बघत नाही याची खात्री करत मग मागच्या दोन पायावर उभे राहून पुढचे दोन पाय झाडावर टेकवायचे व तोंड समोर करून फुले रिचवायची ही `बकरी’ कला अवगत करण्यातच बरेच दिवस गेले असते.

आता यादीत फुलं संपून फळं,भाज्या ही त्यांच्या जुळ्या भावंडांची नावे यायला सुरूवात झाली.`फल खाना’ मग `टमाटर+कोथींबीर+सॅलरी की भाजी पानी के साथ रस बनाकर खाना’ असले मौलीक विचार होते.त्यात टमाटर सोबत सॅलरीच्या सॅलरी भिजवून पाण्यासोबत पिणे म्हणजे निव्वळ महिन्याभरची कमाई अशी एका सामान्य चिरकूट खडयाला अर्पण करण्यासारखे होते.आणी तो खडा म्हणजे काय बालाजी सारखे दैवत आहे का आमची सॅलरी तेथे द्यायला.मनात चाललेली ही खदखद `हे सॅलरी सब्जी तुला कोणतेबी फाईव्ह स्टार होतल मंदी आरामशीत मिलनार’ या वाक्याने अजून वाढली.आता सॅलरी नावाची भाजी असून ती फक्त फाईव्ह स्टार हॉटेलातच मिळते ही कल्पनाच मला करवेना.नकळत माझ्या मनचक्शूसमोर (म्हणजे अतिशय अवघड मराठीत सांगायचे तर `मनातल्या मनात’) काही विचारांचा व्हिडीयो तरळायला लागला.

 मी रोज फाईव्ह स्टार हॉटेलध्ये एक भाजी बांधून आणण्यासाठी जात आहे.तेथे जेवायच्या टेबलावर त्या मंद प्रकाशात,धुंद संगितात व  थंड वातावरणात मी मेनु कार्ड मागवतो आहे व ब-याच वेळ त्या वेटरला उभे ठेवून मग एक सॅलरीची भाजी व नंतर कंसातले वाक्य बोलल्यागत हलकेच पार्सल द्या म्हणून सांगतो आहे.त्यावर वेटर केवळ भूतदयेनी माझ्याकडे पाहत व `चिमीत्कार झाला, येडा मानूस हॉटेलात आला’ असे म्हणत परत जात आहे असे भास मला व्ह्यायला लागले.तेवढयात डॉक्टर म्हणाले `ते हॉटल वाले कुटून आनतात ते बघ ने ते सॅलरी’..आता चित्र अजून स्पष्ट झाले .म्हणजे हॉटेलवाल्याकडे जाऊन त्यांची सॅलेरी ची भाजी चा पुरवठादार शोधायचा असा तो कार्यक्रम होता तर…हे थोडे सोपे होते.मला हायसे वाटले.
पुढे त्या यादीत पान,फळं,फुलं खाणे चालूच होते.त्यात पुढे पानफुटी चे पानं खाणे,काळी मिरची त्यासोबत चावून खाणे,कुळीत पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी शिजवून,पाणी गाळून मग चावून खाणे असे उपचार होते.आता या कुळीथ प्रकरणात शेवटी चावून कुळीथ खायचे का गाळलेले पाणी या संभ्रमात मी पडलो व तसे कुजबूजत सौ.ना  विचारले.त्यावर कुठल्याही बायकोने आपल्या नव-याने विचारलेल्या प्रश्नानंतर त्याकडे बघावे तसल्या अतिशय पेटंट तुच्छपणे माझ्याकडे बघीतले.नंतर दोन चमचे कोरफड रोज व भेंडीचे काप पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिणे व अगदीच चव असह्य झाल्यास थोडे पादरं मीठ त्यात टाकण्याची मोठया औदार्याने परवानगी देण्यात आलेली होती. (या मिठाचा असा इतका लाजीरवाणे नाव ज्यानी ठेवले असेल त्याचे स्वतःचे आडनाव नक्कीच नागडे,उघडे,टकले तत्सम असणार व त्यानेच सुडबुद्धीने या मिठाला असं `पादरं’ केलं असणार) आता दुसरेही पान संपल्याने मी निर्वाणीच्या सुरात `ओके डॉक्टर थॅंक यू असे म्हणणार इतक्यात डॉक्टर त्या शिकाऊ डॉक्टर कडे पाहून म्हणाले `त्यान ला तु प्राणायाम सांगितले का?’.मग त्या डॉक्टरीणबाईंनी प्राणायामाचे विवीध प्रकार समजावऊन सांगितले.आता मात्र डॉक्टर पटेलांच्या चेहे-यावर समाधान दिसत होते.पुर्ण माहीती दिली गेली होती.शेवटचा मग निरोप समारंभाचा कार्यक्रम करत आम्ही डॉक्टरांचे आभार मानून त्यांचा निरोप घेतला.

यानंतरचे १५ दिवस सौभाग्यवती पहाटे उठल्यापासून झोपेपर्यंत विवीध ज्युसेस,पानं,फळं व इतर वर उल्लेखलेले अनेक पदार्थ कधी आवडीने कधी जीव,नाक,घसा मुठीत धरून रिचवित होत्या.कधी कधी हे सगळे रिचविल्यावर पोट धरून धरून रडावे लागत होते.पण `इरादे नेक थे और हौसलाभी बुलंद था’ (सौ असल्याने त्याला एक मुळातच बुलंदपणा व मजबूती आलेली होती).बाकी खडा पडो अथवा ना पडो,दिवस रात्र काढे काढणे,ह्याच्यात ते व त्याच्यात हे मिसळणे, कुटणे असल्या `कूट’ उपायांमुळे वरचेवर वाढत चाललेली हिची तब्येत मात्र लवकरच कमी होईल ह्याची मला खात्री होती.बरोबर पंधरा दिवसांनी आम्ही सोनोग्राफी पुन्हा करण्याचे ठरविले पण त्याच दिवशी रात्री पुन्हा किडनीचा बराच त्रास झाल्याने परिस्थीती जैसे थे असल्याचे सिद्ध झाले.आता मात्र काही करायचे नाही सरळ ऑपरेशन करायचे हा निर्धार करून पुन्हा एच बी तपासले तर ते पुन्हा कमी होते.त्यामुळे तसेच पुन्हा डॉ.महालेंकडे जाण्यात काही राम नव्हता म्हणून पुन्हा एच बी वाढविण्याचे उपाय सुरू केले.

दिवस असेच पुढे सरकत होते.एकदा असेच बाजारहाटीसाठी नव्याने उघडलेल्या एका मॉल मध्ये जोडीने गेलो होतो.सौभाग्यवतीला नविन उघडलेल्या व अनेक ऑफर्स असणा-या मॉलमध्ये आदराने घेऊन जाण्याचे असाधारण धाडस मी दाखविले ह्याचे खरे कारण म्हणजे मला काही जुनं देउन नविन मिळण्याच्या मॉलच्या ऑफर्स ने भुरळ घातली होती.आणी म्हणूनच मी हि ला सोबत नेली होती…..अहो….भलतीकडे विचार भरकटवू नका (आणी मलाही नसती स्वप्न पहायला लावू नका…)…आमच्या घरातील टिव्ही,फ्रीज बदलायचे ब-याच दिवसाचे डोक्यात होते व त्यासाठी सौं चा वाटाघाटी करण्याचा स्वभाव कामाला आला असता.पण तेथे गेल्यावर त्यांनी जुन्या वस्तूंच्या ज्या किमती सांगितल्या त्यापेक्षा तो टिव्ही रिक्षात टाकून इथवर आणण्याचा खर्च जास्त होता.शेवटी टिव्ही व फ्रीज दोन्ही घेतल्यास रिक्षाचा खर्च मॉल करेल असे प्रचंड औदार्यपुर्ण धोरण त्या सेल्समन ने दाखविले.पण तरीही ज्या टिव्ही वर मी गेली १० वर्ष दुरदर्शन च्या बातम्यात मधे मधे येणा-या माश्यांपासून ते हल्ली जाहिरातींच्या मध्ये मध्ये दाखविणा-या विवीध मालिका,रियॅलिटी शोज,डान्स कार्यक्रम,बक्षीस सोहोळ्यात नावाशी नाही तर कपड्याशी साधर्म्य असणा-या अनेक मल्लीका,बिपाशा (चवीने)पाहीलेल्या आहेत त्या आदरणीय टिव्ही ला असे वयाच्या उतारावर एकटं परक्याच्या भरवश्यावर (आणी ते ही मातीमोल किमतीत..)सोडून देणे मला संयुक्तीक न वाटल्याने आम्ही `बाय बॅक’ न करण्याचा निर्णय घेतला. मग खरा धोका पुढे सुरू झाला.आता मॉल मध्ये आलोच आहोत तर मॉल बघून घेऊ असे सौ.नी फर्मान काढले व त्याची बिनविरोध अंमलबजावणी करत आम्ही हळू हळू बास्केट भरत पुढे सरकू लागलो.पाहता पाहता आमची बास्केट भरली व सौं नी एक चार चाकाची ट्रॉली ओढून आणली.आता ट्रॉली घेतलीच आहे तर तिचा आदर करून ती ला पुर्ण गच्च भरूनच जावेच लागेल असे वाटून अजून सामान वाढू लागले.शेवटी मी हि ला `अगं चल मला मिटींग आहे’ असे जोरजोरात ठासवत कसे बसे काऊंटर पर्यंत आणले.पण हे मॉल वाले बघा हं कसे चतूर असतात.काऊंटर च्या आजूबाजूलाही विवीध चॉकलेट,च्युइंगम,बिस्किटे,सीडी ज अशा अनेक वस्तू मांडून ठेवलेल्या असतात.म्हणजे जाता जाताही गि-हाईक शे दोनशे रुपयांची खरेदी आरामात करतो.सौ नी एका सीडी कडे निरखून बघत `अय्या..खरच हे करून बघूयात का..?’ असे उदगार काढले.ते हे काय हे जाणण्यासाठी मी त्या सीडि कडे बघितले तर त्यावर रामदेवबाबा दाढी व लाल उपरण्याखालून डावा हात बाहेर काढत `चलो दिल्ली’ साठी करतात तसा एका दिशेने दाखवत होते.बाबांच्या नजरेतूनही त्यांची `दिल्ली’कडे बारीक नजर असल्याचे दिसत होते. त्या पुढे `किडनी के लिए योग’ असे लिहीलेले होते.खाली केळीच्या झाडाला दोन्ही बाजूला एक एक केळी लागाव्यात त्याप्रमाणे किडनीचे चित्र होते.मी हिला घाईगडबडीत `अगं कशाला अजून प्रयोग…हे उपचार केलेत ना आपण..सरळ ऑपरेशनच करू..’ असे सांगितले. `अहो तुम्हाला फरक कसा कळत नाही..ते निसर्गोपचार होते…हे योगोपचार आहेत.’ सौ, नी चार चौघात आमच्या स्वाभिमानाचे `प्रथमोपचार’ केले.शेवटी बिलात अजून ६० रू वाढवून ती सिडी इतर ढिगभर सामानासोबत घरी आली.

त्याच दिवशी रात्री सौ.नी त्या सिडीचे मनोभावे श्रवण केले व सोबत सांगितलेल्या उपायांची सूची तयार झाली.दुस-याच दिवशी आम्ही बाबांच्या पतंजली योगपिठातील औषधे आणण्यात आले व याआधीच्या उपायात सॅलरीच्या(या नावाच्या भाजीच्या) मागे धावणारे आम्ही आता `पत्थरचट्टा’ नावाच्या चाटन पदार्थाच्या नावाशी साधर्म ठेवणा-या एका झाडाच्या शोधाला लागलो.त्या झाडाची पाने तोडून ती कचाकचा पाण्यासोबत चरण्याचा प्रमुख उपाय रामदेवबाबांनी दिला होता.`इससे लाखो लोगोंकी पथरी हमने हटायी है’ असे अत्यंत मिश्कील चेहेरा करून ते त्या सीडीत सांगत होते.

क्रमशः लवकरच...

मी,ही,तो व ते (भाग-२)


या कथेतील `मी’ व `ही’ म्हणजे मी व आमच्या सौभाग्यवती,`तो’ म्हणजे आमच्या `ही’ ला झालेला किडनी स्टोन व `ते’ म्हणजे आम्ही त्या स्टोनवर केलेले विवीधांगी ईलाज आहेत.
मी,ही,तो व ते (भाग-२)
विशेष सूचनाः
१. भाग-१ वाचून भाग-२ ला हात घातल्यास काहीतरी समजेल अन्यथा `संदर्भहीन लेखन आहे’ व `ते काहीही न समजल्याचा’ आरोप सहन केला जाणार नाही.
आता पुढे वाचा…

आम्ही दर ७-८ दिवसांनी चौकशी करत असल्याने एक दिवस डॉक्टर भाटवडेकरांनी नाईलाजाने आम्हाला दुस-या एका मोठ्या हॉस्पीटलमधील डॉ.नाडकर्णी यांच्या नावाची चिट्ठी लिहून दिली व यांच्याकडे तसेच मशीन आहे तेथे लिथोट्रिप्सी करू म्हणून सांगीतले. डॉ.नाडकर्णींनी आधी काही टेस्ट्स पुन्हा करायला लावल्या.मग पुन्हा सोनोग्राफी.ह्या हॉस्पीटल मध्ये मात्र तो स्क्रीन इतका मोठा होता की आम्हाला तो बदमाश खडा एकदम स्पष्ट मोठ्या पडद्यावर दिसला.मग त्यांच्या ज्युनिअर डॉक्टर ने एक फुटपट्टी घेऊन तो खडा त्या मोठ्या स्क्रीनवर मोजला व एका कागदावर नोंद करून डॉ.नाडकर्ण्यांकडे दिला.ते वाचून गालातल्या गालात हसत ते म्हणाले `अजित,स्केल मिली मिटर मध्ये आहे सेंटी मिटर मध्ये नाही’.हे ऐकल्यावर मी ही वाकून पाहीले असता त्या ज्युनियरने २० मि.मी.च्या ऐवजी २० से.मी. अशी नोंद केरून आपली ज्युनियरकीची लाज राखली होती.त्या खड्याच्या आकाराच्या नोंदीची दुरुस्ती करतानाच डॉ.नाडकर्णींनी एकदम `अरे रे..’असे नैराश्यजनक विधान केले. आता आणखी काय? या माझ्या चेहे-याला ओळखत ते म्हणाले,`मला वाटतं लिथोट्रिप्सीनी हा खडा जाणार नाही.हा थोडा मोठा आहे.त्या पेक्षा तो ऑपरेट करून काढलेला चांगला. ’मला आता उपचार पुन्हा दोन महीने पुढे सरकल्यासाचे चित्र दिसायला लागले.`डॉक्टर आमची तयारी आहे,कधी यायचे तेवढे सांगा.’ मी क्षणाचाही विलंब न लावता निर्णय घेतला.यापुर्वी मी इतका झटपट निर्णय ५-६ वर्षांचा असताना आकाशपाळण्यात पहिल्यांदा बसल्यावर `या `चक्रा’त यापुढे पुन्हा बसून अडकायचे नाही’ हे ठरवतांना शेवटचा घेतल्याचे माझ्या स्मरणात आहे.त्यावेळीही माझ्या मनात आता कधी एकदा हे आकाशभ्रमण थांबते व आपण घरी जातो असे झाले होते.तिच भावना मनात ठेवत मी डॉक्टरांकडे उत्तराची अपेक्षेने पाहीले.डॉ.नाडकर्णी खांदे उडवित म्हणाले,`सॉरी,माझ्याकडे सर्जरी होत नाही.तुम्हाला त्यासाठी डॉ.महालें कडे जावे लागेल.

आता अजून तिसरा डॉक्टर..? डॉ.महालेंचे हॉस्पिटल झटकन सापडले.त्यांच्या रिसेप्शनच्या बाहेर चप्पल बुटांचा सडा पडलेला होता.त्यात निरनिराळ्या जातीच्या,पंथांच्या,आकाराच्या व अवस्थेतील चपला,जोडे,सॅंडली मनमुराद झिम्मा खेळत पसरलेल्या होत्या.(पुर्वी घरात चपलेवर चप्पल चढलेली दिसली तर बाहेरगावी प्रवास करावा लागणार असे म्ह्टले जायचे.एकंदरीत इथल्या चपलांची `चढाओढ’ पाहता आज बाहेरगावी जाण्यासाठी येस टी श्टॅंड फुल्ल असायला हवे होते.)नुकतीच दंगलीत पळापळ झाल्यावर जसा सिन साधारणतः असावा अगदी तसा तो होता.बाहेर त्यांच्या नावाखाली युरोलाजीस्ट अशी पाटी होती व त्याच्या पुढे साधारणतः मध्ये अनेक टिंब असलेल्या व  एकूण १५-१६ अक्षरांच्या अनेक पदव्या लिहीलेल्या होत्या.त्या पदव्यांच्या लांबीवरून फी ची रूंदी ठरत असल्यामुळे रिसेप्शन वर त्यांनी भिंतीवर लिहीलेला प्रथम तपासणी फी चा  आकडा वाचून मला अगदीच `आकडा’ आला नाही.आम्ही निमुटपणे नंबर ची वाट पाहू लागलो.बरीच गर्दी असल्याने आता येथे बराच वेळ बसण्याची तपश्चर्या करावी लागणार होती.थोडा वेळ बसून मग मी सहज पाय मोकळे करण्यासाठी उठलो व तेथे लावलेले काही फोटो,वर्तमानपत्रातील कात्रणं वाचू लागलो.

डॉ.महालेंचे वेगवेगळया काळातील व वेगवेगळ्या वर्तमानपत्रात छापून आलेले यशस्वी शस्त्रक्रीयांचे फोटो व बातम्या तेथे लावलेल्या होत्या. त्यातील डॉक्टर महाले ओळखण्यासाठी मी एका वेळेस दोन फोटो नजरेसमोर ठेऊन दुस-या फोटोत पुनरावृत्ती कुठल्या चेहे-याची होते ते शोधत होतो.पण त्या अनेक कागदांचे रंग,आकार,छपाई व काळ इतका वेगवेगळा होता की त्यातील एक कॉमन चेहेरा ओळखून त्याला डॉ.महाले नाव देण्याचा माझा उपक्रम पुर्ण फोल ठरला.अखेर ब-याच बारकाईने पाहील्यावर कुठे हसणारे,कुठे थकलेले,कुठे पेशंटच्या नातेवाईकांनी फोटो काढताना दाखवलेल्या अतिउत्साहामुळे त्यांच्या मागे लपलेले,कुठे चष्मा घातलेले तर कुठे डोळे बंद आलेले (आणी एका फोटोत तर चुकून अनावधानाने एकच डोळा बंद असलेले) असे डॉ.महाले मी मनात पक्के केले.प्रत्येक फोटोत ते पुर्णतः निराळे वाटत असल्याने मला ते सध्या नक्की कसे दिसतात याचे कुठलेही अनुमान लावता आले नाही.

त्या फोटोंशेजारी असलेल्या एका काचेच्या कपाटात अनेक वेगवेगळ्या आकाराच्या गारगोट्या,विवीधरंगी समुद्रातील दगडं मांडून ठेवलेले होते.`डॉ.ना इतक्या व्यस्त जीवनातून दगड धोंडे गोळा करायचा छंद जपायला बरा वेळ मिळतो.?मी आदरयुक्त आश्चर्याने कुजबुजलो.आता माझी ही कुजबुज अंमळ थोडी मोठ्यानेच झाल्याने ती त्या रिसेप्शनीस्ट च्या कानावर आदळली.त्यावर तिने मला सांगीतले `अहो ती समुद्रतील दगडं नाहीत,डॉक्टर सरांनी ऑपरेट करून काढलेले पेशंटच्या किडनीतील स्टोन्स आहेत..हे ऐकल्यावर मात्र मला फेफडं यायची बाकी होती.`अहो काय सांगता?इतका मोठा दगड,किडनीत.?मी एका भीमकाय दगडाकडे आश्चर्याने बघत म्हणालो.`अहो याला उचलायला तर क्रेनच आणावी लागली असेल’ असा एक पाचकळ विनोद मारत मी स्वतःच खदा खदा हसलो.पण रिसेप्शनीस्ट व आमच्या सौभाग्यवतींच्या चेहे-यावरील सुरकुतीही हलली नाही.उलट हीने माझा शर्ट खेचला.तेथे या किडनी स्टोन वा तत्सम आजारांनी पिडीत पेशंटची टोळी च्या टोळीच बसलेली असल्याने( आम्हीही त्या टोळीतील अधिकृत नवनिर्वाचीत सदस्य असल्याने) त्यांच्या दुखणा-या दगडांवरून घासत घसरून माझा विनोद जखमी होऊन खाली पडला.मग मी ही काहीही झाले नसल्यागत पुर्ववत खाली बसलो व निमूटपणे नंबरची वाट बघायला लागलो.

डॉक्टरांच्या केबिनचा दरवाजा उघडला व आतून एक धोतर बाहेर आले.थोडा वेळ धोतर तेथेच दरवाज्यात उभे राहून डॉक्टरांशी पुन्हा काही सल्ला मसलत करत होते.मग ते पुर्ण आत गेले व दरवाजा पुन्हा धडकन बंद झाला.आता नंबर आमचा असल्याने मग मी जवळ जवळ दरवाज्याला चिकटूनच उभा होतो.दरवाजा पुन्हा बंद झाल्याने मग आम्ही थोडे मागे सरकत पुन्हा तेथेच धोतर बाहेर येण्याची वाट बघत उभे राहिलो.पुन्हा दरवाजा उघडला आणी पाहतो तर काय चक्क धोतराऐवजी आतून एक नऊ वारी हातात एक काचेची बाटली घेऊन बाहेर आली. ही डॉक्टरांची केबिन आहे का चेंजीग रूम ? मी आश्चर्यचकीत होऊन तोंडात बोट घातले. (आता तोंडात बोट घालणे हे फक्त वाक्प्रचार या अर्थाने घ्यावे अन्यथा मी जर ह्या वयात इतक्या लोकांदेखत तोंडात बोटे घालू लागलो व त्यातल्या त्यात त्यातील एखादे बोट जर अंगठा असेल,तर माझे डॉक्टरला दाखवायचे हॉस्पिटल चुकले असे कोणीही म्हणेल.)पण मी समजलो तसला काही चमत्कार पहायला मिळाला नाही.नऊवारी पाठोपाठ धोतर ही आतल्या रांगड्या व्यक्तीसकट बाहेर आले.काऊंटरवाल्या रिसेप्शनिस्टला नऊवारीनी गोडसे स्मितहास्य दिले व आपल्या हातातील बाटली तिला दाखवत `आमचा दागिना घेऊन जाते’ असे उदगार काढले यावर त्या दोघी खळखळून हसल्या. `दागिना’ हा शब्द कानावर पडताच सौं नी तशीच १८० अंशा मान वळवत बाटलीकडे पाहीले.( आत पेशंटला दिवाळीनिमित्त डॉक्टर दागिने भेट देत आहेत असे क्षणभर वाटून `रिकामी बाटली आहे का एखादी’ हे ही विचारेल असे क्षणभर मला वाटले.) इतक्यात नउवारीच्या हातातील त्या बाटलीत चक्क एक पांढरा दगड ठेवलेला होता हे मी पाहिले.आता इतका वेळ बाहेर बसून असले अनेक दगड धोंडे पाहिले असल्याने तो दगड नऊवारीच्या स्वकमाईतला होता व इतका वेळ किडनीच्या लॉकरमधे दडवलेला होता हे मी तात्काळ ओळखले.

एव्हाना मी दरवाज्याच्या आत पोहोचलो व मागे रेंगाळलेल्या सौ.ना जवळ जवळ आत ओढली.आत एका प्रशस्त केबीन मध्ये एका पडद्याआड तपासणी कक्ष व बाहेर डॉक्टरांचा टेबल,समोर दोन खुर्च्या अशी नेहेमीच्या धाटणीचीच मांडणी होती. मी समोर बसलेल्या डॉक्टरांकडे पाहून स्मितहास्य केले व आम्ही दोघे खुर्चीत बसलो.नकळत मी फोटोतील डॉक्टर महालेंच्या चेहे-याची तुलना वास्तवातील डॉक्टरांशी केली व एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.डॉक्टर फोटोत खुपच फ्रेश वाटत होते.आता त्यांच्या चेहेरा खूपच ओढलेला व  तणावग्रस्त वाटत होता.त्यावरून डॉक्टरांचे फोटो हे लग्नाअगोदरचे असावेत हा एक सर्वसाधारण चपखल बसणार वैचारीक तोडगा मी काढला.डॉक्टरांना अभिवादन केल्यावर आम्ही त्यांच्या समोर बसलो.मी थोडक्यात आत्तापर्यंत झालेला इतिहास सांगीतला.त्यात खड्याच्या जन्मापासून ते शेवटच्या डॉ.नाडकर्णींच्या तपासणी पर्यंतचा सगळा तपशील होता.इतक्या वेळ अतिशय धीरगंभीर चेहेरा करून आमची कथा ऐकणारे डॉ.महाले लिथोट्रीप्सी मशीन बंद पडण्याच्या घटनेला मात्र अचानक खुदकन हसले.आपण अनावधानाने जरा जास्त जोरात हसलो हे लक्षात येऊन ते लगेच सावरले व लगेच त्या घटनेविषयी त्यांनी `ओह नो’ असे उदगार काढत परिस्थीती नियंत्रणात आणली.यावेळी मला एक मिनीट स्तब्धता पाळून श्रद्धांजली देतानाही काही केल्या हसू न आवरता येणा-या आमच्या एका मित्राची आठवण झाली.कालांतराने तो एक निष्णांत डॉक्टर झालेला आहे.थोडक्यात समोरचा कुठल्याही दुःखात असताना (व ब-याचदा आपल्या ट्रीटमेंटमुळे दुःखात असताना) पेशंट दिसल्यावर हसता आले पाहिजे हा डॉक्टर होण्यासाठी लागणारा किमान गुणवत्ता निकष तर नव्हे.?

डॉक्टर महालेंना आमची ही कथा फारच रोचक वाटली असावी कारण ते अगदी निवांत कर्र कुई आवाज करणा-या गोल भ्रमण खुर्चीवर मस्त मागे पुढे रेलत कथा ऐकत होते.नकळत त्यांनी त्यांच्या हातात एक गोल काचेचा पेपरवेट घेतला व ते रोखून माझ्याकडे बघायला लागले.त्यांच्या त्या `फेकू का मुस्काटात पोस’ मुळे दचकून मी माझी कथा लगेच आटोपती घेतली.मग डॉक्टरसाहेबांनी सगळे रिपोर्टस पाहीले. एका रिपोर्टकडे मात्र ते रोखून बराच वेळ बघत त्यांनी अत्यंत खेदपुर्वक मान हलवत म्हणाले `यांचा एच.बी.फक्त ७.६ आहे.एवढ्यात ऑपरेशन करता येणार नाही.यांना आधी एच.बी.वाढवावा लागेल.मी औषध लिहून देतो.’ `अरेच्या इतका कमी झाला का?’ शेअरबाजार पडल्यावर पुर्णवेळ नेटवर ऑनलाईन ट्रेडींग व फावल्या वेळेत काम करणा-या सरकारी कर्मचा-याने सेन्सेक्स आकड्यावर टिप्प्णी करावी त्याप्रमाणे मी बोललो.वर जणू काही स्वतःच्याच पिशवीतून काढून दिलेल्या त्या रिपोर्टने लबाडाने एच.बी.बद्दल काही सांगितलेही नाही असा नाराजीचा सुरही होता.आता एच.बी. वाढवणं म्हणजे काय करणं याची काहीच कल्पना नसल्याने मला आता हे ऑपरेशन प्रकरण किती पुढे सरकणार याचा अंदाज येईना.शेवटी मी त्यांना तसं विचारूनच घेतलं.`त्याच काय आहे की एक महिन्यात ते वाढायला हवं.मध्ये काही त्रास झाल्यास दुसरं औषध देतो.’डॉ.म्हणाले.

खिन्न होऊन आम्ही बाहेर आलो.रितसर फी दिली.रिसेप्शनिस्ट कडे बघून कुठलेही `दागिने’ दाखविण्याची संधी मिळाली नाही.चपलांच्या त्या खचामधून एकमेकांची पादत्राणे ओळखत व ती आपापल्या पायात बिनचूक घालत आम्ही बाहेर पडलो.आता एक महिना अजून वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.तो संपुर्ण महिना अत्यंत घाणेरड्या वासाचे ते औषध गोड मानून सौ मोठया हिमतीने घेत होत्या.बाजारात पिशव्या धरायला कमीत कमी शुक्रवारच्या सुटीच्या दिवशी नवरा नसेल तर त्यांच्या होणा-या लाल पिवळ्या चेहे-यावरून त्यांना वरचेवर औषध मानवून त्यांच्या चेहे-यावरील तेज वाढत चालल्याचे जाणवत होते.विशेष म्हणजे एकदाही त्यांना स्टोन चा त्रास न झाल्याने दोन-तीन महिने पुन्हा तसेच पुढे सरकले.

दरम्यान एकदा आमच्या एका काकांनी मला निसर्गोपचार करणा-या एका तज्ञ डॉक्टरांची माहीती दिली.डॉ.पटेल हे गुजराती होते व आमच्या शहरात १५ दिवसातून दोन दिवस येत असत.त्यांच्या हाताला असणा-या गुणाची चर्चा सर्वदूर असल्याने त्यांची अपॉईंटमेंट मिळवणे हे पहिले कठीण कर्तव्य होते.पण अचानकच तेथे काम करणा-या एका संबंधिताची भेट झाल्याने मला लगेच अपॉईंटमेंट मिळाली.गोलंदाजीत व क्षेत्ररक्षणात अत्यंत सुमार कामगिरी करतो म्हणून नाईलाजाने नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला पाठविलेल्या इशांत शर्मा ने अचानकच ३० धावा काढून धोनीला आश्चर्यचकित करावे त्या प्रमाणे माझ्याकडून किमान दोन महिने हे  अपॉईंटमेंट घेण्याचे काम होणार नाही याची खात्री असलेल्या सौ.ना अचानक लगेच अपॉईंटमेंट मिळाल्याने आश्चर्याचा धक्का बसला. (अर्थात इशांत सोडा टेस्ट मॅचेस मध्ये युवराज सिंग,कोहली,गंभीर,सेहवाग ही नाईट वॉचमनला साजेशीच कामगिरी करीत आहेत म्हणा.) ठरलेल्या दिवशी आम्ही डॉ.पटेलांच्या त्या नॅचरोपथी उपचार केंद्रात गेलो.एका मोठया प्रशस्त हॉल मध्ये ते एका अतिशय साधारण लाकडी खुर्चीवर बसलेले होते.त्यांच्या बाजूला एक शिकाऊ महिला डॉक्टर कागद पॅड ला लावून डॉक्टर सांगतील ते उपचार पेशंट ला लिहून देत होती.डॉक्टर अतिशय वयस्क होते.त्यांची बोलण्याची,हसण्याची शैली अतिशय लोभसवाणी होती.गुजराती टोन लगेच समजत होता.आमचा नंबर आल्यावर अतिशय हसतमुखाने त्यांनी आम्हाला बसायची खूण केली.पेशंटच्या नावाच्या यादीत सौभाग्यवतींचे नाव असल्याने त्यांनी हिच्याकडे बघतच `केम छो’ केले.व `शूं समस्या छे’ असले काहीतरी मला ऐकू आले.आता समस्या जरी `शू खडया’ ची च होती पण हा गुजराती हल्ला अगदी कॉंग्रेसपेक्षाही आमच्या सौभाग्यवतींना जड गेला.रणजीत त्रिशतक मारून संघात आलेल्या फलंदाजाची अचानक डेल स्टेन समोर आल्यावर होते तशी गांगरलेली परिस्थिती आमच्या हि ची झाली.त्यामुळे डॉक्टरांनी मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे पाहीले.मी `इनको किडनी के खडे का त्रास है’ अशी सुरुवात करून राष्ट्रभाषेत कशीबशी पहिली धाव घेतली व घाईघाईत पुन्हा स्ट्राईक सौ.कडे दिली.यावर डॉक्टर साहेबांनी पुन्हा हिच्याकडे बघत `तमारा हसबॅंड कहे तमे किडनी पथरी छे.Is he correct? Where you feel the pain?’ असे विचारले.आता या आमच्या गुजराती डेल स्टेन आजोबांनी एका षटकात दोन बाऊंसर टाकले.एक म्हणजे `हसबॅंड’ असे म्हणत त्यांनी आमचा बॅंड वाजवून सौभाग्यवतींना गालातल्या गालात हसायला लावले( अगं बाई यांना काय माहिती घरी बॅंड कोणाचा वाजतो ते? असले हावभाव तिच्या चेहे-यावर होते.) व दुसरा गुजरातीवरून आमच्या सौं चा जालीम शत्रू इंग्रजीच्या खांद्यावरून त्यांनी नेम लावला. सौ.नी पर्स मधे हात टाकला.`where आणी pain’ या दोन शब्दांचा अर्थ लावत पर्स मधील पेन बाहेर काढतात की काय या भितीने मी दचकून त्यांचाकडे पाहिले.पण तसले काही जादूचे प्रयोग न दाखवता त्यांनी आतून रुमाल बाहेर काढला व भर जानेवारीच्या थंडीत आलेला घाम पुसला. हिला पेपर सोपा जावा म्हणून मी लगेच भाषांतर करून `अगं तुला कुठे दुखतय ते सांग ना?’ असे सांगितले.यावर डॉक्टरसाहेबांनीही `हो,हो शांग शांग’ असे अनुमोदन दिले.त्यांच्या या (बाल)मराठी उदगारांनी धीरात धीर येऊन मग हिने सविस्तर कथा `शांगी’तली.मग डॉक्टरांनी काही प्रश्न विचारले जसे `तू पानी किती पिते?,तू नारियल पानी घेते की नाय?’ त्यावरून मग डॉक्टरसाहेबांनी काही गोष्टी टिपून घेणा-या मुलीला सांगितल्या.ते सर्व लिखाण झाल्यावर त्यांनी तो कागद तिच्याकडून घेऊन आमच्या समोर ठेवला.तो एक मोठा निबंधच होता.

क्रमशः लवकरच…

मी,ही,तो व ते (भाग-१)


मी,ही,तो व ते (भाग-१)
विशेष सूचनाः
१.या कथेतील `मी’ व `ही’ म्हणजे मी व आमच्या सौभाग्यवती,`तो’ म्हणजे आमच्या `ही’ ला झालेला किडनी स्टोन व `ते’ म्हणजे आम्ही त्या स्टोनवर केलेले विवीधांगी ईलाज असल्याचे पहिल्याच ओळीत जाहीर करीत आहे.त्यामुळे काहीच चवदार वाचायला न मिळाल्याचे निरोप पाठवू नयेत.तरी पुढचे लिखाण वाचावे अथवा नाही हे लगेच ठरवावे.
२. आपल्या वाचनात आले नसेल कदाचीत पण प्रस्तुत लेखकाने यापूर्वी काही लेखन केलेले आहे तरी अगदीच नवखे आहेत असे समजत चुका काढून उगाच लेखकाचे मानसीक खच्चीकरण करू नये.

परवाच कोणीतरी किडनी स्टोन चा विषय काढला आणी मलाही माझ्या आयुष्यात आलेल्या एका आदरणीय खड्याची कथा आठवली.त्या बहुगुणी खड्याच्या आठवणीत मी इतका मोहरून गेलो आहे की त्याच्या बद्दलची `खडा नी खडा’ माहीती तुम्हाला कधी एकदा सांगून माझे मन हलके करतो असे मला झाले आहे.

लग्नानंतर मला (म्हणजे माझ्या बायकोला) साधरणतः दोन वर्षांनी मुलगा झाला.यावर आमच्यात लग्नानंतरच मुलं होतात असला अतिशय सुमार दर्जाचा विनोद मारण्याची आपल्यापैकी काहींची इच्छा होत असेल तर ती दाबा कारण सुमार दर्जाचा ठेका आताशा फक्त झहीर खान यांचेकडे त्यांच्या एकंदरीतच मैदानवरील हालचालींमुळे (अथवा त्याच्या अभावामुळे) राखीव आहे.अहो मागे अहमदाबाद कसोटीत इंग्लंडविरुद्ध या महाशायांनी दोन सोडलेले झेल,पायाजवळून जाणारा चेंडू निव्वळ खाली वाकताना `मोडेन पण वाकणार नाही’ या निर्धारान्वये वाकता न आल्याने शेवटी सिमारेषेपलिकडे उभ्या असणा-या बॉल बॉय साठी सोडेलेले पाहताना फार वेदना झाल्या.

असो तर सांगण्यासारखी गोष्ट अशी की आमच्या चिरंजीवांच्या जन्माच्यावेळेसच मला आणखी एक अपत्य झाले.आता तुम्ही म्हणाल `अभिनंदन, चला तर मग भगवान ने छप्पर फाडके दिया’.पण थांबा एवढे एकदम निष्कर्ष काढू नका.म्हणजे मला जुळे वगैरे झाले नव्हते तर आमच्या सौभाग्यवतींनी एक गोंडस,लोभसवाणा व अतिशय आकर्षक खडा ज्याला अनेक लोक (इंग्रजीच्या) प्रेमाने `किडनी स्टोन’ ही म्हणतात तो किडनीत जन्माला घातला होता.सोनोग्राफी यंत्रात डॉक्टर भाटवडेकरांनी पांढ-या चंद्रावर असलेला एक काळा डाग दाखवावा त्याप्रमाणे त्या काळ्या स्क्रीनवर तो पांढरा खडा मला दाखवला त्यावेळी त्या भयंकर काळ्या निळ्या चित्रातील तो खडा मला प्रचंड रुपवान व राजबिंडा वाटला. मुलगा पोटात असतानाच हा आमचा खडाही बाजूला किडनीत गुण्यागोविंदाने वाढत होता.पहिल्या सोनोग्राफीत डॉक्टरांनी आम्हाला ही गुड न्यूज दिली.सौभाग्यवती लाजल्या आणी त्यांच्या लाजण्यामुळे मला घाम फुटला.याचे कारण मागे एकदा आमची कामवाली बाई `भाभीजी दुबली हो गयी’ असे चक्क राष्ट्रभाषेत खोटं बोलली तेव्हा आमच्या सौभाग्यवती अशाच लाजल्या होत्या आणि त्यानंतर ती कामवाली पुन्हा कधीही दिसली नाही.पुढे जाउन ती मनोरूग्ण असून (ती म्हणजे मोलकरीण) वाट्टेल ते बडबडत असे हे समजले. त्यानंतर आता हा लाजण्याचा प्रसंग आल्याने कित्येक दिवस मी जाता येता डॉक्टरांच्या क्लिनीकला जाऊन बाहेर रिसेप्शन ला डॉक्टर साहेब `आहेत ना’ अशी काळजीयुक्त चौकशी करित असे.

असो तर आमचे डॉक्टर भाटवडेकर म्हणाले की `अहो त्यात घाबरण्यासारखं काही नाही छोटासा खडा आहे.आता बाळाला आत खेळायला सोबत मिळाली असे समजा.आता अशा अवस्थेत तशीही काही ट्रीटमेंट करता येत नाही नंतर आरामात काढता येईल हा खडा.खूप त्रास झाला तर हे औषध लिहून देतो’.औषधाच्या त्या प्रिस्क्रीप्शन ची चिठ्ठी मी मेडीकल दुकानदारासमोर ठेवली.प्रेग्नंसी व वरून किडनी स्टोन हा दुग्धशर्करा योग पाहता गि-हाईकाचे उज्ज्वल भविष्य लक्षात घेत त्याने लगेच मला बसायला खुर्ची वगैरे दिली. उरलेल्या दोन रुपयाच्या सुट्याऐवजी चॉकलेट न देता चक्क त्याने चक्क मला अजून तीन रुपये माफ करून पाच रुपयाचे नाणे हातात टेकवले.असा दुकानदार जर मला लहानपणापासून भेटला असता तर असेच पाच पाच रुपये जमा करून मला आतापर्यंत मुंबईत वरळी सी फेस ला फ्लॅट बुक करता आला असता असे काही महत्वाकांक्षी विचार माझ्या मनात तरळून गेले.पाच रुपयाचे ते नाणे मी मोठ्या सन्मानाने पॅंटच्या खिशात टाकले आणि फुकटात मिळालेले पैसे मग ते बक्षिसात मिळालेले का असेना अजिबात टिकत नाहीत हा माझा इतिहास असल्याने  लागलेले लॉटरीचे तिकीट सांभाळावे त्याप्रमाणे चार चार वेळा ते नाणे खिशात तपासत मी घरी आलो.दाराशीच मुलं क्रिकेट खेळत होती.मला पाहताच क्षणी `काका,काका..’ असे म्हणत ती आली आणी टॉस करण्यासाठी नाणं मागू लागली(मी वास्तववादी लेखक असल्याने स्वतःचा उल्लेख `दादा दादा’ असा न करता `काका काका’ असाच केला आहे हे लक्षात घ्यावे) .मी नाही नाही म्हणत असतानाच जवळ जवळ माझ्याकडून लुटूनच त्यांनी ते पाच रुपयांचे नाणं नेलं आणी परस्पर त्याचा टॉस झाला.माझ्या डोळ्यादेखत गटांगळ्या खात वर हवेत उडालेलं ते नाणं स्वतःचे हेड आपल्या टेलमध्ये घुसवत महापालीकेच्या एका उघड्या गटारात `डुबूक’ असा आवाज करत आत गेलं आणी मुलं स्टंप व बॅट तेथेच सोडून पळाली.जाउ द्या पुन्हा एकदा सिद्ध झालं की फुकटातलं काहीही पचत नाही.(कमीत कमी मला तरी.हा काही सगळ्यांसाठीचा वैश्विक सिद्धांत नव्हे हे कुठल्याही राजकारण्याकडे पाहून आपल्याला पटेल.)

त्यानंतर पुढची काही महिने सौभाग्यवतींचे बाळंतपण,बाळाचे आगमन,त्याचे सतत झोपणे व आमच्या झोपायच्या वेळा जोरजोराने रडत जागणे (व जागविणे),सर्व विधी जागच्या जागी करणे,मग पाळणा, पाळणा देतांनाची अंगाई गिते व ते गायल्यामुळे बाळाची झालेली झोपमोड मग पुन्हा त्याचे रडणे, त्याच्या अनेक बाललीला या सगळ्यात फारच लवकर गेले.दरम्यान सौभाग्यवतींच्या किडनीतील खड्याने त्याचे  अस्तित्व असे कधी वेदनेवाटे न दाखविल्यामुळे तो कदाचित परस्पर पडला असावा असा आम्ही एक भाबडा कयास बांधला होता.पाहता पाहता बाळ एक वर्षाचे झाले.किडनीतील त्या खड्यानेही आपला पहिला वाढदिवस साजरा केला.मग लवकरच मजल दरमजल करीत खडा व बाळ दोघेही दोन वर्षांचे झाले.

अचानक एक दिवस सौभाग्यवतींना पुन्हा कळा (वेदना या अर्थाने) सुरू झाल्या.यावेळी डॉक्टरांनी पुन्हा हा त्रास किडनी स्टोनचा असल्याचा साक्षात्कार केला.काही टेस्टस लिहून दिल्या.त्यांनी त्या प्रिस्क्रीप्शनवर जे काही गोल गिरगिरीत अक्षरात लिहीलेले होते ते वाचू शकणारा माणूस अमुक अमुक सोनोग्राफी सेंटर मध्येच फक्त असतो हे समजल्याने मग तेथेच गेलो.त्याने मात्र तो नुसत्या नजरेच्या एका कटाक्षाने वाचला व लगेच एका कागदावर तीन आकडी दोन संख्या लिहील्या व तिथेच खाली त्याची बेरीजही करून दाखवली.प्रथम तोंडी केलेली बेरीज त्याने नंतर कॅलक्यूलेटर ने पुन्हा केली.पण तो समाधानी दिसला नाही.कॅलक्युलेटर वरचा शुन्य दाबत त्याने ते आकडे पुन्हा मिटवले व पुन्हा बेरजा मांडल्या.तो काय करत आहे हे पाहत मी थोडा पुढे झालो व मी तो आकडा वाचला.तो पाच आकडी दिसल्याने तो त्या कॅलक्युलेटर वरील बेरजेच्या ऐवजी गुणाकाराच्या कळा दाबत असावा असे लक्षात आले. मग ते कॅलक्यलेटर मी हातात घेत त्याला बेरीज करुन दिली.माझ्या आलेल्या उत्तरावर त्याच्या चेहे-यावरील समाधान ओसंडून वाहू लागले.का कोण जाणे त्याने तोंडी केलेल्या बेरजेचा आकडा माझ्या लावलेल्या आकड्याशी मिळताजुळता असावा.आम्हाला येणा-या टेस्ट्स च्या खर्चांचे ते आकडे होते.मी ते पैसे (नाईलाजाने) त्याच्या हातावर ठेवले.त्यानंतर पुढील तीन तास सौभाग्यवतींच्या निरनिरांळ्या यंत्रावर आलटून पालटून तपासण्या झाल्या.`ह्यांना स्टोन आहे’ अशी एक शिळी बातमी डॉक्टरांनी आम्हाला मोठ्या खुशीत दिली.(खुशी होणे साहजिकच आहे म्हणा.मलाही नविन मोठी ऑर्डर बुक झाल्यावर असाच आनंद होतो).`पण डॉक्टर अजून तो पडला नाही?’ मी आपण मत न दिलेला उमेदवाराचा निवडणुकीचा निकाल विचारावा त्या पद्धतीने कुजबुजलो.
`तो आपोआप पडणारही नाही,तो किडनीत एकदम तळाशी आहे.गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध तो वर येऊन मुत्रनलिकेत येणार नाही.आणि मला वाटतं आता ऑपरेट करायला हवा तो आता २० मिमि चा झाला आहे.’ डॉक्टर म्हणाले. `अहो म्हणजे चांगला घोडा झालाय म्हणा की’ मी मनातल्या मनात खाऊन पिउन धष्टपुष्ट झालेल्या त्या २०मिमि दगडाला शिव्या देत पुटपुटलो.न्यूटन जर त्या दिवशी झाडाखाली झोपण्याच्या ऐवजी झाडावर सफरचंद तोडत बसला असता तर गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्धही ते फळ त्याच्या हातात पडून तसा शोध त्याने लावला असता व आमच्या या तळाशी असलेल्या खड्याचाही प्रश्न आपोआप मिटला असता.व याबदल्यात आमच्या या खडयाला मी `न्यूटनस्टोन’ असे नावही द्दयायला तयार होतो.पण शेवटी नव्हतं बिचा-याच्या नशीबात.असो,ऑपरेशन हा शब्द ऐकून न्यूटनचे ते झाडावरून खाली पडलेले फळ माझ्याच डोक्यात पडून ते मला गुरुत्वाकर्षणाने जमिनदोस्त करेल की काय असे मनात वाटले.त्याही अवस्थेत (त्या फळाचा नेम चुकवत) मी स्वतःला सावरले.
`मग डॉक्टर पुढे काय.?’..`त्याचे असे आहे की ऑपरेट केले तर लगेच खडा जाईल.दुसरा उपाय लिथोट्रिप्सीचा आहे.त्यात तुम्हाला दोन तीन वेळेस सिटींग कराव्या लागतील.त्यात आम्ही ऑपरेशन न करता,तो खडा शॉट देऊन बाहेरूनच फोडतो,त्याचे छोटे तुकडे करतो व ते मुत्रनलीकेतून काढतो.काय करायचे ते तुम्ही ठरवा.’
त्यांचा लिथोट्रिप्सी हा शब्द मला कुठेतरी शितपेयांच्या जाहीरातीतून सांडून इकडे आल्यासारखा वाटला.अगदीच नाही तर तो `ऑक्टॉपसी’ या एका आठ पायांच्या प्राण्याच्या नावावर गेलेल्या बॉंडपटाच्या नावाशी (ज्यात आपल्या दोन पायांच्या अमृतराजांच्या विजय ने काम (?) केले आहे) साधर्म्य करत होता.  डॉक्टर बोलत होते आणी मी कल्पना करत होतो की माझ्या बायकोच्या पाठीत,कमरेत ते मशीन गदा गदा गुद्दे मारत आहे व प्रत्येक वेळेस आत खडा फुटून दगड फोडल्या सारखा आवाज निघत आहे.आता हेच करायचे तर ते नेक काम मी सुद्धा घरच्या घरी मॅनेज केले असते असे क्षणभर वाटून गेले.तसेही साल्याने लग्नात कान ओढल्यापासून ते अगदी परवा परवाला `आमच्या ह्यांना ना काही व्यवहारज्ञानच नाही’ असे सौ.नी फोनवर माहेरच्या मंडळींकडे केलेल्या जाहीर प्रगटना पर्यंतच्या सगळ्या अपमानांची परतफेड बाकी आहेच.

मग आम्ही चौघेही (मी,सौ,मुलगा व खडा) डॉक्टरांच्या क्लिनीकच्या बाहेर आलो.सौभाग्यवतींशी चर्चा केली.ती लढाईवर निघालेल्या झाशीच्या राणीसारखी काहीही करायला तयार होती.मी स्वतः ऑपरेशन या शब्दालाच अतिशय घाबरतो.एक वेळ मी `बायको’ या शब्दाला त्यातल्या त्यात कमी घाबरेन पण ऑपरेशन म्हटल्यावर माझी बोबडी वळते.(इथे मुद्दाम घाबरण्याची परिसीमा लक्षात यावी म्हणून `बायको पेक्षा जास्त’ अशी तुलना केली आहे.वास्तवात काय असावे हे आपल्यातले अनेक पुरूषमंडळी मनोमन जाणताच.)
मी शेवटी ऑपरेशन टाळून लिथोट्रिप्सी करायचे ठरवले.वेळ,वार ठरवून आम्ही सगळ्या तयारीने एका सकाळी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो.हॉस्पीटलचा गाऊनसुद्धा आदेश भाऊजींनी दिलेली पैठणी नेसावी त्या ऐटीत घालून सौ मोठ्या दिमाखात ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्या.आत आधी तिला भुल देणार होते म्हणे.मी मनात म्ह्टले `ही ला काय भुल द्दयायची काय गरज?,नुसतं पडलं की झोप लागणा-या सुदैवी लोकांपैकी ही आहे.ती झोपेत असताना बुलडोझर चालवला तरी जाग येणे नाही.काळजी नसावी.’

बराच वेळ गेला.एव्हाना भुल देऊन हिने स्वप्न पाहायलाही सुरूवात केली असणार.आतापर्यंत झोपेत बाजारातील सगळे मोत्या,खड्यांचे दागिने पाहून झाले असतील हिचे.माझ्या मनात हे विचार चालू असतानाच डॉक्टर भाटवडेकर त्यांचा ऑपरेशन चा पोशाख व तोंडाला मास्क लावून आत गेले.चुकून डॉक्टर ऑपरेशन करायचे नाहीए `लिथो’ करायची आहे हे विसरले नसतील ना?असा प्रश्न माझ्या मनात आला.(असले प्रश्न लहानपणापासून माझ्या मनात येत असत.मी लहानणी एकदा भाबडेपणाने झोपताना माझ्या आईला `उद्या सुर्य उगवायला विसरणार नाही ना? असे विचारून प्रत्यक्ष सुर्यनारायणाला सुर्यनमस्कार घालायला लावले असल्याची आख्यायिका आहे.) मी शांतपणे बाहेर येरझा-या मारायला सुरूवात केली.बराच वेळ गेला पण आतून कुठलाही स्टोन क्रशर सारखा आवाज येईना.धक्का बुक्की ही ऐकू येईना.डॉक्टरांनी मशीन साईलेंट मोडवर लावले वाटतं.

साधारणतः अर्ध्या तासाने एक नर्स सलाईन लावलेल्या आमच्या हीला गाढ झोपेत असलेल्या अवस्थेत स्ट्रेचर वर घेऊन आली.एका रुम मध्ये स्ट्रेचर लावताना मी नर्स ला `झाली का लिथोट्रीप्सी?’ म्हणून विचारताच तिने असा काही पडका चेहेरा केला की मला क्षणभर धस्स झाले.घाई घाई ने मी हिचा श्वास झालू आहे याची खात्री केली.(अरेरे तो चालूच होता.) मी डॉक्टरांकडे घाव घेतली.डॉक्टरांचा ही चेहेरा विशेष विजयी दिसत नव्हता.मी पुन्हा `झाली का लिथोट्रिप्सी?’ म्हणून विचारले.डॉक्टरांनी शांतपणे चेहे-यावरचा मास्क काढला व म्हणाले `ते काय झालं.. आम्ही भूल दिली त्यांना व पहिला शॉट मारताच आमचे मशीन बंद पडले.मी प्रयत्न केला पण ते काही चालू होत नाही.मला मुंबईहून तंत्रज्ञ बोलवावा लागेल.त्यांची भूल उतरायला ५-६ तास लागतील तोवर आराम करू द्दया.पंधरा दिवसांनी पुन्हा पाहू..’सौभाग्यवतींच्या ह्या एका झटक्यातच मशिन बंद पाडण्याच्या कर्तुत्वाचा मला मनोमन अभिमान वाटला. मग लावलेले ( व पैसे मोजलेले) सलाईन पुर्ण उपभोगून व्यवस्थीत शुद्ध आल्यावर आम्ही घरी परत आलो.काम धाम न करता असे आरामात ७-८ तास पडायला मिळाल्याचा एक निराळाच निखार सौभाग्यवतींच्या चेहे-यावर होता.इतका वेळ आपली ट्रीटमेंट झाली अशा समजात ती होती.झालेली हकीकत सांगताच तिचाही मस्त झोपेच्या उपभोगाचा उन्माद गळून पडला.हताश अवस्थेत डॉक्टरांचे मशीन चालू होईस्तोवर पुन्हा काही दिवस वाट पाहण्याखेरीज दुसरा इलाजही नव्हता.

त्यानंतर दर १५ दिवसांनी येणा-या अमावस्या व पोर्णीमेसारखे आम्ही नित्यनियमाने डॉक्टरांच्या मशीन चालू होण्याची आराधना करित होतो.तीन महिने उलटले पण मशीन काही चालू होईना.आमच्या सौभाग्यवतींच्या त्या किडनीतील कणखर दगडाने त्या दगड फोडायच्या मशिनलाच कायमचे खडी फोडायला पाठविले होते.मशीन मुळे माणसे दगावतात हे ऐकले होते पण माणसाने आणी ते ही एका स्त्री मुळे मशीन कायमचे यमसदनी गेल्याच्या त्या विलक्षण प्रसंगाची नोंद कायमची इतिहासात पितळाक्षरांनी व्हायला हवी.(सोने,चांदी चे सध्याचे भाव बघता आता विशेष घटनांच्या ऐतिहासिक नोंदी सुवर्णाक्षरांनी न करता पितळाक्षरांनी करायचा वाक्प्रचार रुढ करण्याचा साहित्य संमेलनानिमित्त सर्वांसाठी प्रस्ताव..यावर कमीत कमी वाद नको.)
क्रमशः लवकरच…