बुंग-२…(भाग-३)
बुंग-२…(भाग-३)
बुंग टू असे वाचावे…विशेष सूचनाः
१. या लेखाचे नाव `धूम-२’ च्या धर्तीवर न ठेवता `दबंग’ प्रेरणेने `दबुंग’ ठेवावे असे काही सलमानप्रेमींनी कळवले आहे.पण `नामांतर’ या विषयासोबत येणा-या प्रदीर्घ चळवळीच्या धास्तीने आम्ही तो विचार तुर्तास प्रलंबीत (की निलंबीत..) ठेवत आहोत.
लायसेन्स एकदाचे दाखवून व नंतर त्याला व्यवस्थित पाकीटाच्या कार्ड होल्डर मध्ये ठेवत मी एकदाचा आत प्रवेश केला.
आता पुढे…
आत गेल्या गेल्या मला मुघल निर्मीत किल्ल्यांवर असणा-या `दिवाण-ए-आम’ व `दिवाण-ए-खास’ यातील फरक काय असतो याचा उलगडा झाला.बाहेरच्या जागोजागी असणा-या अस्वच्छतेची,धुळीची सवय झालेल्या या अस्सल `दिवाण-ए-आम’ भारतीय सामान्य नागरिकाला आतले चकचकीत,स्वच्छ व भव्य `दिवाण-ए-खास’ वातावरण मे महिन्याच्या भर उन्हातून घरात आल्यावर मिळणा-या कैरीच्या थंडगार पन्ह्यासारखे सुखावह वाटले. शांत एका जागेवर उभा राहून तो पुर्ण परिसर ग्लासमध्ये पन्हयाचा खाली राहिलेला गर देखील जिभेने चाटून खावा त्याप्रमाणे न्याहाळला.विवीध विमान कंपन्यांचे काऊंटर्स,अनेक आरामखुर्च्या,जागोजागी लावलेले टी.व्ही.संच,चकचकीत फरश्या,त्याला अजूनच चकचकीत करण्यासाठी चाललेले स्वच्छता कर्मचा-यांचे प्रयत्न (इतके चकचकीत की एका पिंगट केसांच्या भारतीय महिलेचा लिपस्टीक व्यवस्थित करण्यासाठी हातात धरलेला आरसाही `गोल मटोल’ रुप त्या फरश्यांमध्ये न्याहाळण्यात असल्याचा मला भास झाला. (स्वतःचे त्या बाईचे नव्हे..उगाच कशाला आपण कोणाच्या भरभक्कमपणाविषयी बोला..)), कधीही आजवर पाहिले नाही अश्या पध्द्तीचे लोखंडी पाईप चे छताचे नक्षीकाम,अनेक प्रवाश्यांची रेलचेल. मला तर आताच हवेत तरंगायला झाले.सुदैवाने हातात व खांद्यावर असणा-या बॅगांच्या वजनाने बहुदा मी जमिनीवरच राहिलो.
एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की तेथे मी सोडलो तर जवळजवळ प्रत्येक व्यक्तीने सामान हे चार चाकी ट्रॉल्यांवर ठेवलेले होते. आजूबाजूला नजर टाकल्यावर तेथे एक खूपच मोठी व भरपूर चाके असणारी ट्रॉली कोप-यात लावलेली दिसली.`लग्नाच्या पुर्ण व-हाडासाठी असणार बहुदा’ माझ्या मनात त्या महाकाय ट्रॉलीचा उपयोग डोकावला. माझ्या सामानाच्या मापाची लहान ट्रॉली मला एकही तेथे दिसेना. त्याचवेळेस माझ्यापेक्षा थोडासा वयाने लहान असणा-या (म्हणजे वय वर्षे साधारण १० ) एका बालकाने त्याच (व-हाडासाठी वाटलेल्या) महाकाय ट्रॉलीतून एक ट्रॉली अलगद ओढून बाहेर काढली व ती महाकाय ट्रॉली म्हणजे अनेक ट्रॉलीज एकेमेकात फसवून (अडकावून या अर्थाने) बनलेली साखळी असल्याचा मला साक्षात्कार झाला.स्वतःच्या या घोर अज्ञानाचे नैराश्य पुढे वाढून ठेवलेल्या विमानप्रवासाच्या उत्सुकतेत विरघळवत मी `जेट’ चे काऊंटर शोधले.माझ्या समोर रांगेत पुन्हा एकदा ते विदेशी जोडपे आपल्या भरगच्च शरीर व सामानासोबत होते. माझ्या आधी त्यांनी त्यांच्या बहुतांशी बॅगा काऊंटर वाल्या बाईच्या शेजारी असणा-या बेल्ट वर टाकल्या होत्या. तेथे उभ्या असणा-या व हिरव्या रंगाचे रेडीयम वाले जॅकेट घातलेल्या एका कर्मचा-याने त्यांना एक मोठे पान चिटकावले. (म्हणजे त्या बॅगस ला जोडप्याला नव्हे) मग आपल्या हातात ठेवलेल्या दोन बॅगज लाही दो-याने लेबल अडकावून व त्या बाईकडून कसलेसे छापील कार्ड घेत दोघांनी मला पुढे येण्यासाठी जागा दिली. त्या काऊंटरसमोर जाऊन मी उभा राहिलो व पलिकडचे दॄश्य पाहून मी क्षणभर भांबावलो.
मी इतका वेळ काऊंटर वर बसलेली बाई ( `काऊंटर पलीकडे बसलेली बाई’ हा शब्दप्रयोग जास्त सोज्वळ राहील नाही का? ) असेल असे तिच्या आवाजावरून काढलेल्या निष्कर्षाला नवीन बांधलेल्या उड्डाणपुलाला त्याच्या खाली रात्रीतून येऊन संसार थाटलेल्या कुटूंबाच्या मुळ पुरूषाने मारलेल्या शिंकेनेच तडा जावा याप्रमाणे तडा गेला.समस्त व्याकरणपंडीतांना फेफेडे आणायला लावत प्रथमच स्त्रीलिंगी `ती’ हा वास्तवात पुल्लींगी `तो’ निघाला.या आधी आवाजावरून फसल्याचे दुसरे उदाहरण म्हणजे उषा उत्थुप. या उत्थुपबाईंचे `हरी ओम हरी’ जेव्हा मी प्रथम ऐकले तेव्हा अतिशय गोड किशोरवयीन पॉप मेल सिंगर आला आहे व त्याचे हरी ओम हरी,चाराने की खारी..बायको बोम मारी…(असे पुढील काव्यनिर्माण स्वतःच्या काव्यप्रतिभेने करून) हे उत्कॄष्ट गीत नक्की ऐका अशी एक मोफत जाहीरातही मी करीत असे.कालांतरानी त्या उत्थुप नावाच्या गायकाचे पुर्ण नाव उषा उत्थुप असल्याचे समजल्यावर जो धक्का बसला तोच आज पुन्हा बसला.
पण तो `तो’ निघाला हे ठीकच झाले कारण अतिशय विरळ होत चाललेले डोक्यावरचे व वाढत चाललेले मिशीवरचे व हातावरचे केस या चुकलेल्या व्यस्त समिकरणाची स्त्री ही प्रथमच विमानप्रवासास निघालेल्या माझ्यासारख्या चिमुरड्याला निव्वळ भिती दाखविण्यासाठी ठेवली आहे असे वाटले असते( ७५ किलोचा व तिशी ओलांडलेला देह बाळगून स्वतःला चिमूरडा म्हणवून घेण्याची धिटाई बायकोपासून लांब गेल्याने बळावत चालली आहे अश्या निष्कर्षाला न येता हा शब्दप्रयोग विमानप्रवासाच्या अनुभवाच्या बाबतीत केला आहे हे ध्यानात घ्यावे).व कदाचीत विमानप्रवास हा आमच्यासारख्यांसाठी `इन्स्टालमेट्स’मुक्त जिवनाच्या स्वप्नासारखेच अपुरेच राहिले असते. `युअर टिकीट सर’ तुतारी बासरीच्या आवाजात म्हणाली व मी भानावर आलो. मी तिकीट त्याच्यापुढे ठेवले.ते बघून तो काही टाईप करू लागला. `एनी बॅगेज सर’?..मी माझ्या खांद्यावरची एक व हातातली एक अशा दोन्ही बॅगा वर उचलून दाखविण्याचा प्रयत्न करत `वन..टू…’ असे बॅगांच्या संख्येचे मोजमाप त्याला दिले..माझ्या त्या वन..टू…च्या पुढे लगेच `बकल माय शू’ असे मात्र तो म्हणाला नाही. त्यादरम्यान दोन्ही बॅगा वर धरल्याने माझा आकार मात्र त्या`बिग फॅट हेन’ वजा झाला. सर बोथ इन बॅगेज? ऑर हॅंडबॅगस…?’ त्याने हॅंडबॅग म्हटल्यावर मला लगेच `विस किलो’ आठवले.पण माझ्याकडे वजनाचा हिशेब तयार होता.मग मी लगेच `धीस लगेज इन बॅगेज’ असे यमक जुळवत ती मोठी बॅग बेल्ट वर ठेवली व त्या स्त्री-पुरूष आवाजातील त्या द्वंद्वगिताचा अंत केला. एक प्रिंट निघाली व ती त्या बॅगला फास दिल्यागत डकवण्यात आली. त्यामुळे गुदमरून जाऊन माझ्या त्या काळ्या कुळकुळीत बॅगेचा चेहेरा अजूनच काळवंडला.
क्षणार्धात ती त्या बेल्टवरून पुढे सरकत नजरेआड झाली. माझ्या हॅंडबॅगला लावण्यासाठी त्याने मला एक दोरा लावलेला टॅग दिला.एक वेळ फेसबुकवर फोटो टॅग करणे लवकर जमले पण हा टॅग लावताना पुन्हा घाम निघाला आणी आमच्या त्या नवखेपणाचा फायदा घेत तो हिरव्या जॅकेटवाला मला टॅग लावून देत उपकाराच्या ओझ्याखाली दाबून गेला. दरम्यान `युअर बोर्डींग पास फॉर मुंबाsssय सर’ असे म्हणत नाटकाचा फुकट पास दिल्यासारखा एक आयताकृती जाडसर कागद काऊंटरवाल्याने माझ्याकडे दिला. त्याच्या त्या `मुंबाsssय’ या `शांघाsssय’ सदॄश्य उच्चारांनी आपला शांघाय कधी होतो यासाठी मुंबादेवीला साकडं घालून वाट बघत बसलेली आपली मुंबापुरी मात्र प्रसन्न पावली असणार.
त्या पासवर मोठ्या अक्षरात वर `जेट कनेक्ट’ असे लिहीलेले होते.त्यानंतर माझे नाव,कुठून कुठे जाणार वगैरे मजकूर होता.`शिट नं’ नीट बघून घ्या, बोर्डींग पास वर लिहीलेला असतो हे गोंदविलकरांचे वाक्य आठवले ( `स’ ला `श’ म्हणायच्या त्यांच्या सवयीमुळे भल्याभल्यांना गप्प करणा-या क्रिकेटर व समालोचक नवज्योतसिंगास ते `सिद्धू' आडनाव बदलावयास लावतील हे मात्र नक्की..) . मग कुठे `शिटा’ यचय हे पासवर नीट वाचले. `सीट ३७ सी’ अशी ओळ दिसली आणी मग सकाळी सकाळी `बसायला’ जागा मिळणार याचा निखळ आनंद झाला.(ह्या आनंदाचा खरा परामर्श पंधरा लोकात एकच `विसर्ग विहार’ असणा-या घरात राहिल्यशिवाय समजणार नाही.)
क्रमशः लवकरच…