Friday, May 8, 2015

मूषक वध – एक संघर्षमय साहसकथा भाग-४

मूषक वध – एक संघर्षमय साहसकथा भाग-४

दरम्यान माझ्या एका बालमित्राची भेट झाली. इलेक्ट्रिकल इंजीनियर असलेला आमचा हा मित्र `पवन’, त्याच्या कंपनीत होणा-या चो-यांविषयी बोलत होता.त्यात चोरांचा बिमोडासाठी त्याने वीजप्रवाह व तारांचा वापर कसा केला हे तो त्याच्या नेहेमेच्या सवयईप्रमाणे एक मोठी कथा कथन केल्यागत रंगवून रंगवून सांगत होता…`म्हणजे बघ महेश…..त्या साल्यांचे  दिवस आता भरले होते.. (चोरांसाठी वापरले गेलेले आदरवाचक विशेषण..त्याचा नावाशी साधर्म्य असणा-या नातेवाईकांशी संबंध नाही) मग मी त्या रात्री ठरवले की आज इस पार या उस पार…आज एक तर ते चोर राहतील नाही तर मी…सालं इंजीनियरींग काय झक मारायला केलं आपण..?’..आता हा प्रश्न असा होता की त्याला माझ्यासारखा इंजीनियरींग करूनही कुठल्याही तांत्रिक बाबींशी संबंध न राहिलेल्या माणसाने लगेच..हो झक मारायलाच झालो इंजीनियर असे उत्तर दिले असते..पण आमचा हा मित्र कुठल्याही प्रश्नाचे समोरचा उत्तर देऊ शकेल अशी सूतराम शक्यताही शिल्लक न ठेवणारा आहे..तो लगेच स्वतःच उत्तर देतो…

तर `सालं इंजीनियरींग काय झक मारायला केलं आपण..?’. अरे ह्ट्ट…मी त्यांना पुरून उरणारच मला माहित होते…मग मी काय केले असेल सांग..? (येथे उत्तर देणे अपेक्षित नव्हते…) मी लगेच दोन वायर घेतल्या…मग त्या गुंडाळल्या कंपाऊंडच्या तारेला…त्यातून टाकला साला ४४० व्होल्ट चा सप्लाय…आणी मग…पवन सांगत होता…मी ऐकत होतो….(तो नेहेमीच फक्त बोलतो आणि आम्ही नेहमीच सगळे फक्त ऐकतो)...
युरेका…… (एखाद्या गहन प्रश्नावर उपाय सुचल्यानंतर ताबडतोब कपडे काढून आंघोळीला बसून या शब्दाचे उच्चारण करावे व आंघोळ अर्धवट सोडून जगाची पर्वा न करता (तसेच) रस्त्यावर पळत सुटावे असा सर्वसाधारण संकेत आहे..)

दुस-याच दिवशी दोन लांब तारा,सॉकेट,प्लग,बटन या सर्व सामुग्री सकट आणी मित्राने दिलेल्या मोलाच्या सल्ल्याप्रमाणे पुर्ण तयारी झाली…तार बिळाच्या आतून जितक्या आत टाकता येतील तितकी टाकून फिरवून बाहेर काढली होती. माझे हे सगळे चाललेले प्रयोग जोशीकाका बघत होते.आणि त्यांच्या हाताची मुठ नाकापाशी गेली..त्यांची नजर वर आकाशाकडे गेली विचार करत ते आत निघून गेले. याचे कारण म्हणजे वीज,शॉक ह्या गोष्टींना जोशीकाका प्रचंड घाबरत असत.बाहेर खांबावरची विजेची तार वा-यानी थोडी जरी हलली तरी यांना ती आपल्याच अंगावर पडण्यासाठी `रनअप’ घेत असल्याचा भास होत असे आणि मग वर बघत बघत ते शेपुट आत घातलेल्या कुत्र्यागत रस्ता पार करत असत.त्यांना वर बघताना पाहून अनेक जण उत्सुकतेपोटी आभाळाकडे पहात आणि मग जोशीकाकाही हे सगळे वर का बघत आहेत असे वाटून थांबून पुन्हा वर पहात असत…बराच वेळ केलेल्या निरीक्षणानंतर काहीच कुठे नाही म्हटल्यावर त्यांची हाताची मुठ नाकापाशी जी जाई ते अगदी घरी परत येईपर्यंत.

त्या उलट ह्या बाबतीत जोशीकाकू मनानी अतिशय खंबीर होत्या.घरातील फ्युज,ट्युब यशस्वीरित्या बदलण्यापासून ते मामुली बिघाड झालेल्या वीजेच्या उपकरणांना आत्मविश्वासाने उघडून ठेवून कायमचे स्वर्गवासी करण्यापर्यंत त्यांचे आजवरचे कर्तुत्व होते.एकदा तर हौशीनी आणलेल्या इलेक्ट्रॉनिक कॅसीयो चा  `नि’ बरोबर वाजत नसल्याची शंका आल्याने त्यांनी चार स्क्रू खोलून काही प्रयोग केले असता, `ध’ व `नि’ या दोन सुरांनी `मिले सुर मेरा तुम्हारा’ अशा आणा भाका घेत एकमेकांसोबत मिलन केले आणी सप्त सुरांना आपले एक भावंड गमवावे लागले. हे जरी असले तरी काकूंची असल्या तांत्रिक वस्तू उघडणे व आत काहीतरी हात घालून खटपट करण्याची हौस कुठेही कमी झालेली नव्हती. ह्याचे महत्वाचे कारण कदाचित चार उघडलेल्या उपकरणातून एखादे काकूंचा तडाखा बघून घाबरूनच चालू होत असत..हे असणार.

मला आज वायर,सॉकेट असले प्रयोग करताना बघून काकू पदर खोचून हिरहिरीने सामील झाल्या नसत्या तरच नवल..`महेशराव, आज एकदम न्यूट्न घुसला की काय अंगात…वायर,लाईट वगैरे….’ काकूंना सगळे विज्ञानातले शोध न्यूटनरावांनी लावलेले नसून एडिसन नावाचा लाईट लावणारा शास्त्रज्ञ वेगळा होऊन गेला हे मी सहज सांगायला गेलो असता…अहो महेशराव,शेवटी न्यूटन काय आणि तुमचा एसिडन काय…शेवटी ते एकाच काळातले..कोणी कोणता शोध लावला तरी असे श्रेय ओरबाडायला काय ते काही वाटवेबाई आहेत?...असे म्हणत जोशीकाकूंनी एडिसनाला पार `एसिड वाश’ देऊन आपले काळ,काम,वेगाचे गणित विसरायला लावले होते. तसेच सार्वजनिक गणपतीत स्वतःचे वजन वापरून (ओळख या अर्थाने) आमदाराच्या हस्ते एक आरती ठेवल्यामुळे लोकप्रिय झालेल्या वाटवेकाकूंचा स्थानिक पातळीवर शाब्दीक सूड उगविला होता.
सॉकेट पासून निघालेली वायर बिळात फिरून पुन्हा घरातील सॉकेट पाशी आली होती.आता तयारी पुर्ण झालेली होती.कधी एकदा बटन दाबतो आणि शॉक लागून घूस मरते असे मला झाले होते.ती आतच मरून पडली तर तिला ओढून बाहेर काढण्यासाठी एक लांब बारीक सळईही मी आणून ठेवलेली होती.

`जय हो पवन बाबा की’ अशी भावनात्मक साद मैत्रीच्या भक्तीरसात न्हाऊन निघाली आणि देवळाच्या गाभ्यात घंटानाद करावा तसा बटनावर हात मारला….जोरात आवाज झाला….. फटाका हातात फुटल्यागत असह्य चटका बसला…मी गर्भगळीत झालो…त्यातच गाभा-यातल्या उदबत्तीच्या सुगंधाऐवजी जळका उग्र वास आसमंतात दरवळला आणि..आणि…आमच्या सौ ची ती पेटंट किंकाळी पुन्हा येऊन आदळली….मी भानावर आलो….वायर खोचलेल्या सॉकेट पासून घूर येत होता..त्या सॉकेटच्या सर्वांगावर काळे डाग उडून ते कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचे राहिले नव्हते…वायरही तोंड काळे करत दूर फेकली गेलेली होती….धूर घराचे धुराडे सापडत नसल्याने रुसून तिथेच घुटमळला होता…काहीतरी जोडणी करण्यात गडबड झाली हे मी मनोमन ताडले.धावत बाहेर आलो…बाहेरचे दॄश्य हेलकावणारे होते.बाहेरच्या विजेच्या पोलवर काहीतरी स्पार्कींग झाल्याने तेथे बघ्यांची गर्दी जमली होती.सगळीकडची वीज गेल्याचेही लक्षात आले. बिळात जाणा-या त्या दोन्ही तारा पार कळकभिन्न झालेल्या होत्या.लांबवर सौ व जोशीकाकू एकेमेकींना घट्ट बिलगून उभ्या होत्या.आत आलेल्या फटाक्याच्या आवाजामुळे आत माझे काही बरेवाईट झाले असेल असे वाटल्याने (कदाचित) पण जोशीकाकू तर जवळपास आमच्या हिची समजूत काढायच्या पोझ मध्ये पाठीवर एक हात ठेवून होत्या.मी बाहेर आलेले बघताच दोघीही धावतच पुढे आल्या…घराच्या आत न्याहाळत माझ्याकडे बघताना सौ च्या चेहे-यावर कमालीच्या आनंदाची लकेर उमटली…( फार भाबडी आहे हो ही…खूप प्रेमही करते माझ्यावर)..

`अय्या…मला वाटलं घरातला टी.व्ही.च उडाला….बरं झालं बाई…आताच नवा घेतला होता.’.टी.व्ही.उडाला नाही म्हटल्यावर जोशीकाकूंचा चेहेराही टवटवीत झाला.कधी कधी फुलटॉस चेंडू ही यॉर्कर ठरू शकतो हे मला पटले..दरम्यान मी सारखा हाताच्या बोटांकडे बघत होतो हे जोशीकाकूंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सौ ला खाणाखूणा करून सांगितले…त्यानंतर मग `अगं बाई…तुम्हालाही लागलं की काय..? असे म्हणत मग मलमपट्टी साठी साहित्य आणायला सौ आत गेली.

जोशीकाकाही दरम्यान बाहेर आले होते.`महेशराव,झेपतील तेच प्रयोग करा…’ माझ्या हाताकडे बघत ते म्हणाले.पुन्हा त्यांचा हात मुठ आवळून नाकापाशी गेला..विचारांचा गरूड गगनझेप घ्यायला तयार झाला होता.थोडा वर गेला असता तर मी त्यालाच ही घूस कुठे वरून दिसली तर झडप घालायला सांगणार होतो.

अखेर मुषक वधा चा हा तांत्रिक उपायही फोल ठरला. पवन ला फोन लावावासा वाटत होता पण तो काय म्हणणार मला माहित होते..`साल्या…तुला कोणी नसते उपद्व्याप करायला सांगितले..मला सांगितले असतेस तर मी कोणाला पाठवून त्या हरामखोराला असा भाजला असता ४४० व्होल्ट देऊन…(येथे हरामखोर म्हणजे मुषक, मी अथवा जोशीकाका नव्हे..)’ आता हे शब्दामृत या क्षणीतरी फुकट पिण्याची माझी इच्छा नव्हती.कोप-यावरच्या इलेट्रीशियनला निरोप दिला (गुंता निस्तरण्यासाठी) आणी मी शांतपणे फे-या मारण्यासाठी गच्चीवर गेलो..

सौ मलम गच्चीवर घेऊन आली.श्रावण महिन्याची नुकतीच सुरूवात होती..वारा सुटला होता..वातावरणात एक वेगळाच रोमांस होता.गच्चीवर माझी एक आरामखुर्ची कायम टाकलेली असते.प्रपंच चालवताना कधी कधी होणारी शारीरिक व मानसिक दमछाक विसरण्यासाठी मला ही आरामखुर्ची खूप कामी आली आहे.मी वर असा आलो तर मला शांततेची गरज आहे हे सौ ओळखते. मी आरामखुर्चीत डोळे बंद करून पडलो.काळोख पसरला होता…तिने शांतपणे माझा हात हातात घेतला (मलम लावण्यासाठी...)…आज त्या स्पर्शात कमालीची उब होती…

`चिऊ’,खूप निराश झालोय मी आज…’मी हिला प्रेमाने चिऊ म्हणत आलो आहे…
हाताला मलम लावत ती म्हणाली…`तरी मी तुम्हाला म्हणत होते,आपण हे असले प्रयोग करताना पवनभाऊजींना बोलावून घेऊ.’

`जाऊ दे…त्याला तरी कसं असल्या फालतू गोष्टीत अडकवणार आपण..’ आराम खुर्चीतून थोडा वर होत मी म्हणालो.खाली इलेक्ट्रिशियन कसलीसे ठोकाठोक करण्याचे आवाज येत होते.

`पण मग आता काय?..ती डुचकी घूस तर आपले घर पाडायला बसली. ती ह्या घराची मालकीण आणि आपण आपले कैदेत असल्यासारखे…’ सौ च्या आवाजात कापरे भरलेले होते.
(`डुचकी’ हा शब्द दुस-या स्त्री विषयी संताप व वेळप्रसंगी तिच्या कर्तुत्वाविषयी असामान्य आदर व्यक्त करणासाठी सामान्य बोलीभाषेने दिलेला विशेष दागिना मी मानतो. ही `दुसरी’ स्त्री जवळची नातलग असल्यास ह्या शब्दाची धार अधिक वाढते.पुर्वी माझी आई व सौ एकेमेकींविषयी आपापल्या माहेरी खाजगीत बोलतना या सामान्यनामाचा यथेच्छ वापर करत असत हे मी ऐकून होतो.)

एवढ्यात `येऊ का महेशराव?’ हे शब्द कानावर आले.जोशी काका व काकू वर गच्चीवर आले होते.आता सिन असा…मी आरामात आराम खुर्चीवर पडलेलो,माझा हात मोठ्या प्रेमाने(?) सौ च्या हातात, मलम लावताना ती थोडीशी माझ्या जवळ झुकलेली आणी मी ही थोडे अंग अवघडले असल्याने थोडा पुढे झुकलेलो…त्याचा परिणाम असा झाला की मी काही बोलण्याच्या आतच जोशीकाकू…`अगं बाई,सॉरी हं…मला वाटतं…आम्ही जिना वाजवूनच आत यायला हवे होते..’..आता जोशी काकूंचा बलदंड देह साधा अंगणातून चालला तरी कंपनं देऊन जातो..इथे ५० वर्षांपुर्वीचा जिना धडधडला असणारच..त्या वेळी इलेक्ट्रिशियनच्या त्या ठोकाठोकीत जोशीकाकूंची ती द(आ)बकी पाउले विरून गेली असावी एवढेच..पण `जिना वाजवून येणे’ ह्या सामान्य दिसणा-या वाक्यात गच्ची बंद करण्याचा दरवाजा मागेच सडून पडून गेल्याने गच्चीवर ठेवलेला काकूंचा जुना कुलर कोणीतरी उचलून नेल्याची आठवण करून देणे हा छुपा उद्देश असेल हे आपल्यापैकी किती जणांनी ताडले बरं…? असो…

इतक्यात वीज परत आली...रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात मला काकांच्या व काकूच्या हातात भागिदारीत एक लांबट पिंजरा दिसत होता.त्याला एका बाजूने काकांनी तर दुस-या बाजूने काकूंनी धरलेला असल्याने तो बराच जडही असावा..`महेशराव, ही आमच्या जोशी कुटूंबाकडून आपणासाठी सप्रेम भेट..’ , मी बघतच राहिलो..मी हिला `चिऊ’ म्हणतो यापलीकडे माझा पक्षीकुळाशी काडीचाही संबंध नव्हता. माझ्या चेहे-यावरचे गोंधळलेले भाव ताडत काका म्हणाले,`हा त्या घुशी साठी..ह्याच्या आत केक ठेवायचा आणि मग तो खायला घुस आत आली की तिच्या वजनानी अशी ही  झडप दाबली जाते..आणी असा हा दरवाजा बंद होतो…सटकन आवाज झाला आणी त्यानंतर काकंचे `ओय…आ…आई गं….’ अशी आरोळी…काकांनी चुकून त्या पिंज-याचे दार आपल्याच हातावर पाडून घेतले होते.मग आम्ही ते हातानीच वर करून काकांचा तो दुखावला गेलेला `मदतीचा’ हात बाहेर काढला.आता मलम लावून देण्याची वेळ काकूंची व आरामखुर्चीत बसण्याचे सौभाग्य काकांचे होते…आम्ही कुणीही न सांगता `जिना वाजवत’ व पिंजरा घेऊन खाली गेलो.

पिंजरा तसा वजनाने नाही तर आकारानेच मोठा होता.दोन मोठ्या घुशीतर आरामात डबल बेड टाकून या झोपू शकल्या असत्या.मला आजची रात्र वाया जाऊ द्यायची नव्हती.आणलेला केक संपलेला असल्याने शेवटी कणकेचा गोळा टाकायचे मी ठरवले.`मुझे किसीभी हालत मे गब्बर चाहिये ..सिर्फ जिंदा’… हे डॉयलॉग आठवून त्या घुशीला जिवंत का होईना पकडण्याचे मनात होते.एकदा का ती पिंज-यात आली की मग…ही ही हा हा हा हा… असे क्रुरपणे हसत मी तिला यमसदनी धाडू शकलो असतो…

दरम्यान प्रचंड सोसाट्याचे वादळ सुरू झाले.आकाशात काळेकुट्ट ढग गोळा होऊ लागले.कुठल्याही क्षणी मुसळधार वृष्टी होणार याचे पुर्ण संकेत होते.कणकेचा गोळा पाण्याने विरून जाऊ नये म्हणून मी पिंज-यावर एक प्लॅस्टीकची ताडपत्री टाकली व पिंजरा उडून जाऊ नये म्हणून मी त्यावर दोन तीन ठिकाणी दगडं ठेवले.पिंज-याचा दरवाजा उघडा करून त्याची दांडी कणकेचा गोळा ठेवलेल्या त्या ताटावजा चौथ-याशी जुळवली.पिंज-याच्या मागचा बाजूनी एक काडी आत घालून ताटावर घुस बसली तर दरवाजा बंद होतो हे प्रात्यक्षिक करून पाहिले.अचानक मला काय वाटले माहिती नाही पण मी एका छोट्या फडक्याची घडी करून त्या पिंज-याच्या पृष्ठभागावर अंथरली.

पाण्याच्या प्रवाहात पिंजरा येणार नाही अशा पद्धतीने मी तो ठेवला.काकांनी इतक्या काळजीपोटी दिलेला तो पिंजरा कमीत कमी वाहून जाऊ नये ही भूमिका.आता पुर्ण तयारी झाली होती. दरम्यान पाऊस सुरू झाला.दहाच मिनीटात पावसाचा वेग प्रचंड वाढला होता.थोड्याच वेळात रस्त्यावरून पाणी दुथडी भरून वाहायला सुरूवात झाली..अचानक जोराने वीज कडाडली आणी वीजपुरवठा पुन्हा बंद झाला.आता जवळपास पुर्ण शहराची वीज खंडीत झाली होती.पाऊस रात्रभर कोसळत होता.गेल्या अनेक वर्षात इतका पाऊस एका रात्रीत झाला नसेल.रात्रभर खळखळून वाहणा-या पाण्याचा आवाज येत राहिला.

अर्धवट झोपेतच रात्र सरली.उजाडताच लगबगीने बाहेर आलो..रस्त्यावरचे झाड उन्मळून खाली पडले होते.रस्त्यावर पाणी अजूनही वाहतच होते.अंगणात जवळजवळ पोटरीएवढे पाणी होते.पाऊस मात्र थांबलेला होता.पिंजरा मी थोडा उंचावरच्या जागेवर ठेवल्याने तो मात्र जसाच्या तसाच होता.इतक्या पावसात घूस त्यात येऊन गोळा खाण्याची सूतरामही शक्यता नसल्याने मी आधी घराला काही हानी झाली नाही ना हे पाहण्यासाठी अवती भवती पाण्यातून रस्ता काढत गेलो.झाडाने पुर्ण रस्ता बंद केलेला होता.रस्त्यावरून वाहून येणा-या पाण्यात अनेक वस्तू होत्या ज्यात चपला,काड्या,काही प्लॅस्टीक थैल्या,फेकलेले शहाळे…आणि…आणि….हो…एक मोठ्या घुशीचे शव….हो….मोठ्या घुशीच शव…..मी त्या पाण्यातही जागच्या जागेवर उडीच मारली..टम्म फुगलेले व तोंड उघडे असणारे ते घुशीचे शव..ज्याची मी सकाळी तीन दिवसाआड येणा-या नळाच्या पाण्यापेक्षाही जास्त वाट पाहिली…ते शव…

मी हे घरी सांगण्यासाठी सौ ला हाक मारणार तोच….`अहो…..अहो…’ हा सौ चा,`बाबा …बाबा….’ हा साक्षीचा आणी `महेशराव….लवकर या….महेशराव…’ हा जोशीकाकांचा अशा तीन आरोळ्या प्रादेशिक बातम्या,विवीधभारती व गांधी वंदना एकत्र लागल्यासारख्या आल्या..मी पाणी तुडवत धावत कंपाऊंडच्या आत गेलो..सगळे त्या पिंज-या जवळ उभे होते… सौ धूर निघून जळालेल्या दुधाच्या पातेल्याच्या तळाकडे बघावी तशी बघत होती.. त्या धुराचा त्रास झाल्याने बहुदा काकांच्या हाताची मुठ नाकापाशी जाऊन नाक जोरजोरात श्वास आतबाहेर टाकत होते,साक्षी जागच्या जागेवर उड्या मारत टाळ्या पिटत खिदळत होती तर जोशी काकू नुकत्याच काकांना शोधत त्यांच्या मागे येऊन थांबलेल्या होत्या..
मी धावतच पिंज-यापाशी गेलो..पिंज-याचा दरवाजा बंद झालेला होता.त्याच्या वर असणारे ताडपत्रीचे आवरण थोडेशे बाजूला केलेले होते.आणि आत…आत…

(इथे क्रमशः टाकून सस्पेन्स वाढविणार होतो पण अशा अनेक कथा पुढे वेळेअभावी अपु-या राहिल्याचा अस्मादीकांचा इतिहास आहे.त्यामुळे आज शेवट करूनच टाकूयात..पता नही कल हो न हो..)

आणी आत…जिच्यासाठी आम्ही जंग जंग पछाडले,जिच्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस आणी सी एलच्या विदाऊट पे लिव्ह करून पायावर धोंडा मारून घेतला,जिच्या साठी शरीराच्या अनेक भागातला मुका मार आणि तळबोटावरचा फोडही आम्ही आनंदाने सहन केला,जिच्या साठी आम्ही आमच्या पांढ-याशुभ्र सॉकेट वरचे आणी गव्हाळ ( किंबहुना काळ्या) गुडघ्यावरचे डागही हसत हसत घुवून काढले,जिच्या खाण्यासाठी आणलेला केक दाखवून आम्ही आमच्या मुलींच्या तोंडचे पाणी पळवले त्याच आमच्या या कथेच्या नायिकेला तिच्या पिलावळांना स्तनपान करताना आम्हाला बघावे लागत होते…

मी स्तब्ध होऊन बघतच राहिलो.मी टाकलेल्या त्या कपड्याच्या घडीवर आरामात घुस पहूडली होती व तिला ५-६ पिले लगडून स्तनपान करत होती..बाहेर रात्रभर झालेल्या हैदोसाची कुठलीही चिंता घुशीणी च्या चेह-यावर नव्हती.तिच्या त्या काळ्याकुट्ट चेहे-यामुळे तिच्या चेह-यावर आम्हाला पाहून काही प्रतिक्रिया उमटल्याचे मला जाणवले नाही.पिले मात्र ब-यापैकी उजळ आणि गोंडस होती हे मान्य करायला हवे.

मी सर्वांकडे नजर टाकली..आई आणि पिले या दोन शब्दांची सांगड घालताना फक्त मातृत्वच शिल्लक राहते हेच खरे..क्षणभर विचार केला आणि शांतपणे पिंजरा उचलला. `बाबा…प्लीज त्यांना फेकू नका….’ साक्षीने टाहो फोडला…..…`अहो..म्हणते..त्यांचे पिणे होऊ द्या मग मारू त्यांना…’ सौ पुटपुटल्या…काकांच्या विचारांची गती अचानकच वाढली…मी त्यांच्याकडे बघितले..काय समजायचे ते समजून त्यांनी घरात जाऊन गाडीची चावी आणली…व गाडी चालू केली…`साक्षी…चलतेस…पिल्लांना दूरवर डोंगरात सोडून येऊ….’

त्यावेळेस तिच्या चेहे-यावर बापाविषयी वाटलेला अभिमान ओसांडून वाहत होता. माझ्या या निर्णयावर काका,काकू ही खूश दिसले…आणी सौ नी पदर डोळ्यांना लावला….काका गाडीचा गियर टाकतात न टाकतात..तोच….पुन्हा ती सौ ची पेटंट किंकाळी मागून आली..मी लगबगीने खाली उतरलो तेव्ह्या सौ व जोशीकाकू पुन्हा एकमेकींना बिलगून रस्त्यावरच्या पाण्याकडे पहात होत्या आणी त्यात तरंगणारे ते मघाचे घुशीचे शव तोंड वासून त्यांच्याकडे बघत होते……`अहो हे काय आणखी….?’

मी शांतपणे एक जुन्या वर्तमानपत्राच्या कागदात ते शव उचऊन मागच्या डिक्कीत टाकले…आणि म्हणालो..

`हाच तो..…`मूषकवध’…निसर्गाने केलेला….’ आणी आमची गाडी दूर त्या डोंगराच्या दिशेने जाऊ लागली….

कथा संपली...

Tuesday, May 5, 2015

मूषक वध – एक संघर्षमय साहसकथा भाग-३

मूषक वध – एक संघर्षमय साहसकथा भाग-३

`काका,मी कालच रात्री केक टाकलाय त्या घुशीसाठी..बघू या काय होते ते..’

सकाळ होण्याची मी जवळजवळ कशी बशी वाट पाहीली. पहाटेच लगबगीने खाली जाऊन मी केक टाकलेल्या दोन्ही तिन्ही जागा नीट पाहिल्या.केक नाहिशे झालेले होते. घुशींनी ते फस्त केले आहेत ह्या अत्यानंदाने मला स्वर्ग दोन बोट उरले..( आजवर लिहीताना अनेकदा स्वर्ग दोन बोटांवर आणला आहे..पुढील वेळेस थोड्या टाचा उंच करून रंभा,उर्वशी बघीन म्हणतो…) घुशींनी तो केक डिनर नंतरची स्वीट डिश म्हणून खाल्ला का नाश्त्यात तोंड गोड करायला इतकाच काय तो तपशिल बाकी होता.कधी एकदा तोंड वासून मेलेल्या त्या घुशींचे शव उचलून फेकतो असे मला झाले होते.त्या उत्साहात मी ऑफीसला ‘ मयताला जायचे आहे’ असा निरोपही दिला.त्यावर साहेबानेही मग `तेराव्याचे जेऊनच या म्हणावं’ असा प्रेमळ आग्रह केल्याचेही सोबत कानावर आले..पण मी निश्चयाला पेटलेलो होतो. साहेब गेला उडत हे (मनाशी) म्हणण्याइतके मला मूषक वधाने झपाटले होते.

दर दहा मिनीटाला मी पुर्ण आंगण फिरून येत होतो.मेलेल्या,तडफडणा-या घुशीला बघण्यासाठी माझे डोळे आसूसले होते.सुर्य आता डोक्यावर आला होता.नाश्त्यात नाही तर लंच ला तरी केक खातील ही भाबडी आशा मी ठेवून होतो. रात्री टाकलेल्या केकच्या जागाही मला पक्क्या ठाऊक होत्या.त्या ठिकाणी ते केक नाहीत यामुळे लवकरच काहीतरी गोड बातमी येईल ही मनोमन खात्री होती.`आपल्या मयताची वार्ता येण्याची इतक्या आतुरतेने कोणी वाट पाहत असेल तर हे घुशे…तुझ्या जगण्याला तरी काय अर्थ उरला आहे गं…’असे भावनात्मक आवाहनही तिला मनोमन मी केले...आणी काही वेळाने बातमी आली….. एक कुत्रं बाहेर मरून पडल्याचे कोणीतरी सांगितले.

कुत्रे हे कुठलेतरी विषारी पदार्थ खाल्यामुळे मेले असल्याची त्याच्या तोंडातून येणा-या फेसाकडे बघून चर्चा सुरू होती.चुकून कुत्र्याने तो केक अथवा `केका’वलेली ती घूस तर खाल्ली नसेल..? मी कुत्र्याच्या केकसदॄश्य गोड पदार्थांविषयीच्या आवडी निवडी तसेच त्याची मांजरीसोबत उंदीर खाण्याच्या भागिदारी कराराबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण ह्या कुत्रा व मांजर महायुतीचा या श्वानाच्या महानिर्वाणाशी असणारा संबंध ब-याचश्या बघ्यांच्या आकलनापलिकडे गेल्याने मतदारांचा एक्झीट पोल लक्षात आला नाही. त्यातच ते कुत्रे आपलेच आहे का हे बघण्यासाठी एक जोडपे तेथे येऊन थांबल्याने प्रसंगावधान दाखवत मी तेथून काढता पाय घेतला. 

दरम्यान जोशीकाकूंनी तिंबून ठेवलेला कणकेचा गोळा हातोहात भरदिवसा गायब झाला व जणूकाही गळ्यातील हारातला मोती कोणी काढून न्यावा त्याप्रमाणे काकूंनी त्या कणकेच्या रिकाम्या पातेल्याकडे बघत हताश होऊन टाहो फोडला..लगेच सौ नी घीराचा हात काकूंच्या पाठीवर ठेवल्याने गहिवरून येऊन काकूंच्या त्या सुरांना आणखीनच `ताल’ आला आणी जोशींकडे काही वाईट बातमी घडली आहे असे समजून शेजारच्या घरातील राक्षसभुवनकरांपासून ते कोप-यावरच्या रत्नपारख्यांपर्यंत सगळे आत डोकावून गेले.`गोळ्यात गोळा कणकेचा गोळा…जोशीकाका आहेत अजून काकूंना आवरा’ असले उखाणे मला सुचायला लागले.हा प्रकार इकडे सुरू असतानाच नुकत्याच आणून टाकलेल्या किराणातील गव्हाच्या पोत्याला धार लागून गहू चालत चालत अंगणात गेल्याचे खळबळजनक वृत्त कुमारी श्रेयाने पोहोचवले व आम्ही धावत घरी गेलो.घरात अक्षरशः हैदोस माजला होता.पोत्यातील गव्हाने वेगळ्या चुलीकडे वाटचाल केलेली होती तर गाद्यांमधला कापूस अचानकच गादीचा पाठींबा काढून बंड करत युतीबाहेर पडला होता,देवघरातील तुपात भिजवलेल्या कापसाच्या वातींचा डब्बा पुर्ण उघडा होऊन `वात’ आल्यागत पडला होता.हे सगळे पाहिल्यावर सौ हंबरण्याच्याही पलीकडे जात फक्त तोंडाचा चंबू करून विस्फारीत नजरेने पाहत राहिल्या.`तुझे डोळे सुंदर आहेत त्यांच्याकडे बघत रहावेसे वाटते असे मी काही गाफील क्षणी तरूणपणी बोललोही असेल…पण आजचे सौ चे ते विस्फारलेले डोळे कुठल्याही भयपटात सहज ड्रॅक्युलिनीचा क्लोजअप म्हणून खपले असते.

गोष्ट आता हाताबाहेर गेली होती.घराच्या चार भिंतींच्या आत येऊन केलेला हा हैदोस कुठल्याही दरोड्यापेक्षा कमी नाही ही मनोमन मला जाणीव झाली.टाकलेला केक एकतर घुशींनी न खाता त्या मेलेल्या दुर्देवी कुत्र्यानी खाल्ला असणार असे वाटून मी पुन्हा जाऊन केक चे दोन पुडे घेऊन आलो.या वेळेस केक टाकताना तो अगदी बिळाच्या तोंडावर टाकला व कुत्रा वा मांजर जाऊ शकणार नाहीत अशा दगडांच्या कपारीत तो फसवला आणी आता सरहद्दीवर लढणा-या व मशिन गन ची नळी डागून ठेवलेल्या सैनीकासारखा एका कुंडीच्या आड लपून मी निरीक्षण करत बसलो.संध्याकाळ होईस्तोवर कुठलीही हालचाल झाली नाही.आजची टाकलेली सी ल पुर्ण वाया जाणार ह्या जाणीवेने मन विषीण्ण झाले.आता खरोखरच तेरा दिवस रजा टाकावी आणी घुशींना यमसदनी आणी गरज पडली तर मरणयातनांची परिसीमा म्हणजे यमाच्या श्वसुरसदनी धाडूनच ऑफीसला जावे असे वाटायला लागले. अचानक डोळ्यासमोर काजवे चमकले.मी नजर अजून तीक्ष्ण केली असता ते दोन बारीक डोळे माझ्याकडे रोखून बघत असल्याची खात्री झाली.मी नजरेची एकाग्रता कमालीची वाढविल्यावर मला हळू हळू घूस तो केक संपवित असल्याचा भास झाला.मनात हर्षाची लकेर उमटली..मी स्तब्ध राहिलो.हळू हळू तो केक फस्त झाला आणी मी जागच्या जागेवर उडीच मारली.

आज मला शांतपणे झोपायचे होते.उद्या ऑफसला मात्र जावे लागणार होते.त्यामुळे घुशीच्या अंत्यसंस्कारासाठी जोशी काकांकडे सुटी घेण्यासाठी शब्द टाकावा असे मनोमन वाटले.पण सौ नी जोशीकाका गावाला गेले असून घुशींसाठी मी एकटीच पुरेशी असल्याचा दावा केला आणी बाजीप्रभूंचा आत्मा पुन्हा एकदा कृतकृत्य झाला.

सकाळी सकाळी मी ऑफीसला जाण्याअगोदरच घुशी कुठे मरून पडल्या हे पाहण्याच्या उद्देशाने लगबगीत अंगणात उतरणार एवढ्यात घात झाला…मी पाय पायरीवर टाकला आणी का कोण जाणे ५० वर्षांपासून कधीही आपली `पायरी’ न सोडणा-या त्या मजबूत दगडी पायरीचा धीर खचला आणी तिने सीतामाईच्या जन्मभूमीत आपले बस्तान बसवले.अचानक झालेल्या या दग्याफटक्याचा अंदाज न आल्याने मग ७४ किलोच्या ह्या विस्तारीत देहाचाही बुरूज कोसळला. `धप्प’ असा आवाज आला ( खरंतर माझे वजन बघता तो धडाड…असा आवाज असणार..असो उगीच भलत्या विषयावर चर्चा नको..) कारण सौ आतून ओरडल्या `अगं बाई आता या घुशी गेल्या आणि माकडे आली वाटतं छतावर…’ आणी मग आपल्या समस्त मानवजातीच्या त्या पुर्वजाला आपल्या पिलावळांसकट मर्कटलीला करताना पाहण्याच्या अतिव इ्च्छेपोटी हातात पेस्ट व दुस-या हातात ब्रश घेऊन धावत बाहेर आलेली साक्षी हातातल्या पेस्टरुपी द्रोणागिरी सकट भुईसपाट झाली आणी मग तिने वेदनेने विव्हळत भोकाड पसरले.वेदनेच्या हिंदोळ्यांवर झुलत झुलत मी एक हात पार्श्वभागावर,एक कमरेवर व गुडघ्यावर ठेवायला निव्वळ हात शिल्लक न राहिल्याने लंगडत कसा बसा साक्षीला घेऊन घरात परत आलो. सर्वात आधी पायरी धसल्याची खबर घरात दिली.आणी पुढची संभाव्य पडझड थांबविली.

पुढील २४ तास हे निव्वळ शरीराच्या वेगवेगळ्या भागांना शेक देणे,मलम लावणे या उपचारात गेले.दरम्यान जोशी काकू आणी आमच्या सौ यांच्या द्विसदस्यीय समीतीने केलेल्या तपासान्वये कुठेही घूशीचे शव सापडल्याची तक्रार नोंद झालेली नव्हती. प्रचंड नैराश्य आले होते.एकतर या घुशींच्या नादात दोन दिवस फुकट रजा पडली आणी त्यातून काहीही निष्पन्न नाही.घुशीला केक रिचवताना मी स्वतः बघीतलेले असल्याने त्या केक चा काहीही परिणाम त्यांच्यावर झालेला नाही हे उघड होते.थोडे बरे वाटायला लागल्यावर घुसच काय आख्खा माणूस यमसदनाला पाठविण्याची वल्गना करणा-या त्या दुकानदाररुपी रेड्याला रुग्वेदाचे चार श्लोक कानी पाडण्यासाठी तावातावाने मी गेलो असता तो स्वतः आपल्या दुकानाचे पेस्ट कंट्रोल करून घेत असल्याने दुकान ४ दिवस बंद असल्याची धक्कादायक बातमी मिळाली.

आता मात्र माझा संयम सुटत चालला होता.आणि दिवसागणीक घुशीचे प्रताप वाढत चालले होते.पाय-या,कंपाऊंड यावर समाधान न मानता आता तिने आमच्या घराच्या भिंतींखालून भुयारे खणायला सुरूवात केली होती.पायरी सरकल्यापासून माझ्या मनातील धास्ती फारच वाढली होती.मला उघड्या डोळ्यांनी माझे राहते घर भिंती धसल्यामुळे जमिनदोस्त होईल असे वाटायला लागले.ऑफीस मध्ये गेल्यावरही आपल्या मागे घरी काही घडणार तर नाही ना असे वाटत असे.त्या गडबडीत सौ बद्दलही प्रचंड काळजी दाखविली जाऊ लागली.`कशी आहेस…बरी आहेस ना?..’ या सामान्य विचारापूसवजा वाक्यांचा भलता अर्थ काढून, आमच्या हिने कुर्मगती कार्यशैलीमुळे विणकाम अर्धवट राहिलेले श्रेयाच्या वेळेचे स्वेटर पुन्हा विणायला बाहेर काढले.मला आधीच गळ्याशी आलेले घराचे बजेट अजूनच डोक्यावर जाताना दिसायला लागले आणी मग मात्र आता काहीतरी तातडीने करायला हवे ह्याची जाणीव झाली.

विषानंतर जालीम काय ही चौकशी सुरू झाली आणी मग सायनाईड या पदार्थाचे नाव समोर आले.त्याचा एक थेंब आख्ख्या माणसाला क्षणार्धात संपवितो अशी आख्यायिका मी ऐकून होतो.पण हे सायनाईड सगळीकडे मिळत नाही म्हणतात.त्यासाठी लाईसेन्स लागते असे ऐकले.दरम्यान जोशी काका एका औषधी कंपनीत कामाला असल्याने त्यांच्या कंपनीत सायनाईडचा वापर केला जातो हे मागे बोलल्याचे मला आठवत होते.मी `सायनाईड ची एक बाटली घेऊन या’ अशी गळ त्यांना घातली.झालेल्या दुखापतींच्या,गेलेल्या कणकेच्या गोळ्याच्या आणी गादीबाहेर आलेल्या त्या कापसाच्या आणा भाका त्यांना घातल्यावर तेही प्रयत्न करायला तयार झाले.पण नंतर दुस-याच दिवशी त्यांचे डिपार्टमेन्ट बदलल्यामुळे आमचा हाता तोंडाशी आलेला `सायनाईड’ चा घास नियतीने हिरावून नेला.

माझ्या डोक्यात दिवसरात्र फक्त त्या घुशींचा नायनाट एवढाच विचार येऊ लागाला..त्यामुळे ऑफीसच्या प्युन ने `साहेब,फाईल कुठे ठेवू?’ या प्रश्नाला `बिळात ठेव’ हे उत्तर..तसेच डिलीव्हरी साठी तगादा लावून डोकं खाणा-या गि-हाईकाला तो गेल्यावर अगदी `घुशी’ सारखा डोकं कुरतडून गेला हा शेरा…`या बॉस ला ना रॅट किलरच दिले पाहिजे’ हा मनाशी आलेला विचार,रस्त्याने जाता येता पुर्वी प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे लक्ष आता त्याच स्थळांच्या काचेच्या बांगड्यांकडे जाऊ लागले आणि पराकोटी म्हणजे कॉम्प्युटर सोबत असणा-या माऊस ला हात लावताना चारदा विचलीत होणारे मन….आणि हिम्मत करून त्याला धरल्यावर मुंडी पिरगळल्यागत त्याचा होणारा वापर होय…

क्रमशः

मूषक वध – एक संघर्षमय साहसकथा भाग-२

मूषक वध – एक संघर्षमय साहसकथा भाग-२


`अहो काचा कशाला?’ .
`मांजा बनवायचाय..’,आता मी ही वाकड्यात शिरलो.
`अहो,आयुष्यभर चक्री धरणा-यांनी मांजा बनवायचा विचार करू नये’…हे वाक्य हि ने कुठल्याश्या वाचलेल्या कादंबरीतील `आयुष्य भर चाकरी करणा-यांनी माड्या बांधायचा विचार करू नये’ या वाक्यातील निव्वळ चक्री व चाकरी या दोन `चक’व्या शब्दांच्या साधर्म्याचा आधार घेत फेकले.(एरवी साहीत्याशी हिचा संबंध `आता भगिनींनी साहित्य व कृती लिहून घ्या’ या मेजवानी कार्यक्रमातील उपदेशपुर्ण रिसीपी भक्तीभावाने लिहून घेण्यापलीकडे नाही. आणी ह्या साहित्याचे रसग्रहण आम्ही खारट,आंबट,तुरट झालचतर पांचट अश्या निव्वळ `ट’ कारांत चवीच्या पदार्थांना `व्वा व्वा’ असे म्हणत संसाराचा रथ आवाज न करता पुढे चालावत करत असतो.)
मग मी तिला थोडक्यात `ह्या काचा मी त्या बिळासमोर व आत ठेवण्यासाठी गोळा करत आहे’ हे समजावले.मग तिनेही हिरहिरीने जुन्या ट्युबलाईट,बल्ब,फुटक्या बांगड्या,,परवाची फुटलेली तेलाची बाटली,हिच्या माहेरच्या मिळालेल्या टिचलेल्या कप बशा (ज्या आमच्या कामवालीने फोडल्या असा आरोप लावत माहेरवासियांना पाठीशी घालण्याचा हिने अटोकाट प्रयत्न केला होता) ह्यांचा पाहता पाहता ढीग गोळा केला.
आमची ही जमवा जमव चालू असताना बाहेरील भंगारवालाही `आज जुने सामान आवरायला काढले आहे’ हे समजून `साब देना है क्या’? म्हणत त्या `काचे’ री ढिगाकडे बघायला लागला.माझ्या मनात उगिचच `भंगारात तर मीच निघालो आहे रे हा संसार चालवत..काय किलो घेतोस बघ…’ असे निरोपाचे वाक्य येऊ लागले… पण त्यावर तो ` साब, ये माल तो भंगार मे भी नही जायेगा’ असे म्हणेल याची खात्री होती.त्यामुळे मी गप्प राहिलो.असे आमचे भाडेकरू जोशी काकाही आज घरीच होते.आमचा हा काय उपक्रम चालला आहे याचा अंदाज घेत ते बाहेर आले.
`काय महेश राव? आज भंगार काढताय की काय?’ असे म्हणत त्यांनी हाताची मुठ माईक धरल्यासारखी आवळून तोंडाजवळ नेली व खोल श्वास घेतला.आता ही त्यांची एक स्पेशल लकब होती. ते काही विचार करायला लागले की असे हाताची मुठ आवळून नाकाजवळ नेऊन खोल श्वास घेत. त्यांचा हात तसा गेला की त्यांचा काहीतरी विचार सुरू आहे हे आम्ही ताडत असू. पण बाकी काही म्हणा त्यांची ही लकब थेट हातात लांब दांडीचे कमळाचे का गुलाबाचे फूल घेऊन सुंगणा-या त्या अकबर बादशाहाच्या ( का शहजादा सलीम हो) तैलचित्रावत मला वाटत आली आहे.बाकी आमचे जोशीकाका मस्तकावर तेलाचा अखंड अभिषेक केल्यासारखे तेल लावत असल्याने कुठल्याही भिंतीला टेकून बसले की एक अभिनव तैलचित्रकलेचा अध्याय सुरू करत असत. मी तर असेही ऐकून आहे की कुठल्याश्या तेल कंपनीच्या विक्रेत्याने जोशीकाकांचा हा तैल प्रपंच पाहून त्यांना त्या कंपनीचा ब्रॅंड अंबॅसिडर करण्याचीही ऑफर दिली होती म्हणे.पण काकांनी ते लावत असलेले तेल खोबरेल नसून जास्वंदाचे असल्याचा प्रामाणिक गौप्यस्फोट करत इतर कुठल्याही तेलाचा प्रसार व प्रचार करणार नसल्याचे छातीठोक पणे सांगितले आणी मग तो प्रस्ताव `तेल’ खात पडला.
जोशीकाकांनी अजून काही तर्क लढविण्या आधी मी त्यांना थोडक्यात माहिती दिली.त्यांनीही ते ढिगारे पाहिलेले होते.`अहो मग नुसत्या काचा टाकून काय होणार आहे?त्या बिळात पाणी टाकूयात आपण..’असे म्हणत कोणीही न सांगता जोशीबुवा आमच्या घरातला पाईप बाहेर काढण्यासाठी घुसले.मग त्यानंतरचे दोन तास..पाईपाने त्या बिळाच्या आत पाणी सोडणे,थोड्या थोड्या वेळाने दबा धरून बिळाबाहेर कोणी येते का याची वाट बघणे,पुन्हा पाणी टाकणे,पुन्हा वाट पाहणे यात मोठा छान गेला.
जोशीबुवा त्या बिळात पाणी सोडतांना पाईप घेऊन जेव्हा बिळाच्या तोंडापाशी जात तेव्हा ते उदबत्ती हातात घेऊन सुतळी बॉंब लावल्यासारखी पोझ घेत होते.आणी बिळाच्या आत काही काल्पनीक हालचाल जाणवली की बॉंब ला उदबत्ती लागल्याची शंका आल्यावर पळावे तसे मैलभर लांब मागे पळत होते.पण अखेर ब-याच निष्फळ पळापळीनंतर त्या बिळातून बाहेर तर कोणी आले नाही पण अंगण मात्र पुर्ण ओलेचिंब झाले. शेवटी एका प्रयत्नात पळत मागे येतांना त्यांनी त्यांच्या वयाला लाजवेल अशी गिरकी जागच्या जागी घेतली व घसरून भुईसपाट झाले.नको त्या भागाला ईजा झाली व नाईलाजाने त्यांना`रिटायर्ड हर्ट’ होत ही सर्कस थांबवावी लागली.एव्हाना संध्याकाळ झाली होती.शेवटी जमा केलेल्या काचा टाकून बघाव्यात असा मौलीक सल्ला जोशीकाकांनी दिला व आपल्या पराभवाचा बिगुल फुंकला.मग आम्ही काचांचे तुकडे व काही काटे व्यवस्थित त्या बिळांच्या तोंडावर अंथरले व पुन्हा पुन्हा मागे वळून आमच्या त्या काचेरी नवनिर्मीती कडे कौतुकाने बघत घराकडे परत फिरतानाच..का कोण जाणे पण मला दोन लुकलुकणारे डोळे त्या काचेच्या तुकड्यांचा आडून मला न्याहाळत असल्याचा भास झाला.फोटोग्राफर ने स्माईल प्लिज म्हणेस्तोवर तोंड हसतमुख करत फोटोत येण्याचा आटोकाट प्रयत्न करून शेवटी फोटो निघाल्यावर अजिबात अस्तित्वही त्या फोटोत न दिसणा-या दुर्देवी व्यक्ती सारखे ते डोळे, मी निरखून बघितले तेव्हा कुठेतरी गुडूप झालेले होते.
रात्री जेवण झाल्यावर मी जरा कुठे निवांत येऊन आडवा झालो तोच..सौभाग्यवतींची ती पेटंट किंकाळी पुन्हा आसमंतास भेदून गेली.(किं.नं.३).आता काय आणखी म्हणून मी धावत पुन्हा बाहेर पळालो..तर आमची सौ अचानक हातात बॅगा घेऊन आलेल्या सासरच्या माणसाला बघावं( तेही रात्रीचा स्वयंपाक संपवून झोपायची तयारी केल्यावर ) तशी अंगणातील एका कोप-या कडे सुन्न होऊन बघत होती.
`काय गं..आता काय आणखी?’,मी भित भितच विचारलं..
`अहो,काहीतरी पळालं..त्या कोप-यामध्ये…’. अंधारात हि ला काहीतरी भास झाला असल्याचा मला संशय आला.मी अविश्वास दर्शक काहीतरी बोलणार इतक्यात…..
एक प्रचंड मोठ्या आकाराचा काळा कुट्ट उंदीर हि ने दाखविलेल्या कोप-यातून आम्ही काचा टाकलेल्या बिळाकडे पळाला.मी अवाक होऊन बघतच राहिलो.इतका मोठा उंदीर मी माझ्या उभ्या आयुष्यात बघितलेला नव्हता.ह्यालाच घूस म्हणत असावेत असा तर्क मी बांधला.मी टॉर्च घेऊन त्या बिळावर मारला (मारला म्हणजे त्याच्यावर प्रकाश टाकला हो.उगाच फालतू विनोद नकोयत मी फार टेन्शनमधे आहे..) आम्ही टाकलेल्या काचा जशाच्या तशा ठेऊन त्याच्या शेजारून एक छोटे बीळ उकरलेले मला दिसले. तो उंदीर अथवा ती घूस यांनी बहुदा त्या नवीन बिळातच `घूस’ खोरी केली असावी.
एवढया रात्री आणी त्यातल्या त्यात त्या घूशीचे आकारमान बघता पुन्हा त्या बिळापाशी जाण्याची माझीतरी हिम्मत झाली नाही.पण तसे न दाखविता मी हि ला म्हटले…`तू झोप आता..मी बघतो काय करायचे ते..’ माझ्या या आश्वासक बोलण्यावर तिच्या चेहे-यावरील आलेले कृत कृत्य का कसलेसे भाव हे सर्वसाधारणपणे वट पोर्णिमा,हरतालीका या दिवशी (फक्त) तिच्या चेहे-यावर असतात.
माहेरच्या वारश्याला अनुसरून तिने पडल्या पडल्या लगेच वरचा `सा’ लावला.माझ्या मनःपटलावर मात्र आता फक्त आणी फक्त ती `घूस’ली होती.मी लगेच इंटरनेट चालू केले व काही माहिती वाचली. `रॅट किलर’ सारखे औषध रामबाण इलाज ठरेल हे मनोमन मी नक्की केले.
दुस-याच दिवशी संध्याकाळी पुन्हा बाजार पालथे घातले आणी उंदीर मारण्यासाठी मिळणा-या अनेक केक मधून एक जहाल व जालीम इलाजाचा केक खरेदी केला.विकणा-याने नुसता उंदीरच नाही तर आख्खा माणूसही सहज गतप्राण होईल हे खात्रीलायक सांगितले होते.त्यामुळे औषध उरलेच तर माझे अनेक जालीम शत्रू (उदाः माझी एक सी एल ग्रॅंट करताना माझ्या उभ्या आयुष्यात झालेल्या चुकांची चार चौघात आठवण करून देणारा साहेब,मी लहानपणी पोहाणे शिकण्यासाठी जलतरण तलावावर गेलो असता माझ्या पार्श्वभागावर लथ्थाप्रहार करून तलावात ढकलणारा तो जालीम कोच, जावयाविषयी कुठलाही आदरभाव नसणारी हिच्या माहेरची अनेक मंडळी (म्हणजे जवळ जवळ सगळेच देशपांडे खानदान), मी सकाळी फेरफटका मारायला निघालो असता घराच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतर धप्पा दिल्यासारखा अचानक `भो..भो..’ करत अंगावर येणारा शेजारच्या रत्नपारखींकडील कुतरडा (आणी सोबत तो कुतरडा भुंकला की गॅलरीतून थोबाड बाहेर काढत दात विचकावून हसणारे रत्नपारखी…),आणी सगळ्यात महत्वाचे (कुणाला सांगणार नसाल तर सांगतो..) म्हणजे मी एकीच्या नावाने दिलेले गुलाबी पत्र चुकून दुसरीकडे देऊन मला आजन्म शिक्षा भोगायला लावणारा तो नतद्रष्ट कुरीयर वाला या सर्वांना एका पाठोपाठ एक संपविता येतील असा एक क्रूर विचार मनात येऊन गेला.
घाई घाईत घरी आलो.मी आज केक आणला आहे हे ऐकल्यावर बापाविषयी मुलींना अचानक उमाळा आला व तो उंदराचा आहे म्हटल्यावर पुढच्या क्षणाला मावळला.आमचा शत्रूपक्ष आकाराने बराच मोठा असल्याने मी जरा मोठे मोठे तुकडे त्या केकचे केले व तिनही बिळांच्या आत टाकले.सकाळ पर्यंत सर्वनाश होण्याची मनोमन खात्री बाळगत मी शांत झोपी गेलो.इतकेच काय तर त्या माजो-या घुशीला मारल्यावर कुठे पुरायचे ती जागा ही शोधून ठेवली होती मी..
सकाळी सकाळी अजून एक किंकाळी ऐकू आली…या वेळेस सूर बराचसा टारझन शास्त्रीय संगीताच्या क्लासला गेल्यावर जसा ओरडेल तसा होता. रोजची कामे उरकत रियाझ करणा-या जोशी काकू आपल्या गोड गळ्यानी आज हंबरल्या होत्या.मी धावत पुन्हा बाजूला त्यांच्या घरापाशी गेलो तेव्हा जोशी काकू हातात काठी घेऊन तर जोशी काका हाताचा चंबू करत तोंडावर ठेवायच्या पेटंट पोझ मधे उभे होते. आज काकांचा दुसरा हात मात्र पार्श्वभागावर होता (स्वतःच्या…).यावरून परवाच्या चिखलात मारलेल्या त्या सुराने चांगलाच `सूर’ धरला आहे हे जाणवले. ऑर्केस्ट्रा मधील ड्रम वाजवणारा व गायक अशी काकू काकांची पोझ आहे असले विनोदी विचार या गडबडीतही माझ्या मनात येऊन गेले.मला पाहिल्यावर जोशी काकूंनी फेकलेले वाक्य मला भोवळ आणून गेले असते..त्या म्हणाल्या,`महेशराव आता तुम्ही तुमचे उंदीर आमच्याकडे आणून सोडले की काय?’..मला क्षणभर बिळात हात घालून मी एक एक गलेलठ्ठ उंदीर खेचून खेचून बाहेर काढत आहे,ते उंदीर एका मोठ्या थैलीत भरत आहे आणी मग ची ची करणारी ती उंदरे एक एक करून जोशी काकूंच्या खिडकीतून आत टाकत आहे व हे करताना `ही ही हा हा हा हा हा ‘ असे असूरी हसत आहे असे भास व्हायला लागले.
त्या `आमच्या’ उंदरांनी केलेला प्रताप म्हणजे जोशीकाकांच्या घरासमोरील पायरीखालची जमीन त्यांनी पुर्ण पोखरून ठेवली होती व परवाच रात्री दक्षिण ध्रुवाच्या दुखण्यापोटी सुटी टाकावी लागलेल्या जोशीकाकांना आज सकाळी पायरी सरकल्याने घसरून उत्तर ध्रुवाला बर्फ लावावा लागणार होता. जोशीकाकांचा नाकाजवळील हात आता मोकळा झाल्याने त्यांचे विचारमंथन थांबल्याचे मी ताडले.आता दोन्ही हात दोन ध्रुवांवर ठेवत काका पुटपुटले..`महेशराव,मला वाटतं आता काहीतरी जालीम इलाज करायला हवा.’ त्यांच्या बोलण्यातून संताप व कळा यांचे मिश्रण एकजीव झाल्यासारखे दिसत होते.
क्रमशः