बेडका बेडका नाच रे....भाग-३
बेडका बेडका नाच रे….भाग-३/३ (प्रशांत नानकर लिखीत एक वायफळ
लेख )
वाचकांच्या काही प्रश्नांना उत्तरेः
१. बेडकांच्या बाबतीत इतके स्वैर
इमाजिनेशन सहन होत नाही…उत्तरः हा लेख वाचायला घेतलात याचाच अर्थ
आधीचे दोन पचवले आहेत.तसा हा ही पचवा..सहनही
होत नसेल व सांगताही येत नसेल तर मात्र लेख व लेखक दोघांना खड्ड्यात घाला आणी…असो…
२.तुमची `मॉड बेडकी’ पाण्यातला
घाम पुसायला टिश्यू पेपर शोधत होती मग पाण्याबाहेर पडून फ्रॉग वॉक करायच्या आधी अंग
कशाने पुसले?...उत्तरः हा चांगला पॉईंट पकडलात..पण काहींना बेडकावरचे इतके इमॅजीनेशनच सहन होत नाहीए मग `तिने बाहेर आल्यावर कोवळ्या उन्हात उताणे पडून सनबाथ घेतला आणि अंग कोरडे केले’
हा तपशील मी तरी का लिहू?
दगडफेकीची झळीत फक्त बेडूकच नव्हेत तर सर्प,सरडे,पाली सारखे अनेक सरपटणारे प्राणी भरडले गेले होते.त्या सर्व प्राण्यांच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक तातडीने बोलविण्यात आली व परिस्थीतीचा आढावा घेण्यात आला. मानवाने चालविलेल्या या असंमंजस कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
बेडूकराज्याकडे यजमानपद होते.सर्प गणराज्याचे प्रमुख ह्या बैठकीचे प्रमुख अतिथी होते.ह्या सगळ्यांमध्ये मानवजमात जर कोणाला थोडीफार वचकून होती तर ती ह्या सर्पसमाजाला.सर्पदंशाने मानवाला शह देणे शक्य असल्याने सर्पगणराज्याला ह्या बैठकीत मानाचे स्थान मिळणे स्वाभावीकच होते. `स्नेक सिक्युरीटी फोर्स’ ह्या सर्पजातीतील एका नावाजलेल्या संस्थेला बेडूकेतर सरपटणा-या प्राण्यांना सुरक्षा देण्याचे कंत्राट देण्यात आले.पण बेडूकजातीवरील संकट मोठे होते.त्यांच्या जीवाला असलेला मोठा धोका लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या राहत्या घरापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत ` टेन दर्जाची’ सुरक्षा `कोब्रा बाऊंसर्स’ तुकडी देणार होती.मानवाने अतिधिटाईने सापांवरच हल्ला केला तर जवळच्या सर्पमित्रांचे वाहनक्रमांक प्रत्येक कोब्रा बाऊंसर्स ला देऊन ठेवण्यात आले होते.गरज पडल्यास गुपचूप सर्पमित्रांच्या मोटारसायकलच्या डिक्कीत जाऊन शांत पडून राहण्याचे ठरले होते.पण सर्पमित्र अधिकृत व परवानाधारी असावा असेही ठरले.यासाठी गौताळ्याच्या जंगलात तडीपार केलेल्या काही सर्पबंधूंना शहरातल्या त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर गाठून अधिकृत सर्पमित्रांची माहिती घेण्याचेही ठरले. दरम्यान बाउंसर्स पैकीच काहींनी बेडूकग्रहण करू नये यासाठी त्यांना विशेष बेडूकनिरोधक लस टोचण्याचेही ठरले.या लसीमुळे बेडूक गट्ट्म करण्याची त्यांची वासना काही कालमर्यादेपुरती लोप पावते.स्वतः सर्पप्रमुख अतिशय तत्ववादी असल्याने ते स्वतः ही लस टोचून घेऊनच बैठकीला आले होते.त्यामुळे भोजनाच्या वेळेस आणलेल्या काही मृत बेडकांचा सेवनासही त्यांनी नकार दिला व आज `निर्गीळी’ असल्याचेही सांगितले.पण जशी संघ्याकाळ होऊ लागली तसे त्यांच्या जिभेची हालचाल सुरू झाल्याने कार्यक्रम लवकर आटोपता घ्यावा हे जाणकारांच्या लक्षात आले.जाता जाता त्यांनी फणा काढून १० च्या आकडा दाखवून `टेन’सिक्युरीटीच्या कामाचा बिगूल वाजवला आणी त्या रात्रीपासूनच कोब्रा बाऊंसर्स कामाला लागले.
दुस-या दिवशी अचानक शहरात सर्पदंशाच्या घटना अनेक भागात झाल्याची वार्ता आली.बेडकाला दगड मारायच्या उद्देशाने सलीम अलीवर जमलेल्या काही होतकरू मध्यमवयीन पुरूषवर्गाला फणा काढून स्वागताला उभे राहिलेले नागराज पाहून परासाकडे तातडीने पळावे लागले तर त्यातूनही एकवेळ बायकोची बडबड ठीक किमान सासू अबोल मिळेल ह्या मनोहरी विचारांनी पिसाळलेल्या काहींनी नागराजावर दगडफेक चालू केली.त्यात झालेल्या चकमकीत सर्पदंशाच्या संख्येत वाढ झाली.दिवसभरात शहरभर हाःहाकार माजला…सर्पमित्रांचे फोन सतत एंगेज येऊ लागले…३०० रुपये प्रतीसापाचा पकडण्याचा दर सरळ सरळ चार आकडीत पोहोचला..साप पकडण्यासाठी बाहेरगावातील सर्पमित्र आयात करावेत याविषयी सूचना देण्यात आल्या..पकडलेले बरेचसे साप किंग कोब्रा निघाल्याने सर्पमित्रांनीही आश्चर्य व्यक्त केले व कोब्रा असल्यास दर रू.५००० असा मेसेज सर्पमित्रांकडून बोलविणा-याला दिला जाऊ लागला.इतके कोब्रा तर कोकणस्थांच्या लग्नालाही जमत नाहीत हा एक खास पुणेरी विनोद व्हॉटसअप वर फिरू लागला.
कोब्रा बाऊंसर्स नी आपले काम चोख बजावायला सुरूवात केलेली होती.त्याचा परिणामही एका दिवसातच दिसायला लागला.बेडकांच्या पाठीमागे हात धुऊन लागलेले मनुष्यगण अचानकच सर्पदंशाच्या भितीने का होईना पण थोडे मागे हटले होते.दगडफेकीच्या तुरळक घटना सोडल्या तर वातावरण शांत होते. माणसाने बेडकाला दगड मारल्यामुळे सापांचे अन्न त्यांचापासून हिरावले गेल्याच्या निर्माण झालेल्या भावनेतूनच त्यांनी दगड मारणा-यास दंश करायला सुरुवात केली असावी असा अंदाज काही सर्पमित्रांनी लावला.
दुस-या दिवशीही वातावरण निवळलेले होते.बेडूकराज्यातले व्यवहार पुर्वस्थीतीत येण्यास सुरूवात झालेली होती.नुकताच पुन्हा पाऊस झाल्याने `कितने दिनो के बात है आई सजना रात मिलन की’ असली गाणी घरोघरी वाजू लागली होती (व त्याचा अर्थ एकमेकांना सोप्या भाषेत समजावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते).येणा-या सुकाळाची नांदीच जणू `कोब्रा बाऊंसर्स’ नी दिलेल्या संरक्षणामुळे दोनच दिवसात तयार झाली.
पण हा आनंद बेडूकजातीला फार काळ उपभोगता आला नाही..दुस-या दिवशीच्या रात्रीच…किर्र अंधारात…कोब्रा बाऊंसर्स च्या `लेक किलर’ ब्रिगेड मधील एका कोब्रा ची जीभ अचानक लपलपायला लागली…तो अचानकच सळ सळ करत तलावातील झुडूपात गेला आणी…येताना त्याच्या निमूळत्या तोंडात आडवा धरलेला एक लठ्ठ बेडूक सुटण्याची धडपड करत पकडलेला दिसला…त्यानंतर पुढील अर्ध्या तासात.हल्लक्ल्लोळ माजला…रक्षणासाठी आलेले कोब्रा बाऊंसर्स भक्षक बनून बेडूकजातीवर तुटून पडले…अनेक बेडूक शहीद झाले.बेडूक प्रतिबंधक लस दिलेल्या मुदतीपेक्षा खूप लवकर निकामी झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे सर्पगणराज्याच्या अध्यक्षांनी सांगितले व त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली.त्याचबरोबर झालेल्या घटनेचा तपासणी अहवाल येईस्तोवर संरक्षण काढून घेत असल्याचेही सांगितले.त्यावर `रेप्टाईल फोरम’ ने तीव्र शब्दात निषेध नोंदवत सर्प अध्यक्षांना या `सिरीयल टोड किलींग’ बद्दल दोषी ठरविले.
त्या रात्री बेडूकविधीमंडळाची बैठक घेण्यात आली.अचानक आलेल्या ह्या दुहेरी संकटामुळे सर्वच हवालदील झाले होते.विरोधी पक्षांनी सापासारख्या विषारी व लबाड जातीवर संरक्षणाची जबाबदारी सोपविल्याबद्दल सत्ताधारी पक्षाला चांगलेच फैलावर घेतले.
दरम्यान साप दिसण्याचे प्रमाण थोडे कमी झाल्याने दगडफेकीच्या घटना पुन्हा सुरू झाल्या. बेडूक महासंघाच्या घेतलेल्या आपत्कालीन बैठकीत आता शेवटचा उपाय म्हणून सरळ सरळ मानवकुळाशीच चर्चा करून हे संकट टाळण्याचे सर्वानुमते ठरले.त्यानुसार ५ बेडकांचे एक शिष्टमंडळ निवडण्यात आले.पण एक सोडून पाच पाच निशस्त्र बेडके असे मोकळे पाहून आख्खं शिष्टमंडळच नेस्तनाबुत झाल्याशिवाय राहणार नाही हा मुद्दा मांडण्यात आला.त्यावर त्यातील एका ज्येष्ठ बेडकाने ह्या विषयी पुरूष मानवजातीशी न बोलता स्त्री मानवजातीशी बोलावे हा मोलाचा सल्ला दिला अन प्रस्तुत दगडफेकीच्या घटना स्त्री मानवासाठीही घातक असल्याने ती सहानुभूती मिळवावे असे ठरले..मग स्त्री मानवाशी चर्चा करण्यासाठी मध्यस्थी म्हणून मार्जारकुळातील `किटी’ व श्वानकुळातील `टॉमी’ अशा मानवजातीशी कौटुंबीक सलगी असणा-या पण एकमेकांमध्ये छत्तीसचा आकडा असणा-या दोन प्राण्यांची निवड झाली.सुरुवातीला मानवस्वभावाच्या लहरीपणाचा पुरेपुर अनुभव असलेल्या या दोघांनीही हे काम किती अवघड असल्याचे शिष्टमंडळाला पटवून दिले.पण त्याच बरोबर योग्य मानधन मिळाल्यास प्रयत्न करण्याची तयारीही दाखविली.त्यांच्या मानधनाच्या या `सिग्नेचर’ मागणीमुळे ज्येष्ठ बेडकाने आपल्या बाहेर आलेल्या डोळ्यांनीच इतरांना ` माणसाशी बोलण्यासाठी आपली निवड योग्य’ असल्याचे खुणावले आणी पाण्यातील काही चविष्ठ मासे व काही चटकदार किडे ह्यांची पुढील ६ महिने आठवड्यातून एकदा मेजवानी देण्याच्या बोलीवर सौदा ठरला.ऍडव्हान्स म्हणून सोबत आणलेले काही मासे तिथेच देण्यात आले. किटी आणी टॉमी ह्यांनी आपआपसातला अंतर्गत कलह विसरून सोबत मेजवानीवर ताव मारला. प्रसंगी कलह विसरून सोबत येण्याची ही कलाही त्या दोघांना मोठ्या राजकारण्यांच्या घरात वावरत असल्याने पुर्ण आत्मसात झालेली होती.दोघांनाही तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.
किटी ने लडीवाळपणे ,मालकीणीच्या कुशीत शिरत, मालक लपून छपून बंगल्यामागील तलावाजवळ बेडूक शोधत असल्याचा निरोप दिला व असेच चालू राहिले तर लवकरच तुमची बोलती बंद होण्याचे स्पष्ट संकेतही दिले.त्यावर इलाज म्हणून म्याव म्याव असे म्हणत मालकीणिच्या कानात काहीतरी सागितले..ज्यावर तिने किटीला भरगच्च मलाईचे दूध भांड्यात टाकले…
दुसरीकडे टॉमी ने बाईंचा पायाला लाडीवाळपणे चाटत व हळूच पायावर डोके ठेवत वरील सर्व प्रक्रीया पुर्ण केली…टॉमी ने जे काही सांगितले त्यावर बाईंनी स्पेशल ऑस्ट्रेलीयाहून आणलेले नवे कोरे हाड टॉम्याला चावायला दिले….
दुस-या दिवशी असाच व्हॉट्स अप पळविताना अशाच एका पोस्ट ने पुन्हा हबकलो…ह्या वेळेस ती पोस्ट होती…
बेडकाला दगड मारला की
मूकी बायको मिळणार ..ही खरोखरच अफवा निघाली....खरी बातमी
अशी…..ज्यांनी ज्यांनी निष्पाप बेडूक प्रजातीवर दगड मारला त्यांनी
आता आपल्या बायकोला सोन्याचा बेडूक करून द्यावा…तोही छाती व अंग
पुर्ण फुगवलेला…तरच ह्याच जन्मी सध्याच्या बायकोपासून मुक्तता
होईल व सोबत सोन्याची बेडकी बनविली तर तुम्हाला आज ह्वी हवीशी वाटणारी एखादी स्त्री
पुढील आयुष्यात हमखास तुमची होईल.
मित्रांनो काय सागू तुम्हाला व्हॉटस अप ची कमाल…
पाते लवते न लवते तोच झाला नव-याचा हमाल..
बेडूक दगड राहिले दूर नवरे सगळे सोनाराच्या दारी
कॅरेट चालतील उन्नीस बीस पण बेडूकजोडी बनवा प्यारी
काहीही करून आधी माझा बेडूक बनवा फुगवून तट्ट
बेडकी ही द्या सोबत असू देत मग दिसायला मठ्ठ
हुकली आता तर पुन्हा येणार नाही ही गोड संधी
बायको बदलून मिळणार..माझी तर झाली
हो चांदी
झालो जरी कंगाल…आणी आला जरी
प्रलय..
बायकोला सोन्याची बेडूकजोडी हाच माझा निश्चय…
तर समस्त मानवकूळातील
बायकांनो…लवकरच तुम्हाला सोन्याची बेडूकजोडी
मिळणार आहे…बेडूक मात्र तट्ट फुगलेला हवा हं….
समाप्त…