मूषक वध – एक संघर्षमय साहसकथा भाग-१
मूषक वध – एक संघर्षमय साहसकथा भाग-१
खालील कथा एका सत्यघटनेवर आधरीत असल्याने पात्रे काल्पनिकच असतील असे नाही.काही जिवीत अथवा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळलेच तर त्याला लेखक काय करू शकतो? शेवटी त्यानी कल्पना तरी किती कराव्यात ?
कथेची प्रेरणा दिल्याबद्दल परममित्र संदीप पाठक यांचे विशेष आभार….
महाभारतात द्रौपदीने रक्षणासाठी घातलेल्या एका हाकेवर जसे भिमाने तिची मदत घेऊन खलनायक किचकाचा वध केला होता त्याप्रमाणे आमच्या या कथेतील नायकाने आपल्या सौभाग्यवतीने मारलेल्या एका किंकाळीवर बायको, मुलं, शेजारी, पाजारी आप्तेष्ट, मित्रमंडळ, नातेवाईक यांच्यासोबत कट रचून कथेतील खलनायक `मूषक’ याला यमसदनी धाडण्यासाठी केलेल्या अपार संघर्षाची `मूषकवध’ ही साहस कथा आहे.
यातील `मूषक’ हा प्राणी साधारणतः लिमोसीन सारख्या लांबट शरीराचा,काळ्या रंगाचा,अंगापिंडाने भरलेला,पिळदार शरीराचा,टोकदार मिशा असणारा,समोरील दात `मिकी माऊस’ नामक सेलेब्रिटी सारखे असणारा असतो. भारतीय उपखंडात ज्याला मोठा उंदीर वा घूस म्हटले जाते.
गणपतीने जेव्हा त्याचे वाहन हॅशबॅक वरून सिडान वर शीफ्ट केले तेव्हा देवाने उंदराऐवजी घुशी ची निर्मीती केली असावी असा एक माझा प्रामणिक समज आहे.
तर महाराजा ही गोष्ट सुरू होते त्या दिवसापासून ज्या दिवशी सकाळी सकाळी आमच्या सौभाग्यवतींनी अंगणात झाडाची फुले तोडतांना पहिली किंकाळी मारली…( किंकाळी नंबर १ )`पहिली किंकाळी’ वरून अजून दुसरी,तिसरी,चौथी ब-याच यायच्या बाकी आहेत हे जाणकारांच्या लक्षात आलेच असेल. त्यामुळे सकाळच्या पेपरासोबत चहा पितांना त्यात बुडविलेल्या माझ्या हातातल्या ग्लुको बिस्कीटाने उरलेल्या तुकड्याची साथ सोडली व तो घाबरून कपाच्या तळाशी जाऊन बसला, जेष्ठ कन्यारत्न साक्षीने नुकतीच उचललेली सुवासिक तेलाची बाटली घाबरून तोल गेल्याने फरशीवर पाडली व त्याचा खळ..ळ.. असा आवाज आला व पुढील क्षणाला कनिष्ठ कन्या श्रेयाने नेमके त्याच वेळी आत येऊन त्या सुवासिक तेलाच्या डोहात डुबकी मारली. या पडापडीत तिघींच्या तिन किंकाळया इको इफेक्ट दिल्यासारख्या एका पाठोपाठ एक आल्या. बायको,मोठी मुलगी,लहान मुलगी,चहा की त्यात बुडालेले बिस्कीट यापैकी प्रथम कोणाकडे बघावे या विवंचनेत काही बोध होण्या आधीच माझ्या हातातील उरलेला बिस्कीटाचा तुकडाही चहाच्या स्वाधीन झाला.
बिस्कीटाचा असा हातातोंडाशी आलेला घास गेल्याने हताश होत मी तसाच कप टेबलावर ठेवला व सौ च्या दिशेने धावलो.ती डोळे विस्फारून एका मातीच्या ढिगा-याकडे बघत होती.मला आलेले पाहताच तिच्या चेहे-यावर कमालीचे वेगळे भाव दिसले.(ते भाव ` बरं झालं बाई तुम्ही आलात’ वाला आनंद असावा असे मला वाटते कारण पाण्याच्या दिवशी चुकून उशिरा उठल्यामुळे घाईघाईत नळ चालू केल्यावर पाणी असल्यास ती पाण्याकडे बघून असा चेहेरा करते.) तिने `अहो बघा ना हे काय!!’ असे म्हणत त्या ढिगा-याकडे बोट केले.मी ही मातीच्या त्या ढिगा-याचे अवलोकन केले.बरीच माती उकरलेली दिसत होती व आत एक छानसे बिळ ही केलेले दिसत होते.
`साप असेल का हो या बिळात’? या सौ च्या वाक्याने मघाची किंकाळी ही तिला झालेल्या कपोलकल्पीत सर्पदंश वेदनेने झालेली असावी हा अंदाज मी बांधला. `असेल हं…कदाचित अजगर ही असेल’ मी विनोद केला.पण सौ असले मार्मिक विनोद खपवण्याच्या मनस्थितीत नव्हती.माझ्या अजगरी विनोदावर फणा काढून ती पुन्हा बिळावरील नजर तिक्ष्ण करीत फुत्कारली… `मग काय चिमणीने अंडरग्राऊंड घेतलंय भाड्यानी?’. सौ च्या विनोदबुद्धी किती खालच्या पातळीची आहे हे त्या `अंडरग्राऊंड’ वरून सिद्ध झाले..अगं उंदीर वगैरे असेल’… मी बोलून गेलो पण उकरलेल्या मातीचे आकारमान व त्या बिळाचा व्यास बघता ह्या प्राण्याची भूमिती सामान्य उंदरापेक्षा मोठी आहे हे नक्की होते.आम्ही तात्पुरती माती पुन्हा टाकून ते बीळ बुजवले व रोजच्या कामाला लागलो.
रात्री झोपताना सौ ने मला आठवण करून खाली जाऊन अंगणात फेरफटका मारून येण्यास सांगितले (व सोयिस्करपणे स्वतः सोबत येण्याचे टाळले).बुजवलेले बिळ व्यवस्थित होते.तरी भानगड नको म्हणून मी त्यावर एक मोठी फरशी ठेवून आलो. दुस-या दिवशी पहाटेची सुरुवातच पुन्हा एकदा `अगं बाई..अय्या हे काय..?’ ह्या पुन्हा सौभाग्यवतींच्या हंबरड्यावजा किंकाळीने झाली (किं.नं.२)..
काल पडापड करून दमल्याने बहुतेक पण दोन्ही कन्या शांत झोपून होत्या. आईच्या कर्णमधूर आवाजाने कानाच्या पड्द्यावर कंपने आल्याने साक्षीने स्वतःचा कान खाजवण्यासाठी उचललेला हात चुकून श्रेयाच्याच कानाला लावला व तिनेही झोपेतच ताईला एक चापट मारली.पुढचा फाईट सिक्वेन्स पहायला मी थांबलो नाही व आमच्या `अगं’ चा `अय्या’ पहायला मी अंगणात धावलो.
`अहो हे बघा नं…’ ..मी ही थोबाड विस्फारून बघतच राहिलो( आपले ते तोंड…दुस-याचे ते थोबाड ह्या सामान्य बोलीभाषेच्या नियमाला मी बगल दिला आहे हे लक्षात घ्या..) काल बुजविलेल्या बिळाच्या आजूबाजूला अचानकच मातीचे दोन ढिगारे दिसायला लागले. येथेही दोन मोठी बिळं दिसत होती. आता मी ही थोडा चिंताग्रस्त झालो.उंदीर,घूस,साप की आणखी काही हा प्रश्न भेडसवायला लागला.पण एका रात्रपाळीत इतका मोठा कामाचा ढिगारा कुठल्याही सामान्य कामगाराने उपसलेला मी आजवर बघितलेला नव्हता (आणी तो ही कुठल्याही इन्सेन्टीव्ह शिवाय..)मी दबक्या पावलाने संपूर्ण परिसर न्याहाळला.दरम्यान साक्षी येउन पोहोचली व तिने सरळ त्या मातीच्या ढिगात हात खुपसला व खेळण्यास सुरुवात केली.`घूसच असणार ही’ ह्या माझ्या वाक्याला ,`बाबा,मला वाटतं,डायनासोर असायला हवा..कित्ती मज्जा येईल…’..असा प्रतिसाद आला आणी माझ्या डोळ्यासमोर डायनासोरचा तो आक्राळ विक्राळ चेहरा,ते दात,तो कर्कश्श आवाज,ते ढीगभर लीद, आणी त्याच्या त्या नुसत्या लाथेने माझे घर उलथापालथ होऊन चोळा मोळा झालेले दिसायला लागले.
`चुप गं…आणि दूर हो बघू तेथून..असले छप्पन डायनासोर मारलेत आम्ही आमच्या माहेरी’ हे सौ चे वाक्य माझ्या मनातील डायनासॉरला त्याने गिळण्यासाठी केलेल्या `आ’ ला ` अक्क्लदाढे त कीड आहे तुझ्या..रूट कॅनॉल करावे लागेल’ असे उत्तर देण्याची हिम्मत देऊन गेले.आमची `ही’ भलतीच धीट आहे पण कंडीशन्स अप्लाय…`छप्पन डायनॉसॉर’ वगैरे वल्गना तो एक फक्त पिटुकला उंदीर आहे हे मनात धरून केलेली होती..जी मारण्यासाठी माहेरी आख्खे देशपांडे खानदान बाजीप्रभूंच्या नावाचा जप करत उतरत असणार व चारही कोप-यात चार भरभक्कम देशपांडे उभे राहिल्यावर तो बिचारा उंदीर हाय ब्लड प्रेशरनेच गुदमरूनच यमसदनी जात असणार यात मला काहीही शंका नाही.एरव्ही `ही’ डास मारतानाही आधी हीट मारते व त्यानंतर त्या भूलतंत्रामुळे तर्र होऊन रांगत चाललेल्या डासाला `मेल्या बरा तावडीत सापडलास’ असे म्हणत चपलेने तुडवत असूरी आनंद मिळविते.आणी इथे `छप्पन्न डायनोसॉर म्हणे’ असो…देशपांडे कुणीकडचे….(आता इतका उद्धार केल्यानंतर `देशापांडे’ हे आमच्या श्वसूरप्रजातीच्या कुटूंबाने धारण केलेले आडनाव असल्याची शंका आपल्या मनात आली असेल तर..आपण हा लेख मनोभावे वाचत असल्याबद्द्ल अभिनंदन…)
आता मला ते मातीचे ढीग व बिळं सतत नजरेसमोर दिसायला लागले.दिवसभर ऑफीस मधेही तेवढेच विचार…अहो बॉसची केबीन म्हणजे तो मातीचा ढिगारा असून केबीन चे दार म्हणजे ते बीळ आहे असे भास व्हायला लागले.(त्या गडबडीत मी त्या बिळाच्या आत डोकावून आत खुर्चीत बसलेल्या प्राण्याचा चेहेरा रेफेरेन्स साठी पाहून घेतला..प्राणी कोणावर तरी रागानी फुत्कारत असल्याने त्या प्राण्याला शिंग असल्याचाही मला भास झाला.)मग अचानकच काहीतरी डोक्यात विचार आला…तडक हाफ डे टाकून घरी आलो.बायको गाढ झोपलेली होती.बाकी हा एक गुण माहेरून आणलाय यात शंका नाही.अहो हिचे बाबा म्हणजे आमचे श्वसूर बसल्या जागी पेंगायला लागतात.आमच्या लग्नात तर दोन्ही व्याही एकमेकांना हाताला हळद लावून गळाभेट करतात ना त्या कार्यक्रमात फोटोग्राफर ने ती अलिंगन दिलेली पोझ तशीच ठेवून फोटो काढायला थोडा वेळ घेतला तर आमचे सासरेबुवा चक्क व्याह्याच्या विस्तारीत बाहुपाशात घोरायला लागल्याची आख्यायीका आहे..तर मी दोन बेल वाजविल्यानंतर अखेर हिने दरवाजा उघडला. मी घरी लवकर कडमडल्यामुळे दुपारचे जागरण होण्याचा घोक्याचा घंटानाद अनावर येऊन ती पुटपुटली (किंबहुना फुरफुरली,फसफसली,फुत्कारली…असो…शेवटी तुमच्यापैकी बरेचसे नवरे असणारच की…शेवटी शब्दापेक्षा भावना महत्वाच्या…त्या पोहोचल्या असतीलच..)
`अहो,काय हाकललं की काय तुम्हाला ऑफीसातून?’
तिच्या त्या आस्थापुर्वक प्रश्नाकडे दुर्लक्ष करत मी फर्मान सोडले `लवकर घरातल्या फुटक्या काचा गोळा कर’…
`काचा’? ही इतक्या मोठ्याने ओरडली की त्या प्राणांतीक सादेने कदाचीत खिडक्यांच्या काचांनीही `ओ’ देत लाकडी सांगाड्याची साथ सोडून दिली असती…
क्रमशः